Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, २० जानेवारी २००९

मुंबई मॅरेथॉन रॉक्स
मुंबई शहर कायमच धावत असतं, फरक इतकाच की धावण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी. पण रविवारी झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार धावला आणि प्रत्येकाने हजारो मुंबईकरांसोबत पुन्हा नव्याने ‘मुंबई स्पीरिट’चा सळाळता अनुभव घेतला. पहाटेपासूनच सीएसटी रेल्वे स्टेशनबाहेरचा परिसर मुंबईकरांनी फुलून गेला होता. आझाद मैदानातील वेगवेगळ्या प्रवेशद्वारांवर शिस्तबद्ध रीतीने प्रत्येकजण रांगेत उभा होता. वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, पोलीस, सुरक्षारक्षक, स्वयंसेवक आपापल्या कामात गुंतले होते. लहान मुलं, तरुण, प्रौढ, आजी-आजोबा, अपंग व्यक्ती अशा कितीतरी जणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विशेष म्हणजे प्रत्येकजण स्वत:च्या आनंदाबरोबरच इतरांना आनंद देण्यातही मग्न होता. इतका मोठा दहशतवादी हल्ला होऊनही मुंबईकर मॅरेथॉनमध्ये खूप मोठय़ा संख्येने उपस्थित राहिले. कुणाच्याही चेहऱ्यावर भीतीचं सावट नव्हतं, होता फक्त उत्साह आणि आनंद. कितीतरी स्वयंसेवी संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, उद्योगविश्वातील प्रतिनिधी धावत होते. वेगवेगळ्या संस्थांना सहाय्य म्हणून बऱ्याच मोठय़ा संख्येने तरुणाईही सहभागी झाली होती.

 


चित्रविचित्र वेश, लक्षवेधी घोषणाफलक, रंगीबेरंगी कपडे यांमुळे वातावरणात वेगळीच प्रसन्नता होती. परदेशी पाहुणेसुद्धा कॅमेऱ्यामध्ये मॅरेथॉन मोमेंट्स क्लिक करत होते. ब्रिटनचा मूळ रहिवासी असलेला पण पवई येथे राहणारा रॉजर मॅरेथॉनमध्ये खूपच उत्साही दिसत होता. तो म्हणाला, ‘‘मी हाफ-मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. ही वेगळीच मजा आहे आणि मी पहिल्यांदाच मॅरेथॉन कशी असते याचा अनुभव घेतोय.’’
अर्जुन रामपाल, नागेश कुकनूर, शर्मिला टागोर हे सेलिब्रिटीजही सुरक्षेची काळजी न करता मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. अर्जुन रामपाल आणि नागेश कुकनूर यांनी अपंग मुलांसोबत धावण्याचा आनंद घेतला. कल्पक घोषणाफलक हेही मॅरेथॉनचं एक वैशिष्टय़ म्हणता येईल. ‘देअर इज नो गुड वॉर अ बॅड पीस’, ‘ओल्ड- डू ऑर डाय, न्यू- डू बिफोर डाय’ ही काही लक्षवेधक घोषणावाक्यं होती.
एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे तरुण विद्यार्थ्यांचा तुलनेने कमी सहभाग. तरुण विद्यार्थी काही स्वयंसेवी संस्थांसाठी धावत होते. मात्र महाविद्यालयाचं कोणत्याच विद्यार्थ्यांनी प्रतिनिधित्व केलं नाही. ‘‘हे खरंय की महाविद्यालयातील तरुण संख्येने कमी आहेत,’’ अशी प्रतिक्रिया आयसीटी इन्स्टिटय़ूटमधील आदित्य या विद्यार्थ्यांने दिली.
मात्र मुंबईकरांनी दाखवलेलं धैर्य, माणुसकी मॅरेथॉनमधून दिसून येत होती. आपल्या शहरावर झालेल्या हल्ल्याबद्दल कोणी बाऊ करत नव्हतं. सर्वाना त्याबद्दल जाणीव होती. मात्र आपण निर्धास्त आहोत हेही मुंबईकरांच्या देहबोलीतून कळत होतं. एखाद्या कारणासाठी मुंबईकर उत्स्फूर्तपणे एकत्र येतात हेच पुन्हा मॅरेथॉनमुळे सिद्ध झालं.
कॅम्पस मूड टीम

