Leading International Marathi News Daily                                  सोमवार, १ जानेवारी २००९
लोकमानस
‘शांतता!.. घरकुलांचे मार्केटिंग चालू आहे!!
 
‘म्हाडा’च्या ४००० फ्लॅट्स्साठी पहिल्या दोन दिवसांत दोन लाख अर्ज विक्रीला गेले! ३० जानेवारीपर्यंत आणखी काही लाख अर्जाची विक्री होईल. या लाखो ‘अर्जदारां’पैकी तिथे खरोखर कायमचे वास्तव्य करू इच्छिणारे किती आणि केवळ गुंतवणूक म्हणून फ्लॅट ‘ब्लॉक’ करून ठेवण्याची मनीषा बाळगणारे किती? हल्ली ‘गुंतवणूकदार’ हा प्राणी कुठल्या कुठल्या क्षेत्रात उपटेल हे सांगता येत नाही. घरबांधणी क्षेत्रात अशी ‘गुंतवणुकदारगिरी’ करून यथावकाश स्वत:ची चांदी करायची, हा उपद्व्याप अनैतिक आहे, असे आजकाल कोणालाही वाटत नाही. ‘म्हाडा’च्या एच.आय.जी. म्हणजे ‘हायर इन्कम ग्रुप’च्या फ्लॅटस्साठी इच्छुक असणारे ‘अर्जदार’ प्रत्यक्षात उच्च व अतिउच्च-मध्यमवर्गातले असून त्यातल्या बहुतेक सर्व जणांचे स्वत:चे फ्लॅटस् आहेत. काही जणांची स्वत:ची ‘फार्म-हाऊसेस’ आहेत, तर काही जणांच्या दाराशी एक-दोन मोटारी आहेत. ज्यांची मुले परदेशात मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये ‘प्लम जॉब’वर आहेत, अशी मंडळीही येनकेन प्रकारेण ‘म्हाडा’चा एम.आय.जी. फ्लॅटस् आपल्याला हडप करता येईल का याची चाचपणी करताहेत! या सर्व उपद्व्यापामागची ‘उदात्त’ प्रेरणा एकच- ती म्हणजे ‘गुंतवणूक’!
‘म्हाडा’च्या इ.डब्ल्यू.एस. म्हणजे ‘इकॉनॉमिकली वीकर सेक्शन’साठीच्या फ्लॅटस्बद्दल काय बोलावे? सध्या ‘सेल्फ कण्टेण्ड फ्लॅट’चे भूत सर्वाच्या मानगुटीवर एवढे घट्ट बसले आहे, की दुसऱ्या कुठल्याही पर्यायी घररचनेचा विचारही आपण करू शकत नाही. १८० चौ. फूट क्षेत्रफळाचा ‘सेल्फ कण्टेण्ड फ्लॅट’ म्हणजे एक मोठा क्रूर विनोद आहे. १८० चौरस फुटात खोली, स्वयंपाकघर आणि टॉयलेट कोंबण्याचा हा अट्टाहास कशासाठी? हे भयानक डिझाईन कोणी केले? मुंबईच्या तळागाळातल्या जनतेने कधीतरी ‘आम्हाला सेल्फ कण्टेण्ड घर पाहिजे’ अशी मागणी केली होती काय? त्यापेक्षा पूर्वीच्या ‘चाळ-सिस्टिम’वर आधारित घररचना का नाही करत? चाळ-सिस्टिम घररचनेची धाटणी व एकूण माहोलच असा असतो, की कोणताही धनदांडगा, श्रीमंत अथवा उच्च-मध्यमवर्गीय माणूस इथे येऊन आपले बस्तान बसवायच्या भानगडीत पडत नाही; जेणेकरून ही घररचना खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या म्हणजे गरीब जनतेच्या वास्तव्यासाठीच अशी वर्षांनुवर्षे राहते. याउलट ‘म्हाडा’चे १८० चौ. फुटाचे चार ‘सेल्फकण्टेण्ड’ फ्लॅटस् एकत्र करून ७२० चौ. फुटाचा सुबक ‘दोन-बेडरूम हॉल-किचन’ फ्लॅट सहज करता येतो. या अशा सुबक जागेचा ‘ऑफिस-स्पेस’ म्हणूनही कमर्शियल उपयोग होऊ शकतो आणि म्हणूनच चढय़ा किंमतीला हे असे छोटे ‘सेल्फ कण्टेण्ड’ फ्लॅटस् विकले जातात, विकत घेतले जातात. ‘म्हाडा’चे छोटे फ्लॅटस हे अशा ‘स्पेक्युलेशन मार्केट’साठी आहेत काय, हे ठरवण्याची वेळ आलेली आहे.
