Leading International Marathi News Daily                                  सोमवार, १ जानेवारी २००९
नवनीत
जेव्हा संतांनी स्वीकारलेली सर्वसंग्राहक वृत्ती धोक्यात सापडली, तेव्हा पंथांचा पगडा वाढला. सांप्रदायिकांचाही कल कट्टरतेकडे झुकला. गुरुबाजी वाढीला लागली. त्यातून दुराव्याला जागा मिळू लागली. दृष्टीच सदोष बनली. जणू वैचारिक- सांस्कृतिक मूळ दृष्टीला मोतीबिंदूने ग्रासले आणि दुर्दैवाने त्याचे पर्यवसान स्वत्व हरविण्यात होऊन बसले. मुळात दुही राहू नये, याचाच विसर पडला. आम्ही हे सारे ध्यानात घेऊन
 
गुरू नानकदेव यांच्या चरित्राकडे आणि कार्याकडे पाहिले आहे. त्यांच्याठायी कोणत्याही प्रकारचा दुराग्रह नाही. दुहीचा विचार तर अजिबातच नाही. हिंदू आणि यावनी या दोन्ही परंपरेतील जे जे चांगले आणि शाश्वत, ते त्यांनी अगदी मनापासून स्वीकारले. आम्ही ते सवंगतेच्या आहारी न जाता स्पष्ट करण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी लोककथा, लोकापवाद असे सारे एकवटून त्यांची खोली आणि विशालता सांगितली आहे. दुराग्रह वा एकांगीपणा यांना तिथे थारा नाही, हेही शक्य तितके त्या त्या ठिकाणी स्पष्ट केले आहे.
या ठिकाणी मुळातच शीख (सिक्ख) मत अथवा पंथ का निर्माण झाला, याचादेखील विचार करणे औचित्याचे ठरावे. गुरू नानकदेवांसारख्या द्रष्टय़ा सत्पुरुषाला आपले मूळचे सांस्कृतिक, वैचारिक स्वत्व राखले जाणे अत्यावश्यक आहे, असे प्रकर्षांने जाणवले; ज्याला कारणही तसेच जबरदस्त घडले. इस्लामचा प्रचार-प्रसार करणाऱ्या संधिसाधूंच्या आणि आक्रमकांच्या टोळ्यांनी प्रथम वायव्य भारतावर धाड घातली. तिथले जनजीवन उद्ध्वस्त केल्यानंतरच ही मंडळी पुढे सरकली. इस्लामच्या या र्सवकष आक्रमणानंतर अशा प्रकारची जाणीव उत्तरेतील अन्य प्रदेशातील सत्पुरुषांना कितपत झाली? उत्तर देणे अवघड आहे. पण नानकदेवांना मात्र ती जाणीव तीव्रतेने झाली. त्यांना हे पक्के ठाऊक होते की, आपले जे आहे-सनातन काळापासून जे काही चांगले चालत आले ते आपले आपणच राखू शकतो. त्यात काळाच्या ओघात जर काही अनुचित झाले असेल, तर तेही आपले आपणच घडवू शकतो. तो सर्वस्वी आमचाच अधिकार आहे. आपल्यातील दुहीचा घेतला तर परके आणि शत्रू फायदाच घेतील. गुणांचा पुतळा कोणीच असत नाही. प्रत्येक व्यक्तीत आणि त्याने निर्मिलेल्या पंथांत/ दर्शनात काही दोष संभवतात. कालांतराने साऱ्यांनाच जाणवतात. म्हणून गुरू नानकदेव ठामपणे म्हणाले, ‘आमचे जे आहे, त्यातील बरेवाईट आमचे आम्हीच ठरवू’.
अशोक कामत

अभ्रिका म्हणजे काय? अभ्रिकांचे किती प्रकार आहेत? या अभ्रिका नुसत्या डोळ्यांना दिसू शकतात का?
अभ्रिका म्हणजे तेजोमेघ. अभ्रिकांना ‘नेब्युला’ या नावाने ओळखले जाते. नेब्युला हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ तेजोमेघ असा आहे. आकाशात जसे तारे दिसतात, ग्रह दिसतात; तसे ढगांसारखा दिसणारा ‘वायूचा मेघ’ही दिसतो. पूर्वी या तेजोमेघांचे स्वरूप व्यवस्थित माहिती नव्हते. आता विज्ञान-तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे, नवीन साधने निर्माण झाल्यामुळे या अभ्रिका किंवा नेब्युला यांचे स्वरुपातील वैविध्य लक्षात येऊ लागले आहे.
