Leading International Marathi News Daily                                  सोमवार, १ जानेवारी २००९
राज्य

आयुर्वेदातच सापडेल आरोग्यदायी जीवनाचे रामबाण औषध- डॉ. रवी बापट
ठाणे, १८ जानेवारी प्रतिनिधी

विषाणू आणि प्रतिजैविकांच्या लढाईत नेहमी विषाणूच जिंकत आले आहेत. मुख्यत तपासण्यांवर भर असणारे आधुनिक वैद्यकशास्त्र दिवसेंदिवस अधिक खर्चिक होत चालले आहे. प्रगत देशांमध्ये निर्माण होत असलेल्या नवनव्या आजारांवर प्रचलित आधुनिक शास्त्रात कोणतेही रामबाण उत्तर नाही. आयुर्वेदात अशी उत्तरे शोधणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट यांनी आज सकाळी गडकरी रंगायतनमध्ये आयोजित एका आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. येथील आयुर्वार्ता प्रबोधिनी, झंडू फार्मास्युटिकल्स आणि लोकसत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयुर्वेद अ‍ॅण्ड यू' या आरोग्यविषयक मार्गदर्शनपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात डॉ. बापट यांनी आधुनिक वैद्यक शास्त्राच्या मर्यादा स्पष्ट करतानाच आयुर्वेदाचे महत्त्व विषद केले. वैद्य शंकर किंजवडेकर, लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर, झंडू फार्माचे प्रदीप पाटील, आयुवार्ताचे वैद्य उदय कुलकर्णी आणि वैद्य मधुरा कुलकर्णी उपस्थित होते.

बालचित्रकारांनी दिला सुरक्षिततेचा संदेश!
ठाणे, १८ जानेवारी/प्रतिनिधी

आधुनिक जगात ‘सुरक्षितता’ हा अग्रगण्य प्रश्न बनला आहे. आपली आधुनिक पिढी सुरक्षित राहावी, यासाठी तळागाळापासून प्रयत्नशील असायला हवे. देशाची सुरक्षा, दैनंदिनी सुरक्षा, घराघरातील सुरक्षा, रस्त्यावरील सुरक्षा, औद्योगिक व पर्यावरण सुरक्षा, विद्युत सुरक्षा, व्यसनांचे दुष्परिणाम, आरोग्य सुरक्षा यांचे महत्त्व लहानपणापासूनच मुलांवर बिंबवायला हवेत. सुरक्षिततेचे गांभीर्य ओळखून समाजप्रबोधन व्हावे, यासाठी ठाणे विभागाच्या संचालनालय औद्योगिक सुरक्षा व आरोग्य आणि म्युच्युअल एड रिस्पॉन्स ग्रुप (मार्ग) ठाणे शहर व नवी मुंबई यांनी आज रविवारी ‘सुरक्षितता चित्रकला स्पर्धा २००९’चे आयोजन केले होते. ठाणे व नवी मुंबईतील ५०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. रविवारी सकाळी नऊ वाजता ठाणे येथील कॅडबरी इंडिया लि.च्या हिरवळीवर सर्व बालचित्रकार जमले.

‘निवडणूक जिंकण्यासाठी सर्वकाही’ ही राजकारण्यांसाठी ‘गाईड लाईन’
ठाणे, १८ जानेवारी/प्रतिनिधी

राजकारणात चांगले काम करणाऱ्याला कधी सन्मान मिळत नाही आणि वाईट काम करणाऱ्याला कधी शिक्षा होत नाही. तसेच निवडणुकीत कधी कोणते सुत्र चालेल आणि कोणत्या लाटेवर यश मिळेल हेही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत राजकारण आणि निवडणुका यांचे शास्त्रोक्त विवेचन करणारे तसेच निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा याचे मार्गदर्शन करणारे ‘निवडणूक जिंकण्यासाठी सर्वकाही’ हे पुस्तक सर्वच राजकीय पक्षांना गाईड लाईन म्हणून उपयुक्त ठरेल असा विश्वास ठाण्यात जमलेल्या मान्यवर राजकीय नेत्यांनी व्यक्त केला. डॉ. दिलीप सरवटे आणि डॉ. उदय निरगुडकर लिखित आणि राजहंस प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या निवडणूक जिंकण्यासाठी सर्वकाही या पुस्तकाचे प्रकाशन आज सायंकाळी गडकरी रंगायतन मध्ये शानदार सोहोळ्यात झाले. मान्यवरांचे चौकार- षटकार आणि त्याला उपस्थित ठाणेकरांनी दिलेली मनमुराद दाद हे या कार्यक्रमाचे वेगळे वैशिष्टय़ होते. लोकसभेचे माजी सभापती खा. मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, भाजपा प्रदेश अध्यक्ष नितीन गडकरी , राजहंस प्रकाशन संस्थेचे डॉ. सदानंद बोरसे आणि स्वत: लेखक डॉ. सरवटे आणि डॉ. निरगुडकर यांच्या उपस्थितीत तसेच तमाम रसिकांच्या साक्षीने या पुस्तकाचा प्रकाशन सोहोळा पार पडला.

