Leading International Marathi News Daily                                  सोमवार, १ जानेवारी २००९

.. तर रसिकांचा चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल- बेनेगल
पुणे, १८ जानेवारी/प्रतिनिधी

‘मनोरंजनापासून प्रबोधन वेगळे करता आले तरी सिनेमाच्या बाबतीत तसे घडत नाही. त्यामुळे प्रबोधन व मनोरंजनाचे मिश्रण करून रसिकांचे ‘ओरिएन्टेशन’ बदलले तर चित्रपटाकडे पाहण्याचा सामान्यांचा दृष्टिकोन बदलेल,’ असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी व्यक्त केले. ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया’ या संस्थेने सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण केल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन बेनेगल यांच्या हस्ते आज करण्यात आले. या वेळी संस्थेचे केंद्रीय उपाध्यक्ष किरण व्ही. शांताराम, सचिव सुधीर नांदगावकर, महाराष्ट्र शाखेचे अध्यश्र वीरेंद्र चित्राव, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक विजय जाधव, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. पॉलो मिन्युटो, प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, तसेच सतीश जकातदार आदी या वेळी उपस्थित होते. बेनेगल म्हणाले, ‘जुन्या पिढीत व आजच्या पिढीच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. आजच्या पिढीला प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यासाठी खटपट करण्याची आवश्यकता राहिलेली नाही.

जेधे चौक एकेरी वाहतूक योजना दोन दिवस लांबणीवर
पुणे, १८ जानेवारी / प्रतिनिधी

स्वारगेट येथील जेधे चौकातून टिळक रस्त्यावर प्रवेशबंदी करण्याचे व सारसबागेकडे जाणारा रस्ता एकेरी करण्याच्या योजनेची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांनी पुढे ढकलली. दोन-तीन दिवसांनंतर या योजनेची अंमलबजावणी होणार असल्याचे, वाहतूक पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले. नियोजित वेळापत्रकानुसार आजपासून (दि. १८) ही योजना राबविण्यात येणार होती, मात्र रस्ता दुभाजक तोडण्याचे व जमनालाल बजाज चौकात वाहतूक नियंत्रक दिवा बसविण्याचे काम अपूर्ण राहिल्याने या योजनेची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली. जेधे चौकात होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी तसेच वाहतुकीचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी ही योजना तयार केली होती. या योजनेनुसार, शंकरशेठ रस्ता व सातारा रस्त्यावरून येणाऱ्या वाहतुकीला टिळक रस्त्याकडे जाण्यास प्रवेशबंद करण्यात येणार होता. या वाहतुकीला सारसबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळविण्यात येणार होते. टिळक रस्त्यावर जाऊ इच्छिणाऱ्या वाहनांना सारसबाग येथील चौकातून उजवीकडे वळून टिळक रस्त्याला जाता येणार होते. तत्पूर्वी पूरम चौक व हिराबाग चौकामध्ये वाहतूक पोलिसांनी चक्राकार वाहतूक सुरू केली होती. जेधे चौकातील योजनेची आज अंमलबजावणी झाली असती, तर सिग्नलचे दोन फेज कमी करून वाहतुकीचा वेग वाढविण्यात पोलिसांना यश आले असते. वाहतूक पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, ‘‘जेधे चौकातील योजना आजपासून राबविण्याची आमची इच्छा होती, मात्र काही कामे अपूर्ण राहिल्याने तसे करता आले नाही.जमनालाल बजाज चौकात वाहतूक नियंत्रक दिवा बसविण्याची गरज असल्याचे वाहतूक पोलिसांच्या लक्षात आले असून सारसबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुभाजक तोडण्याचे कामही अपूर्ण राहिले आहे.’’ दोन-तीन दिवसांनंतर या योजनेची अंमलबजावणी सुरू होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भ्रष्टाचाराविरोधात एकत्र यावे- रामदेवबाबा
पुणे, १८ जानेवारी/प्रतिनिधी

भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम उघडल्यापासून आपल्याला होणारा विरोध कमी झाल्याचे सांगत योगगुरू रामदेवबाबा यांनी पुणे पोलिसांच्या व्यासपीठावरून भ्रष्टाचाराविरोधात एकत्र येण्याचे आवाहन आज केले. पोलीस मुख्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात ‘योगजीवन व राष्ट्रभक्ती’ या विषयावर बोलताना रामदेवबाबा यांनी हे आवाहन केले. या वेळी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह, सहआयुक्त राजेंद्र सोनावणे, पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते. ‘‘भ्रष्टाचाराविरोधात ‘भारत स्वाभिमान’ ही मोहीम सुरू केल्यानंतर गेल्या पाच ते सहा महिन्यांत मी कुठल्याच विवादात सापडलेलो नाही. खरेतर संघर्ष किंवा विरोधाने मला व माझ्या कामाला ताकद मिळते; परंतु भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम सुरू केल्यापासून कोणी मला प्रश्न विचारण्याच्या पूर्वीच मी उत्तरे देत आहे. त्यामुळे मला व माझ्या कामाला होणारा विरोध कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे,’’ असे रामदेवबाबा यांनी या वेळी सांगितले. योगधर्माचा स्वधर्म, आत्मधर्म व राष्ट्रधर्माशी थेट संबंध आहे; परंतु देशच टिकला नाही तर योग राहणार नाही. त्यामुळे लहान मुलांना आपण कोणते संस्कार देतो हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सत्जनांचा सन्मान आणि दुर्जनांचा अपमान ज्या समाजात होतो त्याच समाजाची उन्नती होते, असेही रामदेवबाबा या वेळी म्हणाले. पोलीस आयुक्त डॉ. सिंह म्हणाले, ‘योग हा कुठल्या जाती, धर्मापुरता मर्यादित नसल्याने त्याद्वारे देश जोडण्याचे व राष्ट्रभक्ती जागविण्याचे काम रामदेवबाबा यांनी उभे केले आहे. पोलिसांचे ब्रीदवाक्य व रामदेवबाबा यांचे वेदमंत्र यामध्येही फरक नाही. देशाला जोडण्यासाठी पोलिसांना बळ दिले पाहिजे व त्यासाठी पोलिसांनी योग शिकले पाहिजेत’. सहआयुक्त राजेंद्र सोनावणे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

रानडे बालक मंदिरातर्फे ‘लुटू या थंडीची मजा’
पुणे, १८ जानेवारी/प्रतिनिधी

न्यायमूर्ती रानडे बालक मंदिरातर्फे हिवाळ्यानिमित्त ‘लुटूया थंडीची मजा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्ले ग्रुप, लहान गट व मोठा गट यातील एकूण सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी प्ले ग्रुपमधील मुलांचे बोरनहाण करण्यात आले. तसेच त्यांना हलव्याच्या दागिन्यांची आणि गरम कपडय़ांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना आगोणे उपस्थित होत्या. त्यांनी मुलांना पर्यावरणविषयक माहिती दिली. यानंतर मुलांना चूल पेटवून अन्न शिजवण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. याप्रसंगी मुलांनी शेकोटी पेटवून त्याभोवती फेर धरून नाच केला. तसेच धुंधुरमासाचे गाणेही म्हटले. या कार्यक्रमाचे संयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री मोघे, उपमुख्याध्यापिका वर्षां फडणीस व इतर शिक्षिकांनी केले.

