Leading International Marathi News Daily                                 रविवार, १८ जानेवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत

 


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

दहशवादविरोधात एकजुटीचा संदेश देणारी दौड आज!
अडीच हजार स्पर्धक धावणार
केनिया, इथियोपियातील स्पर्धक प्रमुख दावेदार
बक्षिसाची एकूण रक्कम अडीच लाख डॉलर !


.. तर भाजपशी युती तोडू; शिवसेनेचा खणखणीत इशारा
मुंबई, १७ जानेवारी / प्रतिनिधी
सीमेवर सध्या निर्माण झालेला प्रश्न निकाली लागेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा.
युतीबाबतचा निर्णय गडकरी आणि मुंडे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच
सीमाप्रश्नी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अडवाणी यांचीही भेट घेणार
-शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागांतील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारकडून सुरू झालेल्या दडपशाहीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे पडलेला सीमा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्नाटक सरकारने मराठी भाषकांवरील अत्याचार थांबविले नाहीत तर जवळपास गेली दोन दशके अभेद्य असलेली शिवसेना-भाजप युती तोडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. मात्र त्याच वेळी भाजपने युती तोडण्याबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या पाठिंब्यावर राष्ट्रपतीपदी प्रतिभा पाटील निवडून आल्या असल्याने त्यांनी प्रतिभा पाटील यांच्यामार्फत हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी प्रतिक्रिया भाजपने व्यक्त केली आहे.
सीमाभागातील बेळगाव येथे विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यास विरोध करणाऱ्या मराठी भाषकांविरुद्ध कर्नाटक सरकारने बळाचा वापर केला आणि एन. डी. पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना अटक केली. त्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेत उमटली आहे. मराठी भाषकांवरील अत्याचार असेच सुरू राहिले तर भाजपसमवेत असलेली युती तोडण्यात येईल, हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा संदेश घेऊन आपण आलो असल्याचे राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी बेळगांव येथे स्पष्ट केले.

गुप्तधनाच्या लालसेपोटी मस्तानीचे समाधीस्थळ अज्ञातांकडून उद्ध्वस्त
शिक्रापूर, १७ जानेवारी/वार्ताहर

आरस्पानी सौंदर्यामुळे ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेल्या मस्तानीचे समाधीस्थळ पाबळ (ता. शिरूर) आज पहाटे काही अज्ञात व्यक्तींनी उद्ध्वस्त केले. गुप्तधनाच्या लालसेपोटी हे कृत्य केल्याचा अंदाज असून, या घटनेने मस्तानीच्या आठवणीची ओळख असणारी शेवटची स्मृती नामशेष झाली आहे. दरम्यान पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन लगेचच समाधीस्थळाची पुनर्बाधणी सुरू केली. तत्पूर्वी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकोप्याचे दर्शन घडवून पूजन केले. पाबळ गावापासून थोडय़ा अंतरावर असलेल्या या समाधीस्थळाची देखभाल करणाऱ्या महंमद इनामदार यांना सकाळी तिथे गेल्यावर ही घटना लक्षात आली. ही बातमी समजताच ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आणि सभा घेऊन या घटनेचा निषेध नोंदविला. त्याचबरोबर येथील जैन महाविद्यालय बंद करण्यात आले. तहसीलदार उदयसिंह भोसले, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन पाहणी केली. चिरेबंदी दगडांनी बांधलेले हे समाधीस्थळ पूर्णपणे उखडून टाकण्यात आले असून, समाधीस्थळाच्या खालील जमीन तीन फुटापर्यंत या अज्ञातांनी खोदली. त्या ठिकाणी मस्तानीच्या मृतदेहाच्या हाडांचे अवशेष आढळून आले आहेत. सन १७४० च्या सुमारास थोरले बाजीराव पेशवे यांचे रावेर येथे निधन झाल्याचे वृत्त समजताच मस्तानी हिने पाबळ येथे आत्महत्या करून घेतल्याचे इतिहासात नमूद आहे. आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या मस्तानीसाठी थोरले बाजीराव पेशव्यांनी तिला पाबळ व केंदूर आणि लोणी ही गावे दिली होती. पाबळ येथील गढीवर तिचे वास्तव्य होते. जनमानसाच्या भावना लक्षात घेऊन या गढीचा जीर्णोद्धार करणार असल्याचे तहसीलदार भोसले यांनी ग्रामस्थांना सांगितले.

