Leading International Marathi News Daily                                  सोमवार, १ जानेवारी २००९
शेतीवाडी

कमी पाण्यातही आच्छादन पद्धतीने भुईमूग
चीनमध्ये २० वर्षांपासून ही पद्धत सर्रास सुरू असली व पिकही भरघोस येत असले तरी आपल्याकडे मात्र मागील पाच वर्षांपासून या पद्धतीचा अवलंब होऊ लागला. विदर्भात सर्वप्रथम मी व पुसदमधील चार शेतकऱ्यांनी २००३ मध्ये हे धाडस केले. पण अजून फारसा प्रतिसाद या पद्धतीला मिळाला नाही. पॉलिथीन आच्छादनावर भुईमूग पिकाचे उत्पादन घेणे म्हणजे पाण्याचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा यशस्वी उपक्रम ठरावा. सरळ, सोपी व सुटसुटीत निचरा होणारी जमीन निवड करून खोल नांगरणी केली व वखराच्या व पठालनच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत केली. शेवटच्या वखरपाळीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत एकरी १० गाडी घेऊन त्यात सु. फॉ. ३ बॅग, डी.ए.पी. २ बॅग व सूक्ष्म अन्नद्रव्ये पूरक म्हणून फेरस ६, झींग ५, बोरान १ कि. ग्रॅ., मशागत पूर्वीच जपिसप २०० कि. ग्रॅ. सारखे फेकून दिले होते. मॅग, सल्फेट २० कि. ग्रॅ. प्रमाणे खूप चांगले मिसळून घेतले व सारखे फेकून दिले, सोबत पोस्ट ४ कि. ग्रॅ. टाकले. जमीन भुसभुसीत व ढेकळे विरहीत करून घेऊन ३० इंच सरीचे वरंबे घेऊन बाजूने १२ इंचाची सरी काढली. उत्तरास आडवे दांड घेतले व स्प्रिंकलरच्या साहाय्याने जमीन ओली करून घेतली व तणनाशकाची फवारणी करून घेतली. ३ फेब्रुवारीला वापसा येताच पूर्वीची तयार करून ठेवलेली ३६ इंच रुंदीचे व ७ मायक्रॉन जाडीचे ८ x४ इंच अंतरावर १ इंच व्यासाची छिंद्रे पडलेली पॉलिथीन अंथरली व दोन्ही बाजूच्या कडा सरीत मातीने दाबून दिल्या. जेणे करून वारा वादळाने पॉलिथीन उडून उडून जाऊ नये. या वेळी बहुधा सोसाटय़ाचा वारा येतोच तेव्हा सावधगिरी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. परंपरागत पद्धतीपेक्षा प्रत्येक ४x६ च्या ५ ओळी आल्या या पद्धतीत म्हणजे एकरी ८० किलोचा सडिरेट ठेवावा लागला. याप्रमाणे कमी दिवसात येणारा ट्राम्बेचा टी.जी. २६ हा वाण वापरला. टी.जी. २६ या वाणाचे १०० टक्के जर्मिनेशन बियाणे ९० किलो घेऊन त्यात थायरस, बावीसटीन, ट्रायकोडर्मा व सवार्ंत शेवटी रायजोबीयम ट्रीटमेंट करून घेतले व सावलीत वाळायला ठेवले. पॉलिथीन सरी अंथऱ्यावर मजुरां करवी १-१ बी दाबून घेतली. बी छिद्राच्या मधोमध येण्याची काळजी घेतली. एक मजुराला फक्त दोन तास टोबायला दिले.


ग्लोबल वॉर्मिगचा धोका वातावरणाइतकाच तो शेतीलाही आहे. त्यामुळे मानवजातीच्या अस्तित्वासाठी, त्याच्या अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी असलेल्या साधनावरच अधिक घातक परिणाम होणार आहेत. ओझोनचा थर विरळ झाल्यापासूनच या दृष्टिकोनातून अधिक गंभीरपणे विचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता परिस्थिती बरीच पुढे गेली आहे. ग्लोबल वॉर्मिगला तोंड देण्यासाठी काय उपाय योजता येतील, याचा विचार एका बाजूला होत असला तरी दुसऱ्या बाजूला यात आपण काय काय गमावू शकतो, याचाही ताळेबंद मांडण्याचा प्रयत्न संशोधक करीत आहेत. टोरांटो विद्यापीठात संशोधकांच्या गटाने आपले निष्कर्ष नुकतेच प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार ग्लोबल वॉìमगमुळे जमिनीतील सूक्ष्म रेणूंची संरचनाच बदलते आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या जी गोष्ट बनविणे अवघड आहे, तिचेच स्वरूप बदलले जाणार, हे स्पष्ट झाले आहे. हवेत जेवढा कार्बन वायू असतो त्याच्या दुप्पट कार्बन मातीमध्ये असतो. आजवर संशोधकांनी याचा अतिशय बारकाईने कधी अभ्यास केलेला नव्हता. मात्र टोरांटो विद्यापीठातील संशोधकांनी मातीच्या रेणू संरचनेचा अभ्यास करतानाच तापमानवाढीने या संरचनेवर कितपत परिणाम होऊ शकतो, यावर लक्ष केंद्रित केले होते. मातीतील धूलिकणांमध्ये पिकाला पोषक घटक तयार करण्यात सेंद्रिय घटकांचा मोटा वाटा असतो. त्यातून वनस्पतीच्या सजीवतेला किंवा ती वाढण्यासाठी आवश्यक घटकांची उपलब्धता होते. शेतीसाठी हीच गोष्ट नेमकी अत्यंत महत्त्वाची असते.

भारत-पाकचे बासमती युद्ध
भारत आणि पाकिस्तानमध्ये मुंबईवरील हल्ल्यानंतर गेले काही दिवस तणावाचे वातावरण राहिले आहे. मात्र त्याचा परिणाम इतरही विशेषत: उभय देशांमधील व्यापारविषयक बाबींवर होणे क्रमप्राप्त आहे. अशा वातावरणातच बासमती युद्ध भडकले आहे. त्याला कारणही अर्थात पाकिस्तानच्या बाजूने झालेली चूकच ठरली आहे. पाकिस्तानातील कराचीच्या ट्रेडमार्क रजिस्ट्रारने लाहोर बासमती उत्पादक संघटनेला बासमतीचे व्यापार चिन्ह (ट्रेडमार्क) वापरण्यास परवानगी दिली. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत उतरताना केवळ पाकिस्तान हाच बासमती उत्पादक म्हणून दाखल होऊ शकतो. बासमतीचे व्यापारचिन्ह इतर कोणाला वापरता येणार नाही, असा धोका निर्माण झाला. परिणामी उभय देशातील तज्ज्ञांनी बासमतीची नोंदणी सयुंक्तपणे करण्याचा निर्णय घेतला असला तरीही पाकिस्तानने दुसऱ्या बाजुला एकतंत्री कारभार चालूच ठेवला आहे. जानेवारीच्याच दुसऱ्या आठवडय़ात श्रीलंकेला पाचशे टन बासमती निर्यात करण्यासाठी पाकिस्तान व्यापार विकास प्राधिकरणातर्फे प्रमाणपत्र देण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम येईल त्याला प्राधान्य या तत्त्वावर श्रीलंकेतील एका सार्वजनिक कंपनीला हा बासमती तांदूळ शून्य कर आकारणीतून पाठविला जाणार आहे. एका बाजुला भारताने दिलेला संयुक्त नोंदणीचा प्रस्ताव पाकिस्तानच्या व्यापार खात्याचे अधिकारी मान्य करीत आहेत, तर दुसरीकडे निर्यातीला हिरवा कंदील दिला जात आहे. एवढेच काय पण भारताने बासमतीसाठी भौगोलिक वर्गवारीनुसार (जिऑलॉजिकल इंडिकेशन) संयुक्त नोंदणीचा दिलेला प्रस्तावासही पाकिस्तान तयार नसल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे पाकिस्तानातील तांदूळ निर्यातदार संघटनेने भारताच्या व्यापार खात्याला सुपर बासमतीच्या नावावर हक्क सािंगतल्याबद्दल एक नोटीसही बजावली आहे.

युरोप-अमेरिकेच्या सेंद्रिय शेतीत काम करण्याच्या संधी
जग हे एक खेडेगाव झाले आहे. या जागतिक खेडय़ातल्या सर्वच शेतकऱ्यांना पडणाऱ्या प्रश्नापैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाढती मजुरी. विशेषत: प्रगत देशात म्हणजे अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, हॉलंड, स्वीत्र्झलड येथल्या शेतकऱ्यांना वाढत्या मजुरीमुळे शेती करण्यात अनेक अडचणी येत आहेत. सेंद्रीय शेतीत सेंद्रीय उत्पादनांना २५ ते ५० टक्के जास्तीचा भाव मिळतो. पण त्यासाठी जास्त मनुष्यबळ लागते आणि प्रगत देशातले युवक कंपोस्टमध्ये हात घालायला तयार नसतात. कितीही यांत्रिकीकरण केले तरी मानवी श्रम हे लागतातच. आपल्या देशात इतर संस्कृतीच्या लोकांनी कायमस्वरूपी यावे आणि स्थायिक व्हावे असे उदार धोरण जगात कोठेही पहायला मिळत नाही. मात्र आपले काम करायला तात्पुरते यावे. प्रेमाने राहावे आणि काम संपल्यावर निघून जावे, अशी भावना सर्वत्र आढळते. गेल्या वर्षांतल्या परदेशातल्या शेतीविषयक बातम्या जर तुम्हाला वाचायला मिळाल्या असत्या तर तुमच्या लक्षात आले असते की, अमेरिका आणि इंग्लंड या देशात गेल्या वर्षी शेतीमाल तोडण्यासाठी कामगार मिळाले नव्हते. अमेरिकेतल्या शेतात मेक्सिकन स्थलांतरित मोठय़ा प्रमाणावर काम करतात. बेकायदेशीरपणे. सरकारने बेकायदेशीररीत्या आलेल्या स्थलांतरीतांविषयीचे कायदे कडक केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक तोडणीच्या वेळेस मजूर मिळेनात. तीच गोष्ट इंग्लंडमधली. आता इंग्लंडमध्ये पूर्व युरोपातील नागरिकांना श्रमाच्या कामासाठी बोलावण्याचे चालले आहे.

शेतक ऱ्यांना आवाहन
आपल्याकडे शेतकरी गतकाळाच्या मानाने झपाटय़ाने पावले पुढे टाकू लागला आहे. वेगवेगळे प्रयोग ऐकून किंवा स्वत: प्रयोग करून पाहात आहे. एखादा शेतकरी शहरांमधील तारांकित हॉटेल्समध्ये लागणारा ब्रोकोलीसारखा परदेशी भाजीपाला पिकवत आहे. कोणी मधुमका लावत कॉर्नकॉर्नरला माल पुरवतो, तर आताशा मोठय़ा कंपन्याही रिटेल बाजारात उतरून शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधत आहेत. कोणी नव-नवीन तंत्रज्ञानात स्थानिक पातळीवर बदल करीत वेगळेच यंत्र निर्माण करतो. खरे तर विजेची टंचाई लक्षात घेता कोणी ट्रॅ्रक्टरलाच मोटर पंप जोडून विहिरीतील पाणी उपसण्याचा प्रयोग करतो. यात भलेही विद्वत्तापूर्ण किंवा सखोल माहिती नसेल. पण असे चुकत-माकत केलेले प्रयोगच आपली शेती पुढे नेण्यास कारणीभूत ठरणार आहेत.अशा प्रकारच्या सर्व प्रयोगांसाठी, अशा प्रयोगांची माहिती लोकसत्ताच्या ‘शेतीवाडी’ तून प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही जे काही प्रयोग करीत असाल, जर काही नवीन तंत्रज्ञान वापरत असाल तर त्याचा अनुभवही लिहा. तुम्हाला शेतीच्या एखाद्या धोरणाबाबत जे काही वाटत असेल ते परखडपणे लिहा. तेवढय़ाच निर्भिडपणे ते विचार लोकांपर्यंत पोहोचतील. मजकूर कागदाच्या एका बाजूला लिहून तो -
निवासी संपादक, दै. लोकसत्ता,
३/११, अरोरा टॉवर्स, मोलेदिना रोड, कॅम्प, पुणे-१
या पत्त्यावर पाठवावा. पाकिटाच्या वर एका कोपऱ्यात ‘शेतीवाडी’साठी असा उल्लेख करावा. मातीत राबून राठ झालेले हात, औताचा कासरा धरुन तळहाताला घट्टे पडलेले हात घेऊन जिगरबाज मनांचा शेतकरी लिहिता व्हावा, आपलेच प्रयोग, अनुभव त्याने स्वत:च, प्रसंगी तोडक्या-मोडक्या शब्दात माडांवेत.आता सुजाण झालेला शेतकरी स्वत: लिहू शकतो हे सिद्ध करण्याची ही वेळ. त्यांच्यासाठी हे आवाहन.