‘सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे..’ हे‘म्हाडा’चे ब्रीदवाक्य. त्यानुसार इ.डब्ल्यू.एस. आणि एल.आय.जी. क्षेत्रातली तरी घरबांधणी ‘चाळ-सिस्टिम’ घररचनेवर आधारित करता येईल का याचा विचार झाला पाहिजे, जेणेकरून इथे येणारा माणूस कायम वास्तव्यासाठी येणारा ‘जेन्युइन बायर’ म्हणजेच खरोखरीचा घरखरेदीदार असेल!
चंद्रमोहन वैद्य, ठाणे

केंद्रीय विद्यापीठ: उदासीन राज्य सरकार
ल्ल देशात बारा नवीन केंद्रीय विद्यापीठे स्थापन करण्याबाबत सरकार लवकरच अध्यादेश जारी करणार आहे. नवीन केंद्रीय विद्यापीठे बिहार, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, ओरिसा, पंजाब, राजस्थान व तामिळनाडू या राज्यांत स्थापन करण्यात येणार आहेत. ज्या राज्यांनी या विद्यापीठांची मागणी केली आहे त्यांना ती दिलेली आहे.
महाराष्ट्रातून तशा प्रकारची मागणी झालेली नाही, त्याचे छुपे कारण मोठमोठय़ा मंत्रीमहोदयांच्या शिक्षण संस्था व विद्यापीठे.
जर केंद्रीय विद्यापीठे स्थापन झाली तर आपण खोललेल्या विद्यापीठांना कोणी विचारणार नाही हा हेतू यामागचा असावा. कारण राज्य शासन हे मराठी मुलांच्या दर्जेदार शिक्षणाचा विचारच करत नाही. नाही तर सरकारने एवढी मोठी संधी सोडलीच नसती. हा सरकारचा नाकर्तेपणा आहे.
संदीप चौधरी, घाटकोपर, मुंबई

शिक्षा पोलिसांना का?
ल्ल २६/११च्या भयानक अनुभवानंतर शासनाने अमलात आणलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे पोलीस कर्मचारी/ अधिकाऱ्यांच्या रजा व सुट्टय़ा रद्द करणे. गणपती आणि नवरात्रानंतर आता जरा उसंत मिळत असताना त्यांना यंत्रमानवाप्रमाणे वागवणे माणुसकीला धरून आहे काय? समाजात आढळणाऱ्या अपप्रवृत्तींचा थोडाफार भाग त्यांच्यातही आहे, पण २६/११ चा गुन्हा जणू काही त्यांनीच केला आहे अशा थाटात त्यांना ही शिक्षा का? समाजाच्या प्रत्येक घटकाने नियमांचे पालन केले व दक्षता बाळगली तर पोलिसांवरचा बराच ताण कमी होईल. पोलिसांना नावे ठेवणारा व त्यांना विकत घेऊ बघणारा समाज हे करायला तयार आहे का? पुढाऱ्यांचे संरक्षण वेळप्रसंगी मनाविरुद्धही पोलिसांनाच करावे लागते हे योग्य आहे का? नवीन भरती, पर्यायी यंत्रणा अशा उपाययोजना करणे सोडून असणाऱ्या पोलीस कर्मचारी/अधिकाऱ्यांना शिक्षा करणे कितपत न्याय्य आहे?