शहरात दक्षतेचा इशारा
पुणे, १८ जानेवारी / प्रतिनिधी

संशयित दहशतवादी फिरत असल्याची खबर पोलिसांना मिळाल्याने शहरात दक्षतेचा इशारा देण्यात आला असून विविध भागांमध्ये हॉटेल, लॉज तसेच गर्दीच्या ठिकाणांवर कसून तपासणी करण्यात येत आहे. मात्र सध्याच्या संवेदनशील परिस्थितीमध्ये, पोलिसांकडून वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या सरावाचा हा भाग असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी म्हटले आहे.
दहशतवादी संघटनेचा एक कार्यकर्ता शहरात फिरत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दुजोरा दिला, मात्र त्याबाबत अधिक खुलासा करण्यास त्यांनी नकार दिला. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर शहराला असलेला धोका यंदा गंभीर स्वरूपाचा असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर शहरात दक्षतेचा इशारा देण्यात आला असून सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आता पसंतीनुसार नियुक्त्या!
एमपीएससीद्वारे अकराशे पदे भरणार
पुणे, १७ जानेवारी / प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या अ गटातील अकराशे वैद्यकीय अधिकारी पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची पसंतीच्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे. या प्रक्रियेस वीस जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. या भरती प्रक्रियेमुळे अस्थायी स्वरुपातील दीड हजार पदांवरील अधिकाऱ्यांना कायम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरोग्य खात्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या तीन हजारांच्या घरात आहे.

‘दलित आत्मकथनामुळे मराठी भाषेस बळ’
पुणे, १८ जानेवारी / प्रतिनिधी

‘दलित आत्मकथनाने इतिहास मांडला नाही तर मराठी भाषेला, समाजशास्त्राला चांगले बळ दिले’, अशा शब्दांत दलित साहित्याविषयी गौरवोद्गार व्यक्त करीत यामुळेच नव्या म्हणी, वाक्प्रचार आणि नवे शब्दही मिळाले, असे मत पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांनी आज येथे व्यक्त केले. प्रतिमा प्रकाशनच्या वतीने ‘दलित साहित्य : प्रवाह आणि प्रकार’ या आणि स्नेहवर्धन प्रकाशनचे ‘स्वातंत्र्यसुप्ते’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. पानतावणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. संशोधन ग्रंथ आणि काव्यसंग्रह हा डॉ. अविनाश सांगोलेकर आणि डॉ. अ. वा. कुलकर्णी यांनी संपादित केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव होते. व्यासपीठावर स्नेहवर्धन प्रकाशनच्या डॉ. स्नेहल तावरे उपस्थित होत्या. प्रतिमा प्रकाशनचे अरुण पारगावकर यांनी प्रास्ताविक केले.

न्यायालयाची सुरक्षा अधिक कडक होणार
पुणे, १८ जानेवारी / प्रतिनिाधी

शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयातील ऐरणीवर असलेल्या सुरक्षेच्या प्रश्नांवर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांनी शहराच्या पोलीस आयुक्तांसह बैठक घेऊन न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना आज केली. यामुळे नजीकच्या काळात न्यायालयातील सुरक्षा आता आणखी कडक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा न्यायालयात झालेल्या बैठकीस जिल्हा न्यायाधीश अशोक चिमा, पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह, सहआयुक्त राजेंद्र सोनवणे, पोलीस उपायुक्त रघुनाथ खैरे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी पोलीस आयुक्तांसह पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परिसराची पाहणी केली. मुंबई नंतर पुण्यालाही दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळेच जिल्हा न्यायालयात येणाऱ्या अडीच ते तीन हजार वकील, पक्षकार आणि आरोपींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर यांनी न्यायालयाच्या सुरक्षेविषयीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता. या प्रस्तावासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांनी मान्य केला. त्यात काही सुधारणाही सुचविल्या. न्यायालयातील एकूण प्रवेशद्वारांपैकी तीन प्रवेशद्वारांवरून प्रवेश करणे, तसेच प्रवेशकर्त्यांच्या तपासणीसाठी मशिन, चौकी यांची नव्याने उपाययोजना तसेच सुरक्षेसाठी पोलिसांचे एक स्वतंत्र पथक नियुक्त करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यात एक पोलीस निरीक्षक, दोन फौजदार आणि वीस कर्मचारी असा वीस ते तीस कर्मचारी वर्ग येथे कायमस्वरुपी तैनात करण्याच्या सूचना मुख्य न्यायाधीशांनी दिल्या, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला दिली. अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे आरोपींच्या पलायन, तसेच न्यायालयातील लॉकअपच्या क्षमतेविषयी प्रामुख्याने यावेळी चर्चा झाली. त्यात आणखी तीन ते चार लॉकअप बांधण्याची सूचना करून त्यामुळे सुमारे ५० कैद्यांची व्यवस्था करता येईल. तसेच सध्या पार्किं गचे व्यवस्थापन चांगले नसल्याने होणारा गोंधळ लक्षात घेता यापुढे केवळ वकील, न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्या वाहनांनाच न्यायालयीन आवारात प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच पक्षकारांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी बाहेर सोय करण्यात येईल, असेही बैठकीत ठरले. तसेच न्यायालयाभोवती असलेल्या भिंतींची उंची आता वाढविण्याचे ठरले आहे. तसेच अन्य विविध गोष्टींचा आढावा न्यायमूर्तीनी घेतला. आरोपींना न्यायालयात आणण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिगंचा पर्याय स्वीकारता येईल काय, यावर विचारविनिमयही करण्यात आला.

