Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, २० जानेवारी २००९
प्रादेशिक

‘तुझे आहे तुजपाशी’
झंडु- लोकसत्ता प्रस्तुत परिसंवाद

ठाणे, १९ जानेवारी / प्रतिनिधी

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तणावपूर्व जीवनशैली अपरिहार्य झाली असली तरी आयुर्वेद आणि योगशास्त्राच्या साह्याने त्यावर मात करता येईल आणि आरोग्यपूर्ण जीवन जगता येईल. माणसांच्या आरोग्याबाबत ‘तुझे आहे तुजपाशी’ अशीच परिस्थिती आहे. मात्र आपण त्याकडे लक्ष दिले नाही, असे मत येथील परिसंवादात मान्यवर आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केले. ‘झंडु- लोकसत्ता’ प्रस्तुत आयुर्वेद अॅण्ड यू या मालिकेंतर्गत ‘तणावपूर्ण जीवनशैली’ व ‘चिरतारुण्यासाठी आयुर्वेद’ या विषयावर रविवारी गडकरी रंगायतनमध्ये आयोजित परिसंवादात वैद्य शंकर किंजवडेकर, वैद्य उदय कुलकर्णी आणि वैद्य मधुरा कुलकर्णी सहभागी झाले होते.

‘भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्राच्या भावना समजून घ्याव्यात’
मुंबई, १९ जानेवारी / प्रतिनिधी

कर्नाटकात भाजपचेच सरकार असून भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी सीमा भागात मराठी बांधवांवर सुरु असलेला अन्याय समजून घेतला पाहिजे. तसेच सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी त्वरित हस्तक्षेप केला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार मनोहर जोशी यांनी केली. बृहन्महाराष्ट्र मंडळ (मध्यवर्ती) दिल्लीने साताऱ्यात आयोजिलेल्या संस्थेच्या ६२ व्या अधिवेशनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते कॉ. मधुकर कात्रे कालवश
मुंबई १९ जानेवारी / प्रतिनिधी

महाराष्ट्रातील असंघटित कामगारांच्या चळवळीचे नेते, स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि गोवा मुक्ती संग्रामातील एक अग्रणी लढवय्ये कॉ. मधुकर कात्रे यांचे अलीकडेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सामान्य कष्टकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अखंड कार्यरत राहिलेला सच्चा सेनानी हरपला, अशी शोकसंवेदना व्यक्त होते आहे.

‘आयएएफए’ पुरस्कारासाठी मुलांच्या ४५ जाहिरातपटांची नामांकने
२४ जानेवारीला मुंबईत पुरस्कार वितरण

मुंबई, १९ जानेवारी / प्रतिनिधी

‘आईसप्लेक्स’ या वेबपोर्टलच्या वतीने जाहिरातपट (अ‍ॅड-फिल्म) बनविण्याची अनोखी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील ४५ जाहिरातपट ‘आईसप्लेक्स अ‍ॅड फिल्म अवॉर्ड-२००८’साठी (आयएएफए) नामांकित करण्यात आले आहेत. येत्या २४ जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विजेत्या जाहिरातपटांना ‘आयएएफए’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शाळकरी मुलांमधील प्रतिभेला वाव देण्यासाठी आयोजित ‘आईसप्लेक्स’ने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