पैशाची उभारणी हाच ‘सत्यम’च्या संचालक मंडळाचा अग्रक्रम
राजूबंधूंच्या पोलीस कोठडीत वाढ

हैदराबाद, १७ जानेवारी/ पीटीआय

सुमारे ५० हजाराच्या घरात असलेले कर्मचारी आणि लाखो भागधारकांच्या हितरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या घोटाळेग्रस्त सत्यम कॉम्प्युटरच्या नवनियुक्त संचालक मंडळाने कंपनीच्या परिचालनासाठी आवश्यक निधीची उभारणी हाच आपला अग्रक्रम असल्याचे आज आपल्या बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान हैदराबादच्या सहाव्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी सत्यमचे माजी अध्यक्ष व संस्थापक रामलिंग राजू, त्यांचे बंधू व कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक बी. रामा राजू आणि माजी मुख्य वित्तीय अधिकारी वदल्मणी श्रीनिवासन यांच्या पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली आहे. तिघांच्या चौकशीसाठी आणखी मुदत मिळावी या आंध्र प्रदेश गुन्हे अन्वेषण विभागाच्या विनंतीनुरूप त्यांच्या पोलीस कोठडीत २२ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने आता राज्यात आरोग्यबँका
अभिजीत कुलकर्णी, नाशिक, १७ जानेवारी

अवघ्या एक रुपयात रक्तदाब तपासणी.. दोन ते चार रुपयांत मूत्र तपासणी.. अशाप्रकारे नेहमी आवश्यक ठरणाऱ्या आरोग्यसेवांसाठी प्रस्तावित दरपत्रक निश्चित असलेल्या आरोग्य बँकेची मुहूर्तमेढ लवकरच महाराष्ट्रात होत आहे. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी साध्या साध्या आरोग्य तपासण्यांची सुविधा देखील उपलब्ध नाही तेथे तसेच मोठय़ा शहरांतील झोपडपट्टय़ा वा तत्सम वसाहतींमध्ये ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आरोग्य विद्याशाखेने पुढाकार घेतला आहे. सरकारी व खासगी सहकार्याच्या (सखास) माध्यमातून येत्या मार्च पर्यंत १०० ठिकाणी आरोग्यबँका कार्यान्वित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे डॉ. शाम अष्टेकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

पाकिस्तानला अखेर पुरावे पटले!
इस्लामाबाद, १७ जानेवारी/वृत्तसंस्था

मुंबई हल्लाप्रकरणी भारताने दिलेले पुरावे अखेर पाकिस्तानला पटले आहेत. भारताने निव्वळ माहिती दिली आहे, पुरावे नव्हेत, अशी वक्तव्ये आधी पाकिस्तानतर्फे करण्यात येत होती. आज मात्र पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी सांगितले की, भारताने दिलेले पुरावे ठोस वाटत आहेत. त्यांची आता छाननी सुरू असून त्याआधारे फौजदारी खटल्यासाठी ठोस असे पुरावे आम्ही जमा करीत आहोत. मुंबईवरील हल्ल्यांत पाकिस्तानी नागरिकांचा हात असल्याच्या आरोपानंतर पाकिस्तानने एक त्रिसदस्यीय दहशतवादविरोधी समिती स्थापन केली आहे. या समितीला आता दहा दिवसांत आपला अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थात पाकिस्तानात अद्याप मुंबई हल्लाप्रकरणी एकही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. आमच्यावर भारताचे कोणतेही दडपण नाही आणि कोणत्याही देशाच्या दडपणाला आम्ही जुमानणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

पोलिसांवर हल्ला करून पाच कैदी फरार
ठाणे, १७ जानेवारी / प्रतिनिधी

वसई न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात आलेल्या पाच कैद्यांनी पोलिसांवरच हल्ला करून पलायन केल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी घडली. दरोडेखोरीच्या आरोपावरून एक वर्षांपूर्वी या कैद्यांना गुजरात व ठाणे पोलिसांनी संयुक्त कारवाईत पकडले होते. या घटनेमुळे ठाणे ग्रामीण पोलिसांची पाचावर धारण बसली असून फरार झालेल्या कैद्यांना पकडण्यासाठी त्यांनी धावपळ सुरू केली आहे. वसई न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर कैद्यांना पुन्हा ठाणे कारागृहात पोलीस गाडीतून नेण्यात येताना गाडी कामन फाटय़ाजवळील एका पुलाजवळ आली असतानाच या सहा कैद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. गाडीत नऊ पोलीस होते. त्यातील पाचजण गंभीर जखमी झाले. सहा दरोडेखोरांपैकी एकाला कसेबसे पोलिसांनी पकडले.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८