जागतिकीकरणाचा गरिबांसाठी उपयोग करायला हवा -घारे
पुणे, १८ जानेवारी/प्रतिनिधी

जागतिकीकरणामुळे सध्या पैसा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, ज्ञान व विचारांची मोठय़ा प्रमाणात देवाणघेवाण होत आहे. याचा गरिबांसाठी काम करणाऱ्या लोकांनी व विविध संस्थांनी पुरेपूर उपयोग करायला हवा. असे मत डॉ. मुकुंद घारे यांनी आज व्यक्त केले.
शहरी पर्यावरण, झोपडपट्टी विकास, भूकंपग्रस्त भागात घरबांधणी, तसेच विषयवार नकाशे करणाऱ्या ‘मशाल’ या संस्थेच्या वतीने संस्थेने केलेल्या कार्याचे सादरीकरण व चर्चा करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘ग्लोबलायझेशन अँड इटस शप्लिकेशन्स ऑन डेव्हलपमेंट इन इंडिया’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी मशालचे मुख्य कार्यवाह शरद महाजन, शुरींदर कौर, कृष्णा चामे, पांडुरंग वाव्हळ, दीपक कुंभार, अशोक पिंगळे आदी उपस्थित होते. जागतिकीकरणाच्या नावाखाली गरीब व श्रीमंती यामधील दरी वाढत असल्याचे सांगून डॉ. घारे म्हणाले की, गरिबांची गरीबी वाढत आहे. यासाठी त्यांचे प्रश्न, समस्या सोडवून त्यांना या प्रक्रियेमध्ये सामावून घेणे आवश्यक आहे. सूक्ष्म नियोजनाने झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवता येऊ शकतात. त्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. याच अंगाने मशाल ही संस्था पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या काही झोपडपट्टय़ांमध्ये महापालिकेच्या ‘उत्थान’च्या माध्यमातून नागरवस्ती विकास विभाग व सी.एच.एफ.इंटरनॅशनल या संस्थांच्या साहाय्याने कार्यरत आहे.लातूर भूकंपातील पूनर्वसनाबाबतचे अनुभव कृष्णा चामे यांनी तर धारावी पुनर्वसन प्रकल्पाची दिनेश प्रभु यांनी माहिती दिली.

‘नेहरू इन्स्टिटय़ूट’ च्या वतीने राष्ट्रीय स्तरावर निबंध स्पर्धा
पुणे, १८ जानेवारी/प्रतिनिधी

भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे राष्ट्रीय स्तरावर आंतर तंत्रनिकेतन निबंध सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता वालचंदनगर उद्योग समूहाचे संचालक स. स. गंगावती यांच्या हस्ते होणार आहे.
संस्थेचे प्राचार्य राजेंद्र उत्तूरकर यांनी ही माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, की २००७-०८ हे तंत्रनिकेतनचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्त ‘टेक्नो-इनोव्हा’ ही राष्ट्रीय स्तरावरील निबंध सादरीकरण स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत देशभरातून १३० स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर पर्यावरण व संवर्धन या विषयावर राज्यस्तरीय आंतर तंत्रनिकेतन ‘भारती करंडक’ आधारित समूहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यात १५ समूह सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत विजेत्या संघांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. मिलेनिअम सिने प्रॉडक्शनचे संचालक राजीव मिरासदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ २४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कार्यवाह विश्वजित कदम, पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग, महेश झगडे उपस्थित राहणार आहेत.

