Leading International Marathi News Daily                                  सोमवार, १ जानेवारी २००९
प्रादेशिक

न्यायालयीन चौकशीची मागणी
मुंबई, १८ जानेवारी / प्रतिनिधी

म्हाडा उच्चपदस्थांच्या ‘गृहस्वप्न’ या सोसायटीबरोबरच जुहूसारख्या मोक्याच्या ठिकाणी अनेक सोसायटय़ांना २.४ इतका एफएसआय देण्याचे प्रकरण उघड होऊनही त्याबाबत काहीही कारवाई झालेली नसतानाच आता गृहनिर्माण विभागातील काही अधिकाऱ्यांनी संगनमताने शासनाच्या विशेषाधिकाराचा परस्पर वापर करून मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेली सुमारे ३५ घरे वाटून केलेल्या ‘व्यवहारा’ची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार चरणसिंग सप्रा यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भेटून केली आहे. गृहनिर्माण विभागातील अधिकाऱ्यांचा हा ‘व्यवहार’ उघड होऊ नये यासाठी या आदेशांच्या फायलीच गायब केल्या जाण्याची शक्यता गृहित धरून सेवानिवृत्त नव्हे तर विद्यमान न्यायाधीशाकडून चौकशी व्हावी, अशी मागणी आपण केल्याचे सप्रा यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. असा घोटाळा राजकारण्यांनी केला तर कमालीचा गहजब केला जातो.

‘मॅरेथॉन’चा असाही बोनस!
सुनील डिंगणकर, मुंबई, १८जानेवारी

वाशीला राहणारा १७ वर्षीय राजू दास दररोज पहाटे सीएसटीला येतो. वर्तमानपत्रांचे गठ्ठे मुंबईतील विविध ठिकाणी पोहोचविणे हे त्याचे काम आहे. रविवारी सकाळीही त्याने आपले काम नियमितपणे पार पाडले. वाशीला वर्तमानपत्रांचा गठ्ठा पोहोचविल्यावर तो पुन्हा सीएसटीला आला. त्याला मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे नव्हते पण मॅरेथॉनच्या निमित्ताने रस्त्यावर गोळा होणाऱ्या प्लॅस्टिकच्या बाटल्या विकून त्याला ‘बोनस’ मिळेल म्हणून त्याने सीएसटी स्थानक गाठले होते. सुमारे एक कोटी ८५ लाख ६५ हजार मुंबईकरांची रविवार सकाळ आळोखे-पिळोखे देत सुरू होत असताना बाकीचे ३५ हजार मुंबईकर मात्र ‘स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन’मध्ये सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यांना सहकार्य करण्यास सर्व यंत्रणाही सज्ज होती. या मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्यांचे नातेवाईकही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सीएसटी स्थानक परिसरात उपस्थित होते. प्रत्येकाला प्लास्टिकच्या बाटलीतून पाणीवाटप करण्यात येत होते. त्यामुळे ठिकठिकाणी बाटल्यांचा खच पडला होता. राजू दासने मोठे पोते आणून त्यात या बाटल्या भरल्या. पुरेशा बाटल्या जमा झाल्यावर तेथे इतरांनीही त्याच्या पोत्यामध्ये बाटल्या टाकण्यास सुरुवात केली. दोन तासात त्याचे पोते पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांनी भरून गेले.

सॅनहोजेच्या ‘कौतिका’मुळे साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणुकीत महामंडळाच्या मतदारांची उदासीनता!
शेखर जोशी, मुंबई, १८ जानेवारी

पुढील महिन्यांत सॅनहोजे येथे होणाऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या ‘कौतिका’मुळे मोठय़ा प्रमाणात गदारोळ आणि वादविवाद झाला. महामंडळाच्या काही घटकसंस्था आणि सदस्यांच्या विरोधाला न जुमानता हा निर्णय पुढे रेटण्यात आला. त्याचा थेट परिणाम महाबळेश्वर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानावर झाल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी आपली अनास्था आणि उदासीनता दाखवत अत्यल्प मतदान केले.

