Leading International Marathi News Daily                                  सोमवार, १ जानेवारी २००९
विविध

(सविस्तर वृत्त)

आरटीओ कार्यालयात जाऊन पंतप्रधानांनी केले वाहन चालवण्याच्या परवान्याचे नूतनीकरण
नवी दिल्ली, १८ जानेवारी/पीटीआय

 
पंतप्रधान मनमोहन सिंग यापुढे मोटार चालवण्याची शक्यता कमी आहे तरीही त्यांनी व्यक्तिगतरीत्या परिवहन खात्याच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या वाहन चालवण्याच्या परवान्याचे इतर कुठल्याही सामान्य नागरिकाप्रमाणे नूतनीकरण करून घेतले. त्यांच्या परवान्याची मुदत ४५ दिवसांपूर्वीच संपली असून परवाना नूतनीकरणासाठी पंतप्रधानांनी इंद्रप्रस्थ येथील आरटीओ कार्यालयात जाण्याचे ठरविले. फक्त त्यांनी एकच सवलत घेतली ती म्हणजे ते रविवारी या कार्यालयात गेले होते. सामान्य लोकांसाठी रविवारी हे कार्यालय बंद असते पण तीही सवलत म्हणता येणार नाही कारण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना रविवार निवडावा लागला. पत्नी गुरुशरण कौर यांच्या समवेत ते परवाना नूतनीकरणासाठी गेले होते. पंतप्रधानांनी आरटीओ कार्यालयात गेल्यानंतर फोटो काढून घेण्यापासून सर्व सोपस्कार पूर्ण केले. बायोमेट्रिक लायसन्ससाठी लागणारे फिंगर प्रिंट्सही त्यांनी दिले. वैद्यकीय तंदुरुस्तीचे प्रमाणपत्रही पंतप्रधानांनी सादर केले. ते ११.३० वाजता कार्यालयात आले व पंधरा मिनिटातच त्यांचे काम झाले. मोटार परवाना अधिकारी प्रदीप आनंद व वाहतूक आयुक्त आर.के.वर्मा यांनी मनमोहन सिंग यांना परवाना दिला. त्यांच्या पत्नीनेही वाहन चालवण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करून घेतले.

आणखी पुरावे भारत सादर करणार
इस्लामाबाद १८ जानेवारी/पीटीआय

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यांत सामील असलेल्या सर्व गुन्हेगारांना पकडले पाहिजे, तसेच या हल्ल्यांच्या चौकशीत भारताने सहकार्य केले तर उत्तमच आहे, असे मत पाकिस्तानने आज व्यक्त केले आहे. पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा प्रमुख रेहमान मलिक यांनी सांगितले की, मुंबईत दहशतवादी हल्ला करण्यात सामील असलेल्यांना पकडून त्यांच्यावर दहशतवाद विरोधी कायद्यान्वये खटले भरण्यास पाकिस्तान वचनबद्ध आहे. भारताने सादर केलेल्या पुराव्यांना पाकिस्तानने दिलेला सकारात्मक प्रतिसाद पाहता आता आणखी पुरावे सादर केले जाण्याची शक्यता भारतातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.