Leading International Marathi News Daily                                 मंगळवार, २० जानेवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

अग्रलेख

विशेष लेख

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत

निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑल सेट फॉर चेंज
वॉशिंग्टन, १९ जानेवारी/पी.टी.आय.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे उद्या बराक ओबामा स्वीकारणार असून अमेरिकेच्या साडेतीनशे वर्षांंच्या लोकशाहीच्या इतिहासात या समृध्द देशात प्रथमच बदलाचे वारे वाहणार आहेत. लोकांच्या भक्कम पाठिंब्यावर निवडून आलेल्या बराक ओबामा यांना अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवसापासून सध्या या देशावर घोंघावत असलेल्या आर्थिक अरिष्टाचा सामना करावा लागेल. या कठीण काळात अमेरिकी नागरिकांनी दृढ संकल्प करून या अरिष्टावर मात करण्यासाठी आपले सर्व सामथ्र्य पणास लावावे, असे आवाहन ४७ वर्षीय बराक ओबामा हे यावेळी करणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या परराष्ट्रीय धोरणातील अनेक मुद्दे बराक ओबामा यांना बदलून नव्या धोरणाची मुहुर्तमेढ रोवावी लागणार आहे, तसेच अमेरिकेला सध्या ग्रासत असलेल्या आर्थिंक मंदीचे अरिष्ट दूर करण्यासाठी काही खास उपाययोजना हाती घ्याव्या लागतील. आर्थिक मंदीतून अमेरिकेला ‘बेल-आऊट’ कसे करणार हे ओबामा यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे. उद्या जेव्हा बराक ओबामा पवित्र बायबल ग्रंथावर हात ठेवून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील तेव्हा अमेरिकेत एक मोठा इतिहास रचला जाणार आहे. ओबामा भारताचे वर्णन अमेरिकेचे नैसर्गिक मित्र राष्ट्र असे करीत असले तरी ओबामा यांनी नुकतीच काश्मीर प्रश्नाची सांगड अफगाणिस्तान प्रश्नाशी घातली असल्यामुळे नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत बराक ओबामा यांना प्रचंड बहुमत मिळाले आणि त्यांनी त्याचवेळी अमेरिकेत इतिहास घडविला आहे. उद्या ते जेव्हा या पदाची सूत्रे स्वीकारतील तेव्हा या इतिहासावर शिक्कामोर्तब होईल आणि अमेरिकेला आपल्या इतिहासात प्रथमच आफ्रिकी वंशाचा कृष्णवर्णीय अध्यक्ष मिळेल. अर्थात ओबामा हे जेव्हा ओव्हल ऑफीसमध्ये प्रवेश करतील तेव्हा त्यांच्यासमोर हिमालयाएवढी आव्हाने असणार आहेत. ते या सर्व प्रश्नांशी कसा लढा देतात याकडेच जगातील राजकीय निरीक्षकांचे आता लक्ष लागून राहिले आहे.

पाटण्यात प्रेक्षकांची हुल्लडबाजी; गंभीर, सेहवाग सुरक्षित
पाटणा, १९ जानेवारी / पीटीआय

एका स्थानिक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेदरम्यान वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर या भारतीय सलामीवीरांना आज प्रेक्षक आणि पोलिसांत झालेल्या चकमकीमुळे काढता पाय घ्यावा लागला. सुदैवाने, या भारतीय क्रिकेटपटूंना कोणतीही दुखापत झाली नाही. येथील मोईन हक स्टेडियममध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला गंभीर, सेहवागसह प्रवीणकुमारही उपस्थित होता. त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणेही कठीण झाले. एवढेच नव्हे तर प्रेक्षकांनी कुंपण तोडून मैदानात प्रवेश केला. प्रेक्षकांना रोखण्यासाठी मग पोलिसांनी काहींना लाठीचा चोप दिला. तेव्हा खवळलेल्या प्रेक्षकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही प्रेक्षक जखमी झाले. काहींनी मैदानात धाव घेतली. ही परिस्थिती निवळत नसल्याचे पाहून भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी याने प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केले. भोजपुरी चित्रपटातील गाणी पेश करून त्याने प्रेक्षकांचे लक्ष वळविण्याचाही प्रयत्न केला.

