Leading International Marathi News Daily
रविवार, १ ८ जानेवारी २००९

गॅलिलि ओने ग्रह-ताऱ्यांचा वेध घेण्याकरता आकाशात दुर्बिण रोखल्याच्या घटनेला या वर्षी ४०० र्वष होत आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेने ही घटना साजरी करण्यासाठी २००९ हे ‘आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष’ घोषित केलेलं आहे. यानिमित्ताने या वर्षभरात जगभरात खगोलशास्त्रावरील विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. यासाठी खगोलशास्त्रीय संस्था व संघटनांनी कंबर कसली आहे. खगोलशास्त्र लोकांपर्यंत नेणे, हा त्यामागचा उद्देश असून, जास्तीत जास्त लोकांना दुर्बिणीतून आकाशातील ग्रह-तारे दाखविण्याचा संकल्प संयुक्त राष्ट्र व ‘इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिक्स युनियन’ने सोडला आहे. गेल्या चार शतकांत खगोलशास्त्रात झालेली प्रगती स्तिमित करणारी आहे..
इसवी सन १६०९ मध्ये गॅलिलिओने स्वत: बनविलेली भिंगाची लहानशी दुर्बिण आकाशात रोखली. म्हटलं तर ही एक साधीशी घटना! परंतु या घटनेमुळे पुढील ४०० वर्षांत कोणती क्रांती होणार आहे, याची खुद्द गॅलिलिओलादेखील कल्पना नसेल. गेल्या ४०० वर्षांत खगोलविश्वासंबंधीच्या आपल्या कल्पना-संकल्पनांची अक्षरश: उलथापालथ झाली. आज तर आपण अशा एका टप्प्यावर आहोत की, केवळ विश्वाची व्याप्तीच नव्हे, तर विश्वाचा जन्म केव्हा व कसा झाला, विश्वात द्रव्य कसं निर्माण झालं, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण ठामपणे देऊ शकतो. पण हा ४०० वर्षांचा प्रवास सहजगत्या झालेला नाही. या काळात अक्षरश: हजारो खगोलशास्त्रज्ञांनी अविश्रांत मेहनत घेऊन संशोधन केलं. केवळ खगोलशास्त्रातच नाही, तर विज्ञानाच्या सर्वच शाखांमध्ये प्रगती होत गेली व ती एकमेकांना पूरकही ठरत गेली. आज मागे वळून पाहताना- आधुनिक खगोलशास्त्राची सुरुवात गॅलिलिओच्या आकाशात दुर्बिण रोखण्याने झाली, हे मान्य करायला हवं. त्यामुळे गॅलिलिओला आधुनिक खगोलशास्त्राचा जनक म्हणायला काहीच हरकत नाही. युरोपात १५ व्या- १६ व्या शतकापासूनच ‘रेनेसाँ’ची (पुनरुत्थानपर्व) सुरुवात झाली होती. निकोलस कोपर्निकसने १५४३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘डी रिव्होल्युशनिबस्’ या पुस्तकात सूर्य-केंद्रित विश्वाची कल्पना मांडून परंपरागत मांडणी असलेल्या पृथ्वी-केंद्रित विश्वसंकल्पनेला धक्का दिला होता. चर्चच्या बहिष्काराच्या भीतीने कोपर्निकसने अनेक र्वष आपला हा सिद्धांत प्रसिद्ध मात्र केला नाही. असं म्हटलं जातं की, मृत्युशय्येवर असताना कोपर्निकसने पुस्तक प्रसिद्ध करायला परवानगी दिली. पुस्तकाची पहिली प्रत त्याच्या हातात पडल्यावर त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असून, सूर्यासह इतर ग्रह पृथ्वीभोवती फिरतात, ही सर्वमान्य विश्वसंकल्पना चर्चनेही मान्य केली होती. कोपर्निकसने ही संकल्पना धुडकावून, ‘सूर्य हा विश्वाच्या केंद्रस्थानी असून, पृथ्वीसह इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात,’ हा नवा सिद्धांत मांडला. अपेक्षेप्रमाणे चर्चने तात्काळ या पुस्तकावर बंदी आणली. परंतु बंदीनंतरही निदान शास्त्रीय जगतात तरी या सिद्धांताविषयी कुजबुज सुरू होती.

