Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १७ जानेवारी २००९९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

अग्रलेख

ग्रंथविश्व

त्रिकालवेध

लोकमानस

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)


तरले.. अन् तारले!
हडसन नदीत विमानाचे ‘इमर्जन्सी लँडिंग’
१५५ प्रवासी सुखरुप बचावले
न्यूयॉर्क, १६ जानेवारी / पी.टी.आय.

‘देव तारी त्याला कोण मारी’, या उक्तीचा प्रत्यय देणारा अभूतपूर्व चमत्कार आज हडसन नदीच्या पात्रात घडला. न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच यूएस एअरवेजचे ए-३२० या प्रवासी विमानाचे हडसन नदीच्या पात्रात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. इंजिनातील बिघाडामुळे ही दुर्घटना घडली. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने विमानातील सर्वच्या सर्व १५५ प्रवासी सुखरुप बचावले. वेगाने वाहणाऱ्या हडसन नदीच्या पात्रात विमान उतरवणारा वैमानिक प्रवाशांचा जीवनदाता ठरला. विमानाचे दोन्ही इंजिन काम करत नसताना वैमानिकाने विमान नदीच्या पात्रात उतरवण्यात यश मिळवले. तापमान उणे ७ अंश सेल्सियस असल्याने पाण्यावर बर्फाचा थर जमलेला होता. त्यामुळे विमान पाण्यात बुडाले नाही. पक्ष्याची धडक बसल्याने इंजिन बंद पडले असावे, असा अंदाज आहे. विमान पाण्यावर तरंगल्यानंतर काही प्रवाशांनी थेट बोटीत उडय़ा घेतल्या तर काही प्रवासी विमानाच्या दोन्ही पंखांवर उभे राहून सुटका होण्याची प्रतीक्षा करत होते. काही मिनिटातच पोलिसांनी आणि मदत पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य वेगाने सुरू झाले.

थ्री चिअर्स फॉर मुंबई
मुंबईला ३८ वे रणजी विजेतेपद; धवलचे पाच बळी
हैदराबाद, १६ जानेवारी/पी.टी.आय.

या मोसमात भन्नाट फॉर्मात असणाऱ्या धवल कुलकर्णीने दुसऱ्या डावात उत्तर प्रदेशचा निम्मा संघ ७६ धावांतच गारद केला आणि मुंबईने २४३ धावांच्या मोठय़ा विजयासह ३८ वे विक्रमी रणजी जेतेपद पटकावले. शेवटच्या दिवशी विजयासाठी ५२५ धावा फटकावण्याचे अशक्यप्राय आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या उत्तर प्रदेशचा दुसरा डाव केवळ ७१.५ षटकांत २८१ धावांतच आटोपला; पण त्यापूर्वी त्यांच्या अमिर खान (४३) आणि प्रवीण गुप्ता (२५) या शेवटच्या जोडीने ५५ धावांची भागीदारी करून मुंबईकर गोलंदाजांचा अंत पाहिला. मात्र धवल कुळकर्णीने चहापानानंतर प्रवीण गुप्ताचा अडथळा दूर करून मुंबईच्या ३८ व्या रणजी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले आणि मुंबईच्या ड्रेसिंगरूममध्ये विजयाचा जल्लोष सुरू झाला.
मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्याच सत्रात उत्तर प्रदेशची ४ बाद ५५ अशी अवस्था करून आपल्या वर्चस्वाची साक्ष दिली. कर्णधार महम्मद कैफ (७२) आणि भुवनेश्वर कुमार (८०) यांनी पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भर टाकून त्यांच्या डावाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. सकाळी धवल कुळकर्णीने पहिल्या डावातील यशस्वी फलंदाज शुक्लाला गलीतील रोहित शर्माद्वारे झेलबाद करून मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्यानेच सुरेश रैनाचाही अडसर दूर केला. कुळकर्णीच्या चेंडूला कट करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि स्लीपमध्ये सचिन तेंडुलकरने झेल टिपण्यात कुचराई केली नाही. झहीर खान आणि आगरकरने तन्मय श्रीवास्तव आणि परविंदर सिंग याचे बळी मिळविले.उपाहारानंतरच्या सत्रात रमेश पोवारने कैफ-भुवनेश्वर कुमार ही जमलेली जोडी फोडण्यात यश मिळवले. पोवारच्या गोलंदाजीवर कैफ स्लीपमधील मुजुमदारकडे (बदली खेळाडू) झेल देऊन तंबूत परतला. धवलने भुवनेश्वर कुमारचा (८०) अडसर दूर केला.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. आनंद यादव
मिळालेली मते : आनंद यादव ३२२ ’ शंकर सारडा १५५

औरंगाबाद, १६ जानेवारी/खास प्रतिनिधी

महाबळेश्वर येथे मार्चमध्ये होणाऱ्या ब्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव आज निवडून आले. त्यांनी समीक्षक डॉ. शंकर सारडा यांचा १६७ मतांनी पराभव केला.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यालयात आज मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. चंद्रदेव कवडे यांनी निकाल जाहीर केला. यंदा प्रथमच अत्यल्प मतदान झाले आहे. साठ ते बासष्ट टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी घटक संस्था आणि अन्य संस्था मिळून ७९१ मतदार होते. त्यापैकी ४८९ मतदन झाले. डॉ. यादव यांना ३२२ व श्री. सारडा यांना १५५ मते मिळाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत १२ मते अवैध ठरली, असे डॉ. कवडे यांनी सांगितले.