युती तोडण्याचा इशारा शिवसेनाप्रमुखांनी प्रत्यक्षातही आणावा- छगन भुजबळ
नवी मुंबई, १९ नोव्हेंबर / प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जे बोलतात, ते करून दाखवितात. त्यामुळे सीमाप्रश्नावर भारतीय जनता पक्षासोबत युती तोडण्याचा इशारा देणाऱ्या शिवसेनेने तो प्रत्यक्षातही आणावा, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज वाशी येथे दिला. केंद्र आणि राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार असताना या दोन्ही पक्षांनी सीमावासीयांसाठी ठोस असे काय केले, याचा खुलासा या पक्षांनी आधी करावा, असे आव्हानही छगन भुजबळ यांनी या वेळी दिले.
नवी मुंबई, क्रीडा संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन आज छगन भुजबळ यांच्या हस्ते मोठय़ा दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले. या वेळी ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक, सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील, नवी मुंबईच्या महापौर अंजनी भोईर, तसेच महोत्सवाचे आयोजक संदीप नाईक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी सीमा प्रश्नासंबंधी युतीच्या नेत्यांना टोला हाणला. सीमा प्रश्नावर युती तोडण्याची भाषा शिवसेनेकडून केली जात आहे. मात्र इशाऱ्याचा खेळ खेळण्याऐवजी शिवसेनेने प्रत्यक्ष कृती करावी, असा उपरोधिक सल्ला या वेळी छगन भुजबळ यांनी दिला. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी, तसेच बिगर मराठी मतांचे राजकारण करण्यात काही पक्ष मश्गुल आहेत. मात्र या निवडणुकांचे निकाल केवळ विकासाच्या मुद्दय़ावर ठरतील, असा अंदाजही छगन भुजबळ यांनी या वेळी व्यक्त केला. राज्यात आणि देशात काँग्रेस हा मोठा भाऊ असला तरी लहान भाऊ (राष्ट्रवादी) कर्तबगारी दाखवीत असेल, तर त्याकडे मोठय़ा भावाने कानाडोळा करून कसे चालेल, असा प्रश्न उपस्थित करीत छगन भुजबळ यांनी या वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला प्राधान्याने जागा सोडण्याचा मुद्दाही उपस्थित केला.

अट्टल दरोडेखोर अंकुश काळे जमावाच्या हल्ल्यात ठार
श्रीगोंदे, १९ जानेवारी/वार्ताहर

पोलीस नाईक अंकुश धावडे यांच्यासह ७ खून व इतर अर्धा डझन गुन्हे करणारा अट्टल दरोडेखोर अंकुश काळे आज रात्री जमावाच्या हल्ल्यात ठार झाला. तालुक्यातील आर्वी-अनगरे परिसरात ही घटना घडली. उसन्या पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून काळे याने सहकाऱ्यासह जमावावर हल्ला केला. जमावाने केलेल्या प्रतिहल्ल्यात तो ठार झाला, तर त्याचा साथीदार शांत्या वसंता काळे जखमी झाला. श्रीगोंदे व दौंड तालुक्यांच्या हद्दीवर भीमा नदीकाठच्या आर्वी-अनगरे शिवारात हे थरारनाटय़ घडले. सप्टेंबर २००४मध्ये त्यांच्याच समाजातील एका महिलेवर बलात्कार केल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर श्रीगोंदे पोलिसांचे पथक अंकुशला पकडण्यासाठी गेले असता पथकावर हल्ला झाला. त्यात पोलीस धावडे यांना निर्घृणपणे ठार मारण्यात आले. या घटनेनंतर अंकुशचे वडील वसंता काळे पोलीस चकमकीत ठार झाले. काळे याने बदला घेण्यासाठी तांदळी (तालुका शिरूर) येथे त्यांच्याच समाजातील सहाजणांची कत्तल केली. त्यानंतर अंकुश पोलिसांना त्याचा भाऊ लहू याच्यासह हुलकावणी देत होता. नंतर पुणे पोलिसांच्या पथकाने अंकुशला पकडले. परंतु नंतर तो रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता.अंकुश व लहू काळे यांची नदीकाठी नगर व पुणे दोन्ही जिल्ह्य़ांत मोठी दहशत होती.