मृग नक्षत्रांत ‘ओरायन’ नेब्युलाचे नाव तुम्ही ऐकले असेल. द्विनेत्री किंवा दुर्बिणीतून याचे स्वरूप सरकीला कापूस चिकटलेला असावा तसे दिसते. हा धूळ आणि वायू यांचा मोठा विस्तार आहे. या मेघाचा आपल्याला जाणवणारा जो भाग आहे त्याने १५ ते २० प्रकाशवर्षे जागा व्यापली आहे. प्रत्यक्षात हा मेघ कितीतरी मोठा आहे. यामध्ये तारे जन्माला येत आहेत. या ताऱ्यांच्या अस्तित्वामुळेच हा मेघ प्रकाश देतो. इंग्रजीमध्ये अशा मेघांना ‘एमिशन नेब्युला’ म्हणतात. कृत्तिका तारकापुंज आपणास डोळ्यांनी दिसतो. इथे तारे तयार झालेले आहेत, पण ते ज्या वायूपासून तयार झाले आहेत तो वायू अजून शिल्लक आहे. हा वायू या ताऱ्यांचा प्रकाश परावर्तित करतो म्हणून अशा अभ्रिकांना ‘रिफलेक्टिंग नेब्युला’ म्हणतात. वायूंचे काही पुंजके स्वत: प्रकाशत नाहीत. परंतु त्यांच्या मागे असलेल्या म्हणजे पाश्र्वभूमीवर असलेल्या तारकांचा प्रकाश विखुरल्यामुळे आपणास दिसत असतो. अशा अभ्रिकांना ‘डार्क नेब्युला’ म्हणतात. दक्षिण आकाशात ‘त्रिशंकू’ जवळ दिसणारा कोलसॅक हा वायुमेघ या प्रकारचा आहे. शेवटच्या घटका मोजणारे काही तारे स्फोटांतून वायू बाहेर फेकतात. या ताऱ्यांभोवती या वायूंची तबकडी तयार होते. हा तेजोमेघ ग्रहासारखा दिसतो, म्हणून यास ‘प्लॅनेटरी नेब्युला’ म्हणतात. अगदी दूरच्या दीर्घिकाही ढगांसारख्या, तेजोमेघांसारख्या दिसतात. असंख्य तारकांनी बनलेल्या त्या स्वतंत्र आकाशगंगा आहेत हे नंतर स्पष्ट झाले. अशा दीर्घिकांनाही पूर्वी ‘स्पायरल नेब्युला’ म्हणत.
हेमंत मोने
शनिवार, दिनांक १७ जानेवारी रोजी ‘कुतूहल’ या सदरातील लेखात दोन ठिकाणी ‘तीन ते सव्वीस प्रकाशवर्षे’ असे छापले आहे. त्याठिकाणी ‘३.३६ प्रकाशवर्षे’ असे वाचावे.
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दुष्काळग्रस्त भिल्ल स्त्रियांची वस्त्रहीन अवस्था ध्यानी येताच सारं आयुष्य वनवासींच्या सेवेसाठी वेचणाऱ्या ठक्कर बाप्पांचा जन्म सौराष्ट्रातील भावनगरचा. इंजिनीअरिंगची पदवी मिळवून रेल्वेत नोकरी करणाऱ्या बाप्पांनी भिल्ल सेवा मंडळ, अखिल भारतीय आदीम जाती सेवक संघाद्वारे महत्त्वाचे कार्य केले. स्वातंत्र्य चळवळीत ते होतेच, ‘कस्तुरबा ट्रस्ट’चेही ते विश्वस्त होते. पददलितांच्या सेवेत देह चंदनासारखा झिजवणाऱ्या अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर यांना लोक बाप्पा म्हणत.. १९ जानेवारी १९५१ ला ते निधन पावले.
