Leading International Marathi News Daily                                  सोमवार, १ जानेवारी २००९
अग्रलेख
‘सामंत’शाही संपली!
गेली काही वर्षे बाळ सामंत तसे दूर दूरच होते. वय आणि प्रकृती या दोन्ही कारणांमुळे. एकेकाळी त्यांच्या नावाचा बराच दबदबा असे. मीडियात आणि साहित्य वर्तुळातही. त्यावेळेस मीडिया म्हणजे फक्त वर्तमानपत्रे- साप्ताहिके-मासिके. दिवाळी अंकांचा उत्सव अधिक जोमात साजरा होत असे. कोणत्या दिवाळी अंकात कुणाचे काय प्रसिद्ध झाले आहे याची वाङ्मयीन मंडळींमध्ये बरीच चर्चा होत असे. त्या चर्चेला व्यासपीठापेक्षा चव्हाटय़ाचे अधिष्ठानच अधिक असे. फारच कमी साहित्यिकांचा राजकीय वर्तुळात वावर असे. महाराष्ट्रातले साहित्यिक तसे एकूण राजकारणापासून जरा फटकूनच असत. लेखक-कवी-नाटककार मंडळींमधले हेवेदावे, चढाओढी, पुरस्कारांसाठी धडपड, चर्चा-परिसंवादांमधील वितंडवाद असे साहित्यिक राजकारण (आजच्यासारखे?) इतके असे की प्रत्यक्ष राजकारणात रस घ्यायला त्यांना फुरसत मिळणे शक्यच नव्हते. जे पत्रकार असल्यामुळे (व त्यांच्या ‘दैनिकी’ दराऱ्यामुळे) साहित्यवर्तुळाशी संबंध ठेवून असत त्यात काही संपादक-स्तंभलेखक-समीक्षकांचा समावेश होता. हे ज्येष्ठ पत्रकार-संपादक साहित्यिक व राजकीय अशा दोन्ही चव्हाटय़ांवर हजेरी लावत. त्यांना दुखविणे साहित्यिकांना व राजकारण्यांनाही परवडणारे नसे. हे पत्रकार दोघांचे हितसंबंध जपत, परंतु या पत्रकारांचे काही ‘प्रायव्हेट क्लब्ज्’ असत. साहित्य संमेलनांचे फड उभे राहिले की या ‘क्लब्ज्’चे रूपांतर ‘गँग्ज’मध्ये होत असे. या साहित्यिक टोळीयुद्धाकडे राजकीय नेते मनोरंजन म्हणून पाहात असत. विशेष म्हणजे साहित्य संमेलन असो वा पुरस्कार, राजकीय आशीर्वाद लागतच असत. तर, समाजातील स्वयंभू व उच्चभ्रू शहाण्यांचे असे तीन ‘लोक’ -त्रिलोक - असत- साहित्यिक, पत्रकार आणि राजकारणी. या ‘तिन्ही लोकी’ ज्यांचा व्यासंगी संचार असे ते बाळ सामंत. या तीनही वर्तुळांत चालणाऱ्या सर्व घडामोडी, भानगडी, स्पर्धा, टोळीयुद्धे यांचा चालता-बोलता ‘ज्ञानकोश’ म्हणजे बाळ सामंत! त्यामुळे सार्वजनिक जीवनात त्यांच्याशी मैत्री असल्याचा भास निर्माण करणारे खासगीत त्यांचे शत्रू असत. वस्तुत: बाळ सामंत यांचा साहित्यसंग्रह, लोकसंग्रह आणि अनुभवसंग्रह प्रचंड होता. त्यांचा सारस्वतातील (ही संज्ञा जातिवाचक नव्हे, तरीही..) हा संचार अनेकांना जाचकही वाटत असे, परंतु त्यांची स्वतंत्र अशी एक ‘सामंतशाही’ (ही संज्ञाही वाचकांनी जपून घ्यावी!) होती. त्या ‘सामंतशाही’चा दरारा होता, कारण बाळ सामंतांचे व्यक्तिगत संबंध यशवंतराव चव्हाणांपासून ते आचार्य अत्रेंपर्यंत आणि जयवंत दळवींपासून अ.