२००० पूर्वीच्या ‘खोटारडयां’ना हायकोर्टाचे संरक्षण नाही
मुंबई, १८ जानेवारी/प्रतिनिधी

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील ज्या उमेदवारांना २० नोव्हेंबर २००० पूर्वी राखीव कोटय़ातून नोकरी किंवा शैक्षणिक प्रवेश मिळविले आहेत व ज्यांचे जातीचे दाखले नंतर अवैध ठरून रद्द केले गेले आहेत अशांची नोकरी किंवा प्रवेश अबाधीत ठेवण्याचे आदेश न्यायालये देऊ शकत नाहीत, असा निकाल उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने दिला आहे. महाराष्ट्र शासन वि. मििलद व इतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने २० नोव्हेंबर २००० रोजी निकाल दिला होता. त्या निकालाचा भिन्न अर्थ लावून उच्च न्यायालयाच्या दोन खंडपीठांनी गेल्या वर्षभरात दोन परस्परविरोधी निर्णय दिले होते. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा नेमका अर्थ काय हे ठरविण्यासाठी मुख्य न्यायाधीशांनी न्या. एस. बी. म्हसे, न्या. ए.पी. देशपांडे व न्या. पी.बी. वराळे यांचे पूर्णपीठ स्थापन केले होते.

‘मोक्का’ फेरआढावा समिती स्थापण्यासाठी याचिका
मुंबई, १८ जानेवारी/प्रतिनिधी

संघटित गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दहा वर्षांपूर्वी केलेल्या ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या’च्या पोलीस अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या मनमानी व अवास्तव वापरास आळा बसावा आणि हा कायदा सुयोग्य प्रकरणांनाच लागू केला जाऊन त्याखालील कारवाई अधिक पारदर्शी व चोखपणे व्हावी यासाठी ‘टाडा’ व ‘पोटा’ या कायद्यांप्रमाणेच ‘मोक्का’ प्रकरणांचा फेरआढावा घेण्यासाठीही उच्चाधिकार समिती (रिव्ह्यू कमिटी) राज्य सरकारने स्थापन करावी यासाठी एक रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली गेली आहे. ‘मोक्का’अन्वये खटला सुरू असलेल्या कळंबोली येथील एक आरोपी कलजितसिंग त्रिलोचनसिंग गिल या आरोपीने केलेली ही याचिका बुधवारी न्या. बिलाल नाझकी व न्या. अनूप व्ही. मोहता यांच्या खंडपीठापुढे आली असता न्यायालयाने दोन आठवडय़ांनी याचिका अंतिम सुनावणीसाठी घेण्याचे ठरविले व तोपर्यंत राज्य सरकारने याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवरील आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राच्या रूपाने सादर करावे, असे निर्देश दिले.

संपूर्ण एसी लोकल नको..काही डबेच हवे!
मुंबई, १८ जानेवारी / प्रतिनिधी

सर्व नऊ अथवा बारा डबे वातानुकूलित असलेल्या वा दिवसभरातून मोजक्याच वेळी धावणाऱ्या वातानुकूलित लोकल मुंबईकरांना नको आहेत. त्याऐवजी प्रत्येक लोकलमध्ये एखादं-दुसरा वातानुकूलित डबा असावा, अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे. त्यासाठी प्रथम वर्गापेक्षा ३०-५० टक्के अधिक प्रवासभाडे मोजण्याची मुंबईकरांची तयारी आहे. वातानुकूलित लोकलबाबत मुंबईकरांचे मत जाणून घेण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) गेल्या महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणांतर्गत एमआरव्हीसीने ५० हजार छापील अर्ज मुंबईकरांना वाटले होते. त्यापैकी संपूर्ण भरलेले १३ हजार ९०० अर्ज एमआरव्हीसीकडे जमा झाले आहेत. त्यामध्ये १०० टक्के मुंबईकरांनी शहरात एसी लोकल चालविण्यास अनुकूलता दर्शविली. तसेच त्यासाठी मासिक पासाच्या सुविधेला त्यांनी पसंती दर्शविली असल्याचे एमआरव्हीसीच्या सूत्रांनी सांगितले. वातानुकूलित लोकलबाबतच्या या अहवालास सध्या अंतिम रुप देण्यात येत आहे. येत्या एक-दोन दिवसांनंतर हा अहवाल मध्य व पश्चिम रेल्वेकडे पाठविला जाईल, अशी माहिती एमआरव्हीसीच्या प्रवक्त्याने दिली. या सर्वेक्षणांतर्गत वाटलेल्या ५० हजार अर्जापैकी ३० हजार अर्ज उपनगरी प्रवाशांमध्ये व उर्वरित २० हजार कॉर्पोरेट कंपन्यांत वाटल्याचे सांगून, ई-मेल व वेबसाईटच्या माध्यमातून अत्यल्प मुंबईकरांनी प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकल संपूर्ण वातानुकूलित असण्याऐवजी लोकलमधील ठराविक डबे वातानुकूलित असण्याबाबत मुंबईकरांमध्ये एकमत आहे. त्याचप्रमाणे प्रथम व द्वितिय वर्ग प्रवाशांमध्ये त्याबाबत काही मतभेदही असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सध्याच्या नऊ अथवा बारा डबा लोकलमधील ठराविक डबे वातानुकूलित असावेत, अशी प्रथम वर्ग प्रवाशांची सूचना आहे. मात्र त्यामुळे द्वितीय वर्गाच्या डब्यांची संख्या घटण्याची भीती असल्याने, त्याला द्वितीय वर्गाच्या प्रवाशांनी विरोध दर्शविला आहे. शहरातील लोकल १५ डब्यांच्या झाल्यानंतर त्यातील तीन डबे वातानुकूलित करावेत, अशी द्वितीय वर्गाच्या प्रवाशांची सूचना असल्याचे एमआरव्हीसीच्या सूत्रांनी सांगितले.