पळालेल्या कैद्यांनी घातला दरोडा
ठाणे,१९ जानेवारी/प्रतिनिधी

पोलिसांवर हल्ला चढवून पोबारा केलेल्या पाच कैद्यांनी रविवारी रात्री भिवंडी तालुक्यातील खारबाव गावात दरोडा घातला. हे कैदी मध्य प्रदेशातील झबुआ या दरोडेखोर टोळीचे सदस्य आहेत. यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांना पुन्हा धडकी भरली आहे.वसई न्यायालयातील सुनावणीनंतर १३ कैद्यांना पोलीस व्हॅनमधून ठाणे कारागृहात आणले जात असताना शनिवारी सायंकाळी सहा कैद्यांनी कामन फाटय़ाजवळ पोलिसांवर हल्ला करून पलायन केले. त्यापैकी एकाला पोलिसांनी कसेबसे पकडले. या कैद्यांना वर्षांपूर्वी ठाणे ग्रामीण भागात घालण्यात आलेल्या दरोडय़ांच्या गुन्ह्यात गुजरात आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली होती. हे आरोपी झाबुआ टोळीतील असून त्यांना पकडण्यात पोलिसांना खूप मेहनत करावी लागली होती. असे असताना ते पळून गेल्याने पोलिसांना धडकी भरली आहे. त्यामुळे सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली असताना रविवारी रात्री या कैद्यांनी भिवंडी तालुक्यातील खारबाव गावातील बांगलापाडय़ातील धनाजी पाटील व त्यांच्या पत्नीवर हल्ला करुन दहा हजाराचा ऐवज लुटला. प्रामुख्याने त्यांनी जेवणाचे पदार्थ पळविले आहे. या घटनेनंतर पाटील हे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर तेथे लावण्यात आलेल्या दरोडेखोरांच्या छायाचित्रांवरून ती टोळी झाबुआ असल्याचे उघड झाले. या प्रकरणी तालुका ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लग्नाच्या जेवणातून विषबाधा : २८ जण अत्यवस्थ
मुंबई, १९ जानेवारी / प्रतिनिधी

लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने अंधेरी येथे २८ जणांना रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.
अंधेरी येथील युनायटेड सोसायटीमध्ये राहणारे नवाज हाफीज खान यांच्याकडे लग्नानिमित्त शाकाहारी व मांसाहारी जेवण ठेवले होते. जेवणानंतर २८ जणांना उलटय़ा होणे, मळमळणे असा त्रास सुरू झाला. या सर्वाना उपचारासाठी कुपर रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी आठ जणांवर उपचार करून त्याना सोडून देण्यात आले. तर २० जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने पोलीस बंदोबस्तात वाढ
मुंबई, १९ जानेवारी / प्रतिनिधी

मुंबईवर कधीही दहशतवादी हल्ला होऊ शकतो त्यासाठी जेहादी तयार आहेत असा इशारा एफबीआयने दिल्यानंतर मुंबईतील बंदोबस्तात कमालीची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांवर नाकाबंदी सुरू असून वाहनांची क डक तपासणी केली जात आहे. पोलिसांच्या पेट्रोलिंगमध्येही वाढ करण्यात आली आहे. खबऱ्यांचे नेटवर्क वाढवण्याकडे मुंबई पोलिसांनी आता विशेष लक्ष दिले आहे. दहशतवादी हल्ला क धीही आणि कोणत्याही स्वरूपात होऊ शकतो, मात्र आम्हाला आता २४ तास सज्ज राहायला हवे. प्रत्येक माणसाला आता लक्ष ठेऊन पोलिसांना खबर द्यायला हवी. खबऱ्यांचे आमचे नेटवर्कही वाढवण्यात येत आहे, अशी माहिती गुन्हे अन्वेषण खात्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. रस्त्यांवर असलेली नाकाबंदी, जागोजागी वाढवलेला बंदोबस्त यामुळे जनतेच्या मनातही सुरक्षा यंत्रणेवरील विश्वास वाढतो आहे याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. शहरातील अनेक रस्त्यांवर असलेली नाकाबंदी वरिष्ठ पातळीवरून आदेश येत नाही तोपर्यंत सुरूच राहणार आहे असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शाहरुखची अशीही दानशूरता!
मुंबई, १९ जानेवारी / पी.टी.आय.

