Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, २० जानेवारी २००९

माणूस प्रगत की प्राणिजगत?
आपली सुरक्षाव्यवस्था का कोसळते?.. एक पर्यावरण शिक्षक म्हणून या गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. हे करताना माणूस आणि प्राणिजगताची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. सर्व व्यवस्था, परंपरा, कृती या सर्वच बाबतीत ही तुलना केली तर वेगळीच वस्तुस्थिती पुढे येते. ‘माणूस हा सर्वात विकसित प्राणी आहे’.. आपण असे मानत असलो ते खरे आहे का? माणूस काही बाबतींत इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. पण वेगळे असणे म्हणजे अधिक विकसित किंवा अधिक प्रगत असणे नव्हे. नव्या पिढय़ांवर ‘माणूस हा अधिक विकसित आहे’ हे बिंबवले जाते. त्यामुळे या पिढय़ा अशाच भ्रमात राहतात व निसर्गाकडून काही शिकण्याच्या मन:स्थितीत नसतात.

नैसर्गिक धाग्यांचे वर्ष
पृथ्वीवरील जीवनाधारांचे प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास हा संपूर्ण जगाच्याच चिंतेचा विषय झाला आहे. वाढते शहरीकरण, जंगलतोड, वैश्विक तापमानवाढ, हरितगृह परिणाम करणाऱ्या वायूंच्या प्रमाणात वाढ, इत्यादी पर्यावरणविषयक समस्यांनी सर्वच देशांना ग्रासले आहे. सर्व देशांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती व्हावी व पर्यावरण रक्षणाचे उपाय राबविण्यात यावेत, या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघातर्फे आंतरराष्ट्रीय वर्षे जाहीर केली जातात. २००२ हे इको टुरिझम वर्ष, २००३ गोडय़ा पाण्याचे (फ्रेश वॉटर) वर्ष, २००७ डॉल्फिन वर्ष, तर २००८ ‘प्लॅनेट अर्थ’ म्हणून साजरे केले गेले. याचप्रमाणे २००९ हे आंतरराष्ट्रीय नैसर्गिक धाग्यांचे (नॅचरल फायबर्स) वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. नैसर्गिक धाग्यांमध्ये विविध वनस्पतिज आणि प्राणिज धाग्यांचा समावेश होता. सूत (कापूस), ताग, काथ्या, घायपात, वेत, भाज्यांमधील धागे, गवताची पाती इ. वनस्पतिज धागे आहेत; तर लोकर, रेशीम कॅटगट हे प्राणिज धागे आहेत.

पर्यावरणाची दक्षिण आशियाई गुंफण
जगासमोरच्या समस्या अतिशय किरकोळ स्वरुपाच्या आहेत. त्यांची सोडवणूक भांडवलशाही अथवा साम्यवादाला शक्य नाही. पाणी, ऊर्जा, अन्नधान्य यांचे वितरण योग्य रीतीने होत नसल्याने तुटवडा भासतो. पाणी व ऊर्जेचे साठे जोडून (ग्रीड) वितरण केल्यास टंचाई उरणार नाही.. प्रज्ञावंत रचनाकार बक मिन्स्टर फुलर यांनी १९६९ साली मांडलेली ही संकल्पना. ती कुणी फारशी मनावर घेतली नाही. आज चाळीस वर्षांनंतर ती संकल्पना वास्तवात उतरवण्यासाठी तंत्रज्ञान, निधी उपलब्ध आहे आणि ही दक्षिण आशियाकरिता राजकीय गरजही आहे. प्रदूषण, पर्यावरणाला भौगोलिक व राजकीय सीमा नाहीत. हवा, नद्यासुद्धा सर्व बंधनं ओलांडून प्रवास करतात. राजकारणानेही काळानुरुप असेच प्रगल्भ व्हावे हा पर्यावरणाचा संदेश आहे.

