Leading International Marathi News Daily                                  सोमवार, १ जानेवारी २००९
बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेखाली नवे अमेरिकन सरकार प्रशासनाची सूत्रे हाती घेईल. नव्या प्रशासकीय नियुक्त्यांतून ओबामा यांच्या विचारांचे आणि धोरणांचे प्रतिबिंब पाहायला मिळेल. नुकतीच सर्जन जनरलपदी संजय गुप्ता यांची झालेली नियुक्ती ही त्याचीच चुणूक. त्यांच्या पाठोपाठ आता भारतीय वंशांच्या आणखी दोन व्यक्तींपैकी एकीची अमेरिकन संघराज्याच्या प्रमुख तंत्रज्ञान अधिकारीपदी नियुक्ती होऊ घातली आहे. पद्मश्री वॉरियर आणि विवेक कुंद्रा. यापैकी पद्मश्री वॉरियर या सध्या नॅसडॅकच्या सिस्को सिस्टिम्सच्या प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी- चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहेत. यापूर्वी त्यांनी मोटरोलाच्या चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून काम केले आहे आणि त्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विशेषज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात. पद्मश्री वॉरियर यांचा जन्म आणि प्रारंभिक शिक्षण आंध्र प्रदेशात विजयवाडा येथे झाले. दिल्लीच्या आयआयटीमधून त्यांनी केमिकल इंजिनीअरिंगमधली पदवी मिळविली आणि नंतर अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठातून केमिकल इंजिनीअरिंगमधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सध्या त्या या दोन्ही शिक्षणसंस्थांच्या सल्लागार समितीच्या सदस्याही आहेत. २००७ मध्ये त्यांना न्यूयॉर्क पॉलिटेक्निक विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देऊन गौरविले. पद्मश्री वॉरियर मोटरोला कंपनीत आल्या १९८४ मध्ये. २००३ च्या जानेवारी महिन्यात पद्मश्री यांची नियुक्ती मोटरोलाच्या चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून झाली आणि मोटरोलाच्या त्या पहिल्या महिला कार्यकारी अधिकारी ठरल्या. मोटरोलाच्या प्रयोगशाळांतील ४,६०० तंत्रज्ञांच्या पथकाचे नेतृत्व त्या करू लागल्या. २००५ मध्ये त्या कार्यकारी उपाध्यक्ष बनल्या आणि २६,०००
 
इंजिनीअर्सच्या चमूचे नेतृत्व करू लागल्या. मोटरोलामधल्या त्यांच्या २३ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. चीफ टेक्नॉलॉजी अधिकारीपदाच्या त्यांच्या कारकीर्दीतच २००४ साली मोटरोलाला अमेरिकेच्या अध्यक्षांच्या हस्ते नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी हा सन्मान मिळाला. ‘सीमलेस मोबिलिटी’सारखी वॉरियर यांनी मांडलेली संकल्पना बाजारात प्रत्यक्षात येऊ शकली नाही आणि ‘बिट्स ऑन माय एज’ या आपल्या ब्लॉगवर त्यांनी ज्या अ‍ॅपल आयफोनवर टीका केली होती, ती संकल्पना पुढच्या काळात बाजारात अतिशय यशस्वी ठरली. तरीही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या, तंत्रज्ञानाधारित उद्योगातल्या त्यांच्या स्थानाविषयी आणि नव्या तंत्रज्ञानाला बाजारपेठ मिळवून देण्याच्या त्यांच्या क्षमतेविषयी कधीही दुमत निर्माण झालेले नाही. ‘फॉरच्युन मॅगेझिनने आपल्या ‘सर्वाधिक प्रभावशाली महिलां’च्या यादीत त्यांचा समावेश करताना सर्वाधिक वेतन घेणाऱ्या १० महिलांपैकी एक तरुण व प्रभावशाली महिला, उगवत्या चार ताऱ्यांपैकी एक असे त्यांचे उल्लेख केले आहेत. ‘इकॉनॉमिक टाइम्स’नेही ‘११ सर्वाधिक प्रभावशाली वैश्विक भारतीयां’मध्ये त्यांचा समावेश केला आहे. २००१ मध्ये ‘वर्किंग वूमन मॅगेझिन’ने ‘विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी कार्यरत महिलां’साठीच्या पुरस्काराकरिता देशभरातून ज्या सहा विजेत्यांची निवड केली, त्यात पद्मश्री वॉरियरही होत्या आणि पुढे २००३ मध्ये अमेरिकन इमिग्रेशन लॉ फाऊंडेशननेही त्यांच्या कर्तृत्वाची पावती दिली. शिकागोस्थित जॉफ्री बॅले आणि म्युझियम ऑफ सायन्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री, सिंगापूरची सायन्स, टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड रिसर्च एजन्सी, शिकागोतील मेयर्स टेक्नॉलॉजी काउन्सिल, कॉर्नेल युनिव्हर्सिटी इंजिनीअरिंग काउन्सिल अशा विविध संस्थांशी त्या विशेषज्ज्ञ, सल्लागार म्हणून संबंधित आहेत. विस्कॉन्सिनस्थित अल्फालाइट कंपनीचे सीईओ मोहनदास वॉरियर यांच्याशी त्यांनी विवाह केला असून, त्यांचा मुलगा करण वॉरियर इलिनॉइस मॅथ अ‍ॅण्ड सायन्स अ‍ॅकेडमीमध्ये शिकतो आहे.