श्रीनगरातील ग्रेनेड हल्ल्यात जखमी झालेल्या दोन अनाथ मुलांवर मुंबईतील नानावटी इस्पितळात उपचार सुरू असून त्यांचा पूर्ण खर्च ‘किंग खान’ शाहरुख करत आहे. मुदस्सर (५) आणि अमीना (३) या दोन निरागसांवर नानावटी इस्पितळात उपचार सुरू असल्याची माहिती फिजिओथेरपी अ‍ॅण्ड स्पोर्ट्स मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. अली यांच्याकडून शाहरुखला मिळाली. त्याने इस्पितळातील मुलांच्या उपचार वार्डासाठी मातेच्या स्मृत्यर्थ ५० लाख रुपयांची देणगी जाहीर करून या मुलांवरील उपचाराचा पूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली. डॉ. अली यांनी नुकतीच जम्मू-काश्मिरातील ग्रेनेड हल्ला झालेल्या ठिकाणी डॉक्टरांच्या पथकासह भेट दिली असताना त्यांना ही दोन बालके जखमी अवस्थेत उपचाराच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळून आले होते. या मुलांवर पुढील उपचार आवश्यक होते. काही डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्पुरते उपचार नि:शुल्क करण्याची तयारी दर्शवली. मात्र, तेवढय़ाने भागत नव्हते. डॉ. अली यांचे शाहरुखच्या कुटुंबाशी चांगले संबंध असल्याने त्यांनी थेट त्याच्याशी चर्चा केली. त्यानंतर शाहरुखने ५० लाख रुपयांची देणगीच नानावटीला जाहीर करून नंतरचा प्रश्नच मिटवून टाकला. शाहरुख लवकरच या मुलांना भेटणार असल्याने ती खुशीत आहेत.

महिन्याभरात हावरे बिल्डर्सने विकली दीड हजार घरे
‘हावरे सिटी’चे भूमीपूजन
मुंबई, १९ जानेवारी/प्रतिनिधी

घराला देवपण येतं ते देवघरामुळे, त्यामुळे हावरे सिटीतल्या प्रत्येक घरात देवघरासाठी प्राधान्याने जागा ठेवावी असे प्रतिपादन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी आज ठाण्यात केले. घोडबंदर रस्त्यावरील हावरे सिटी प्रकल्पाचे भूमीपूजन केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रकल्पाच्या जागी बांधण्यात येणाऱ्या सिद्धी विनायक मंदिराची कोनशिला यावेळी अभ्यंकर यांचे हस्ते बसविण्यात आली. या प्रकल्पात सुमारे तीन हजार घरे बांधली जाणार असून पहिल्या पाच दिवसातच ७५० घरांचा पहिला फेज हाउसफुल्ल झाला. ग्राहकांच्या आग्रहास्तव आता दुसऱ्या फेजचे बुकिंग सुरू करण्यात आले आहे. याआधी नवी मुंबईत कळंबोलीनजीक अशाच प्रकारचा लहान व स्वस्त घरांचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता व त्यालाही ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. हावरे सिटी प्रकल्पाच्या भूमीपूजनाला महाराष्ट्र चेंबरच्या मीनल मोहाडीकर, ठाण्याचे उपमहापौर अशोक भोईर, जमीनमालक व माजी नगरसेवक जनार्दन पाटील, ठाणे भाजपाचे अध्यक्ष संजय वाघुले आदी उपस्थित होते. गेल्या आठ वर्षांत ठाण्यात वनरुम किचन आकाराचा फ्लॅट कुणीही बांधलेला नाही हे वास्तव ध्यानात घेऊन हावरे यांनी सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधायचे ठरवले असल्याबद्दल अभ्यंकर यांनी आनंद व्यक्त केला. सैनिक, पोलीस व कलावंत यांचेसाठी या प्रकल्पात १०० घरे राखीव ठेवण्यात आली आहेत.

सीएसटी-मडगावदरम्यान सहा अनारक्षित विशेष गाडय़ा
मुंबई, १९ जानेवारी / प्रतिनिधी

कोकण रेल्वेच्या मार्गावर सीएसटी-मडगावदरम्यान २० ते २५ जानेवारी या काळात सहा अनारक्षित हिवाळी विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. कोकणकन्या एक्स्प्रेसपाठोपाठ ही अनारक्षित विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. सीएसटीहून २०, २२ आणि २४ जानेवारी रोजी रात्री २३.५५ वाजता ही गाडी मडगावकडे रवाना होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० वाजता ती मडगावला पोहोचेल. २१, २३ आणि २५ जानेवारी रोजी दुपारी १६.३० वाजता मडगावहून सीएसटीकडे रवाना होणाऱ्या या गाडय़ा दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२० वाजता सीएसटीला पोहोचतील. कोकणात जाण्यासाठी असलेली प्रवाशांची प्रचंड झुंबड लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे कोकण रेल्वेने म्हटले आहे. या गाडय़ांना दोन्ही दिशांच्या प्रवासात दादर, ठाणे, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळून, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, बिलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, पेरणेम, थिवीम आणि करमाळी या स्थानकांत थांबे देण्यात येणार आहेत.