 

१५६४ मध्ये जन्मलेल्या गॅलिलिओने १५९० च्या सुमारास विज्ञानक्षेत्रात आपला ठसा उमटवायला सुरुवात केली होती. पडुआ विद्यापीठात गणिताचा प्रोफेसर म्हणून कार्य करत असताना गॅलिलिओला खगोलशास्त्र हा विषयही मुलांना शिकवावा लागत असे. अ‍ॅरिस्टॉटल व टॉलेमी यांच्या विश्वसंकल्पना शिकवत असतानाच गॅलिलिओला मनापासून मात्र कोपर्निकसचासूर्य-केंद्रित सिद्धांत पटत होता. पण त्याची उघड वाच्यता तो करू शकत नव्हता. १६०९ मध्ये गॅलिलिओला युरोपातील बाजारपेठेत आलेल्या एका नव्या ‘खेळण्या’विषयी माहिती कळली. हे नवे खेळणे होते एका डच व्यापाऱ्याने बनवलेली एक लहानशी दुर्बिण.
हॉलंडमधील भिंग बनवणारा एक व्यापारी हॅन्स लिवरशे याला पहिली दुर्बिण बनविण्याचं श्रेय जातं. या शोधाची एक गमतीदार कहाणी सांगितली जाते. लिपरशेचे दोन भाचे त्याने बनवलेल्या भिंगांशी खेळत बसले होते. खेळता खेळता एकाने डोळ्यापुढे मोठय़ा भिंगासमोर लहान भिंग धरले. आणि काय चमत्कार! त्याला दूरवर असलेली वस्तू मोठय़ा आकाराची व जवळ दिसली. घाबरून त्याने हातातली भिंगं दूर टाकली. सहज म्हणून त्यांनी ही हकिकत मामाला सांगितली. लिपरशेला हे ऐकून आश्चर्य वाटले. त्यानेही तसं करून पाहिल्यावर त्यातली सत्यता त्याला पटली. असं का होत असावं, याचा विचार केल्यावर त्याने दुर्बिणीचं साधं तत्त्व शोधून काढलं. लिपरशेला या शोधाचं महत्त्व कळलं. त्याने तात्काळ दुर्बिणीच्या शोधाचं पेटंट मिळवण्यासाठी १६०८ मध्ये अर्ज केला. त्यानंतर त्याने अशा अनेक लहान लहान दुर्बिणी बनवून बाजारात आणल्या. या दुर्बिणीतून दूर अंतरावर असणाऱ्या वस्तू जवळ आलेल्या पाहून लोकांना आश्चर्य वाटत असे. या नव्या खेळण्याने निर्माण केलेली सनसनाटी इटलीमधील गॅलिलिओच्या कानावर आली. गॅलिलिओला ताबडतोब या दुर्बिणीमागील तत्त्व कळलं. १६०९ मध्ये त्याने स्वत: भिंगे तयार करून एक दुर्बिण बनवली व या दुर्बिणीचा शोध पोपसमोर सादर केला. गॅलिलिओने त्यानंतर वेगवेगळ्या आकारांच्या दुर्बिणी बनवल्या. त्यावेळी युरोपभर कदाचित हजारो दुर्बिणी असतील. पण गॅलिलिओचं वैशिष्टय़ असं की, त्याने दुर्बिण रात्रीच्या आकाशाकडे वळवली. त्यानंतर अनेक रात्री गॅलिलिओने आकाशाचं निरीक्षण केलं असणार. अर्थात गॅलिलिओच्या दुर्बिणींची क्षमता आताच्या साध्या दुर्बिणीच्या तुलनेतही खूपच कमी होती. त्याच्या पहिल्या दुर्बिणीतून मिळणारी प्रतिमा केवळ तीनपट मोठी होती. तर त्याच्याकडील सर्वात मोठय़ा दुर्बिणीमधूनही फक्त ३७ पट मोठी प्रतिमा मिळत होती. आताच्या चार इंच व्यासाच्या साध्या दुर्बिणीमधून मिळणारी प्रतिमाही ४० ते ८० पट मोठी असते.
