Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, २० जानेवारी २००९
अग्रलेख

गुडबाय मिस्टर बुश!

 

बरोबर आठ वर्षांपूर्वी जॉर्ज डब्ल्यू. बुश (कनिष्ठ) अमेरिकेच्या अध्यक्षपदावर पहिल्यांदा निवडले गेले, तेव्हा त्यांनी ‘आपले हे जबाबदारीचे युग आहे,’ असे म्हटले होते. त्या वेळी माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश (ज्येष्ठ) यांनी ‘आपले चिरंजीव ‘व्हाइट हाऊस’मधून ताठ मानेनेच बाहेर पडतील,’ असे मत व्यक्त केले होते. आज अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असताना त्यांच्या स्वत:च्या आणि त्यांच्या वडिलांच्या त्यांच्याविषयीच्या मतांची चिकित्सा करणे गरजेचे ठरते आहे. आठ वर्षांपूर्वी अमेरिकेची अर्थव्यवस्था जशी सुदृढ होती, तशी ती आज नाही. आर्थिक मंदीने संपूर्ण अमेरिकेलाच आज ग्रासले आहे. अमेरिकेच्या लष्करात भरती होणाऱ्यांची संख्या जेमतेम होती, ती गेल्या काही महिन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. दहशतवाद्यांपासून अमेरिकेचे संरक्षण करायचे म्हणून नव्हे, तर नोकऱ्यांची संख्या घटली, आर्थिक मंदीत वाढ झाली आणि नोकरकपातीला सामोरे जावे लागले, यामुळे अनेक पात्र तरुणांपुढे लष्करात दाखल होण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. बुश सत्तेवर सर्वप्रथम आले तेच मुळात खोटेपणातून, पण नंतरच्या काळातही त्याच खोटेपणाचा आधार घेत त्यांनी संपूर्ण जगाला युद्धाच्या छायेखाली नेले. त्यांच्या वडिलांनी आधीच्या काळात कुवेतवरल्या इराकी हल्ल्याचे निमित्त करून इराकला धडा शिकवला, तर त्यांच्या चिरंजीवांनी इराकमध्ये नसणाऱ्या जनसंहारक अस्त्रांचा बागुलबुवा तयार करून इराकचे कंबरडे मोडले, इराकची धूळधाण केली. इराकमध्ये सद्दाम हुसेन नावाचा जणू एक राक्षस उभा आहे आणि त्याच्या संहारासाठीच आपला जन्म आहे, असे त्यांनी मानले. वास्तविक संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाहणी पथकांनी इराकमध्ये रासायनिक वा जैविक अशी कोणतीही जनसंहारक अस्र्ो नाहीत, असे आपल्या अहवालांमध्ये म्हटले होते. राष्ट्रसंघाच्या एका पाहणी पथकाचे प्रमुख हान्स ब्लिक्स यांनी आपल्या अहवालात त्यासंबंधीचे यथास्थित चित्रण केले होते, पण बुश यांनी अशा कोणत्याच अहवालावर विश्वास दाखवला नाही. ११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्कच्या ‘वल्र्ड ट्रेड सेंटर’वर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात इराकचा संबंध नसूनही तो जोडण्यात आला. या हल्ल्यात ज्यांचा या ना त्या स्वरूपात संबंध आला, त्यांच्याविषयी मात्र ते आजही मूग गिळून गप्प बसले आहेत. इराककडे जनसंहारक अस्र्ो आहेत, असे सांगून ‘सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ या आपल्या गुप्तचर यंत्रणेनेच आपली फसवणूक केली, असे बुश यांनी अलीकडेच म्हटले, हा तर निगरगट्टपणाचा नमुनाच म्हणावा लागेल. इराकमध्ये