मतदार नोंदणी केलीत?
सिस्टीम खराब आहे, असं अनेक जण सर्रासपणे बोलतात. पण सिस्टीमचा भाग होणं, त्यामध्ये वैयक्तिक पातळीवरही सहभाग नोंदवणं अनेकांना जमत नाही. राजकारण्यांना नावे ठेवणारे मतदान करतात का? किती तरुण प्रशासकीय सेवा, राजकारण हे आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडून, त्याचा भाग होऊन, ते बदलण्याचा प्रयत्न करतात?
आपल्याकडे १८-३० वयोगटातील एकूण ३० टक्के मतदार आहेत. पण त्यातील फक्त सहा टक्केच तरुणांची मतदार म्हणून नोंदणी आहे. २४ टक्के तरुणांचं नावच मतदारयादीत नसल्याने ते मतदानास पात्र नाहीत. मतदानाच्या बाबतीतही अनेक चुकीच्या संकल्पना तरुणांमध्ये आहेत, असे बंगलोर येथील जनाग्रह या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. शहरातील तरुणांना मतदारयादीत नाव नोंदविण्यापासून रोखणारी गोष्ट म्हणजे सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांचा उदासीनपणा. मतदारयादीत नाव नोंदविण्याचा फॉर्म आपल्या घराजवळील कोणत्या केंद्रावर द्यायचा, त्याबरोबर कोणती कागदपत्रे पुरावा म्हणून जोडायची, तेथील अधिकारी कोण आहेत, माझ्याकडे मतदार ओळखपत्र नाहीये त्यामुळे मला मतदान करता येणार नाही, मी या शहरातला नाही त्यामुळे मला इथून मतदान करता येणार नाही, असे अनेक प्रश्न तरुणांना पडलेले असतात. ते रास्तही आहेत. कारण आपल्याकडे त्या बाबतीत समाजप्रबोधन केलं जात नाही. खरं तर मतदानासाठी फक्त तुमचं नाव मतदारयादीत असणं आवश्यक असतं, मतदार ओळखपत्र हे मतदानासाठी आवश्यक नाही. तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्टसारखे कोणतेही फोटो आयडेंटिटी प्रूफ दाखवून मतदान करू शकता. सध्या अनेकांचा समज असा आहे की २५ नोव्हेंबर रोजी ज्यांनी नावनोंदणी केली आहे त्यांचंच नाव मतदारयादीत असणार व त्यांनाच येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळणार. पण हा समज चुकीचा असून नवीन मतदारांसाठी नावनोंदणीची प्रक्रिया ही २२ जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा चालू होत आहे. ज्यांनी आपलं नाव अजूनही मतदारयादीत नोंदवलेलं नाही त्यांनी ही संधी सोडता कामा नये. बंगलोर येथील जनाग्रह या एनजीओने टाटा-टीच्या मदतीने नव्या तरुण मतदारांचं नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी ६६६.्नंॠ१ी.ूे या वेबसाइटची निर्मिती केली आहे. ही मोहीम महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांत यशस्वीरीत्या राबविण्यासाठी लोकसत्ता चळवळ महत्त्वपूर्ण कामगिरी करीत आहे. भारतातील प्रमुख ३५ शहरांतील तरुणांना कोणत्याही अडथळ्याशिवाय आपलं नाव मतदारयादीत नोंदविता येतेच. त्याशिवाय वेबसाइटद्वारे तुमच्या फॉर्मबाबतचे अपडेट तुम्हाला एसएमएस आणि ई-मेलद्वारे मिळत राहतात.
प्रशांत ननावरे
nanawareprashant@yahoo.co.in