सौंदर्य आराधनावादी संस्कृती जोपासायला हवी’
पुणे, १८ जानेवारी/प्रतिनिधी

जगातील वाढत्या सांप्रदायिकतेला आळा घालण्यासाठी सौंदर्य आराधनावादी संस्कृती जोपासण्याची गरज असून, त्यासाठी दर्जेदार साहित्य व कलानिर्मिती केली पाहिजे, असे मत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी आज व्यक्त केले.
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा या वर्षीचा ‘राजेंद्र बनहट्टी कथा पुरस्कार’ ‘आर्त’ या कथासंग्रहाच्या लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रंथालयाचे अध्यक्ष मोहन दाते, कार्याध्यक्ष मुकुंद अनगळ, कार्यवाह प्रा. चारुदत्त निमकर, सदस्या विद्युत पावगी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पाच हजार रुपये व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मोजके पण कसदार लेखन ही माझी वृत्ती असून, आपले लेखन लोकांच्या स्मरणात राहावे यासाठी मी प्रयत्नशील असते. तसेच या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असल्याचे मत गजेंद्रगडकर यांनी व्यक्त केले.
अनगळ यांनी प्रास्ताविक केले. प्रतिमा पटवर्धन यांनी परिचय करुन दिला आणि पावगी यांनी सूत्रसंचालन केले.

समूहगीत व लोकनृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २३ व २४ ला
पुणे, १८ जानेवारी/प्रतिनिधी

शरद-मल्हार प्रतिष्ठानतर्फे तेरा तालुक्यांमधून घेण्यात आलेल्या आंतरशालेय समूहगीत व लोकनृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २३ व २४ जानेवारीला गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. यावेळी प्रतिष्ठानचे प्रसिद्धिप्रमुख अनुज खरे उपस्थित होते.ही स्पर्धा लहान व मोठा अशा दोन गटांमध्ये होणार असून ग्रामीण व शहरी अशा दोन विभागांमध्ये विभागण्यात आली आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी सत्तर शाळांच्या संघांची निवड झाली असून स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २४ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदामंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, वनमंत्री बबनराव पाचपुते आदी उपस्थित राहतील.

पुण्यात २१ जानेवारीला राज्यव्यापी आरक्षण परिषद
पुणे, १८ जानेवारी/प्रतिनिधी

ओबीसी संघर्ष समितीतर्फे २१ जानेवारी रोजी पुण्यामध्ये राज्यव्यापी आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येणार असून, यामध्ये मराठा समाजाच्या ओबीसीतील समावेशामुळे होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी सांगितले. या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना सहभागी होणार असल्याची माहितीही कुदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यापरिषदेमध्ये महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, बापट आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी त्वरित करावी, भ्क्रिमिलेअरची मर्यादा दहा लाख रुपये करावी आदी मागण्या सरकारपुढे ठेवण्यात येणार आहेत.

पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करावेत - चोरबेले
पुणे, १८ जानेवारी/प्रतिनिधी

क्रुड तेलाचे भाव उतरलेले असतानाही सरकार पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव कमी करत नाही. जागतिक मंदीमध्ये होरपळलेल्या उद्योजक व व्यापारी वर्गाला भाव कमी झाल्यास दिलासा मिळणार असून जनतेच्या भावनांशी न खेळता त्वरित भाव कमी करण्यात यावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी केले आहे.तेलाचे भाव कमी केल्यास सर्वानाच दिलासा मिळणार आहे. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा, असे चोरबेले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.

बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी तीन जण िरंगणात
पुणे, १७ जानेवारी / प्रतिनिधी

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीत तीन उमेदवार िरंगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. खजिनदार, ऑडिटर, तसेच कार्यकारिणीची दहा सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. बिपीन पाटोळे यांनी दिली. अध्यक्षपदासाठी अॅड. मिलिंद पवार, अॅड. राम पाटोळे यांच्यासह अॅड. किरण पवार यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उपाध्यक्षपदासाठी दोन जागांसाठी आठ तर सचिव पदासाठी पाच उमेदवार रिंगणात उतरले आहेत. खजिनदारपदी अॅड. अभिजित बीडकर, ऑडिटरपदी अॅड. भूपेंद्र गोसावी यांची बिनविरोध निवड झाली. अॅड. प्रसाद बहिरट, अॅड. बाळासाहेब भोसले, अॅड. विशाल चौधरी, अॅड. सुनीलकुमार जोशी, अॅड. सुहास कदम, अॅड. वामन कोळी, अॅड. पाडुंरंग मोरे, अॅड. धैर्यशील सणस, अॅड. प्रवीण शेंडकर, अॅड. विजय झांजे यांची कार्यकारिणीसाठी बिनविरोध निवड झाली.

वीस लाख सभासद नोंदणीचे ‘क्रांतिसेने’ चे उद्दिष्ट
पुणे, १८ जानेवारी/प्रतिनिधी

संपूर्ण राज्यभर क्रांतिसेना या नवीन पक्षाची सभासद नोंदणी मोठय़ा प्रमाणात सुरू असून, पुणे जिल्ह्य़ात वीस लाख सभासद नोंदणीचे उद्दिष्ट आहे. येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा क्रांतिसेना पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे, अशी माहिती क्रांतिसेनेचे (महाराष्ट्र) कार्याध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे यांनी आज येथे दिली. क्रांतिसेनेच्या पुणे जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांची आज प्रा. माणिकराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये क्रांतिसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. यामध्ये विशाल डांगे यांची पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख म्हणून तर सोमनाथ गायकवाड यांची जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बाळासाहेब गायकवाड यांची शहरप्रमुखपदी, शहर संघटक व प्रसिद्धिप्रमुख म्हणून सिद्धेश्वर कर्नावट, शहर सचिवपदी चंद्रकांत भावसार, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा राखीव मतदार संघाच्या अध्यक्षपदी नंदू बनसोडे, शहर उपाध्यक्षपदी विजय काटकर तसेच अॅड. शिवशंकर शिंदे यांची कायदेशीर सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली. जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून लालासाहेब मांडगे यांची निवड करण्यात आली आहे.

विश्वकर्मा इन्स्टिटय़ूटच्या वतीने बुधवारी फ्रेंच फेस्टिव्हल
पुणे, १८ जानेवारी/प्रतिनिधी

विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि फ्रान्स दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या बिबवेवाडी येथील परिसरामध्ये २१ जानेवारी रोजी फ्रेंच फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष हेमंत अभ्यंकर यांनी आज पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना फ्रान्समधील उच्चशिक्षणाच्या संधींविषयी माहिती व्हावी तसेच फ्रान्स या देशाविषयी व तेथील संस्कृतीविषयी जाणून घेता यावे या विचारातूनच फ्रान्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मुंबईतील फ्रान्स दूतावासाचे प्रमुख फ्रान्सिस पुजोलय उपस्थित राहणार असून ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तसेच भारत व फ्रान्समधील औद्योगिक सामंजस्यासंबंधी एक सत्र आयोजित करण्यात आले असून यामध्ये विविध कंपन्यांचे प्रमुख आपले विचार मांडतील.यावेळी संस्थेचे विश्वस्त भरत अगरवाल, अलायन्स फ्रान्सिस संस्थेचे प्रमुख जॉन जॅक्स स्यूरो आणि इतर उपस्थित होते.

सराव शिबिराचे आयोजन
पुणे, १८ जानेवारी / प्रतिनिधी

हाजी गुलाम मोहम्मद आझम उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने जिल्ह्य़ातील उर्दू प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण २० शाळांच्या ७५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिराचे संयोजन प्राचार्य नौशाद शेख, विश्वस्त इकबाल मुलाणी, मुमताझ भालदार, हाजरा खान यांनी केले होते.