Leading International Marathi News Daily                                  सोमवार, १ जानेवारी २००९
क्रीडा

विक्रमी धाव घेणारा केनियाचा मुगारा ठरला विजेता
महिलांमध्ये इथियोपियाची केबेबुश पहिली; रामसिंग यादव, एल. अरुणादेवी भारतीयांत प्रथम
मुंबई, १८ जानेवारी / क्री. प्र.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांनी सुन्न झालेली हीच का ती मुंबई, असा प्रश्न पडावा, एवढा उत्साह आणि जल्लोष आज सहाव्या स्टॅण्डर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनच्या वेळी पाहायला मिळाला. जवळपास पस्तीस हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवून या अश्या भ्याड हल्ल्यांनी मुंबईचे ‘स्पिरीट’ आणि वेग यांच्यावर कोणताही फरक पडलेला नाही याचाच प्रत्यय आज जगाला दिला. स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी ‘दर्दी’ मुंबईकरांनी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली करीत मॅरेथॉन यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला. मॅरेथॉनमध्ये यावर्षीही बोलबाला राहीला तो केनियांच्या धावपटूंचाच. गेली दोन वर्षे जेतेपद पटकाविणाऱ्या केनियाचा जॉन केलेई या वर्षी त्याची हॅट्ट्रिक पूर्ण करेल का, याकडे फक्त मुंबईचे नाही तर संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागलेले होते. पण यावर्षी त्याची हॅट्ट्रिक हुकलेली असली तरी केनियाने मात्र स्पर्धेच्या जेतेपदाचा मान मात्र सोडलेला नाही. कारण यावर्षी केलेईला मागे टाकून केनियाच्याच केनेथ मुगाराने २ तास ११ मिनिटे आणि ५१ सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण करीत जेतेपदाचा मान पटकाविला. या शर्यतीतील ही विक्रमी वेळ होती. २००६मध्ये केनियाच्याच रोनोने २ तास १२ मिनिटे व ०३ सेकंद अशी वेळ देत शर्यत जिंकली होती. ती शर्यतीची विक्रमी वेळही होती. पण यावर्षी ती वेळ मागे पडली. एवढेच नव्हे तर दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या केनियाच्या डेव्हिड टारुस यानेही ही विक्रमी वेळ मागे टाकली.

...अन् विजेती पदकाविनाच घरी परतली
मुंबई, १८ जानेवारी/ क्री.प्र.

पुर्ण मॅरेथॉनमध्ये पहिल्या तीन आलेल्या महिला भारतीय धावपटूंना पोडियमवर पदके देण्यासाठी बोलविण्यात आले. इंद्रेश धीरज, लीलाम्मा अलफान्सो व किरण धीरज यांना अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकांची पदके, प्रमाणपत्रे आणि धनादेश देण्यात आले. यावेळी या तिघींच्याही चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. पण हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणभंगूर ठरला. कारण काही क्षणातच या स्पर्धेत खरोखर पहिली आलेली एल. अरूणा देवी आयोजकांना भेटली आणि एक नवा पेच सर्वासमोर निर्माण झाला. सर्व काही पडताळून पाहिल्यानंतर एल. अरूणा देवीला स्पर्धेची विजेती घोषित करण्यात आलेले असले तरी आयोजकांच्या चुकीमुळे मात्र या विजेतीला पदकाविनाच घरी परतावे लागले आहे. मणीपूरमधील ईम्फाल येथे राहणाऱ्या एल. अरूणा देवीने ३ तास ९ मिनीटे आणि ५९ सेकंदांमध्ये स्पर्धा पुर्ण केली आणि भारतीय महिला धावपटूंमध्ये पहिला येण्याचा मान तीने पटकाविला. स्पर्धा संपल्यावर तीच्या पायाला दुखापत झाली. तीने सर्वाना ओरडून सांगितले की, मी स्पर्धेतील विजेती आहे, मला मदत करा. पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार होईना.

ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेवर ५ धावांनी मात; मालिकेत बरोबरी
होबार्ट, १८ जानेवारी / पीटीआय

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा ५ धावांनी पराभव केला आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना २३ जानेवारीला सिडनी येथे खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने शॉन मार्श (७८) आणि कर्णधार रिकी पॉन्टिंग (६४) यांच्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर ९ बाद २४९ धावांची मजल मारली आणि प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेचा डाव ६ बाद २४४ धावावर रोखला. दक्षिण आफ्रिकेतर्फे जॅक्वेस कॅलिस (७२), अब्राहम डिव्हीलियर्स (४४), मार्क बौचर (नाबाद ३७) आणि जेन पॉल डय़ुमिनी (३५) यांनी शर्थीची झुंज दिली पण, विजयी लक्ष्य गाठण्यासाठी त्यांना ६ धावा कमी पडल्या.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात जडेजाचा समावेश
दुखापतीमुळे हरभजनची माघार
मुंबई, १८ जानेवारी / पीटीआय

