Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, २० जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

हायटेक शिवसेनाभवनात चप्पलचोर!
मुंबई, १९ जानेवारी/प्रतिनिधी

 
कॉर्पोरेट लूक लाभलेल्या, अनेक छुप्या कॅमेऱ्यांची अहोरात्र देखरेख असलेल्या शिवसेना भवनातून सध्या चप्पल गायब होत असून चप्पल चोर शिवसेनेची भक्कम तटबंदी आणि कॅमेरांचा पहारा याला गुंगारा देण्यात यशस्वी झाला आहे.
शिवसेनेचे माजी दिवंगत नगरसेवक के. टी. थापा यांच्या कन्येने अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी थापा यांच्या समर्थकांसह काही आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर माजी नगरसेवक प्रकाश आयरे हे आपली चप्पल शोधू लागले. परंतु शोधूनही त्यांना त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे आयरे हे ज्याच्या त्याच्या पायाकडे पाहत इकडेतिकडे फिरत होते. शिवसैनिकांची पांगापांग झाल्यावर अनवाणी आयरे शिवसेना भवनाखालील राष्ट्रीय लेदर वर्क्‍स या दुकानात गेले व त्यांनी नवी चप्पल खरेदी केली. चप्पल चोरीस गेल्याचे आयरे यांनी राष्ट्रीय लेदर वर्क्‍सच्या मालकाला सांगताच मागील आठवडय़ातही दोन-तीनजणांच्या चप्पल चोरी झाल्याचे त्याने आयरे यांना सांगितले. याबाबत कानोसा घेतला असता आणखी काही आजी-माजी आमदार, नगरसेवक, जिल्हाप्रमुख यांना चप्पल चोरामुळे फटका बसल्याचे समजते.
शिवसेनेत नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासारखे शौकीन नेते असताना त्यांनी ली कुपर, रेड टेप, गुच्ची, व्हर्साचि अशा ब्रँडच्या महागडय़ा शूजची ओळख अन्य नेत्यांना करून दिली. आता शिवसेनेतील अनेक नेते महागडय़ा मोटारी, पेन, घडाळ्यांबरोबरच ब्रँडेड शूज वापरतात. या शूजची किंमत पाच हजार रुपयांपासून सत्तर हजारांपर्यंत आहे. शिवसेना भवन एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसप्रमाणे असून तेथे बैठकीकरिता येणाऱ्यांना आपले जोडे काढून ठेवणे सक्तीचे आहे. नेमकी हीच संधी चप्पल चोराने साधून काहींवर अनवाणी फिरण्याची पाळी आणली आहे. त्यामुळे महागडे शूज घालून येणाऱ्यांचे अर्ध लक्ष बैठकीत तर अर्ध बाहेरच्या बुटांकडे अशी काहींची सध्या अवस्था झाली आहे. शिवसेना भवनात ठिकठिकाणी कॅमेरे बसवले असून कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बसून अथवा आपल्या मोबाईलवर शिवसेना भवनात काय चालले आहे याकडे लक्ष ठेवू शकतात, अशी अत्याधुनिक यंत्रणा तेथे कार्यान्वित आहे. त्याला चप्पल चोराने गुंगारा दिला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी जाहीर सभांमध्ये असे सांगतात की, त्यांना त्यांच्या वडिलांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांना सांगितले होते की ज्या नेत्याच्या कार्यालया व घराबाहेर चपलांचा खच पडला आहे ती मोठी व्यक्ती समजावी. ठाकरे यांच्या या निकषानुसार शिवसेना भवनात आतापर्यंत दिसणाऱ्या चपला कमी व्हाव्या, असा कुणी रचलेला राजकीय डाव तर नाही ना? अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.