Leading International Marathi News Daily                                 सोमवार, १ जानेवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

शेतीवाडी

अग्रलेख

लाल किल्ला

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईला धावणे चुकलेले नाही. या धावण्याला काळवेळेचे बंधन नाही. रात्रंदिवस मुंबईकरांच्या पायाला चक्र. कधी नोकरीच्या निमित्ताने, कधी ती शोधण्याच्या निमित्ताने..कधी शाळा-कॉलेजसाठी तर कधी भटकंती म्हणून. दररोज अव्याहत धावणारी मुंबई आजही धावली, पण रोजच्या तिच्या धावण्यात आणि आजच्या धावण्यात फरक होता. रविवारच्या विश्रांतीच्या दिवशीही मुंबई अविश्रांत धावली. काहीजण धावले मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, काही धावले मॅरेथॉनचा दरवर्षीचा नित्यक्रम चुकू नये यासाठी, काहींना द्यायचा होता सामाजिक संदेश तर काहींना भागवायची होती निव्वळ हौस. कारण काहीही असो, मुंबई धावली.. रविवारीही.

पेशव्यांचा वंश मस्तानीमुळे टिकून
सुनील माळी, पुणे, १८ जानेवारी

तत्कालीन समाजाकडून उपेक्षा, छळ सहन करूनही बाजीराव पेशव्यांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मस्तानीने लष्करी मोहिमांत भाग घेत जिवंतपणी तनमनाने मराठा साम्राज्याची सेवा केलीच, पण तिच्या कुशीतून जन्माला आलेल्या पराक्रमी वीरांच्या वंशवृद्धीमुळे पेशव्यांचा रक्ताचा अस्सल वंश अद्याप इंदूरमध्ये टिकून आहे आणि मराठा साम्राज्याचा नावलौकिक उज्ज्वलही करतो आहे, हे तिचे मराठा साम्राज्यावरील उपकारच ठरतात. मात्र त्याबदल्यात स्वातंत्र्यामध्ये तिची कबरही सुरक्षित ठेवण्याची जाण राहात नसल्याची शोकांतिका स्पष्ट झाली आहे. मस्तानीची पाबळ येथील कबर चोरीच्या उद्देशाने उद्ध्वस्त करण्यात आली आणि मनापासून प्रेम केलेल्या रणरागिणीच्या, झुंजार बाजीरावाच्या अर्धागिनीच्या व्याकुळ करणाऱ्या इतिहासखुणाच पुसल्या गेल्या. राजा छत्रसाल बुंदेले यांच्या या कन्येने विवाहानंतर सर्व प्रकारचा छळ सहन करूनही बाजीरावाला मनापासून साथ दिली. छत्रसाल हे राजपूत राजे तिचे पिता तर आई मुस्लिम. तिच्या मृत्यूनंतर तिचा आणि बाजीरावाचा पुत्र समशेरबहाद्दर याने पुढे अनेक लढायांमध्ये मराठय़ांच्या शत्रूला समशेरीचे पाणी पाजले. त्याकाळच्या सामाजाने मस्तानीला वाईट वागणूक दिली तरी बाजीरावच्या पत्नी काशीबाई यांनी मस्तानीच्या मृत्यूच्या वेळी अवघ्या सहा वर्षे असणाऱ्या कोवळ्या समशेरला आपल्या पदराखाली घेऊन त्याला वाढविले, हाही भावनाप्रधान पदर दिसून येतो.

श्रीलंका दौऱ्यातून दुखापतीमुळे हरभजनची माघार
मुंबई, १८ जानेवारी / क्री. प्र.

श्रीलंका दौऱ्यासाठी आज जाहीर झालेल्या पंधरा खेळाडूंच्या भारतीय संघात अष्टपैलू रवींद्र जडेजा याच एकमेव नव्या चेहऱ्याचा समावेश आहे तर अव्वल ऑफस्पिनर हरभजन सिंगला मांडीचे स्नायू दुखावले असल्यामुळे या दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. यंदाच्या रणजी हंगामातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच २० वर्षांच्या रवींद्र जडेजाला संघात स्थान मिळाले तर गेल्या ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेत झालेल्या एकदिवसीय मालिकेनंतर संघाबाहेर गेलेल्या उत्तर प्रदेशच्या प्रवीण कुमारनेही भारतीय संघात पुनरागमन केले.

लीजवरील जमिनींचा १० दिवसांत आढावा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
बाजारभावाच्या एक टक्का दराने महसूल वसूल करणार

समर खडस, मुंबई, १८ जानेवारी

राज्यातील व विशेषत मुंबईतील जे भूखंड लीजने (मोठय़ा कालावधीसाठी भाडेपट्टय़ाने) विविध संस्था, व्यावसायिक आस्थापने, कारखाने, क्लब्ज यांना देण्यात आले आहेत, त्यांचा र्सवकष आढावा घेऊन त्याचा अहवाल येत्या १० दिवसांमध्ये आपल्याला द्यावा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महसूल, उद्योग तसेच अर्थ खात्याच्या सचिवांना दिला आहे. तसेच हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या जमिनींची नाममात्र लीज वाढवून ती बाजारभावाच्या एक टक्का वसूल करण्याचा नवा फॉम्र्युला बनविता येईल किंवा कसे हे पहावे, असे सूचक उद्गारही मुख्यमंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत काढल्याचे समजते. मुंबईत अनेक संस्थांना, रुग्णालये चालविणाऱ्या खाजगी ट्रस्टना, तसेच मुंबईतील नामांकित व उच्चभ्रू क्लब्जना शासकीय जमिनी ३० ते ९९ वर्षांच्या लीजने देण्यात आलेल्या आहेत. अत्यंत नाममात्र दरामध्ये दिलेल्या या जमिनी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असून त्यातून सरकारला कोणतेही फारसे उत्पन्न मिळत नाही. तसेच त्या जमिनींवर उभ्या असलेल्या आस्थापनांमधून सामान्य नागरिकांना फार मोठा दिलासा मिळेल, अशीही कोणती कामे होताना दिसत नाहीत. या उलट भाडेपट्टय़ाने दिलेल्या या जमिनींचा नाममात्र महसूल भरण्याबाबतही अनेक संस्था टाळाटाळ करतात. अनेक संस्थांनी तर वर्षांनुवर्षे संबंधित जमिनीच्या भाडेपट्टय़ाचे पैसेच भरलेले नाहीत.