गॅलिलिओने त्याच्या दुर्बिणीमधून शुक्राच्या कला, चंद्रावरील विवरे, गुरूचे चार चंद्र, शनीची कडी, सूर्यबिंबावरील काळे डाग असे अनेक शोध लावले. गुरूच्या चंद्रांचं निरीक्षण केल्यावर तर त्याची खात्रीच पटली की कोपर्निकसचा सूर्य-केंद्रित विश्वसिद्धांतच खरा आहे. पण चर्चच्या दबावामुळे तो ते उघडपणेसांगू शकत नव्हता. त्याने ‘स्टारी मेसेंजर’ या पुस्तकाद्वारे तसंच अनेक ठिकाणी वादविवादांमध्ये कोपर्निकसच्या सिद्धांताचा पुरस्कार करायला सुरुवात केली. अखेरीस चर्चने गॅलिलिओवर चर्चच्या शिकवणुकीविरुद्ध शिकवण दिल्याच्या आरोपाखाली खटला भरला आणि त्याला नजरकैदेची शिक्षा सुनावण्यात आली.
गॅलिलिओ दुर्बिणीमधून आकाश न्याहाळत असण्याच्या सुमारास आणखी एका ग्रीक संकल्पनेला हादरा बसला. सर्व ग्रह वर्तुळाकार कक्षेतच फिरत असतात, हा प्राचीन समज गॅलिलिओचा समकालीन खगोलशास्त्रज्ञ जोहानस् केपलर याने चुकीचा ठरवला. १६०९ मध्ये केपलरने ग्रहांच्या गतीचे पहिले दोन नियम प्रसिद्ध केले. सर्व ग्रह लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहेत, असे केपलरने दाखवून दिले. टायको ब्राहे या खगोलशास्त्रज्ञाने केलेल्या अनेक वर्षांच्या अचूक निरीक्षणांच्या आधारे केपलरने हे नियम सिद्ध केले. यानंतर काही वर्षांतच गुरूभोवती फिरणारे चंद्रही लंबवर्तुळाकार कक्षेतच फिरत असून, केपलरचे तिन्ही नियम अचूक आहेत, हे सिद्ध झालं. कोपर्निकसचा सिद्धांत हळूहळू सर्वमान्य झाला. पृथ्वीचं विश्वकेंद्री स्थान जाऊन सूर्यमालेतील इतर ग्रहांप्रमाणेच तो सर्वसामान्य ग्रह आहे, हे सर्वाना पटू लागले. १६४२ मध्ये गॅलिलिओचा मृत्यू झाला. त्याच वर्षी इंग्लंडमध्ये एका घरात अशक्त व कृश बाळ जन्माला आलं. हे मूल पुढे खगोलशास्त्राला नवी दिशा देणारं ठरलं. या मुलाचं नाव होतं-आयझ्ॉक न्यूटन. १६६५ मध्ये न्यूटनने विज्ञानातील पदवी प्राप्त केल्यानंतर काही महिन्यांतच लंडनला प्लेगची साथ आली. लंडन सोडून न्यूटन त्याच्या गावी परतला. विविध विषयांवर चिंतन करत असलेल्या न्यूटनला तेव्हा विचार करायला भरपूर निवांत वेळ मिळाला. गावातल्या दोन वर्षांच्या त्या मुक्कामात न्यूटनने त्याच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे शोध लावले. तो सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला असताना झाडावरून खाली पडलेले सफरचंद पाहून त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागल्याची तथाकथित घटनाही याच काळात घडली. गुरुत्वाकर्षणाविषयी न्यूटनचं आधीपासूनच मनन व संशोधन सुरू होतं. कदाचित सफरचंद पडताना पाहून त्याच्या मनातील गुरुत्वाकर्षणाची संकल्पना विजेसारखी लख्खकन् स्पष्ट झाली असावी. पुढे न्यूटनने आणखी एक धाडसी पाऊल टाकून वैश्विक गुरुत्वाकर्षणाची कल्पना मांडली व पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाला एका फटकाऱ्यात वैश्विक करून टाकले. केवळ पृथ्वीवरील सफरचंदच गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खेचलं जातं असं नाही, तर चंद्रदेखील याच गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीभोवती फिरतो व पृथ्वी सूर्याभोवती. न्यूटनने केपलरच्या ग्रहगतीच्या तीनही नियमांची गणिती सिद्धता दिली.
१६६९ मध्ये न्यूटनची केंब्रिज विद्यापीठात गणिताच्या प्रोफेसरपदी नेमणूक झाली. अत्यंत एकलकोंडय़ा स्वभावाच्या न्यूटनला आपल्या शोधांना प्रसिद्धी द्यायची अजिबात घाई नसे. संपूर्ण खात्री झाल्याशिवाय त्याच्या संशोधनाविषयी तो फारसा कोणाशी बोलतही नसे. केंब्रिज विद्यापीठात त्याच्या अगदी जवळच्या मित्रांनाही त्याने नवीन शोधलेली गणिताची ‘कॅल्क्युलस’ पद्धत, गतीचे नियम, भिंग व आरसे याविषयीचे संशोधन याबाबत अनेक वर्षे कल्पना नव्हती. कित्येक र्वष आधीच केलेलं संशोधन त्याने त्याचा खगोलशास्त्रज्ञ मित्र एडमंड हॅले याच्या आग्रहाखातर ‘प्रिन्सिपिआ’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध केले. १६८७ मध्ये प्रसिद्ध झालेलं ‘प्रिन्सिपिआ’ हे विज्ञानातील सवरेत्कृष्ट पुस्तक मानलं जातं.
न्यूटनने आपल्या ‘ऑप्टिक्स’ या ग्रंथात भिंग व लोलक (प्रिझम) यांच्या गुणधर्माविषयी सविस्तर माहिती दिली. प्रकाश हा सात रंगांचा बनला असून एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशाचं विकिरण होऊन तो सप्तरंगात विखुरतो, हे न्यूटनने सिद्ध करून दाखवलं. भिंगातून जातानाही प्रकाशाचं विकिरण होऊन रंगदोष निर्माण होतो. त्यामुळे भिंगाच्या दुर्बिणीमधून मिळणारी प्रतिमा रंगीबेरंगी दिसते. हा दोष दूर करण्यासाठी न्यूटनने अंतर्वक्र आरशाच्या दुर्बिणीची क्रांतिकारी कल्पना मांडली. त्याने स्वत:च अशी दुर्बिण बनवून १६६८ मध्ये रॉयल सोसायटीला अर्पण केली. भिंग बनवण्यापेक्षा आरसा बनवणं सोपं असल्याने अल्पावधीतच न्युटोनिअन दुर्बिण खगोलशास्त्रज्ञांमध्ये प्रसिद्ध झाली.
न्यूटननंतर जवळजवळ १०० र्वष मोठमोठय़ा आकारांच्या दुर्बिणींतून आकाशाचा वेध घेणं सुरू होतं. जर्मनीहून इंग्लंडमध्ये स्थलांतरीत झालेला एक संगीतकार खगोलशास्त्राने खूप प्रभावित झाला. त्याने स्वत: दुर्बिणी तयार केल्या. या दुर्बिणीने आकाशाचा वेध घेत असताना १३ मार्च १७८१ या दिवशी संगीतकार- खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षलला एक अंधुक, धुरकट ठिपका दिसला. प्रथम हर्षलला वाटलं की, हा धूमकेतू असावा. काही महिन्यांत त्याच्या लक्षात आले की, हा शनीपलीकडला एक नवीनच ग्रह आहे. हर्षलने या युरेनस नावाच्या नव्या ग्रहाच्या शोधाने प्राचीन काळापासून माहीत असलेल्या शनीपर्यंतच्या सूर्यमालेचा विस्तार दुप्पट केला. आणि रातोरात हर्षल प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला.