गोष्ट एका कॉलेजची
हाय फ्रेंडस्.. हल्ली ळश् ऑन केला की बहुतेकदा आपल्याला बघायला मिळतात, त्या साँस बहूच्या टिपिकल सीरियल्स, चित्रविचित्र चमत्कार दाखविणाऱ्या धार्मिक सीरियल्स नाहीतर तडकफडक रिअ‍ॅलिटी शोज. या सगळ्यामध्ये तरुणांच्या मनाला भावेल, तरुणाईचं प्रतिनिधित्व करेल असा एकही कार्यक्रम नसतो. दुनियादारी, बेधुंद मनाच्या लहरी यानंतर कॉलेजच्या मुलांचं भावविश्व जाणणारी एकही सीरियल पटकन् लक्षात येत नाही. पण या उदास वातावरणात आशेचा एक किरण खुणावतोय, तो म्हणजे कालपासून ‘स्टार प्रवाह’वर सुरू झालेली- ‘गोष्ट एका कॉलेजची’ ही सीरियल.
ही गोष्ट आहे कॉलेजमधल्या एका ग्रुपची. जान्हवी, यो, बबन, पाँटिंग आणि लाजो असा एक घट्ट मैत्री असलेला ग्रुप. जान्हवी आहे एक ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ टाईप मुलगी. ‘यो’ कॉलेजचा जी.एस. आहे, त्यामुळे त्याची एकदम ‘वट’ आहे. लाजो टाइमपास कॅरेक्टर आहे, तर पाँटिंग एकदम मितभाषी, स्वत:त राहणारा. या सगळ्यांशी आपण खूप पटकन रिलेट करू शकतो, कारण यातलं प्रत्येक कॅरेक्टर आपण आपल्या आजूबाजूला, ग्रुपमध्ये, कॉलेजच्या कट्टय़ावर रोज पाहत असतो. ही एक सस्पेन्स थ्रिलर सीरियल आहे. एक घटना घडते आणि या ग्रुपचं शांत रूटीन एकदम ढवळून निघतं.. ही कथा आपल्यासमोर उलगडणार आहे २४ भागांत. या सीरियलमध्ये प्रमुख भूमिकेत आहेत प्रिया मराठे, सचिन पाठक, उदय नेने, नितीन जाधव, आरती साळुंखे, माधवी निमकर हे नवोदित कलाकार. तसंच लोकेश गुप्ते, राजन भिसे, उदय सबनीस, संदेश जाधव इ. बुजुर्ग कलाकार ‘गोष्ट एका कॉलेजची’मधून आपल्याला भेटणार आहेत. लेखन केलंय चिन्मय मांडलेकरने, तर दिग्दर्शक आहेत दीपक नलावडे.
‘गोष्ट एका कॉलेजची’मध्ये ‘यो’ची भूमिका करतोय रामनारायण रुईया कॉलेजमध्ये टी.वाय.बी.एस्सी.चा विद्यार्थी सचिन पाठक. ‘गोष्ट..’च्या अनुभवाबद्दल सचिन म्हणाला, ‘आम्ही सगळेच कलाकार यंग आहोत. त्यामुळे सेटवर काम करताना एक एनर्जी जाणवते. सगळेजण एकमेकांना सांभाळून घेतात. काम करता करता इतर धमाल करतोच. मला स्वत:ला सुप्त इच्छा होती मी माझ्या कॉलेजचा G.S.. व्हावं. ती ‘अशी’ का होईना पूर्ण होत्येय. त्यामुळे मी हा रोल खूप एन्जॉय करतोय. माझे कॉलेजचे शोज, रिहर्सल्स अ‍ॅडजस्ट करण्यासाठी हर्षदाताई (खानविलकर)ची खूप मदत होते. तसंच संजय जाधव, दिग्दर्शक दीपक नलावडे यांचंही मार्गदर्शन मिळतं.
अभिनेत्री प्रिया मराठे ‘गोष्ट एका कॉलेजची’मध्ये ‘जान्हवी’ची प्रमुख भूमिका करत्येय. बांदोडकर कॉलेजमधून बी.एस्सी. केलेली प्रिया सध्या एम.बी.ए.चा कॉरेस्पॉडन्स कोर्सही करत्येय, तोही अभिनय सांभाळून. तिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली, ‘‘सगळ्यात जाणवण्यासारखी गोष्ट म्हणजे सगळे कॉलेज गोअर्स असल्यामुळे आपोआप फ्रेशनेस येतोय.’’ सो फ्रेंडस्. आय अ‍ॅम शुअर. ही ‘गोष्ट एका कॉलेजची’ तुम्हालाही नक्कीच आवडेल. सो नक्की पाहा सोमवार ते बुधवार रात्री १० वाजता ‘स्टार प्रवाह’वर चिअर्स..!!
स्पृहा जोशी
रामनारायण रुईया कॉलेज
spruhaj@gmail.com