बेळगावात मराठी भाषकांवर पुन्हा दंडुकेशाही
महामेळाव्याचे व्यासपीठही उचलले; २१६ जणांना अटक

राजेंद्र जोशी
कोल्हापूर, १६ जानेवारी

मराठी भाषकांचा आवाज दडपण्याची साठ वर्षांची परंपरा कायम ठेवलेल्या जुलमी कानडी राजवटीच्या मुर्दाडपणाचे दर्शन शुक्रवारी बेळगावातील मराठी भाषकांना पुन्हा एकदा झाले. कानडी अन्यायातून मुक्तता मिळविण्यासाठी मराठी भाषकांनी आयोजित केलेला महामेळाव्याला परवानगी नाकारून संमेलनस्थळावरील व्यासपीठाचे साहित्यही उचलून नेण्याची मर्दुमकी कर्नाटक शासनाने दाखवली. त्याबरोबरच सर्वत्र जमावबंदी लागू करून सीमा चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यासह सुमारे २१६ जणांना अटक केली. यामुळे सीमाभागात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.

मंदीचा राज्याला फटका
महसुलात ३० टक्क्यांची घट
मुंबई, १६ जानेवारी / खास प्रतिनिधी

जागतिक मंदीचा फटका आता राज्य शासनालाही बसू लागला असून, राज्याच्या महसुलाचे मुख्य स्त्रोत असलेल्या विक्रीकर आणि मुद्रांक शुल्कावर लक्षणीय परिणाम झाला आहे. या स्रोतांद्वारे येणारे महसुली उत्पन्न अर्थसंकल्पातील अंदाजापेक्षा सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी घटले असतानाच सहावा वेतन आयोग, शेतकरी पॅकेज आणि विविध घटकांना खुश करताना वित्त खात्याची झोळी रिकामी होत आली आहे. परिणामी शासकीय खर्चावर बंधने येऊ शकतात. मात्र विकास कामांना कात्री लावायची नाही, असा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला आहे. यंदा विक्रीकरातून येणारा महसूल सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी घटला आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबर या सणासुदीच्या काळात विक्रीकराचे उत्पन्न चांगले असते. मात्र नेमक्या या दोन महिन्यांत उद्दिष्टापेक्षा १७०० कोटी रुपये उत्पन्न कमी आले आहे. त्यामुळे मार्चअखेर उत्पन्नात आणखी मोठय़ा प्रमाणावर घट होण्याची भीती आहे. मुद्रांकशुल्क विभागाला साडेआठ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्यापर्यंत अपेक्षित उत्पन्न मिळाले होते. परंतु जागतिक मंदीनंतर स्थावर मालमत्तेच्या व्यवहारांवर परिणाम झाले. गेल्या दोन महिन्यांमध्ये मुद्रांक शुल्काचे उत्पन्न २५ ते ३० टक्क्यांनी घटल्याचे मदत व पुनर्वसन खात्याचे प्रधान सचिव रमेशकुमार यांनी सांगितले. उत्पन्नात घट झाल्याने वर्षांअखेर उद्दिष्टाच्या सुमारे १००० ते १२०० कोटी रुपये उत्पन्न कमी येण्याची शक्यता आहे. या विभागाला मुंबई, ठाणे व पुण्यात चांगले उत्पन्न मिळते. या तिन्ही शहरांमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्राला चांगलाच फटका बसला आहे. याबरोबरच मोटार कराच्या उत्पन्नावरही विपरित परिणाम झाला आहे. परंतु विशेष म्हणजे मद्य विक्रीतून मिळणाऱ्या उत्पादनशुल्कात मात्र फारसा परिणाम झालेला नाही.

