Leading International Marathi News Daily
शनिवार, १७ जानेवारी २००९

पेइंग गेस्ट असल्यास बिनभोगवटा शुल्क वसुली अयोग्य
पेइंग गेस्ट आणि लिव्ह लायसन्सवर राहणारा यामध्ये एवढा सूक्ष्म फरक आहे कि त्या दोघांमध्ये लक्ष्मण रेषा काढणे कठीण आहे. परंतु पेइंग गेस्ट हा घरमालका (लायसन्सर) समवेत राहत असल्याने सोसायटी त्याचेकडून बिनभोगवटा शुल्क वसूल करू शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्ययाालयाने दिला आहे त्याची हकिकत.
मध्यंतरी ‘वास्तुरंग’च्या वाचकाने सहकारी गृहनिर्माण संस्थेत ‘पेइंग गेस्ट’चे स्थान काय असा प्रश्न विचारला होता. या वाचकाने आपल्या म्हणण्याच्या पुष्ठय़र्थ पुण्यातील
 

हाऊसिंग सोसायटय़ांत अनेक विद्यार्थी ‘कॉट बेसिस’वर राहतात असे म्हटले आहे. परंतु पेइंग गेस्ट म्हणजे ‘लायसन्सी’ नव्हे त्यामुळे त्यांच्याकडून बिनभोगवटा शुल्क वसूल करता येत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिला आहे.
घाटकोपर येथील एका वृद्ध महिलेने जी एका सहकारी गृहनिर्माण संस्थेची सदस्य आहे, आपल्या जागेत कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांना ठेवले होते. तेव्हा सोसायटीने त्या सभासद महिलेने बिनभोगवटा शुल्क भरले पाहिजे असा ठराव केला.
वस्तुस्थिती अशी आहे की, पेइंग गेस्ट कोणाला म्हणावे याची महाराष्ट्र सहकारी कायद्यामध्ये व्याख्या नाही, असे नमूद करताना मुंबई उच्च न्यायालय म्हणते की, १९९९ च्या महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्यांत पेइंग गेस्टची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे-
‘पेइंग गेस्ट म्हणजे जी व्यक्ती कुटुंबाचा घटक नाही, अशा व्यक्तीला घराचा काही भाग राहण्यासाठी दिला जातो. त्या ठिकाणी लायसन्सी लायसन्सवर राहतो.
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या आदर्श पोटनियम क्र. ४५ प्रमाणे, सोसायटीच्या पूर्वपरवानगीवाचून कोणत्याही सभासदाला आपल्या जागेत कोणालाही, पोटभाडय़ाने किंवा लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्सने किंवा काळजीवाहू तत्त्वावर ठेवता येणार नाही.
उच्च न्यायालयाच्या मते पेइंग गेस्ट आणि लायसन्सी यामधील फरक म्हणजे ज्या व्यक्तीला पेइंग गेस्ट म्हणून ठेवले जाते, त्याचे नावे कोणताही हितसंबंध किंवा हक्क निर्माण केला जात नसतो. उच्च न्यायालयच पुढे म्हणते, पेइंग गेस्ट हा निश्चितच भाडेकरू नाही. एवढेच नव्हे तर भाडे नियंत्रण कायद्याप्रमाणे तो लायसन्सीही नसतो. ही स्थिती मुंबई उच्च न्यायालयाने १९८८ मध्ये ‘दिनू एफ बयरामजी विरुद्ध डॉली जे. इराणी’ याप्रकरणी पुढीलप्रमाणे दिली आहे-
‘व्याख्येप्रमाणे जागेचा ताबा लायसन्सीकडे असतो. तर पेइंग गेस्टला जागेचा काही भाग दिलेला असतो. तेव्हा ‘जागा’ (प्रिमायसेस) आणि ‘भाग’ (पार्ट) या फरकामुळे लायसन्सी आणि पेइंग गेस्ट यामधील फरक चटकन कळतो. दुसरी टेस्ट म्हणजे लायसन्सीकडे जागेचा ताबा असतो तर पेइंग गेस्टला प्रिमायसेसचा एक भाग दिलेला असतो. तिसरी टेस्ट म्हणजे जागेचा जो भाग पेइंग गेस्टला दिलेला असतो, त्याच जागेत लायसन्सीसुद्धा राहात असतो. म्हणजे लायसन्सीचे त्याच जागेतील वास्तव्य म्हणजे तिसरी टेस्ट. लायसन्सीच्या ताब्यात प्रिमायसेस किंवा जागेचा एखादा भाग असतो पेइंग गेस्टसुद्धा प्रिमायसेसच्या एखाद्या भागात लायसन्सी म्हणून राहतो. त्यामुळे या दोघांत लक्ष्मणरेषा काढणे अत्यंत जिकीरीचे आहे. असे असले तरी लायसन्सी आणि पेइंग गेस्ट यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे पेइंग गेस्ट हा घरमालका(लायसन्सर)समवेत राहतो, ही वस्तुस्थिती डोळ्याआड करू नये.
थोडक्यात सांगावयाचे म्हणजे पेइंग गेस्ट हा एखाद्या पाहुण्यासारखा असतो. पाहुणा हा जसा घरमालकाच्या भरीला येतो तसेच हे आहे. पाहुणा काही काळ घरमालकासमवेत मोफत राहतो किंवा पैसे देऊन राहतो.
या माहितीचा उल्लेख करून मुंबई उच्च न्यायालय म्हणते की, पेइंग गेस्टच्या नावाने कोणताही हितसंबंध निर्माण केला जात नाही. तसेच तो घरमालकासमवेत राहतो, म्हणजेच जागा ही सभासदाच्याच ताब्यात असते. त्यामुळे सोसायटी त्याच्याकडून बिनभोगवटा शुल्क वसूल करू शकत नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला.