Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, २० जानेवारी २००९

घाऊक बाजारांमध्ये शिवसेनेचा भगवा
नवी मुंबई/प्रतिनिधी : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे बालेकिल्ले असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारपेठेत आता शिवसेनेनेही चंचुप्रवेश करण्यास सुरुवात केली असून, या बाजारातील पुणे, सातारा जिल्ह्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाने नवी रणनीती आखली आहे.वाशी येथील बाजारपेठेमधील व्यापाऱ्यांची नवी मुंबई घाऊक बाजार व्यापारी विश्वस्त संस्था या नव्या संघटनेची मुहूर्तमेढ शिवसेनेने रोवली आहे. या बाजारांमधील व्यापाऱ्यांमध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचा गेल्या काही वर्षांतील सेनेचा हा मोठा प्रयत्न मानला जात असून, येत्या २० जानेवारीला फळबाजारात पक्षाच्या नेते मंडळींच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याकडे शहरातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजर समित्या या त्या-त्या भागातील राजकारणाचा महत्त्वाचा स्रोत मानल्या जातात.

मिनी ऑलिम्पिकचे थाटात उद्घाटन
नवी मुंबई/प्रतिनिधी

सुमारे १२ हजारांहून अधिक स्पर्धक, १५० हून अधिक शाळा-महाविद्यालयांचा सहभाग आणि खो-खो, कबड्डीपासून अगदी फुटबॉल, क्रिकेटसारख्या सांघिक स्पर्धांनी नटणाऱ्या नवी-मुंबई क्रीडा महोत्सवाचे आज वाशी येथे मोठय़ा धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले. नवी मुंबईतील स्थानिक गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आमदार चषकाच्या आठवणी ताज्या करत देणारा हा क्रीडा महोत्सव येत्या २२ जानेवारीपर्यंत रंगणार असून, या महोत्सवाच्या निमित्ताने शहरात सध्या ‘स्पोर्टस फिवर’ तयार झाला आहे.

‘निर्माण ग्रुप’ची नॅनोसिटी
प्रतिनिधी

टाटांची एक लाखाची नॅनो कार बाजारात यायला अद्याप अवकाश असला तरी, एमएमआरडीए क्षेत्रात एक लाख रुपये भरा आणि वनबीएचके फ्लॅट मिळवा, अशी योजना निर्माण ग्रुपतर्फे जाहीर करण्यात आली आहे.
रिअल इस्टेट मार्केटमध्ये आलेल्या मंदीचा फटका सगळ्यांना बसतो आहे. मुंबई आणि परिसरात मध्यमवर्गीयांना घर घेणे अशक्य बाब बनली आहे. निर्माण ग्रुपतर्फे नेरळ येथे निर्माण नॅनो सिटी उभारण्यात येत असून वनबीएचके, वनअ‍ॅन्ड हाफ बीएचके असे फ्लॅट असलेली नवीन नगरी वसवण्यात येत आहे. सुरूवातीला एक लाख रुपये भरून घर घ्या आणि बाकीची रक्कम सुलभ हप्त्याने फेडा अशी ही योजना आहे.

मराठय़ांना गुणवत्तेप्रमाणे संधी न मिळाल्यास हिसकावून घेणार - नरेंद्र पाटील
बेलापूर/वार्ताहर

भविष्यकाळात मराठय़ांना सर्वच क्षेत्रात गुणवत्तेप्रमाणे संधी न मिळाल्यास ती हिसकावून घेण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघ व माथाडींचे नेते नरेंद्र पाटील यांनी कोपरखैरणे येथे जाहीर सभेत दिला.
सध्याच्या स्थितीत मराठय़ांच्या मुलांना उच्चशिक्षित असूनही आरक्षणाअभावी चांगल्या संधी मिळत नाहीत. मराठा समाज एकत्र होत नसल्याने इतर समाज त्याचा फायदा घेतो. आमदार मेटे यांनी आमदारकीच्या काळात मराठा समाजासाठी काहीच केले नाही, मात्र खुर्चीतून पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यांना मराठा समाजाची आठवण झाली. आमदार शालिनीताईंच्या मागणीनुसार आर्थिक निकषावर आरक्षण दिले, तर पुढील ५० वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता राज्यात येऊ शकत नाही, असे पाटील यावेळी म्हणाले.
आमदार भाई जगताप यांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज व्यक्त करीत त्यासाठी सरकारवर वैचारिक दबाव वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. आमदार विनोद तावडे यांनीही राजकीय नेतृत्वाला केवळ मतांचे गणित कळत असल्याने सर्व मराठा लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन केले. महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतला गेल्यास कोणाला निवडून द्यायचे हे महासंघ ठरवेल, असा सरकारला इशारा दिला. पुढील आठवडय़ात सर्व मराठा संघटनांची समन्वय बैठक घेऊन उपोषण, आंदोलन करूनही सरकार जागे न झाल्यास गाडय़ा पेटवून देण्याचा निर्णय घेऊ, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.