श्रीलंका दौऱ्यासाठी आज जाहीर झालेल्या पंधरा खेळाडूंच्या भारतीय संघात अष्टपैलू रवींद्र जडेजा याच एकमेव नव्या चेहऱ्याचा समावेश आहे तर अव्वल ऑफस्पिनर हरभजन सिंगला मांडीचे स्नायू दुखावले असल्यामुळे या दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. यंदाच्या रणजी हंगामातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच २० वर्षांच्या रवींद्र जडेजाला संघात स्थान मिळाले तर गेल्या ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेत झालेल्या एकदिवसीय मालिकेनंतर संघाबाहेर गेलेल्या उत्तर प्रदेशच्या प्रवीण कुमारनेही भारतीय संघात पुनरागमन केले. इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान भारतीय संघात समावेश असलेल्या दिल्लीच्या विराट कोहलीला वगळण्यात आले. राष्ट्रीय निवड समितीच्या आज झालेल्या बैठकीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सहसचिव संजय जगदळे यांनी भारतीय संघ जाहीर केला. संघ रचनेसाठी आवश्यक असलेली महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी आज झालेल्या बैठकीला भारतीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीही उपस्थित होता.

ऑस्ट्रेलिया अव्वल; भारत उपविजेता
ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक युवा क्रीडा महोत्सव
सिडनी, १८ जानेवारी / पीटीआय

जेसन डोनोहेने नोंदवलेल्या ‘गोल्डन गोल’च्या जोरावर अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने दिवाकर रामच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय युवक हॉकी संघाचा २-१ गोलने पराभव केला आणि ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक युवा क्रीडा महोत्सवात सुवर्णपदकाचा मान मिळवला. या स्पर्धेत साखळी फेरीत चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय युवक संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, भारतीय महिला संघाने अमेरिकेचा पराभव करत कांस्यपदकाची कमाई केली. ऑलिम्पिक हॉकी सेन्टरवर आज अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत भारतीय संघाने वर्चस्व गाजवले पण, त्यांना विजेतेपद पटकावण्यात अपयश आले. यजमान संघाने सकारात्मक खेळ केला. किरेन गोव्हेर्सने तिसऱ्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवत ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. आज दिवाकर रामला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या वीस मिनिटांच्या खेळात मिळालेल्या तीन पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवण्यात दिवाकर अपयशी ठरला. मध्यंतरानंतर प्रमोद कुमारने दिलेल्या पासवर मनदीप अंतिलने गोल नोंदवत भारताला बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत उभय संघ १-१ गोलने बरोबरीत होते. निकालाची कोंडी फोडण्यासाठी सामना अवांतर वेळेत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात ७६व्या मिनिटाला जेसन डोनोहेने ‘गोल्डन गोल’ नोंदवत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

रॉजर फेडररसमोर अनेक आव्हाने
ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा आजपासून
सिडनी, १८ जानेवारी/वृत्तसंस्थ

वर्षांतील पहिल्याच ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचा सोमवार (१९ जानेवारी) पासून शुभारंभ होत आहे. यंदाच्या स्पर्धेत पुरूषांच्या गटात स्पेनचा सर्वोच्च मानांकित राफेल नदाल आणि स्विट्झर्लंडचा व्दितीय मानंकित रॉजर फेडरर, तर महिलांच्या गटात सर्बियाची आना इव्हानोवीच आणि अमेरिकेच्या विल्यम्स भगिनी यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी पुरूष एकेरीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचलेला राफेल नदाल स्पर्धेच्या सुरूवातीला पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाला की, पहिल्या स्थानावरून पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार असलो तरी माझ्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण नाही. पहिले मानांकनाने माझ्यात काहीच बदल केलेला नाही. यामुळे माझ्यावर दडपण वाढण्यापेक्षा मला शांतताच लाभलेली आहे. तीन वेळा ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकणाऱ्या स्विट्झर्लंडच्या व्दितीय मानंकित रॉजर फेडररसाठी २००८ हे वर्ष फारसे चांगले नव्हते. यंदाची ऑस्ट्रेलियन स्पर्धाही त्याच्यासाठी सोपी नसेल असे म्हटले जात आहे. गेल्या वेळच्या स्पर्धेत त्याला सर्बियाच्या यान्को तिपसारेवीचकडून कडवा प्रतिकार स्वीकारावा लागला होता., तर त्यानंतर उपान्त्य सामन्यात सर्बियाच्याच नोव्हाक द्योकोवीचकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरच्या फ्रेंच व विम्बल्डन स्पर्धामध्ये अंतिम सामन्यात तो राफेल नदालकडून पराभूत झाला होता. यंदाही त्याच्यासमोर रशियाचा मरात साफीन, अर्जेंटिनाचा युआन मार्टिन देल पोत्रो आणि क्रोएशियाचा मारीन सिलिच यांची आव्हानेही आहेत. तसेच नदाल आणि द्योकोवीच यांच्याशी उपांन्त्य सामन्यात त्याची गाठ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या कारकिर्दीतील चौदावे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणे त्याच्यासाठी सोपे नाही. महिलांच्या एकेरीमध्ये प्रथम मानांकित कोण असे विचारल्यावर बहुतेक जण रशियाची शारापोव्हा, विल्यम्स भगिनींपैकी एकीचे अशी वेगवेगळी नावे सांगतील. पण त्यांच्यापैकी कोणीच प्रथम मानांकित नसून येलेना यानोकोव्हीचने प्रथम मानांकन पटकाविले आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि अमेरिकन खुल्या स्पर्धा गमावूनही तिला यंदा प्रथम मानांकन देण्यात आले आहे. गतवेळची उपविजेती सर्बियाची अ‍ॅना इव्हानोवीच यंदा ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकते का याकडे सर्व टेनिसशौकिनांचे लक्ष आहे. स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्यामुळे आपण स्पर्धेतून माघार घेत आहोत असे तिने सांगितले.