मालेगाव स्फोटासाठी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण लेफ्टनंट कर्नल पुरोहितकडूनच?
बॉम्ब ठेवणारा संशयित कर्नाटकात!
मुंबई, १८ जानेवारी / प्रतिनिधी

नांदेड स्फोटातील आरोपींच्या जबानीतून त्यांना प्रशिक्षण देणारी मिथुन चक्रवर्ती नामक व्यक्ती कोण होती याचा राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला अद्याप उलगडा झाला नसला तरी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण या प्रकरणी अटकेत असलेला लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यानेच दिल्याचे संकेत मिळत आहेत. पुरोहित हाच मिथुन चक्रवर्ती होता का, याचा सध्या तपास सुरू असल्याचे या पथकातील एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. मालेगाव बॉम्बस्फोटात प्रत्यक्ष बॉम्ब ठेवणाऱ्या तीनजणांची नावेही आतापर्यंतच्या तपासात उघड झाली आहेत. यापैकी एकाचे नाव प्रवीण मुतालिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मुतालिक मूळचा कर्नाटकातील असून अभिनव भारत या संघटनेशी संबंधित आहे. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्या संपर्कात असलेल्या मुतालिकवर बॉम्ब बनविण्याची जबाबदारी होती. रामजी कालसंगारा आणि संदिप डांगे या दोघांनी साध्वीच्या स्कुटरमध्ये प्रत्यक्ष बॉम्ब ठेवल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. मात्र रामजी वा संदिप या दोघांबद्दल फारशी माहिती मिळाली नसल्याचेही त्याने सांगितले. स्वयंघोषित धर्मगुरू दयानंद पांडे याने दिलेल्या माहितीमुळे मालेगाव स्फोटाच्या कटावर अधिक प्रकाशझोत पडल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. मुतालिक नाशिक व देवळाली येथे आला होता आणि साध्वीनेच त्याची भेट पुरोहितशी करून दिली. या काळात झालेल्या बैठकांमध्ये मुतालिक उपस्थित होता. त्याच्यावर या कटाची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली होती, अशी माहिती आता उघड होत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. नांदेड येथील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींनी मिथुन चक्रवर्ती नावाच्या एका लष्करी अधिकाऱ्याने बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याचे म्हटले होते. हाच धागा पकडून दहशतवादविरोधी पथकाने अधिक चौकशी केली तेव्हा नांदेड स्फोटातील आरोपींना पुण्याच्या शिवगड या परिसरात एका आलिशान फ्लॅटमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. ज्या काळात शिवगड येथे प्रशिक्षण देण्यात आले त्याचवेळी दोनदा पुरोहित पुण्यात नियुक्तीवर होता. मिथुन चक्रवर्ती म्हणजे पुरोहितच असावा, असा आमचा ठाम दावा असला तरी निश्चित पुरावे मिळालेले नाहीत, असेही या अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. दहशतवादविरोधी पथकाचे दिवंगत सहआयुक्त हेमंत करकरे यांच्या मृत्यूमुळे मालेगाल स्फोटांच्या तपासावर काही प्रमाणात परिणाम झाला होता. आता मात्र आम्ही त्या धक्क्यातून सावरलो आहोत आणि मालेगाव स्फोटातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी येत्या २० जानेवारी रोजी आरोपपत्रही दाखल करणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली असून त्यातील प्रत्येकाचा सहभाग स्पष्ट करणारे पुरावे आमच्याकडे असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