विलास फडके, पेण

ही ज्योतिषाची भलावणच
ल्ल डॉ. विद्याधर ओक यांचा ‘दैव x कर्म = आयुष्य’ अशा शीर्षकाचा (४ जाने.) लेख प्रसिद्ध झाला आहे. आधुनिक विज्ञानाने ज्योतिष या अर्धवट शास्त्राचे (स्यूडो सायन्स) अक्षरश: वस्त्रहरण केल्याने अलीकडे ज्योतिषी, त्यांचे समर्थक व स्वत:ला ज्योतिषतज्ज्ञ म्हणवून घेणारे ‘ज्योतिष हे शास्त्र आहे’ अशी उघडपणे दवंडी पिटत नाहीत; परंतु असे लेख लिहून हे थोतांडही नाही असा आटापिटा मात्र करतात. डॉ. ओक यांचा लेख हा त्याचा उत्तम नमुना आहे.
त्यांनी सुरुवातीस व लेखाच्या अधूनमधून जणू काही आपण बुद्धिप्रामाण्यवादीच आहोत असा भास निर्माण केला आहे. त्यांचा दावा असा आहे की ते या विषयाचे अभ्यासक आहेत, परंतु लेख वाचल्यावर ते ज्योतिष विषयाचा कैवार घेऊन त्याचा प्रचारच करताहेत हे सिद्ध होते. मागच्या दाराने लपतछपत या तकलादू विषयाला लोकांच्या समोर आणताना आपण विसंगत विधाने करीत आहोत हेही त्यांच्या लक्षात आलेले नाही. उदाहरणादाखल हीच विधाने पाहा, ‘काय होणार हे ठरलेले नसते. कर्ता- करविता तो नसतो, तर आपणच असतो.’ नंतर लिहितात, ‘ज्योतिषशास्त्राचा उपयोग भाकीत करण्यासाठी नसून पत्रिकेच्या अभ्यासाने एखाद्याच्या जीवनातील सद्य व भविष्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार कर्म ठरविण्यासाठी आहे.’ या दोन प्रतिपादनात ठळक विसंगती आहे हे कुणीही मान्य करील. ग्रहांचा परिणाम मानवी जीवनावर होतो या अशास्त्रीय तत्त्वावरच पत्रिका बनविली जाते ना? मग जे गृहीतकच अशास्त्रीय आहे त्यावर आधारित पत्रिका- कुंडली काय लायकीची? जगातील १८६ नामवंत शास्त्रज्ञांनी पत्रक काढून ‘ज्योतिष हे शास्त्र नाही’ याचा निर्वाळा दिला आहे, हे ओक साहेबांना माहीत नसावे. जात व ज्योतिष या घातकी गोष्टींनी या देशाचे अतोनात नुकसान केले आहे. स्वा. सावरकरांनी तर परखडपणे देशबांधवांना उद्देशून सवाल केला आहे की, ग्रहांची पूजा करून अन् त्यांच्यावर विसंबून या राष्ट्राचे काय भले झाले आहे?’ याउलट पत्रिका- कुंडली, मुहूर्त, ग्रहशांती यांना धूप न घालता विज्ञानाची कास धरली त्या पाश्चात्य राष्ट्रांनी जगावर राज्य केले.
हा संपूर्ण लेखच दिशाभूल करणारा आहे. छुप्या अजेंडय़ासारखा छुपा हेतू बाळगून (पत्रिका- म्हणजेच ज्योतिषाचा प्रचार) संपूर्णतया विसंगतीपूर्ण असे लिखाण ओक यांनी केलेले आहे.
चंद्रसेन टिळेकर, अंधेरी, मुंबई