गोपीनाथ मुंडे यांचे गुरुवारपासून शेतकरी संघर्ष अभियान
मुंबई, १९ जानेवारी/प्रतिनिधी

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे येत्या २२ जानेवारीपासून विदर्भातील डोरली गावापासून शेतकरी संघर्ष अभियान सुरू करणार आहेत. तब्बल अडीच हजार कि.मी.चा प्रवास करून राज्यातील डझनभर जिल्ह्यांमध्ये हे अभियान झंझावात निर्माण करील, असा दावा भाजपने केला आहे. मुंडे यांनी त्यांच्या शेतकरी संघर्ष अभियानाकरिता डोरली गावाची निवड केली कारण या गावातील बहुतांश शेतकरी कर्जबाजारी झाल्याने त्यांनी ‘आमचे गाव विकणे आहे’ अशी जाहिरात दिली होती. २२ तारखेला मुंडे यांच्या उपस्थितीत डोरली गावात गावपंचायत होणार आहे. त्यानंतर वायफड या गावी होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला मुंडे मार्गदर्शन करणार आहेत. याच वायफड येथे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांकरिता पॅकेजची घोषणा केली होती. विदर्भ, मराठवाडा, खान्देश येथील डझनभर जिल्ह्यांना मुंडे या अभियानाच्यानिमित्ताने भेट देतील. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे केंद्र सरकारने राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेला पाठवलेले पैसे जिल्हा बँकांना न दिल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांना नवे कर्ज मिळाले नाही, कापूस खरेदीकरिता केंद्र सरकारने जाहीर केलेला तीन हजार प्रतिक्विंटलचा हमीभाव दिलेला नाही, कापूस खरेदी केंद्र सुरू केलेली नाही या प्रश्नांना या अभियानात वाचा फोडण्यात येणार आहे.

कल्याणमध्ये सापडली चांदीची दुर्मिळ नाणी
कल्याण, १९ जानेवारी/वार्ताहर

कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या जुन्या वास्तूच्या जागी खोदकाम करताना दीडशे वर्षांंपूर्वीची सहा नाणी व कागदपत्रे सापडली. रुग्णालयाच्या जुन्या जागेत बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर मॉल्स बांधण्याचे काम सुरू केले आहे. यावेळी एका पीलरमध्ये नाण्याची पितळी पेटी सापडली. ही पेटी तेथे काम करणाऱ्या कामगाराने पळविली. त्यातील काही नाणी खाली पडली होती. या भागातील रॅबिट उचलताना १८६२ व १८८२ सालची सहा नाणी सापडली. ही नाणी चांदीची व ताब्यांची आहेत. व्हिक्टोरिया राणीचा शिक्का असलेली ही नाणी अतिशय दुर्मिळ मानली जातात.
या दगडाच्या कोनाडय़ात काही जुनी कागदपत्रेही सापडली आहेत. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मुकुंद कामठे यांनी नाण्याचा पंचनामा करून ताब्यात घेतली आहेत.

मुंबईतील समुद्रकिनाऱ्या शेजारील इमारती व रस्त्यांसाठी १०७ कोटी
मुंबई, १९ जानेवारी/प्रतिनिधी

मुंबईतील समुद्र किनाऱ्या शेजारील रस्ते व इमारतींना समुद्राच्या लाटा व वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मोठे नुकसान होते. त्यासाठी मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीमध्ये १०७ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्याचे नक्की करण्यात आले. मुंबईचे पालक मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध पक्षांचे आमदार व अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते. कुलाबा ते माहीम या समुद्र किनाऱ्याची हानी टाळता यावी म्हणून तेथे नरिमन पॉइंटच्या समुद्र किनाऱ्या प्रमाणे टेट्रापॉड टाकण्यात येणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे म्हाडाच्या संक्रमण शिबीरांचे भाडे १७०० रुपयांवरून ५०० रुपये करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास व शालेय शिक्षणासाठीही ५०० कोटी रुपयांचा विशेष निधी देण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.