आधुनिक खगोलशास्त्राच्या विकासातला तिसरा महत्त्वाचा टप्पा एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच झाला. १८१७ मध्ये फ्राऊनहॉफर या शास्त्रज्ञाने ताऱ्यांच्या वर्णपटात दिसणाऱ्या रेषांची वर्गवारी केली. १८०२ मध्ये वॉलॅस्टन या शास्त्रज्ञाने सूर्याच्या वर्णपटात दिसणाऱ्या रेषांचा शोध लावला होता. प्रकाशाचे सप्तरंगात विभाजन झाल्यानंतर दिसणाऱ्या ताऱ्यांच्या वर्णपटात अनेक रेषा दिसतात. या शोषक अथवा उत्सर्जक रेषा ताऱ्यांच्या पृष्ठभागावरील मूलद्रव्यांची उपस्थिती दर्शवतात. या स्पेक्ट्रोस्कोपीच्या तंत्राने ताऱ्यांच्या घटकांचा अभ्यास करता येणं शक्य झालं. कित्येक अब्जावधी किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ताऱ्यांचा अभ्यास पृथ्वीवर बसून करता येईल, ही अशक्यकोटीतील गोष्ट त्यामुळे प्रत्यक्षात आली. स्पेक्ट्रोस्कोपीच्या साहाय्याने ताऱ्यांच्या पृष्ठभागावरील तापमान, त्याचे घटक, वस्तुमान, वय, दीप्ती, त्यांचा अवकाशातील वेग अशा ताऱ्यांच्या अनेक गुणधर्माचा अभ्यास करता येणं शक्य झालं. ताऱ्यांची उत्क्रांतीही या तंत्रामुळे अभ्यासता येणं शक्य झालं. स्पेक्ट्रोस्कोपीने खगोलशास्त्रात खऱ्या अर्थानं क्रांती आणली, असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही.
युरेनसच्या शोधानंतर सूर्यमालेचा विस्तार दुपटीनं वाढला असला तरी त्यापलीकडेही असलेलं विश्व किती मोठं आहे, याची शास्त्रज्ञांना काहीच कल्पना नव्हती. दूरवर असलेल्या आकाशगोलावर तारे आहेत म्हणजे नेमके किती अंतरावर, याचा कोणालाच अंदाज नव्हता. १८३८ मध्ये जर्मन खगोलशास्त्रज्ञ फेडरिक बेसेल याने साध्या, सोप्या, परंतु अभिनव पद्धतीने ताऱ्यांची अंतरं शोधण्याची पद्धत विकसित केली. बेसेलने बरोबर सहा महिन्यांच्या अंतराने हंस तारकासमूहातील ‘६१’ क्रमांकाच्या ताऱ्याचं मापन केलं. या दोन मापनांत हा तारा आपलं स्थान किंचित बदलत असल्याचं लक्षात आलं. स्थानातील हा बदल मोजल्यावर साध्या त्रिकोणमितीच्या साहाय्याने बेसेलने या ताऱ्याचं अंतर मोजलं. यानंतर अनेक खगोलशास्त्रज्ञांनी या ‘पराशय’ पद्धतीचा वापर करून जवळच्या ताऱ्यांची अंतरं मोजली. आपल्या विश्वाची व्याप्ती आता कित्येक पटीनं वाढली होती.
विज्ञान व गणित हे नेहमी हातात हात घालून चालत राहतात. गणित व विज्ञानाच्या प्रचंड ताकदीचा प्रत्यय जनसामान्यांना १८४६ मध्ये आला. १८४३ मध्ये २४ वर्षांचा तरुण ब्रिटिश शास्त्रज्ञ जॉन अ‍ॅडम्स याने युरेनस ग्रहाच्या भाकित केलेल्या व प्रत्यक्ष स्थानातील तफावतीवरून गुरुत्वाकर्षणाचा नियम व त्याचं गणित वापरून युरेनसच्याही पलीकडे आणखी एखादा ग्रह असावा, असं भाकित केलं. नुसतं भाकित केलं नाही, तर हा ग्रह केवढय़ा वस्तुमानाचा व आकाशात कोणत्या भागात दिसेल, हेही सांगितलं. या नवोदित शास्त्रज्ञाच्या शोधाकडे इंग्लंडमधील शास्त्रज्ञांनी तेव्हा दुर्लक्ष केलं. १८४६ मध्ये नामांकित फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ लाव्हारिए यानेही स्वतंत्रपणे अशाच प्रकारचं भाकित केलं. २३ सप्टेंबर १८४६ या दिवशी लाव्हारिएनं जर्मन वेधशाळेतील गॅले या निरीक्षकाला हा अज्ञात ग्रह शोधण्याची विनंती केली. गॅलेने त्याच रात्री अ‍ॅडम्स व लाव्हारिए यांनी भाकित केलेल्या ठिकाणीच नव्या ग्रहाचा- नेपच्युनचा शोध लावला.