चांद्रयान- दोन २०११ साली
मुंबई, १८ जानेवारी / प्रतिनिधी

चांद्रयान- दोन २०११ सालच्या अखेरीस किंवा २०१२ च्या सुरुवातीस चंद्राच्या दिशेने झेपावेल. चांद्रयान-दोनच्या प्रत्यक्ष कामाला आता इस्रोमध्ये सुरुवात झाल्याची माहिती इस्रोमधील अधिकाऱ्यांनी दिली. या मोहिमेमध्ये इस्रोने तयार केलेला रोबो प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरणार असून त्याच्या मदतीने चंद्रावरील मातीच्या संदर्भात विविध प्रयोग चांद्रभूमीवरच करण्यात येतील. दरम्यान, चांद्रयान-एकमधील मिनी-सार या यंत्रणेने पृथ्वीवरून कधीही मानवी नजरेस न पडणाऱ्या चंद्राच्या मागच्या भागाची छायाचित्रे नासाच्या प्रयोगशाळेत पाठविली असून त्यामुळे चांद्रभूमीवरील अनेक कोडी उलगडतील, अशी संशोधकांना अपेक्षा आहे.इस्रोमधील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान- दोनचा आराखडा जवळपास तयार आहे. त्याचा मंजुरी मिळणे केवळ बाकी आहे. चांद्रयानाने आजवर ४० हजारांहून अधिक छायाचित्रे रवाना केली असून ती इस्रोच्या नियंत्रण कक्षात व्यवस्थित मिळाली आहेत. त्याचा आधार घेऊन आता पुढील संशोधनास सुरुवात होईल. येत्या, २०१५ पर्यंत भारतीय अंतराळवीर अंतराळात नेऊन त्याला भूमीवर सुखरूप आणण्याचा प्रयोग इस्रोतर्फे केला जाणार असून त्यानंतर २०२० सालापर्यंत भारतीय अंतराळवीर प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरलेले असतील, असा विश्वास इस्रोमधील संशोधकांनी व्यक्त केला. दरम्यान, चांद्रयान-एकमधील नासाचे मिनी-सार काम करू लागले असून त्यानेही चंद्राच्या कधीही न दिसणाऱ्या मागील बाजूच्या ध्रुवीय प्रदेशातील काही महत्त्वाची छायाचित्रे पृथ्वीवर पाठविली आहेत. त्याचे विश्लेषण करण्याचे काम सध्या नासामध्ये सुरू आहे. चंद्राच्या मागच्या बाजूस असलेल्या एका मोठय़ा विवराचे छायाचित्र सध्या संशोधकांच्या हाती आले असून याच चांद्रयानातील दुसऱ्या एका यंत्रणेद्वारे त्या खोल विवरात पाण्याचे गोठलेले अंश सापडतात का, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे

मेंदूत प्रश्न घेऊन जगणारा समाज हवा-श्याम मनोहर
मुंबई, १८ जानेवारी / प्रतिनिधी

समाजात वावरताना आणि जगताना आपल्या सर्वानाचा अनेक प्रश्न पडत असतात. प्रत्येकजण आपापल्या परीने त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही करीत असतो. कधी त्याची उत्तरे मिळतात तर कधी मिळत नाहीत. मात्र प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तरी ते प्रश्न मेंदूत कायम ठेवून जगणारा समाज आज हवा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्याम मनोहर यांनी शनिवारी दादर येथे केले. ‘ग्रंथाली’तर्फे इंडियन एज्युकेशन संस्थेच्या महात्मा फुले कन्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या‘कृतार्थ’ या मालिकेत पत्रकार जयंत पवार आणि रवींद्र लाखे यांनी मनोहर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मला लिहितानाही कायम प्रश्न पडत असतात. पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय मला चैन पडत नाही. कधी कधी त्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत मी लिहितही नाही, असे सांगून मनोहर म्हणाले की, अहं कसा घालवायचा, अध्यात्मामध्ये अहंकार पूर्णपणे जाणे हे तत्त्व सगळ्यांना माहिती आहे. अहंकार जात नाही तो पर्यंत अध्यात्मिक होता येत नाही का, सुचणे ही निसर्गाची देणगी आहे का, प्रयत्न करून किती मिळता येते, आपोआप किती येते, एकदा असाच रात्री अनेक तास चांदण्यात बसलो होतो. जितके तास आपण चांदण्यात बसलो तितके तास या विषयावर वाचन करता येईल, असे लिहिता येई का, मला वाटते की पंधरा मिनिटांपुरतेच ते भाषेत मांडता येईल. त्यामुळे अशा पडलेल्या प्रश्नांचा शोध घेत मी माझे लेखन करत असतो. कथा, कादंबरी, नाटक याचे लेखन केले असले रुढार्थाने कादंबरी लिहिण्यापेक्षा मला ‘फिक्शन’ लिहायला जास्त आवडते, असे एका प्रश्नाच्या उत्तरात मनोहर म्हणाले. या मुलाखतीच्या वेळी मनोहर यांनी आपल्या ‘कळ’, ‘शंभर मी’, ‘खेकसत म्हणतो आय लव्ह यू’ आदी कादंबऱ्या लिहिण्यामागील प्रेरणा, अनुभव सांगितले.