र. अंतुलेंपर्यंत पसरलेले असत. साहजिकच त्यांच्या गप्पांचे फड म्हणजे ‘गॉसिप’च्या मधमाशांचे मोहोळ असे. कधीतरी, कुणीतरी, कुठेतरी त्या मोहोळावर दगड मारीत असे. मग त्या मधमाशा भल्या-भल्यांनाही डसत असत. भले त्या मध जमा करोत, पण अशा वेळेस त्यांना माणसांचे रक्तच गोड लागत असणार. खुद्द सामंतांना मधमाशा डसल्या नाहीत, पण त्यांच्या प्रेरणेने (चिथावणीने!) अनेक अतिशहाण्या साहित्यिकांनी तसे दगड मारून स्वत:वर मधमाशांचा हल्ला ओढवून घेतला! मग खासगी ‘लेट नाइट पार्टीज्’मध्ये त्या दुष्ट मधमाशांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा सामंत जमलेल्या धुंद रसिकांना ऐकवत असत. त्या कथा म्हणजे भल्या-भल्यांचे वस्त्रहरण असे. अशा वस्त्रहरणांतून सामंतांकडे जमा झालेला वस्त्रांचा साठा प्रचंड होता. एकूणच त्यांना विविध प्रकारच्या वस्तूंचा संग्रह करण्याची अचाट हौस होती. त्यात बर्नार्ड शॉच्या सहीचे पुस्तक असू शके आणि बालगंधर्वाच्या अगदी पहिल्या-वहिल्या नाटकाचे फोटोसुद्धा?! शेक्सपियरच्या नाटय़संग्रहाची दुर्मिळ अशी १८ व्या शतकातली प्रत त्यांच्याकडे उपलब्ध असू शके आणि कुमारगंधर्वांच्या पहिल्या जाहीर मैफलीचे वा रेडिओवर झालेले रेकॉर्डिंग. बाळ सामंतांना अपार कुतूहल होते. अगदी सगळ्या गोष्टींचे. संगीत, ग्रंथ, चित्रे, छायाचित्रे आणि माणसे, त्यांच्या जीवनकहाण्या आणि अर्थातच स्वत:चा अनुभव. या सर्व संग्रहाला त्यांच्या छद्मी आणि बिनधास्त स्वभावाचा एक वेगळाच बाज होता. विचाराने सामंत काँग्रेसवाले होते. म्हणजे यशवंतराव चव्हाण स्कूलचे. (राष्ट्रवादी नव्हे!) चव्हाणांप्रमाणेच सामंतांचाही डाव्या म्हणजे कम्युनिस्ट आणि समाजवादी विचारांशीही संबंध आला होता. त्यामुळे अंतुले-वसंत साठेंपासून ते डांगे-एसेम् यांच्याही संपर्कात ते असत. एकेकाळी ते महाराष्ट्र सरकारचे अधिकृत आणि पुढे अनधिकृत संपर्क अधिकारी होते. सर्व वर्तुळांमध्ये त्यांचा वावर असल्यामुळे (आणि वर म्हटल्याप्रमाणे मीडियाविश्व तेव्हा मर्यादित असल्यामुळे) सामंतशाहीचा दबदबा चांगलाच असे. आकाशवाणी- म्हणजे मुख्यत: मुंबई केंद्र हा तर त्यांचा एक अड्डाच होता. त्यांचा उत्साहही उदंड होता. त्यामुळे वय आणि आजारपणाने आक्रमण करीपर्यंत ते ‘तिन्ही’ लोकांशी संपर्क ठेवीत असत, वृत्तपत्रातील लेखांचे मुद्दे खोडून काढत असत, चुकीच्या माहितीची पुराव्यानिशी दुरुस्ती करीत असत आणि वेळ पडल्यास काही प्रथितयशांची सालेही काढत असत. चव्हाटय़ावरील माणसाला चार देताना चार ठोसे घ्यावेही लागतातच. सामंत अर्थातच त्याला तयारच असत. एवढा सगळा ‘नारदीय’ शैलीतला त्रिलोक संचार करून त्यांना वाचायला, लिहायला, मैफली ऐकायला कधी वेळ मिळत असे हे एक गूढच होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या ७०-८५ च्या घरात असावी. मुख्यत: लेख वा स्तंभ संग्रह या पुस्तकांचे विषयही जीवनाच्या विविध अंगांना व्यापणारे. त्यामुळे लौकिक अर्थाने ‘यश’ त्यांनी प्राप्त केले होते. त्यांच्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या मुलाकडून ते पुस्तके मागवीत असत. अमेरिका असो वा चीन, तेथे चालू असलेल्या राजकीयच नव्हे तर साहित्यिक- सांस्कृतिक घडामोडींवरसुद्धा त्यांची नजर असे, परंतु ‘यश’ प्राप्त करून ते ‘प्रथितयश’ कधीही झाले नाहीत. समकालीन साहित्यिकांनी त्यांचा वेळप्रसंगी उपयोग करून घेतला पण त्यांना कोणत्याही ‘साहित्यिक क्लब’चे आजीव सदस्यत्व बहाल केले नाही. साठीच्या आणि सत्तरीच्या दशकात (१९६० ते १९८०) घडलेल्या प्रत्येक राजकीय व साहित्यिक- सांस्कृतिक घटनेचे ते अगदी आतल्या गोटातले साक्षीदार होते. संयुक्त महाराष्ट्र मिळाला तेव्हा ते पस्तिशीच्या आसपास होते. एकाच वेळेस आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण या दोघांचाही निकटचा सहवास त्यांना लाभला होता. त्या दोघांच्या जीवनातील चढ-उतार त्यांनी जवळून पाहिले होते. संयुक्त महाराष्ट्र मिळण्याच्या अगोदर व नंतर आचार्य अत्रे एक अफाट लेजंडरी व्यक्तिमत्त्व होते, पण अशा प्रचंड व्यक्तीला शेवटच्या तीन-चार वर्षांत जी अवहेलना सहन करावी लागली, त्याची व्यक्तिगत बोचही सामंतांना होती, तीच गोष्ट यशवंतरावांची. प्रथम मुंबई प्रांताचे आणि नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या यशवंतरावांचा दिल्लीपर्यंतचा वाढता दबदबा आणि १९७७ नंतर उदास होत गेलेले यशवंतरावही त्यांनी जवळून पाहिले होते. या सर्व काळात महाराष्ट्रातील तमाम सारस्वत (म्हणजे साहित्यिक!) कसा संधीसाधूपणाने वावरत होता, हेही त्यांनी जवळून पाहिले होते. त्यांची ख्याती विनोदी लेखकांच्या मांदियाळीतली असली तरी त्यांना त्याहूनही स्वत:ची ओळख त्यांच्या ‘शापित यश’ या पुस्तकाने करून द्यावी असे वाटे. ‘शापित यश’ हे रिचर्ड बर्टन या विलक्षण साहसी इंग्रज व्यक्तीचे चरित्र आहे. हा रिचर्ड बर्टन म्हणजे नट (एलिझाबेथ टेलरचा पती) नव्हे. सामंतांनी चरित्र लिहिलेला रिचर्ड बर्टन म्हणजे एकोणिसाव्या शतकातील अक्षरश: ‘एकमेवाद्वितीय’ असा माणूस होता. तो संशोधक होता, धाडसी प्रवासी होता, लेखक होता, त्याला मराठी, संस्कृत, गुजराती, हिंदी, पर्शियन याचबरोबर अरबी, स्वाहिली, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच अशा एकूण तीस भाषा येत असत. शिवाय अनेक बोली-उपबोलीही तो बोलू शकत असे. तो चित्रकार होता आणि कलासमीक्षकही. बुद्धिबळातही तो चॅम्पियन होता. बर्टनची जगभर ख्याती आहे ती मात्र मानवशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन्ही विषयात त्याने केलेल्या संशोधनामुळे. त्याचे अवघे आयुष्य चित्तथरारक घटनांनी व्यापलेले आहे. ‘अरेबियन नाइट्स्’ या जगभर गाजलेल्या पुस्तकाचा पहिला अनुवादकार तोच. आपण मुस्लिम आहोत असे भासवून मक्केच्या मशिदीत तो घुसला. त्याची तोतयेगिरी लक्षात येती तर त्याचा शिरच्छेदच झाला असता. आफ्रिका खंडातील लोकांचा आणि भौगोलिकतेचा शोध घेताना हातात तलवार घेऊनही त्याला लढावे लागले. अशा या बर्टनने बाळ सामंतांना पूर्णपणे झपाटून टाकलेले होते. त्यांच्याबरोबरची कोणतीही खासगी व जाहीर बैठक असो, ती बर्टन आख्यानशिवाय संपत नसे. बाळ सामंत यांना तसे धाडसी व चित्तथरारक जीवन लाभले नाही, पण जे जीवन त्यांना मिळाले, ते मात्र त्यांनी अतिशय सुरस व शोधक वृत्तीने व्यतीत केले. बाळ सामंत यांच्या निधनाने हे एक बहुश्रुत, व्यासंगी आणि जीवनरसाने ओथंबलेला, तिन्ही लोकांत बिनदिक्कत फिरणारा फिरस्ता आपल्यातून गेला आहे.