Leading International Marathi News Daily                                  सोमवार, १ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

सॅनहोजेच्या ‘कौतिका’मुळे साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणुकीत महामंडळाच्या मतदारांची उदासीनता!
शेखर जोशी, मुंबई, १८ जानेवारी

 
पुढील महिन्यांत सॅनहोजे येथे होणाऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या ‘कौतिका’मुळे मोठय़ा प्रमाणात गदारोळ आणि वादविवाद झाला. महामंडळाच्या काही घटकसंस्था आणि सदस्यांच्या विरोधाला न जुमानता हा निर्णय पुढे रेटण्यात आला. त्याचा थेट परिणाम महाबळेश्वर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानावर झाल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी आपली अनास्था आणि उदासीनता दाखवत अत्यल्प मतदान केले.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी हे ८२ वे साहित्य संमेलन महाराष्ट्रात किंवा बृहन्महाराष्ट्रात न घेता सॅनहोजे येथे घेण्याचा निर्णय घेतला होता. बे एरिया महाराष्ट्र मंडळाकडून आलेल्या निमंत्रणावरून आणि साहित्य संमेलन परदेशात होत असेल तर त्यात चुकीचे काय, असे ‘कौतिका’ने सांगण्यात येत होते. मात्र या निर्णयावर मराठी साहित्य व्यवहारातील अनेक मंडळी तसेच साहित्य रसिकांकडून नाराजीचा सूर आळवला गेला. साहित्य महामंडळाच्या काही घटकसंस्था आणि सदस्यांचाही या ‘कौतिका’ला विरोध होता.
महामंडळाच्या विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थेनेही या संमेलनाबाबत घटनात्मक आणि वैधतेचे मुद्दे उपस्थित केले. महामंडळाच्या घटनेनुसार अखिल भारतीय साहित्य संमेलन हे महाराष्ट्रात किंवा भारतातच होऊ शकते. परदेशात ते घ्यायचे असेल तर घटनेत तशी दुरुस्ती करावी लागेल, असा मुद्दा उपस्थित करून घाईगर्दीत हे संमेलन घेऊ नये, असा मुद्दा त्यांनी मांडला. अखिल भारतीय साहित्य संमेलन परदेशात घेतल्यामुळे महाराष्ट्रात दरवर्षी होणारे आणि साहित्य रसिकांची प्रचंड गर्दी होणारे साहित्य संमेलन रद्द करावे लागणार होते. महामंडळावर या प्रकरणी सर्व स्तरातून जोरदार टीका झाली.
अखेर महामंडळाने पडती भूमिका घेऊन सॅनहोजे येथे होणाऱ्या संमेलनाला ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ असे नाव देऊन पळवाट काढली. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महामंडळातर्फे दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास राज्य शासनाकडून २५ लाख रुपयांचे अनुदान मिळते. यंदा हे संमेलन झाले नसते तर त्यावर महामंडळाला पाणी सोडावे लागले असते. त्यामुळे अखेर केवळ उपचार म्हणून हे संमेलन महाबळेश्वर येथे घेण्याचे ठरविण्यात आले. मात्र या सर्वाचा परिणाम संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झाला आणि महामंडळाचे सदस्य असलेल्या मतदारांनी आपली नाराजी अशा प्रकारे व्यक्त केली.