ज्येष्ठ साहित्यिक बाळ सामंत यांचे निधन
‘सामंत’शाही संपली! अग्रलेख पाहा
मुंबई, १८ जानेवारी / प्रतिनिधी

ज्येष्ठ साहित्यिक बाळ सामंत यांचे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबईतील नानावटी रुग्णालयात न्यूमोनियाच्या आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कलाताई, पुत्र विजय, राजीव व संजीव, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. साहित्यातील योगदानाबद्दल सामंत यांना २००४ साली ‘पद्मश्री पुरस्कारा’ने गौरविण्यात आले होते. बाळ सामंत प्रामुख्याने विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध होते. ‘मस्करी’, ‘गोंधळ’, ‘खिरापत’, ‘नवरा-बायको’, ‘करामत’, ‘खुशमस्करी’ या त्यांच्या पुस्तकांनी वाचकांना खूप हसविले. बालगंधर्व यांच्या जीवनावरील ‘तो एक राजहंस’, ‘हिटलर - एक महान शोकांतिका’, ‘प्रेमग्रंथ’, ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ ‘युवराज’, ‘मरणात खरोखर जग जगते’, ‘मैफल’, ‘पुनर्जन्म एक शोध’ इत्यादी वेगळ्या विषयावरील पुस्तकांचेही त्यांनी लेखन केले. रिचर्ड बर्टन यांच्या जीवनावरील ‘शापित यक्ष’ हे त्यांचे चरित्र खूप गाजले.
२७ मे १९२४ रोजी जन्मलेल्या बाळ सामंत यांनी रुईया महाविद्यालयामधून कला शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळविली. ‘लोकसत्ता’मधील ‘न संपणाऱ्या गोष्टी’ या बाळ सामंत यांच्या स्तंभाला वाचकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे ‘नवशक्ती’ दैनिकातूनही त्यांनी स्तंभलेखनही केले होते. राज्य शासनाच्या जनसंपर्क अधिकारी पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.

२६ नोव्हेंबरसारखे आणखी हल्ले होण्याचा धोका
न्यूयॉर्क, १८ जानेवारी / वृत्तसंस्था

२६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसारखे आणखी काही हल्ले भारतात नजीकच्या काळात होण्याचा धोका असल्याचा इशारा अमेरिकेतील एका अभ्यास गटाने दिला आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना येत्या काही दिवसांत भारतातील काही ठिकाणी असे हल्ले करण्याची शक्यता असून, भारत तसेच अमेरिकेचे धोरणसुद्धा हा धोका टाळू शकणार नाही, असे ज्येष्ठ राजनितीज्ज्ञ अँजेल राबासा यांनी म्हटले आहे. रॅण्ड कॉर्पोरेशन ही एक संशोधन संस्था असून, अँजेल राबासा यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेच्या सदस्यांनी केलेल्या अभ्यासाअंती हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.२६ नोव्हेंबर रोजी झालेल्या मुंबईवरील हल्ल्यांच्या घटनेपासून पाकिस्तानातील इतर अतिरेकी संघटनांना आणखी चेव येऊन ते त्याच प्रकारचे हल्ले भारतात, तसेच दक्षिण आशियात अन्य ठिकाणी करण्याची शक्यता या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. २६ नोव्हेंबरच्या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानातील ‘लष्कर ए तय्यबा’ या दहशतवादी संघटनेचेच नाव प्रामुख्याने घेतले जाते.

..अन् विजेती पदकाविनाच घरी परतली
मुंबई, १८ जानेवारी/ क्री.प्र.

पुर्ण मॅरेथॉनमध्ये पहिल्या तीन आलेल्या महिला भारतीय धावपटूंना पोडियमवर पदके देण्यासाठी बोलविण्यात आले. इंद्रेश धीरज, लीलाम्मा अलफान्सो व किरण धीरज यांना अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकांची पदके, प्रमाणपत्रे आणि धनादेश देण्यात आले. यावेळी या तिघींच्याही चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. पण हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणभंगूर ठरला. कारण काही क्षणातच या स्पर्धेत खरोखर पहिली आलेली एल. अरूणा देवी आयोजकांना भेटली आणि एक नवा पेच सर्वासमोर निर्माण झाला. सर्व काही पडताळून पाहिल्यानंतर एल. अरूणा देवीला स्पर्धेची विजेती घोषित करण्यात आलेले असले तरी आयोजकांच्या चुकीमुळे मात्र या विजेतीला पदकाविनाच घरी परतावे लागले आहे.

मुंबई महापालिका पोटनिवडणुकीत ४७ टक्के मतदान
मुंबई, १८ जानेवारी / प्रतिनिधी

कुर्ला-नेहरूनगर येथील प्रभाग १६० मध्ये आज झालेल्या पोटनिवडणुकीत ४७.३ टक्के मतदान झाले. जागृती नगर येथे राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेली बाचाबाचीची तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.
या मतदारसंघात ४३ हजार ६५० मतदार असून २० हजार ६५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ४७.३ टक्के मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होणार असून दुपारी बारा पर्यत मतमोजणी पूर्ण होईल असा अंदाज आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८