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला खगोलशास्त्राच्या विकासाचा चौथा टप्पा सुरू झाला. या शतकाच्या सुरुवातीपर्यंत विज्ञानजगत व्यापून टाकणाऱ्या न्यूटनच्या तोडीस तोड, किंबहुना काकणभर सरसच असा एक शास्त्रज्ञ विज्ञानात अद्भुत क्रांती करण्यास सज्ज झाला होता. १९०५ मध्ये मांडलेल्या सापेक्षता सिद्धांताने अल्बर्ट आइनस्टाईनने विज्ञानाच्या क्षेत्रात उलथापालथ घडवून आणली. प्रकाशाच्या वेगाची मर्यादा, प्रकाशाच्या वेगाने प्रवास केल्यास जाणवणारे, मती गुंगवून टाकणारे परिणाम आणि ऊर्जा व वस्तुमान यांचा संबंध दाखविणारे, अत्यंत सुप्रसिद्ध झालेलं ए = ेू2 हे सूत्र या सापेक्षता सिद्धांताच्या निष्कर्षांमुळे आईनस्टाईन अजरामर झाला. १९१७ मध्ये आइनस्टाईनने ‘सर्वसाधारण सापेक्षता’ सिद्धांत मांडून न्यूटनच्या पुढे एक पाऊल टाकलं. सर्वसाधारण सापेक्षता सिद्धांत हा न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांताची सुधारित आवृत्ती होती. गुरुत्वाकर्षण असलेल्या वस्तूजवळ अवकाशाला वक्रता येते, हा या सिद्धांताचा क्रांतिकारी निष्कर्ष सुरुवातीला भल्या भल्या शास्त्रज्ञांच्या पचनी पडला नाही. सूर्याच्या सभोवती असणाऱ्या अवकाशाची वक्रता १९१९ च्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी मोजण्यात शास्त्रज्ञांना यश मिळालं आणि रातोरात आइनस्टाईन जगप्रसिद्ध झाला.
आइनस्टाईनच्या सर्वसाधारण सापेक्षता सिद्धांताचा एक अत्यंत महत्त्वाचा परिणाम म्हणजे विश्वरचनाशास्त्राचा उदय. विश्वाची रचना, विश्वाची उत्पत्ती हे आतापर्यंत धर्माच्या अखत्यारीत असणारे विषय आता विज्ञानाच्या कक्षेत आले. आपली दिशा प्रसरण पावत आहे, असा आश्चर्यकारक निष्कर्ष सर्वसाधारण सापेक्षता सिद्धांतामधून निघत होता. आइनस्टाईनचा स्वत:चादेखील यावर विश्वास बसला नाही. त्याने आपल्या सिद्धांताच्या सूत्रांमध्ये एक स्थिरांक घुसडवून विश्व स्थिर आहे, असा निष्कर्ष आणवला. अर्थात आइनस्टाईनची ही मोठीच चूक ठरली.
साधारणपणे याच सुमारास अमेरिकेतील माऊंट पॅलोमर या वेधशाळेतून एक तरुण शास्त्रज्ञ रात्रीच्या आकाशात दिसणाऱ्या विशिष्ट धुरकट तेजोमेघांचं निरीक्षण करत होता. या तेजोमेघांत दिसणाऱ्या विशिष्ट ताऱ्यांचं निरीक्षण करून अंतर मोजण्याची नवीन पद्धत नुकतीच विकसित करण्यात आली होती. या पद्धतीने एडविन हबलला या तेजोमेघांची अंतरं मिळवण्यात यश आलं. हे मेघ म्हणजे अत्यंत दूर अंतरावर असणाऱ्या दीर्घिका असून, त्या आपल्या आकाशगंगेसारख्याच आहेत, हे हबलनं दाखवून दिलं. यामुळे १९२० पर्यंत आपल्या आकाशगंगेपुरतं मर्यादित असलेलं आपलं विश्व आता अब्जावधी पटीनं विस्तारलं. हबलने १९२७ मध्ये जगाला आणखी एक विस्मयकारक धक्का दिला. आपलं विश्व प्रसरण पावत आहे, असा निरीक्षणावर आधारित शोध त्यानं जाहीर केला. आइनस्टाईनसकट सर्वानाच हा हादरा होता. १९३० मध्ये आइनस्टाईनला आपण स्थिरांक घालून विश्व स्थिर आहे, असे दाखविण्यात मोठी चूक केली, हे लक्षात आलं. ‘माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी घोडचूक,’ असं म्हणत आइनस्टाईनने त्याची कबुली दिली व विश्व प्रसरण पावत आहे, हे मान्य केलं.
