Leading International Marathi News Daily                                  सोमवार, १ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

पेशव्यांचा वंश मस्तानीमुळे टिकून
सुनील माळी, पुणे, १८ जानेवारी

 
तत्कालीन समाजाकडून उपेक्षा, छळ सहन करूनही बाजीराव पेशव्यांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मस्तानीने लष्करी मोहिमांत भाग घेत जिवंतपणी तनमनाने मराठा साम्राज्याची सेवा केलीच, पण तिच्या कुशीतून जन्माला आलेल्या पराक्रमी वीरांच्या वंशवृद्धीमुळे पेशव्यांचा रक्ताचा अस्सल वंश अद्याप इंदूरमध्ये टिकून आहे आणि मराठा साम्राज्याचा नावलौकिक उज्ज्वलही करतो आहे, हे तिचे मराठा साम्राज्यावरील उपकारच ठरतात. मात्र त्याबदल्यात स्वातंत्र्यामध्ये तिची कबरही सुरक्षित ठेवण्याची जाण राहात नसल्याची शोकांतिका स्पष्ट झाली आहे.
मस्तानीची पाबळ येथील कबर चोरीच्या उद्देशाने उद्ध्वस्त करण्यात आली आणि मनापासून प्रेम केलेल्या रणरागिणीच्या, झुंजार बाजीरावाच्या अर्धागिनीच्या व्याकुळ करणाऱ्या इतिहासखुणाच पुसल्या गेल्या. राजा छत्रसाल बुंदेले यांच्या या कन्येने विवाहानंतर सर्व प्रकारचा छळ सहन करूनही बाजीरावाला मनापासून साथ दिली. छत्रसाल हे राजपूत राजे तिचे पिता तर आई मुस्लिम. तिच्या मृत्यूनंतर तिचा आणि बाजीरावाचा पुत्र समशेरबहाद्दर याने पुढे अनेक लढायांमध्ये मराठय़ांच्या शत्रूला समशेरीचे पाणी पाजले. त्याकाळच्या सामाजाने मस्तानीला वाईट वागणूक दिली तरी बाजीरावच्या पत्नी काशीबाई यांनी मस्तानीच्या मृत्यूच्या वेळी अवघ्या सहा वर्षे असणाऱ्या कोवळ्या समशेरला आपल्या पदराखाली घेऊन त्याला वाढविले, हाही भावनाप्रधान पदर दिसून येतो. पानिपतच्या युद्धात तो धारातीर्थी पडला, पण त्याच्याही अलिबहाद्दर या पुत्राने नंतर अतुलनीय पराक्रम करीत मराठेशाहीची सेवा केली, बांद्याला जहागीर स्थापन केली. कलिंजरचा किल्ला घेत असताना अलिबहाद्दरला वीरमरण आले. त्यांच्या घराण्याने नंतर पेशव्यांचा वंश वाढविला, टिकवला आणि आता पेशव्यांच्या अस्सल रक्ताचा वंश अवैझबहादर हा इंदूर येथे असून पेशव्यांचे नाव उज्ज्वल करतो आहे. तेथे त्याने शाळेची स्थापना केली असून त्या शाळेच्या बोधचिन्हावर बाजीराव पेशव्यांचा भाला घेतलेला हात आहे. त्यांच्या घरात बाजीराव पेशवे, समशेरबहाद्दर तसेच अन्य वीरांची चित्रे गौरवाने लावलेली आहेत. तसेच एका मोठय़ा चिनी मातीच्या भांडय़ावरही ही चित्रे आहेत.
‘ये हमारे दादा है’ असे अवैझबहादर अभिमानाने सांगतात,’ अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक प्रा. प्रफुल्लचंद्र तावडे देतात. हे संशोधक अनेकदा अवैझबहादर यांच्या घरी गेले असून तेथे त्यांनी पेशव्यांच्या या वंशजाचा आपल्या घराण्याबाबतचा अभिमान अनेकदा अनुभवला आहे. बाजीराव पेशव्यांच्या मध्य प्रदेशातील रावेळखेडे येथील समाधिस्थानी बाजीराव पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासही अवैझबहादर यांची उपस्थिती असते. एका वर्षीच्या कार्यक्रमात एका प्रमुख पाहुण्याने अवैझबहादर यांचे आभार मानले तेव्हा अवैझबहादर यांनी त्या पाहुण्याला सुनावले, ‘‘आपण माझे आभार मानू नका, हा कार्यक्रम आमच्या कुटुंबाचा असल्याने मीच आपले आभार मानतो..’’. अवैझबहादर यांना शिवछत्रपतींचा आदर असून ‘‘महाराज के नामसे यहाँ कमान होनी चाहिये थी,’’ अशी खंतही ते व्यक्त करतात.
अवैझबहादर यांच्यासोबत राहणाऱ्या त्यांच्या भगिनी हुमेरा खान यांनी पुण्यातून नेहमी जाणाऱ्या या संशोधकांना बाजीराव पेशव्यांपासून अवैझबहादर यांच्यापर्यंतची उर्दूतील वंशावळ दाखवली असून या वंशावळीच्या सुरूवातीलाच बाजीराव यांच्या नावाचा उल्लेख ‘शिवाजीमहाराज के राज का पेशवा’ अशी केलेली आहे.
बाजीराव पेशव्यांना १७४० मध्ये पुण्यापासून दूर असताना मृत्यू आला आणि ते समजताच मस्तानीला इनाम दिलेल्या पाबळ या गावी तिने आपला प्राण सोडला. अश्वारोहण, तलवार-भाला चालविण्यातील नैपुण्याबरोबरच नृत्यनिपुणही असलेल्या या लावण्यसुंदरीचे समाधिस्थळ तिथे बांधण्यात आले.
या गौरवशाली इतिहासाच्या खुणा जपण्याची गरज असताना तेच उखडून टाकण्याची कृती केवळ पैशांच्या लालसेपोटी होत असेल तर ती बाब निश्चितच चुकीची ठरते, अशी संतप्त प्रतिक्रिया इतिहासप्रेमी व्यक्त करीत आहेत.