केवळ एक चर खणल्यामुळे
मलईचं जंगल.. अंबोलीच्या परिसरातील सर्वात हिरवागार टापू, तोसुद्धा असंख्य वनस्पती-प्राण्यांच्या विविधतेने नटलेला. अंबोली पश्चिम घाटात असल्याने व महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असल्याने तिथे पर्यटकांची कमी नाही. पावसाळ्यात आणि इतर वेळीसुद्धा तिथे पर्यटकांची भरपूर गर्दी होते. मुख्यत: बाजारपेठ आणि आसपासच्या जंगलात फिरण्यातच बहुतांशजण धन्य मानतात. त्यामुळे आतमध्ये काही अंतरावर असलेल्या जंगलाला विशेष धक्का लागत नाही. त्यापैकीच एक म्हणजे मलईचे जंगल. अंबोलीच्या बाजारपेठेपासून साधारणत: चार किलोमीटर अंतरावर ते आहे. पण पर्यटकांना आकर्षित करण्याच्या वनखात्याच्या धोरणामुळे चार वर्षांपूर्वी या जंगलापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता करण्याचे ठरविण्यात आले. प्रत्यक्षात तिथे पायवाट होती. तिचा रुंद व तीन किलोमीटर लांबीचा रस्ता करताना मोठे वृक्ष तोडावे लागले. रस्त्याला लागणारा दगडही तिथलेच मोठाले दगड फोडून मिळविण्यात आला. त्यामुळे जंगलात हस्तक्षेप झालाच. शिवाय या रस्त्यामुळे शिकारी व लाकूडतोड करणाऱ्यांसाठी प्रशस्त मार्ग उपलब्ध झाला. त्यामुळे पर्यटन मागे पडले आणि इतर अवैध गोष्टींमध्ये वाढ होत गेली. मलईच्या जंगलात अस्वलांचा मुक्त संचार आहे. सुमारे २३० प्रजातींचे वेगवेगळे पक्षी आहेत. ३२ प्रकारची बेडकं, ३०-३२ जातींचे साप आहेत. विशेष म्हणजे देवगांडूळसुद्धा म्हणजेच ‘सिसिलियन’ (पाय नसलेले उभयचर) इथे आढळतात. त्यापैकी ‘जीजीनिओफिस शेशाचारी’ ही जात तर केवळ इथेच सापडली आहे. इतकं महत्त्वाचे जंगल असूनही एका रस्त्यामुळे हा खजिना बाहेरच्या बऱ्या-वाईट संसर्गासाठी खुला झाला आणि त्याची रया जाऊ लागली. हे थांबविण्यासाठी काय करावं, हा प्रश्न होता. वन खात्यासाठी आलेल्या पैशातून रस्ता बांधण्यात आला होता. खरंतर जंगलात जायचे असेल आणि ते अनुभवायचे असेल तर पायीच जावे, त्यासाठी गाडय़ा कशाला? म्हणून मग मलईच्या जंगलात जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडावर आमच्या ‘मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब’तर्फे एक फाटक उभे करण्यात आले. पण शिकारी व वृक्षतोड करणाऱ्यांनी ते तोडून टाकले. वाहने थेट आतमध्ये जाऊ लागली. आम्हीसुद्धा गप्प बसलो नाही. पुढचा उपाय म्हणून या जंगलात जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडावरच खोल चर खणला आणि वाहनांचा रस्ता पूर्णपणे बंद केला. त्यामुळे वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आणि वन्य जिवांना होणारा उपद्रवही थांबला. आतमध्ये पायी जाणाऱ्यांची संख्या अस्वलाच्या भीतीमुळे कमी झाली. मग दोनच वर्षांत स्थिती पालटली. धो-धो पावसामुळे रस्ता वाहून गेला. भरपूर पाऊस व दमट हवामानामुळे जंगल झपाटय़ाने वाढले. बिया पडून आणि रोपे वाढून रस्त्यावरही जंगल दिसू लागले. मग हा रस्ता होत्याचा नव्हता झाला. हे जंगल विरळ होण्याचे प्रमाण कमी झाले. ज्याला खऱ्या अर्थाने निसर्ग अनुभवायचा आहे, केवळ तोच जंगलात जाऊ लागला आणि मलईच्या जंगलाचा धोका कमी झाला.. केवळ एक चर खणल्यामुळे!
मलबार नेचर कन्झव्‍‌र्हेशन क्लब, अंबोली