दिल से..
प्रिय मिहीर,
माझ्या पत्राला इतकं ढ१ेस्र्३’८ उत्तर लिहिल्याबद्दल थँक्स सो मच! मला खात्री होतीच तुला माझी ही आयडिया नक्की आवडेल म्हणून तुझ पत्र मिळाल्या मिळाल्या लगेचच उत्तर लिहायला बसले आहे.
मिहीर ‘सवाई’ आली रे चार दिवसांवर गेल्या वर्षी केवढी धमाल केली होती ना आपण? यंदा तर मीच परफॉर्म करते आहे. सॉलिड टेन्शन यायला लागलंय रे! कालपर्यंत कट्टय़ावर बसून ‘कटिंग/ सिगरेट’ मारत बसलेले सगळे पुन्हा एकदा सिरीयस झालेत. तालमीचा जोश, उत्साह दामदुपटीने वाढलाय आणि गंमत म्हणजे या सगळ्यातही प्रचंड शिस्त आहे. टेन्शन असलं तरी खणखणीत प्रयोग करायचा आत्मविश्वास आहे आणि हार-जीत या कशानेही कोलमडून न जाता एकमेकांना घट्ट धरून राहणारी एक एकसंध टीम आहे! मिहिर इतके छान जातायत ना हे दिवस- वाटतंय ही प्रोसेस कधी संपूच नये!
अरे अजून एक सांगायचं होतं. परवा इथे
‘मुंबई मॅरेथॉन’ झाली. मी आणि आशुतोष मुद्दाम गेलो होतो पहाटे. इतकं छान वाटत होतं माहित्येय? प्रचंड संख्येने लोक आले होते. अगदी तुझ्या- माझ्याएवढे यंग कॉलेजियन्स, प्रौढ नोकरदार आणि साठी-सत्तरीचे आजी-आजोबाही. काही धावायला आले होते. काही धावणाऱ्यांना चिअर करायला! प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. फ्रेशनेस होता. एक वेगळीच उमेद होती, असं वाटत होतं. उत्साहाची एक एक लाट दुरून खळाळत येतेय आणि बरोबर आपल्यावरच येऊन फुटतेय.. आणि आपल्याही नकळत आपणही त्या उत्साहाच्या लाटेत गुरफटून जातोय.. मिहीर मला कदाचित नीट सांगता नाही येतंय पण इतकं छान होतं ना ते वातावरण.. आशुतोषने खूपच हट्टाने मला नेलं म्हणून, आधी मी जायला तयारच नव्हते. ‘कशाला त्या गर्दीत, गोंधळात जायचं’, असं वाटत होतं. आता कळतंय न जाऊन मी किती आणि काय मिस केलं असतं ते!
मिहीर २६/११ चं महाभारत घडलं आणि वेगवेगळ्या सभा, रॅलीजना ऊत आला आणि अचानक सगळं थंडावलं. हा हल्ला झालाच नव्हता, अशा पद्धतीने सगळे व्यवहार पुन्हा सुरू झाले. मुंबईचं ‘स्पिरिट’ हरवल्यासारखं वाटायला लागलं.. पण परवा या मॅरेथॉनला गेले आणि वाटलं की दहशतवादाच्या सावलीखाली, भीतीच्या सावटाखाली इतकी लाखो माणसं एकत्र येतात, जगण्याला एक नवीन उमेद देतात. हेच आहे ते ‘मुंबई स्पिरिट’ Undying, Never ending...!!
बरं चल, पत्र आता फार लांबवत नाही. तू कसा आहेस? काय नवीन सध्या?? काळजी घे..
Lots of Love,
सावनी.
कॅम्पस मूड टीम
campusmood@gmail.com