१९३२ मध्ये तरुण रेडिओ इंजिनीयर कार्ल जान्स्की याने आकाशातील विशिष्ट भागातून येणाऱ्या रेडिओ लहरींचा शोध लावला. त्याची खगोलशास्त्रज्ञांनी लगेचच दखल घेतली नाही तरी कालांतराने रेडिओ लहरींच्या अभ्यासाचा खगोलशास्त्राच्या प्रगतीला प्रचंड हातभार लागला. आता जगभर विशाल आकाराच्या रेडिओ दुर्बिणी सतत अवकाशाचा वेध घेत असतात. दुसऱ्या महायुद्धामुळे काही काळ खीळ बसलेल्या विज्ञानाच्या घोडदौडीला १९५० च्या सुमारास पुन्हा प्रारंभ झाला. या सुमारास विश्व कसं निर्माण झालं, याविषयी शास्त्रज्ञांमध्ये वादविवाद सुरू होते. जॉर्ज गॅमॉव या शास्त्रज्ञाने १९५० मध्य ‘विश्व एका अणूपासून निर्माण होऊन नंतर त्याचं प्रसरण होत आहे,’ असा सिद्धांत मांडला. या सिद्धांताचे कट्टर विरोधक फ्रेड हॉयल यांनी या सिद्धांताला हिणवत ‘बिग बँग’ असे नाव ठेवले व या सिद्धांताला प्रत्युत्तर म्हणून स्थिर विश्व-सिद्धांत मांडला.
१९६० मध्ये रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने ‘क्वेझार’ या विश्वाच्या सीमेवरील एका अगम्य वस्तूचा शोध लागला. ‘क्वेझार’ ही दीर्घिकांची अगोदरची स्थिती असून, क्वेझारपासून उत्क्रांती होत होत आजच्या स्वरूपातील दीर्घिका निर्माण झाल्या, असं खगोलशास्त्रज्ञांना ठामपणे वाटतं. १९६४ मध्ये योगायोगाने विश्वात सर्वदूर पसरलेल्या सूक्ष्मलहरी प्रारणाचा शोध लागला. यावरून विश्वाचं तापमान ३ केल्विन म्हणजे - २७० अंश सेल्सियस आहे, हे सिद्ध झालं. या शोधाने बिग बँग सिद्धांताला पुष्टी मिळाली व विश्वनिर्मितीच्या अभ्यासाला वेग आला.
पल्सारचा शोध, कृष्णविवरांचा अभ्यास, ताऱ्यांची तसंच दीर्घिकांची उत्क्रांती, अवकाशयुगामुळे सूर्यमालेत पाठवलेली यानं आणि विश्वाचं अंतरंग उलगडून दाखविणाऱ्या हबल अवकाश दुर्बिणीसारखी साधनं, कणभौतिकी व विश्वरचनाशास्त्राचा संबंध या आणि अशा अनेक आघाडय़ांवर सुरू असलेल्या संशोधनामुळे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात खगोलशास्त्रात खूपच वेगाने प्रगती झाली. संपूर्ण विश्वाचं ढोबळ चित्र आपल्यासमोर आता स्पष्ट झालं आहे. या चित्रात अनेक ठिकाणी लहान लहान बारकावे भरण्याचं काम शिल्लक राहिलेलं आहे. केवळ खगोलशास्त्रातीलच नव्हे, तर विज्ञानाच्या इतर शाखांमधील प्रगतीमुळे विसाव्या शतकात ज्या वेगाने तांत्रिक विकास झाला, तो अचंबित करणारा आहे. यापुढे खगोलशास्त्र कोणत्या दिशेने जाईल, याचं भाकित करणं कठीण आहे. परंतु या विकासामुळे मानवी अस्तित्वालाच धोका पोहोचणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे.
प्रदीप नायक
pradeepsnayak@gmail.com