कुल्र्यात शिवसेनेची बाजी
मुंबई, १९ जानेवारी / प्रतिनिधी

कुर्ला येथील प्रभाग १६० मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे कमलाकर नाईक यांनी काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे सदानंद थोरात यांच्यावर ९१५ मतांनी विजय मिळविला. शिवसेनेचे शांताराम नाईक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या विजयामुळे शिवसेनेचे पालिकेतील संख्याबळ ८४ एवढेच राहिले आहे. शांताराम नाईक यांच्या निधनानंतर शिवसेनेने त्यांचे पुत्र कमलाकर नाईक यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. कोणत्याही परिस्थितीत ही जागा शिवसेनेकडून हिसकावून घेण्याचा जंग विरोधी पक्षांनी केला होता. मात्र विरोधी पक्षाचे मनसूबे यशस्वी झाले नाहीत. कै. शांताराम नाईक हे पालिकेवर अवघ्या ९२ मतांच्या फरकाने निवडून गेले होते. मात्र कमलाकर नाईक यांनी तुलनेने मोठा विजय मिळवला. काँग्रेसने सदानंद थोरात यांना उमेदवारी दिली होती. थोरात यांना ७६४९ मते मिळाली तर कमलाकर नाईक यांना ८५६४ मते मिळाली. मनसेतर्फे निवडणूक लढवणाऱ्या मनाली लाड यांना १९७९ मते मिळाली. पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे ८१ नगरसेवक असून मनसेचे ७ नगरसेवक आहेत. अपक्षांच्या मदतीने शिवसेना-भाजपाने पालिकेत सत्ता काबीज केली आहे. नाईक यांची जागा जिंकणे शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाचे होते.

विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपने जागा राखली
नागपूर, १९ जानेवारी / प्रतिनिधी

विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अशोक मानकर विजयी झाले. अटीतटीच्या या लढतीत काँग्रेसचे अनंत घारड यांचा मानकर यांनी ३७ मतांनी पराभव केला. ४१० मतांपैकी मानकर यांना २२० तर, घारड यांना १८३ मते मिळाली. सात मते अवैध ठरली. सागर मेघे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी गेल्या शुक्रवारी मतदान झाले. एकूण ४१४ मतदारांपैकी बहुजन समाज पक्षाचे चार सदस्य तटस्थ राहिले. यामुळे ४१० मतदारांनी मतदान केले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीमुळे गेल्या पंधरवडय़ापासून जिल्ह्य़ातील राजकारण ढवळून निघाले. काँग्रेसचे सर्व गट आणि नेते एकत्र आले पण, घारड यांना पराभवापासून वाचवता आले नाही. मानकर यांनी मात्र भाजपची ही जागा कायम राखली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनात सकाळी आठ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. सर्व मतपत्रिका एकत्र केल्यानंतर मतमोजणीला प्रारंभ झाला. त्याचवेळी मानकर यांचे पारडे जड असल्याचे संकेत मिळाले. अवघ्या अर्धा तासातच चित्र स्पष्ट झाले.

दिल्लीतील चकमकीत चार दरोडेखोर जखमी
नवी दिल्ली, १९ जानेवारी / पी. टी. आय.

दक्षिण दिल्लीतील एक बँक दरोडय़ाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला या वेळी झालेल्या चकमकीत चार दरोडेखोर जखमी झाले. यात एक दरोडेखोर परदेशी वंशाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपआयुक्त (दक्षिण) एच. जी. एस. धालीवाल यांनी सांगितले, की चारही दरोडेखोरांकडे भरलेली पिस्तुले होती. त्यांना जखमी अवस्थेत अटक करण्यात आली आहे. ग्रीन पार्क भागातील बँक फोडण्याचा या दरोडेखोरांचा विचार होता. उत्तर प्रदेशातील दरोडेखोर सत्यप्रकाश ऊर्फ सत्ती यांच्या टोळीने सायंकाळी चार वाजता हा दरोडय़ाचा अयशस्वी प्रयत्न केला. पोलिसांना दरोडय़ाची खबर मिळालेली होती. त्यांनी अगोदरच सापळा रचला होता. दोन मोटारींतून दरोडेखोर आले. त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. पाच दरोडेखोर मोटारीतून पळून गेले. सत्यप्रकाशसह चौघे जखमी झाले.

झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट
नवी दिल्ली, १९ जानेवारी/पी.टी.आय.