भूमिपुत्रांवरील अन्याय दूर करण्याची मागणी
बदलापूर, १८ जानेवारी/वार्ताहर

अर्बन सिलिंग अ‍ॅक्टमधून अंबरनाथ तालुका आणि परिसर वगळून शेतकरी आणि भूमिपुत्रांना न्याय दिला नाही, तर आगामी सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल, असा इशारा आगरी सेनेचे तालुकाप्रमुख विष्णू पिसेकर यांनी दिला. अर्बन सिलिंग अ‍ॅक्टमधून अंबरनाथ तालुक्याला वगळून आगरी समाजावरील अन्याय दूर करावा या मागणीसाठी बदलापूरच्या जाधव मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी आयोजित मेळाव्यात पिसेकर बोलत होते. केवळ अर्बन सिलिंग कायद्यातून हा भाग वगळावा या मागणीसाठी नव्हे, तर डोंबिवली ते बदलापूर आणि परिसरातील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर व्हावा या मागणीसाठी लढा देण्यात येणार असून, याप्रकरणी न्याय न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पिसेकर यांनी दिला. आघाडी सरकारपूर्वी राज्यात युतीचे सरकार असतानाही परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाहीत याबद्दल पिसेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जमिनीवर आरक्षणे टाकताना अधिकारी जागेवर जात नाहीत. कार्यालयात बसून आरक्षणे टाकतात. शासनाप्रमाणे नगरपालिका आणि महापालिकाही शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम करतात, असा आरोप पिसेकर यांनी केला. शेतकऱ्यांना न्याय मिळावा या हेतूने राजकारणविरहित जमीन बचाओ आंदोलन समितीची या सभेत स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स.म. जाधव यांच्यावर सल्लागार म्हणून जबाबदारी टाकण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाही, तर खासदार-आमदार पालकमंत्री यांना तालुकाबंदी करू, असा इशाराही शरद म्हात्रे यांनी दिला. केवळ आश्वासन नको कृती हवी, अशी मागणी करण्यात आली. दत्तात्रय पाटील, स.म. जाधव, शंकर भोईर, डी.बी. पाटील आदींची यावेळी भाषणे झाली. प्रसाद पाठक, दत्ता भोईर, दिलीप सुरवळ, सुरेश मोहिते, विजय पाटील, अरुण सावंत, तसेच शेतकरी वर्ग मित्र संख्येने उपस्थित होता. रघुनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. जाधव मार्केट येथे संघटनेचे कार्यालय उघडण्यात आले. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

भिवंडीत सेना- मनसेत हाणामारी चार जखमी
भिवंडी, १८ जानेवारी/वार्ताहर

शहरातील कोंबडपाडा येथील शिवसेना शाखेच्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा उघडण्यावरून शिवसेना- मनसे कार्यकर्त्यांमध्ये काल रात्री जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये चार पदाधिकारी जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोंबडपाडा येथे शिवसेना शाखाप्रमुख प्रदीप बोडके व मनसे विभाग प्रमुख राजेश काळण यांची आपसामध्ये मनसे शाखा उघडण्यावरून दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादाचे काल रात्री हाणामारीत रुपांतर होऊन त्यात विकास बोडके आणि राजेश चाळण हे गंभीररीत्या जखमी झाल्याने ठाणे व भिवंडी येथील रुग्णालयात उपचार घेत आहे, तर विकास बोडके व संजय कामीनवार या दोघांना किरकोळ मार लागला आहे. त्यांच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पुणे-नागपूर रेल्वे सेवेचे आज उद्घाटन
पुणे, १८ जानेवारी/ प्रतिनिधी

रेल्वे मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार पुणे-नागपूर गरीबरथ सुपरफास्ट रेल्वे सेवेचे उद्घाटन उद्या (सोमवारी) रेल्वे राज्यमंत्री नारायण राठोड यांच्या हस्ते होणार आहे. २० जानेवारीपासून आठवडय़ातून तीन दिवस ही रेल्वे धावेल. पुणे स्थानकावरून सोमवार, बुधवार व शनिवार संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी नागपूरसाठी रवाना होईल. दौंड, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा या स्थानकांवर थांबून ती दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून २५ मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. त्याचप्रमाणे रविवार, मंगळवार व शुक्रवारी ही गाडी संध्याकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी नागपूरहून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेदहा वाजता पुण्यात पोहोचेल. या गाडीला एकूण १५ डबे असणार आहेत, अशी माहिती वाय. के. सिंग यांनी दिली.