सानियाचा सलामीचा सामना दोमाचोस्काशी
सोमदेव देववर्मन पात्रता फेरीत पराभूत झाल्याने ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेत भारतीयांच्या आशा सानिया मिर्झा हिच्यावर केंद्रीत झाल्या आहेत. सानियाचा सलामीचा सामना पोलंडच्या मार्ता दोमाचोस्का हिच्याशी होणार आहे.एकेरी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व सानिया एकटीच करीत आहे. लिएंडर पेस व महेश भूपती हे दोघेही पुरुषांच्या दुहेरी स्पर्धेत उतरणार आहेत

महाराष्ट्राच्या विनीत आणि समीर यांची विजयी सलामी
मुंबई, १८ जानेवारी / क्री. प्र.

महाराष्ट्र संघाचा लाईटवेट गटातील विनित कोटियन आणि लाईट वेल्टर गटाच्या समीर शेखने पहिल्या फेरीत विजय मिळवित तिसऱ्या मुंबई महापौर सुपर कप बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या आशा जिवंत ठेवल्या. पहिल्या फेरीतील सामन्यांच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंनी निराशा केली असतानाच आज लाईट वेट गटातील महाराष्ट्र संघाच्या सिद्धार्थ वर्माचा भारतीय बॉक्सिंग असोसिएशन युथ संघाच्या संदीपने पराभव केला. त्यामुळे स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे अस्तित्व धोक्यात आलेले असतानाच महाराष्ट्र संघाच्या विनित कोटियन आणि समीर शेख यांनी पहिल्या फेरीत विजय मिळवत महाराष्ट्र संघाचा झेंडा फडकवत ठेवला. विनीत कोटीयनने पहिल्याच डावात आक्रमकतेने ठोसे लगावल्याने पश्चिम विभाग यलो संघाच्या रोहीत पटेलला स्वत:ला सावरता आले नाही. शेवटी पंचांनी विनितला विजयी घोषित केले. समीर शेखने सुरूवातीपासून आक्रमक पवित्रा धारण केल्याने खेंडजीत सिंगविरुद्ध १४ -७ असा विजय मिळविला.

कबड्डी : अमरहिंद विजयी
मुंबई, १८ जानेवारी / क्री. प्र.

हनुमान सेवा संघाने आयोजित केलेल्या प्रथम श्रेणी व्यावसायिक व महिला कबड्डी स्पर्धेत महिला गटात अमरहिंद क्रीडा मंडळाने आय.एस. स्पोर्ट्स क्लबवर २८-१२ अशी सहज मात केली तर पुरुष गटातील लढतीत सीबीसी संघाने ओरिएन्टल संघावर २६-१६ असा विजय मिळविला. आणखी एका लढतीत सचिवालय जिमखान्याने ओरिएन्टल इन्शुरन्सवर ३५-२२ अशी मात केली.

बँक ऑफ इंडिया विजयी
मुंबई, १८ जानेवारी / क्री. प्र.

गजानन क्रीडा मंडळाच्या वतीने वामन दुभाषी मैदान (विलेपार्ले) येथे आयोजित केलेल्या ३६व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बँक ऑफ इंडिया आणि एअर इंडिया या संघांनी विजयी सलामी दिली. बँक ऑफ इंडियाने ओम क्रिएशनवर १७-११ अशी तर एअर इंडियाने हॉटेल तुळसा संघावर १८-१५ अशी मात केली. महिला गटात विश्वशांतीने अभिनव क्रीडा मंडळाचा ५०-१५ असा धुव्वा उडविला.