संजय शा. वझरेकर

शैलेश, प्रणव आणि अनुजा गंभीर झाले होते. ‘‘आज गुरुवार, आठवडय़ाचा बाजार; आजी आपल्याला पुन्हा मागच्या गुरुवारसारखे बाजारात पाठवणार,’’ शैलेश म्हणाला. ‘‘हो ना रे, माझ्याही तेच मनात आलं. वैताग येतो रे इतक्या दूर जाऊन लसूण आणि बिस्किटं वगैरे घेत बसायचा’’, प्रणवने री ओढली. ‘‘शीऽऽबाई, सुट्टी घालवायला गावी आलोय तर आजी खेळूच देत नाही मुळी’’, अनुजा फुरंगटून म्हणाली. ‘‘अेऽऽ, एक आयडिया आहे. आजी काल म्हणाली, पाऊस नसला तर बाजारात जा. आज पाऊस पडला तर? म्हणजे पाडला तर?’’ ‘‘अहँहँ, तू काय ढग आहेस का पाऊस पाडायला,’’ अनुजाने वेडावले. प्रणव मात्र वरती थांबला नाही. पटापटा उतरून तो खाली गेला. मागच्या अडगळीच्या खोलीतल्या पत्र्याच्या झाऱ्या घेऊन वरती आला. शैलेश, अनुजा तो काय करतोय ते गोंधळून पाहात होते. न्हाणीघरातून दोन्ही झाऱ्या पाण्याने भरून आणून तो म्हणाला, ‘‘या खोलीच्या खालतीच स्वयंपाकघर आहे. आपण झारीने पाणी स्वयंपाकघराच्या खिडकीवर ओतू, आजीला काय वाटेल बरं?’’ ‘‘आजी म्हणेल, पाऊस पडतोय’’ शैलेश आणि अनुजा एकदमच ओरडले. प्लॅन ठरला. एकाने झारीतून पाणी खालच्या खिडकीवर पडेल अशा बेताने ओतायचे. तोपर्यंत दुसऱ्याने दुसरी झारी भरून तयार ठेवायची. तिसऱ्याने खाली जाऊन स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आजीला, ‘बाजारात जाऊ का?’ विचारायचं. अनुजा म्हणाली, ‘आजी स्वयंपाकघराची खिडकी कधीच उघडत नाही. तिला बाहेरचं काही कळणार नाही. काचेवरून पाणी ओघळताना तेवढं दिसेल. अगदी टॉप आयडिया झाली ही’. झालं. झारीतला पाऊस सुरू झाला. अनुजानं आजीला जाऊन विचारलं, ‘‘बाजारातून आणायच्या सामानाची यादी करू का?’’ आजीचे लक्ष खिडकीच्या काचेकडे गेले. ‘सकाळी कसं स्वच्छ होतं आभाळ. एवढय़ात आला की गं पाऊस,’ आजी म्हणाली. वरून शैलेश, प्रणव वेगाने झाऱ्या रिकाम्या करत होते. इकडम् तिकडम् करून अनुजाने विचारले ‘करू ना यादी?’ ‘‘नको गं पोरी, भिजलात तर आजारी पडाल. आलात तसे धडपणे आईबाबांकडे परत जा. जा, वर जाऊन खेळत बसा. तोवर थालीपीठ लावते,’’ आजी प्रेमाने म्हणाली आणि हसू दाबत अनुजा वर पळाली. मधूनमधून झारी पालथी होत राहिली. अर्धा तास गेला. जाधवकाका हाका मारत आले,‘ पोरांनो, सर्कशीची तिकिटं काढली आहेत. चला रेऽऽ!’ आजी म्हणाली, ‘‘अहो एवढा पाऊस असताना नका नेऊ पोरांना. पुन्हा कधीतरी न्या.’ जाधवकाकांच्या हाका ऐकून सर्कशीला जाण्यासाठी उडय़ा मारत जीना उतरणारे शैलेश, प्रणव आणि अनुजा जागीच थबकले. अरेरे! आता कसली सर्कस आणि कसलं काय!
तुम्ही जेव्हा दुसऱ्याला फसवता तेव्हा स्वत:ला फसवता. स्वत:चे नुकसान करता.
आजचा संकल्प- आज मी प्रत्येकाशी प्रामाणिकपणे वागण्याचा प्रयत्न करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com