आर्थिक संकटात सापडलेल्या सहकारी बँकांना दिलासा; हर्षवर्धन पाटील यांचे सूतोवाच
प्रशांत देशमुख, वर्धा, १८ जानेवारी

आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील सहकारी बँकांना दिलासा देण्याचे सूतोवाच सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले असून याबाबत २२ जानेवारीला आयोजित बैठकीत ठोस निर्णय होऊ शकतो, असेही ते म्हणाले. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील सहकार मेळावा व अन्य बैठकीसाठी वर्धेत आले असता ‘लोकसत्ता’सोबत संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. वर्धेसह राज्यातील ११ सहकारी बँका ‘११-अ’ या सहकार कायद्याच्या तडाख्यात सापडल्या आहेत. म्हणजेच कर्जवाटप, नोकरभरतीसह सर्व कामकाज ठप्प असून केवळ दैनंदिन कामकाजाची मुभा संचालक मंडळास आहे. मराठवाडय़ातील लातूर वगळता सर्व बँकांना याचे ग्रहण लागले आहे. मात्र त्याच वेळी या जिल्हा बँका ग्रामीण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असल्याने त्या पूर्वपदावर येण्यासाठी सरकारवर दबाव आहे. याच संदर्भाने हर्षवर्धन पाटील म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या कर्जमाफी ‘पॅकेज’चा मोठा लाभ याच सहकारी जिल्हा बँकांना मिळाला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले तर त्यापोटीची तरतूद सरकारने बँकांना भरून दिली. म्हणजे दुहेरी लाभ दिसून आला. ‘पॅकेज’च्या निधीनेच या बँका पूर्वपदावर येतील असेही नाही. त्यासाठी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. सहकार खात्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक ‘कृती दल’ तयार केले आहे. त्या अंतर्गत सर्व पैलू अभ्यासल्या जातील. २२ जानेवारीला अशा सहकारी बँक अध्यक्षांची बैठक पुण्याला आयोजित केली आहे. या बैठकीत काही निर्णय होतील. शेतकऱ्यांना विविध उपक्रमांत मदत करण्याचे बँकांचे काम गतकाळात रखडले. ते पूर्ववत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे सहकार मंत्री म्हणाले. संकटातील बँकांना ‘बेल-आऊट’ पॅकेज देण्याचे प्रयत्न होणार आहेत, असे चित्र हर्षवर्धन पाटील यांच्या उत्तरातून दिसून आले.
सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वर्धेत सहकार विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्य़ातील प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान दोन कामे एका महिण्यात सुरू करण्याचे निर्देश संबंधिताना दिले. ग्रामीण लोकांना १०० दिवसांचा रोजगार देणारी एक व १०० दिवसानंतर रोजगार देणारी दुसरी अशा दोन योजना सुरू असून त्यासाठी दोन हजार कोटींची तरतूद आहे. मजूर मिळत नाही ही बाब गंभीर असून प्रशासनाने त्यात लक्ष घालावे, रेशीम शेती करणाऱ्यांना एकरी २० हजार ऐवजी २५ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव असून शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा बँकेच्या वतीने आयोजित सहकार मेळाव्यात बोलताना पाटील यांनी सहकार चळवळ मजबूत करण्याचे आवाहन केले. राज्यातील ३ क ोटी असंघटित महिलांना विम्याचे संरक्षण देण्यासाठी अशा महिलांच्या विमा पॉलिसीचा हफ्ता सरकार भरणार असून ज्या महिलेचा अपघात झाला, तिला एक लक्ष रुपये भरपाई मिळण्याची तरतूद करणारा कायद्या सरकार करणार आहे. सूतगिरणीसाठी ‘जिनिंग प्रोसेस’ अंमलात आणून १ कोटी ते ५ कोटी पर्यंतचा कर्जाचा फोयदा देऊन गिरणी विकास साधावा, अंगणवाडीच्या पोषण आहार योजनेंतर्गत राज्यातील कंत्राटी पद्धत बंद क रून ८० हजार महिला बचतगटांना ६०० कोटी रुपयाचे आहार पुरवण्याचे कंत्राट महिला बचतगटांना देण्यात आले आहे. अशा विविध तरतुदींची माहिती सहकार मंत्र्यांनी दिली. याप्रसंगी आमदार राजू तिमांडे, विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे, सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांचीही भाषणे झाली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी प्रास्ताविक व उपाध्यक्ष शोभा काळे यांनी आभार मानले.