‘भारताने मवाळ भूमिका स्वीकारलेली नाही’
नवी दिल्ली, १६ जानेवारी/पीटीआय

भारतामध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधारांना आमच्या ताब्यात द्यावे या मागणीबाबत भारत अद्यापही आग्रही असून, आम्ही अजिबात मवाळ भूमिका स्वीकारलेली नाही असे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज सांगितले. पाकिस्तानने मुंबईवर झालेल्या हल्ल्याची प्रामाणिकपणे व पारदर्शक रितीने चौकशी करून कटामागील सूत्रधारांना जेरबंद केले पाहिजे असेही मुखर्जी यांनी ठामपणे सांगितले. मुंबईमधील दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधारांना भारताच्या हवाली करणे शक्य नसेल तर पाकिस्तानमध्ये त्यांच्यावर योग्य व कठोर कारवाई केली जावी. अशा कारवाईस भारताचा आक्षेप असणार नाही असे उद्गार प्रणव मुखर्जी यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काढले होते. या उद्गारांसंदर्भात पत्रकारांनी आज प्रणव मुखर्जी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी मुखर्जी त्यासंदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, भारतामध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधारांना आमच्या ताब्यात देण्याच्या मागणीबाबत मवाळ भूमिका घेण्याचा किंवा ती सोडून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुंबई हल्ल्यामागील सूत्रधारांना भारताच्या हवाली न करता त्यांच्यावर पाकिस्तानमध्येच खटले चालविण्यात येतील असे पाकिस्तानने जाहीर केले होते. त्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काढलेल्या उपरोक्त उद्गारांनी खळबळ माजली. भारतात दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत, त्यामुळे या हल्ल्यांमागील सूत्रधारांवर भारतातच कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. ही काही वेगळी मागणी आहे असे नाही. प्रणव मुखर्जी म्हणाले की, पाकिस्तानने ज्या देशांशी गुन्हेगार हस्तांतरण करार केलेला नाही अशा देशांमध्ये गुन्हे केलेल्या व्यक्तींना संबंधित देशांत हस्तांतरित केले जावे अशी तरतूद पाकिस्तानमध्ये १९७२ साली करण्यात आलेल्या हस्तांतरण कायद्यामध्येच आहे.

संजय दत्त निवडणूक लढविणारच
लखनौ, १६ जानेवारी / प्रतिनिधी

लोकसभेची निवडणूक लखनौमधून लढविण्याची घोषणा अभिनेता संजय दत्त याने आज अखेर पत्रकार परिषदेत केली. समाजवादी पक्षाच्या वतीने ही निवडणूक लढविणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. आपण कायदेशीर सल्ला घेतला असून निवडणूक लढविण्यास कोणतेही अडथळे नसल्याचे सांगत भावासमान असलेले अमरसिंग यांच्या सूचनेवरून निवडणूक लढविल्याचा आपण निर्णय घेतल्याचेही त्याने सांगितले. मी कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असून स्वत:चे निर्णय घेण्याची माझ्यात क्षमता असल्याचे सांगून संजय दत्तने प्रिया दत्त यांना अप्रत्यक्षपणे टोला मारला. संजय दत्त निवडणूक लढविणार असल्याची समाजवादी पक्षाने ८ जानेवारीला घोषणा केली होती.

एचडीएफसी बँकेचे गृहकर्ज स्वस्त
मुंबई, १६ जानेवारी / प्रतिनिधी

वित्तक्षेत्रातील आघाडीची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एचडीएफसीने नव्या ग्राहकांसाठी गृहकर्जावरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. ३० लाख रूपयांपेक्षा कमी कर्ज घेणाऱ्यांसाठी ९.७५ टक्के तर ३० लाख रूपयांपेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्यांसाठी १०.७५ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. आजपासून या नव्या व्याजदराची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

‘नन्हे हंसगुल्ले’मध्ये बालकलाकारांची धम्माल
मुंबई, १६ जानेवारी / प्रतिनिधी

‘नन्हे हंसगुल्ले’साठी झालेल्या चित्रीकरणात परीक्षक म्हणून ‘लॉटरी’ या चित्रपटातील अभिनेते अभिजीत सावंत आणि मनीष केळकर उपस्थित होते. या परीक्षकांसमोर बाल कलाकारांनी विनोदी अभिनय सादर करीत हास्यकल्लोळ उडवून दिला.
मोहितने चित्रपटातील आईच्या भूमिकेचे विडंबन यावेळी सादर केले तर अभिषेकने चित्रपटातील लहान मुलांचे विडंबन सादर केले. बालकलाकारांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस अभिनयामुळे प्रेक्षकांचेही मनोरंजन झाले. बाल कलाकारांच्या कसदार अभिनयामुळे ‘नन्हे हंसगुल्ले’ मालिका लोकप्रिय ठरली आहे. प्रत्येक आठवडय़ात बाल कलाकारांमधील स्पर्धा अधिकाधिक तीव्र होत चालली आहे. सध्या या मालिकेत आठ कलाकार उरले आहेत. त्यातील कोणावरही स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ येऊ नये, अशी भावना प्रेक्षकांमध्ये आहे. स्पर्धेतील ही उत्कंठा आता दिवसेंदिवस अधिकच वाढत जाणार आहे. ही मालिका उद्या, शनिवारी रात्री ९ वाजता कलर्स वाहिनीवर सादर केली जाणार आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८