Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, २० जानेवारी २००९

संत निवृत्तीनाथांच्या यात्रेचा अपूर्व उत्साह
प्रतिनिधी / नाशिक

टाळ मृदुंगाचा गजर आणि अभंगाच्या निनादात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रोत्सवास त्र्यंबकेश्वर नगरीत उत्साहात सुरूवात झाली असून राज्यातील विविध भागातून आलेले हजारो वारकरी पालख्यांसह नाशिकमार्गे रवाना होत असल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवरून भगवे झेंडे एका लयीत जात असल्याचे दृश्य दिसत आहे. दिंडीमध्ये बाल वारकरी व महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. बुधवार या यात्रेच्या मुख्य दिवसापर्यंत भाविकांची संख्या एक लाखहून अधिक होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

निधीच्या खडखडाटामुळे कर्मचाऱ्यांवर वेतनप्रतीक्षेची वेळ
आजार संदर्भ सेवा रुग्णालयाचा

अभिजीत कुलकर्णी
नाशिक, १९ जानेवारी

अतिविशिष्ट वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी राज्यात प्रथमच येथे सुरू करण्यात आलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील (सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल) कर्मचाऱ्यांना वेळवर वेतनही मिळू शकत नसल्याच्या तक्रारी असताना दुसरीकडे कोटय़वधी रुपये गुंतवून या रुग्णालयात आणल्या गेलेल्या सामग्रीचा वापर काही खासगी डॉक्टर अप्रत्यक्षपणे आपल्या रुग्णांवरील खर्चिक शस्त्रक्रियांसाठी करून घेत असल्याची चर्चाही सुरू झाल्याने एकूणातच या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आवश्यक त्या निधीची तरतूद आणि किरकोळ तांत्रिक अडचणींमुळे रुग्णालयातील कर्करोग उपचार विभागासारखे महत्त्वाचे विभाग अद्यापही पूर्णाशाने सुरू होऊ शकलेले नाहीत, हे विशेष.

आराम बस अपघाताची वर्षपूर्ती; यंत्रणेकरवी डोळेझाकची अनुभूती
संदीप तिवारी / वणी

सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनानंतर परतीच्या प्रवासाला निघालेली आराम बस एका अवघड वळणावरून थेट पाचशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातास २० जानेवारी रोजी वर्ष पूर्ण होत असले तरी झालेल्या घटनेतून कोणताही बोध न घेता गडावरील या मार्गाची सुरक्षितता जपण्यासाठी जबाबदार असणाऱ्या घटकांकडून अद्याप डोळेझाक केली जात असल्याचे विदारक चित्र पुढे येत आहे. अवैध प्रवासी वाहतूक आणि क्षमतेहून अधिक प्रवासी असणाऱ्या वाहनांना रोखणे, संरक्षक भिंतीचे मजबूत बांधकाम आदी उपायांबाबत अजून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे. या परिस्थितीत बदल न झाल्यास भविष्यात पुन्हा अपघातांना निमंत्रण मिळू शकते, अशी भिती भाविक व्यक्त करीत आहेत.मुंबईच्या सद्गुरू साईबाबा मंडळाचे सदस्य २० जानेवारी २००८ रोजी खासगी आराम बसमधून वणी गडावर दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर ते परत निघाले असताना रात्री दहाच्या सुमारास चालकाचा एका वळणावर ताबा सुटला आणि बस थेट दरीत कोसळली.

पारंपरिक ज्ञानाच्या संरक्षणाचे आव्हान
बोगस डॉक्टर : शोध आणि बोध

राज्यात सध्या सुमारे पावणेदोन लाख नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यामध्ये अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी या मान्यताप्राप्त चिकित्सापद्धतीचे संस्थात्मक शिक्षण (इंन्स्टिटय़ूशनल एज्युकेशन) घेतल्यावर विद्यापीठाची पदवी प्राप्त करून योग्य कालावधी इंटर्नशीप पूर्ण करणारी व आपापल्या कौन्सिल्सकडे रीतसर नोंेदणी करणारी वैद्यकीय व्यवसायिक मंडळी आहेत. १९६१ च्या महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्ट या कायद्यान्वये ही नोंदणी केली जाते आणि त्यानुसार या व्यक्तीला रुग्णांवर औषधोपचार करण्याचा अधिकृत ‘परवाना’ दिला जातो. त्याचे प्रमाणपत्रही त्या व्यक्तीजवळ असावे लागते आणि आपल्या दवाखान्यात / रुग्णालयात ते असणे हेही सक्तीचे असते. ही सगळी कायदेशीर पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर आपल्या असे ध्यानात येईल की, ग्रामीण तसेच वनवासी भागात अनेक ठिकाणी ‘विनापरवाना’ औषधोपचार करणारे, लोकांच्या आरोग्याशी खेळणारे अनेक भोंदू (बोगस डॉक्टर) आहेत. ते झाडपाल्याच्या नावाखाली सर्रास औषधोपचार करतात. त्यासाठी रोगाचे व्यवस्थित निदान करण्याची आवश्यकताही त्यांना वाटत नाही !

भाजपाच्या शेतकरी संघर्ष रथयात्रेचा धुळ्यात समारोप
वार्ताहर / धुळे
वर्धा येथून सुरू होणाऱ्या शेतकरी संघर्ष रथयात्रेचा समारोप धुळे येथे होणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही संघर्ष यात्रा २२ जानेवारी रोजी वर्धा येथून निघणार आहे.
कापूस उत्पादकांचे प्रश्न घेऊन निघणारी ही संघर्ष रथयात्रा १० जिल्हे, १२ लोकसभा मतदार संघ आणि वेगवेगळ्या ४० तालुक्यांमधून प्रवास करणार आहे. एक हजार २८६ किलोमिटरचे अंतर कापून ही रथयात्रा धुळे येथे पोहोचेल आणि मुंडे यांच्या सभेने धुळ्यात या संघर्ष रथयात्रेचा समारोप होणार आहे. या सभेसाठी नितिन गडकरी, प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे, विधीमंडळ गटनेते आ. एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर हे उपस्थित राहणार आहेत. यात्रेच्या स्वागतासाठी आणि जाहीर सभेच्या आयोजनासाठी जिल्हा भाजपाची बैठक झाली. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संभाजी पगारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आ. जयकुमार रावल, नाशिक जिल्हा संघटनमंत्री विठ्ठल चाटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भारत इशी यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.