Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, २० जानेवारी २००९
नवनीत

जी व न द र्श न
देवाचे दर्शन

 

बायबलमध्ये सेहेचाळीसाव्या स्तोत्रात म्हटलेले आहे, Be still and know that I am the Lord,’ तुमच्या चित्तवृत्ती समेवर आलेल्या त्या शांत झाल्या की तुम्हाला आपोआप त्याचे दर्शन घडू शकेल.. सुंदर गोष्टींची निर्मिती शांततेत होत असते. दिवस मावळतो. जनावरे गोठय़ाच्या दिशेने निघतात. पाखरे घरटय़ांत परततात. तहानलेले वासरू मोठमोठय़ाने हंबरते. वात्सल्याने व्याकुळलेली गाय त्याला पान्हा देते. ढुशी मारीत पायस प्राशन करून ते स्वस्थ होते. घरटय़ातील किलबिलाट मंदावतो. पक्षिणींच्या कुशीत शिरून पिल्ले विसावतात. थकला-भागलेला माणूस गोधडीवर लवंडतो आणि नकळत झोपेच्या आधीन जातो. स्वप्नांची पाखरे त्याच्या मनात रुंजी घालू लागतात.
क्षणाक्षणाच्या हळुवार आणि मुलायम पावलांनी रात्र गूढाच्या प्रांतात प्रवेश करते. अवघ्या आसमंतावर शांतीची साय पसरते. अंधार पांघरलेली झाडेझुडपे ध्यानमग्न होतात. माडांच्या फडफडणाऱ्या झावळय़ा स्वत:ला सावरतात. हळूहळू त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागते. सगळे वातावरण पावित्र्याने आणि मांगल्याने भारावून जाते.
नभांगणात आकाशगंगांची झुंबरे डोलू लागतात. ताऱ्या-नक्षत्रांच्या असंख्य दीपांच्या प्रभेने अंधार शरमिंदा होतो. भीतीने पांढराफटक पडतो.
सगळी धरती बनते विशाल पिंडी आणि आकाश अंगणातून दहिवराचा हळुवार अभिषेक सुरू होतो तिच्यावर. त्या सात्विक स्पर्शाने कमलिनी शहारतात. कलिकांना आनंदाचे भरते येते. त्यांचे ओठ विलग होतात. लाख लाख कळय़ा उमलत जातात. त्यांनी आत्म्यात जपलेल्या गंधाची कुपी हळुवार उघडली जाते आणि सर्वत्र दरवळ पसरतो. त्या घमघमाटाने धरित्री मोहरून जाते. शांत पहुडलेल्या वाऱ्याला जाग येते. झुळकांच्या पंखांवर आरूढ होऊन, गंधाचे दूत सर्वत्र संचार करू लागतात. हे सगळे नवल घडते रात्रीच्या गर्भरेशमी शांततेत. शांती असते सृजनाची माता. ती देत असते जन्म सुंदराला, मांगल्याला. भावगंभीर शांती म्हणजे परब्रह्माची लाडकी लेक!
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francisd43@gmail.com

कु तू ह ल
ताऱ्याचा जन्म

तारा जन्माला कसा येतो? आपल्या आकाशगंगेत अजूनही तारे जन्माला येत आहेत का?
आपला वाढदिवस जेव्हा साजरा होतो तो आपला जन्मदिवस असतो. त्या तारखेला काही वर्षांपूर्वी आपण या जगात येऊन पहिला श्वास घेतो आणि आपण जन्माला येतो. पण आपले शरीर, हात, पाय, मेंदू, डोळे इ. तयार होण्याची क्रिया मात्र आपल्या प्रत्यक्ष जन्मापूर्वी मातेच्या उदरात नऊ महिने चालू असते.
ताऱ्यांचा जन्मही असा दोन प्रकारे होतो. तारा प्रकाश, उष्णता इ. स्वरूपात ऊर्जा देऊ लागला म्हणजे त्याचा जन्म होतो; परंतु या अवस्थेत येण्यापूर्वी अशा सर्व गोष्टींची तयारी होण्यासाठी वायू, धूळ, रेणू इ. संमिश्र अशा मेघापासून तारा तयार व्हायला सुरुवात होते. ताऱ्याच्या जन्मापूर्वीच्या जन्माची ही कथा रोचक आहे.
वायू मेघाचे काही कारणामुळे आकुंचन सुरू होते. हा गुरुत्वीय बलाचा परिणाम असतो. त्यामुळे कणांच्या टकरी वाढतात. तापमान वाढते. उष्णता वाढते. ताऱ्याच्या गाभ्यात तयार होणारी ही उष्णता हा गुरुत्वाकर्षणाचा परिणाम असतो. यातील अर्धी उष्णता ताऱ्याच्या गाभ्याचे तापमान वाढविण्यासाठी खर्ची पडते, तर अर्धी उष्णता अवरक्त किरणांच्या स्वरूपात (इन्फ्रारेड) बाहेर फेकली जाते. असा तारा सूर्यापेक्षा खूप मोठा असतो. त्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३००० अंश केल्व्हिनच्या आसपास असते. तो रंगाने लाल दिसतो. हा तारा ‘नवा गडी’ असतो. तारकेच्या आयुष्याच्या शेवटाला पोहोचलेला लाल महाराक्षसी तारा नसतो.
कोणत्याही ताऱ्याला स्थिर ऊर्जा निर्मिती करावयाची असेल तर हायड्रोजन या कच्च्या मालाची जरुरी असते. तारा बनण्याच्या या काळात खूपसा हायड्रोजन असलेले असे एकजिनसी मिश्रण ताऱ्यात असते. आत खेचणारे गुरुत्वीय बळ आणि गाभ्यात निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे बाहेरच्या दिशेस पडणारा दाब यांचा समतोल साधला की, आपल्याला अभिप्रेत असणारा तारा जन्माला येतो. अशा ताऱ्यात हायड्रोजनचे रूपांतर संमीलन क्रियेने हेलियममध्ये होते. या क्रियेचा परिणाम म्हणून तारा प्रकाश, उष्णता इ. स्वरूपात ऊर्जा उत्सर्जित करू लागतो. आपल्या आकाशगंगेत तारे तयार होण्याची क्रिया सतत चालूच असते.
ल्ल हेमंत मोने
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
फ्रेडरिको फेलिनी