आपण लोकशाही आणली, इराकमधला हिंसाचार संपवला आणि इराकी जनतेची हुकूमशाहीच्या जोखडातून सुटका केली, असे बुश यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात म्हटले, ही त्यांनी केलेली फसवणूक आहे. इराकवर लादण्यात आलेल्या युद्धात सद्दाम हुसेन यांच्यासह कितीजणांचा बळी देण्यात आला, त्याची आकडेवारी तपासून पाहायला हवी. अफगाणिस्तानवर बुश यांच्या सैन्याने आक्रमण केले. तोपर्यंत अफगाणिस्तानात तालिबानांच्या हाती सत्ता होती. ‘अल् काईदा’सारख्या दहशतवादी संघटनेला तिथे तालिबानांकडून आश्रय देण्यात आला होता. या तालिबानांचे आणि ‘अल काईदा’च्या दहशतवाद्यांचे दुसरे जग पाकिस्तानात होते आणि आजही ते पाकिस्तानच्या स्वात आणि वझिरीस्तान या भागात कायम आहे. दहशतवाद्यांच्या या अभयारण्याला आवर घालायला आपण कमी पडलो, हे बुश यांनी मान्य केले आहे. ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर बुश यांनी जाहीर केलेल्या दहशतवादाविरुद्धच्या लढय़ात पाकिस्तानला तेव्हाचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी उतरवले नसते, तर पाकिस्तानवरही कारवाई करायचा निर्णय बुश प्रशासनाकडून घेतला जाणे अपरिहार्य होते. पाकिस्तानला त्याचा सुगावा लागल्याने पाकिस्तानी नेते बदलले, तरी पाकिस्तानातल्या दहशतवादी शक्ती बदलल्या नाहीत. त्याचेच पर्यवसान मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्यात पाहायला मिळाले. बुश यांनी त्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला जाब विचारला. त्यांच्या प्रशासनातल्या परराष्ट्रमंत्री कोंडोलिसा राईस यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे आज (मंगळवारी) हाती घेणारे बराक ओबामा यांनी ‘भारताला कारवाई करायचा पूर्ण अधिकार आहे,’ असे स्पष्ट केले. प्रत्यक्षात आज या सर्व नेत्यांकडून भारतालाच आवरायचे प्रयत्न केले जाऊ लागले आहेत. जगात कुठेही मानवाधिकाराचे यत्किंचितही उल्लंघन झाले, की बोंबाबोंब करणाऱ्या अमेरिकेची या विषयात सर्वाधिक घसरगुंडी बुश प्रशासनाच्या गेल्या आठ वर्षांच्या कालखंडात झाली आहे. क्युबाच्या ग्वांतानामो बे या छळछावणीत अमेरिकेने ठेवलेल्या कैद्यांची संख्या आता काहीशेवर आली असली तरी ज्यांची सुटका केली गेली वा मृत्यूनेच ज्यांची ‘सुटका’ झाली, त्यांना कोणकोणत्या यातना भोगाव्या लागल्या ते आता विविध पाहणी अहवालांमधून स्पष्ट केले जात आहे. चौदा वर्षांचा एक कैदी अलीकडेच तिथून सुटला. त्याला तीन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याच्या आरोपावरून सौदी अरेबियात पकडण्यात आले. गरीब घरातला अकरा वर्षांचा मुलगा लंडनच्या टोळीत समाविष्ट कसा झाला हे अजूनही न उलगडलेले कोडे आहे. अशा कितीतरी जणांच्या करुण कहाण्या बाहेर येऊ लागल्या आहेत. बुश यांच्या कारकीर्दीत त्यांनी भारताबरोबर केलेला अणुऊर्जा करार हा मात्र एका वेगळय़ा टप्प्यावर घेऊन जाणारा ठरला आहे. भारताची ऊर्जाविषयक गरज लक्षात घेऊन तो करण्यात आला. अनेक अडचणी उभ्या राहूनही त्यांनी या कराराचा पाठपुरावा केला. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेने टाकलेले हे पाऊल निश्चितच ऐतिहासिक होते. तशाच कराराची अपेक्षा पाकिस्तानने व्यक्त केली असता बुश यांनी मुशर्रफ यांच्यासमोर ‘भारत हा एक जबाबदार देश आहे,’ असे सांगून पाकिस्तानशी तसा करार करायला नकार दिला. भारत-अमेरिका सहकार्याची नोंद त्यामुळेच समस्त जगालाच घेणे भाग पडले. बुश सत्तेवर आले आणि अमेरिकेला दहशतवाद्यांबरोबर तेव्हापासूनच दोन हात करावे लागले. ज्या हल्ल्याबद्दल ‘अल काईदा’ या संघटनेचा सर्वेसर्वा ओसामा बिन लादेन याला दोषी धरण्यात आले, त्याला आजही ‘जिवंत वा मृत’ पकडण्यात अमेरिकेला यश आलेले नाही. गाझा पट्टीत इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा लादेनने अलीकडेच तीव्र शब्दांत निषेध करून इस्रायलविरुद्ध ‘जिहाद’ पुकारला. लादेन सध्या अस्तित्वातच नाही, म्हणणाऱ्यांना लादेनने असाही एक धक्का दिला आहे. ११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेवढय़ा मोठय़ा हल्ल्याला अमेरिकेला तोंड द्यावे लागले नाही, हीच आपल्या कारकीर्दीची जमेची बाजू आहे, असे बुश यांना मानायचे असेल तर त्यांनी तसे खुशाल मानायला हरकत नाही. नाहीतरी आपली आठ वर्षांची अध्यक्षीय कारकीर्द कशी गेली, या प्रश्नावर त्यांनी ती ‘आनंदात’ गेल्याचे म्हटले आहे. चित्ती असू द्यावे समाधान, हाच जर त्यांचा मूलमंत्र असेल, तर त्यांना तरी बोल काय लावणार? बुश यांच्या कारकीर्दीत घडलेल्या वा न घडलेल्या विनोदांविषयी आपल्याला ‘सज्ञान’ करणाऱ्या काही लाख पानांचा इंटरनेटच्या वेबसाइट्सवर संचार आहे. त्यात विनोद, प्रहसने, अर्कचित्रे यांचा भरणा आहे. खुद्द बुश यांनाही आवडतील असे काही विनोदी प्रसंग त्यात आहेत. ‘सकाळी जॉगिंगला बाहेर पडलेले जॉर्ज बुश एका कडय़ावरून नदीत पडतात. त्याच परिसरात खेळणाऱ्या तीन मुलांनी नदीत उडी मारून बुश यांना बाहेर काढले. त्या तिघांचे बुश आभार मानतात आणि म्हणतात, की तुम्ही पोरांनी एका अध्यक्षांना वाचवले. त्याबद्दल तुम्हाला काय हवे? पहिला मुलगा म्हणतो, ‘मला डिस्नेलँडचे तिकीट हवे.’ बुश म्हणतात, ‘मी तुला ते खरेदी करून देईन.’ दुसरा म्हणतो, ‘मला नाईकेचे बूट हवेत.’ त्यावरही बुश म्हणतात, ‘दिले, नो प्रॉब्लेम!’ तिसरा मुलगा म्हणतो, ‘मला व्हीलचेअर हवी.’ त्याच्याकडे पाहात बुश म्हणतात, ‘अरे, तू तर चांगला धडधाकट आहेस आणि व्हीलचेअर मागतोस?’ मुलगा उत्तरतो, ‘काय आहे सर, मी आपल्याला वाचवले, असे जर माझ्या वडिलांना कळले, तर माझी धडगत नाही, म्हणून ती मला हवी.’ अशी आहे बुश यांची कारकीर्द! निवृत्तीनंतर आपल्याला काय काय करायला आवडेल ते त्यांनी जाहीर केलेच आहे, ते ते त्यांना करायला मिळो, अशी सदिच्छा व्यक्त करून त्यांना आपण ‘गुडबाय’ म्हणूया !