मुख्यमंत्री शिबू सोरेन विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या अनिश्चित राजकीय परिस्थितीमुळे झारखंडमध्ये आज राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत करण्यात आली होती. विधानसभेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जावी, या शिफारसीवर सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
पोटनिवडणुकीत सोरेन यांचा पराभव झाल्यानंतर १२ जानेवारी रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. झारखंडचे राज्यपाल सईद सिब्ते राझी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सूचना केली होती. विधानसभेच्यावतीने याबाबत पाठविण्यात आलेली शिफारस राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी मंजुर केली असून गृहमंत्रालयाकडे पाठविल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

‘..तर ‘समझोता’तील आरोपी पाकला द्या’
इस्लामाबाद, २० जानेवारी/पी.टी.आय.
भारताला जर २६/११तील संशयीत आरोपी ताब्यात हवे असतील, तर ‘समझोता एक्स्प्रेस’मध्ये २००७ घडवून आणलेल्या स्फोटातील आरोपी भारताने पाकिस्तानच्या हवाली करावे, अशी मागणी पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांनी ‘जिओ न्यूज’ला काल दिलेल्या मुलाखतीत केली. भारतीय वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव स्फोटांचा संबंध हा समझोता एक्स्प्रेसशी असल्याचे उघडकीस आले आहे. या स्फोटांत सहभागी असलेले कर्नल एस.के. पुरोहित यांच्यासह अन्य आरोपींना पाकिस्तानच्या हवाली केले जावे, अशी अपेक्षा पाकिस्तानातील नेत्यांकडून केली जात आहे. भारताकडून मुंबई हल्ल्यातील आरोपींची मागणी होत असेल, तर आधी ‘समझोता’मधील स्फोटांच्या आरोपींना भारताने पाकिस्तानकडे सुपूर्द करावेत, असे मलिक मुलाखतीत म्हणाले.

‘दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशाला जबर किंमत मोजावी लागेल’
नवी दिल्ली, १९ जानेवारी / पी.टी.आय.

लोकांची दहशतवाद सहन करण्याची शक्ती संपली आहे. ही प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट करणे हाच त्यावर उपाय आहे. पण काही देशांच्या भूमिवर हा दहशतवाद अजूनही फोफावत असून त्यांनी त्याला कायमस्वरुपी पायबंद न घातल्यास त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल अशा शब्दात परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा पाकिस्तानला कडक शब्दात सुनावले. येथे आयोजित एका परिषदेत बोलताना मुखर्जी यांनी वाढत्या दहशतवादाबद्दल चिंता व्यक्त करतानाच या प्रवृत्तीला हाताशी धरणाऱ्या देशांनी आता विचार करण्याची गरज व्यक्त केली.

हायटेक शिवसेनाभवनात चप्पलचोर!
मुंबई, १९ जानेवारी/प्रतिनिधी

कॉर्पोरेट लूक लाभलेल्या, अनेक छुप्या कॅमेऱ्यांची अहोरात्र देखरेख असलेल्या शिवसेना भवनातून सध्या चप्पल गायब होत असून चप्पल चोर शिवसेनेची भक्कम तटबंदी आणि कॅमेरांचा पहारा याला गुंगारा देण्यात यशस्वी झाला आहे.
शिवसेनेचे माजी दिवंगत नगरसेवक के. टी. थापा यांच्या कन्येने अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी थापा यांच्या समर्थकांसह काही आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर माजी नगरसेवक प्रकाश आयरे हे आपली चप्पल शोधू लागले. परंतु शोधूनही त्यांना त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे आयरे हे ज्याच्या त्याच्या पायाकडे पाहत इकडेतिकडे फिरत होते. शिवसैनिकांची पांगापांग झाल्यावर अनवाणी आयरे शिवसेना भवनाखालील राष्ट्रीय लेदर वर्क्‍स या दुकानात गेले व त्यांनी नवी चप्पल खरेदी केली.

श्रीलंका दौऱ्यातून दुखापतीमुळे हरभजनची माघार
मुंबई, १८ जानेवारी / क्री. प्र.

श्रीलंका दौऱ्यासाठी आज जाहीर झालेल्या पंधरा खेळाडूंच्या भारतीय संघात अष्टपैलू रवींद्र जडेजा याच एकमेव नव्या चेहऱ्याचा समावेश आहे तर अव्वल ऑफस्पिनर हरभजन सिंगला मांडीचे स्नायू दुखावले असल्यामुळे या दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. यंदाच्या रणजी हंगामातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच २० वर्षांच्या रवींद्र जडेजाला संघात स्थान मिळाले तर गेल्या ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेत झालेल्या एकदिवसीय मालिकेनंतर संघाबाहेर गेलेल्या उत्तर प्रदेशच्या प्रवीण कुमारनेही भारतीय संघात पुनरागमन केले.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८