वयाच्या बाराव्या वर्षी चित्रपटाच्या आकर्षणाने घरातून पळ काढणाऱ्या फेलिनीने साचेबंद कल्पनांना फाटा देऊन नव्या शैलीचा दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळविली.. व्हरायटी लाइटस्, द व्हाइट शेख, ला स्ट्राडा, द स्वीट लाइफ, सॅरॉरिकॉन, नाइटस् ऑफ कॅबिना, अमरफोर्ड, ज्युलिएट अ‍ॅण्ड द स्पिरिट, रोमा हे त्याचे गाजलेले चित्रपट.. अभिनेत्री गिलेटा मॅसिनाशी त्याने विवाह केला. अनेक पुरस्कारांमुळे तो गाजला, जे. कृष्णमूर्ती हे त्याचे श्रद्धास्थान. २० जानेवारी १९२० ला जन्मलेला फेलिनी ३१ ऑक्टोबर १९९३ ला पडद्याआड गेला.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
खमंग लालसर भजी

करीमला हमीदाचाचीने तयार केलेली भजी फारच आवडायची. त्या छोटय़ाशा टपरीत गिऱ्हाईकांची झुंबड असायची. शाळा सुटली की, करीम यायचा आणि बाकडय़ावर बसून चाची भजी कशी करते ते पाहायचा. चाचीही त्याला बशीत चार-पाच भजी देऊन अभ्यासाची विचारपूस करायची. आसमंतात दरवळणारा खमंग वास, चाचीकडची गिऱ्हाईकांची गर्दी, सतत भरणारा गल्ला, तिची वाढती लोकप्रियता पाहून आपणही छोटं हॉटेल टाकावं, असं त्याला वाटायला लागलं.
एके दिवशी रात्री जेवताना करीमने विचारले, ‘आब्बा, मी हॉटेल टाकू?’ आब्बा म्हणाले, ‘अन् शाळेचं काय? शिकणं महत्त्वाचं!’ अम्मी म्हणाली, ‘हे शिकायचं वय तुझं’. ‘सकाळी शाळा करीन, संध्याकाळी हॉटेल चालवेन. शेजारचा बाबू मदत करणार आहे. माझी फी भागेल. घरालाही मदत होईल’, करीम म्हणाला. एवढासा पोर. अजून मिसरुड फुटायचीय अन् गोष्टी करतोय कमवायच्या. घराला हातभार लावायच्या. आब्बा कौतुकानं हसले. ‘मी मालकांकडून उद्या थोडे पैसे उधार आणतो. भांडवल होईल. जागाही आहे मित्राची.’ करीमनं आनंदानं उडी मारली. अम्मीला शंका आली. ‘तुला भजी कशी करायची ते येतं?’ ‘हँ! विचारीन की कुणाला तरी!’ पण रात्री त्याला झोप आली नाही. भजी, तीही हमीदाचाचीसारखीच कशी करायची बरं?
दुसऱ्या दिवशी तो चाचीकडे गेला. एका बशीत चार भजी घालून तिनं करीमपुढं ठेवली. फारसं गिऱ्हाईक नव्हतं. गरमगरम, लालसर, खमंग भज्यांनी त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. पण पोटावर हात दाबून ‘मेलोऽऽ’ म्हणून त्यानं लोळण घेतली. ‘अम्मी.. कुणी डॉक्टर बोलवा.. मेलोऽऽ’ हमीदाचाचीनं हात कसाबसा पदराला पुसला. स्टोव्ह बंद करून ती डॉक्टरांकडे धावली. तसा करीम तिच्या टपरीमागच्या घरात गेला. स्टुलवर चढून भजी बनवण्याची हमीदाचाचीची खास पद्धत लिहिलेली वही शोधू लागला. एक डबा, दुसरा-तिसरा डबा उघडून शोधताना तोल जाऊन तो धाडकन पडला आणि पडताना पीठ, साखर, हळद अंगावर घेऊन उताणा झाला. हमीदाचाची व डॉक्टर आलेले पाहून शरमून त्याने म्हटले, तू भजी कशी करतेस ते गुपित शोधत होतो. ‘वेडय़ा, ते डब्यात नाही, माझ्या डोक्यात आहे. त्यासाठी संध्याकाळपासून मला मदत कर. काही महिन्यांत शिकशील. पण शाळा आणि अभ्यास सांभाळून हं!’ हसतहसत त्याला जवळ घेत चाची म्हणाली.
‘आपल्याला करावेसे वाटते ते येण्यासाठी कष्ट करून ज्ञान मिळवावे लागते. त्याला शॉर्टकट नसतो.’
आजचा संकल्प - मला आवडणारी गोष्ट मी शिकून घेईन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com