Leading International Marathi News Daily                                  सोमवार, १ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

‘मॅरेथॉन’चा असाही बोनस!
सुनील डिंगणकर, मुंबई, १८जानेवारी

 
वाशीला राहणारा १७ वर्षीय राजू दास दररोज पहाटे सीएसटीला येतो. वर्तमानपत्रांचे गठ्ठे मुंबईतील विविध ठिकाणी पोहोचविणे हे त्याचे काम आहे. रविवारी सकाळीही त्याने आपले काम नियमितपणे पार पाडले. वाशीला वर्तमानपत्रांचा गठ्ठा पोहोचविल्यावर तो पुन्हा सीएसटीला आला. त्याला मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे नव्हते पण मॅरेथॉनच्या निमित्ताने रस्त्यावर गोळा होणाऱ्या प्लॅस्टिकच्या बाटल्या विकून त्याला ‘बोनस’ मिळेल म्हणून त्याने सीएसटी स्थानक गाठले होते.
सुमारे एक कोटी ८५ लाख ६५ हजार मुंबईकरांची रविवार सकाळ आळोखे-पिळोखे देत सुरू होत असताना बाकीचे ३५ हजार मुंबईकर मात्र ‘स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन’मध्ये सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यांना सहकार्य करण्यास सर्व यंत्रणाही सज्ज होती. या मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्यांचे नातेवाईकही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सीएसटी स्थानक परिसरात उपस्थित होते. प्रत्येकाला प्लास्टिकच्या बाटलीतून पाणीवाटप करण्यात येत होते. त्यामुळे ठिकठिकाणी बाटल्यांचा खच पडला होता. राजू दासने मोठे पोते आणून त्यात या बाटल्या भरल्या. पुरेशा बाटल्या जमा झाल्यावर तेथे इतरांनीही त्याच्या पोत्यामध्ये बाटल्या टाकण्यास सुरुवात केली. दोन तासात त्याचे पोते पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांनी भरून गेले.
राजू म्हणाला की, असे काम करण्याचे त्याचे हे पहिले वर्ष नाही. दरवर्षी मॅरेथॉनच्या निमित्ताने त्याला अधिक कमाई करण्याची संधी चालून येते. याबाबतीत त्याचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे जमा झालेल्या बाटल्या कुठे विकायच्या ते ठिकाण, बाटल्यांचा भाव याबद्दल त्याला इत्थंभूत माहिती आहे. सध्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा भाव प्रति किलो १५ रुपये असून पोत्यामधील बाटल्यांचे जवळपास २०० रुपये मिळतील अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.
तुझे छायाचित्र वर्तमानपत्रात छापतो, असे सांगितले असता तो म्हणाला की, मी कचरा उचलण्याचे काम रोज करत नाही. त्यासाठी घाणीत जात नाही. माझे छायाचित्र पाहून आई-वडिलांचा गैरसमज होईल. त्यामुळे त्याने छायाचित्र काढण्यास नकार दिला. मुंबई स्पिरिट दाखविण्यासाठी धावणाऱ्या ३५ हजार मुंबईकरांमुळे राजूसारख्या अनेकांना एका दिवसाची बोनस कमवायची संधीही मिळाली.