‘बीएमएम कोर्स मराठीत नाही का?’, ‘बीएमएम पूर्णपणे इंग्रजीतून जमेल का?’, ‘मला तर मराठीत पत्रकारिता करायची आहे, मग उगीच इंग्रजी का?’ यांसारखे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना सतवायचे; पण आता यापुढे तसं होणार नाही. कारण कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी बीएमएम (बॅचलर ऑफ मास मीडिया) हा अभ्यासक्रम पूर्णत: मराठीत उपलब्ध करून द्यायचा निर्णय घेतला आहे. बीएमएमचा सदोष अभ्यासक्रम, तज्ज्ञ शिक्षकांची वाणवा याबद्दल जोरदार ओरड काही वर्षांपासून सुरू होती. विद्यार्थ्यांची बीएमएम मराठीतून करण्याची मागणी आणि यासाठी ज्येष्ठ व अभ्यासू पत्रकारांनी घेतलेला सक्रिय सहभाग यांच्या जोरावर आता मुंबई विद्यापीठात मराठीतून बीएमएम करता येईल. याचा बराचसा फायदा निमशहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होईल.
विद्यार्थी म्हणतात..
‘‘सर्वप्रथम बीएमएमसाठी निश्चित अभ्यासक्रम ठरवला जावा आणि तज्ज्ञ शिक्षकांचीच नेमणूक केली जावी. तसेच विद्यापीठाने याचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा. आजपर्यंत महाराष्ट्र राज्याचा अभ्यासच समाविष्ट नव्हता. बीएमएमच्या मराठीकरणामुळे ही त्रुटी भरून येईल. तसेच प्रकल्पांसाठी संदर्भग्रंथ शोधण्याची चांगली सुरुवात होईल.’’
गौरीशंकर घाळे
टीवाय बीएमएम, पत्रकारिता, कीर्ती महाविद्यालय
*****
‘‘माझं शालेय शिक्षण मराठीत झालं. मात्र बीएमएममधील अपरिचित इंग्रजीशी जुळवून घेताना त्रास झाला. बऱ्याचदा शिक्षकही मराठी नसतात. शिवाय इंग्रजीतून शिकलेलं मराठीत लिहायला घेणं हे वेळखाऊ काम आहे. बीएमएम मराठीत होतंय, त्यामुळे यापुढील मुलं ‘लकी’ ठरतील.
जुई बाग
टीवाय बीएमएम, पत्रकारिता, पाटकर महाविद्यालय
*****
व्हर्नाक्यूलर माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी हा चांगला निर्णय आहे. खरं तर त्यांच्याकडेही चांगल्या कल्पना असतात. मात्र भाषेच्या अडचणीमुळे त्या कल्पना पुढे येत नाहीत. ज्यांना पत्रकारिता करायची आहे त्यांच्यासाठी हा चांगला निर्णय आहे. मात्र अॅडव्हर्टायझिंगच्या विद्यार्थ्यांना याचा थोडा त्रास होऊ शकतो. मग त्यासाठी दोन-तीन भाषा चांगल्या असाव्या लागतील.’’
प्रियंका तावडे
टीवाय बीएमएम, अॅडव्हर्टायझिंग, एम. डी. महाविद्यालय
*****
‘‘बीएमएम इंग्रजीत आहे. यासाठी मी मनाची तयारी केलीच होती. मलाही अनेकजण ‘मराठीत बीएमएम आहे का?’ असं विचारायचे. ज्यांचं मराठीवर प्रभुत्व आहे त्यांना या निर्णयामुळे फायदाच होईल. मराठी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांमुळे मराठी पत्रकारितेतही खूप संधी आहेत. त्यासाठी भाषा हा अडसर ठरू नये.’’
पूजा लेले
टीवाय बीएमएम, अॅडव्हर्टायझिंग, खालसा महाविद्यालय

* बीएमएमच्या नवीन अभ्यासक्रमात मराठी संस्कृती, महाराष्ट्राचा सांस्कृतिक, राजकीय इतिहास हे विषय मराठीप्रमाणेच इंग्रजीतही समाविष्ट केले जातील.
* तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्यात होणारे मराठीकरण.
*पहिल्या सत्राचे अल्पावधीत मराठीकरण करून द्यायची जबाबदारी पत्रकारांनी स्वीकारली.

प्राध्यापक म्हणतात..
‘‘बीएमएमचं मराठीकरण ही स्वागतार्ह बाब असून यासाठी पुढाकार घेतलेल्या पत्रकारांचं अभिनंदन. मराठी पत्रकारितेचे चांगले अभ्यासक्रम पुणे, नागपूर, अमरावती येथील विद्यापीठांनी राबवले आहेत, त्यांच्या सहकार्यानेसुद्धा मुंबई विद्यापीठाने लगेच पावले उचलावीत. मराठीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय, भाषांतर अनिवार्य असेलच. त्यामुळे त्यांचं इंग्रजी सुधारणार नाही, या गैरसमजाला छेद जाईल. त्याहीशिवाय जे इंग्रजीतून शिकत आहेत त्यांना लोकांची भाषा येणं गरजेचं आहे. बीएमएम मराठीतून शिकवण्याचा विद्यापीठाचा निर्णय चांगला आहे. मला यानिमित्ताने पत्रकारांना सांगावंसं वाटतं की, वृत्तपत्रांशिवायही त्यांनी वेळ काढून अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक काही लिहिलं तर त्याचा खूप मोठा फायदा होईल.’’
राममोहन खानापूरकर
व्याख्याता, सोफिया महाविद्यालय
******
‘‘आम्ही एका मुलीला मराठीतून उत्तरपत्रिका लिहायला व प्रकल्प सादर करायला परवानगी दिली आहेच. शिवाय संपूर्ण अभ्यासक्रम मराठी आला तरी विद्यार्थ्यांचंच भलं होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना मराठी पत्रकारिता करायची आहे त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. या कामी तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे अशीच इच्छा आहे.’’
संगीता कोहली
बीएमएम- समन्वयक, के. जे. सोमैया महाविद्यालय
ओंकार पिंपळे