Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, २० जानेवारी २००९

एमबीए प्रवेश परीक्षा अर्जासाठी विद्यार्थ्यांचा पोस्टात धुडगूस
पिंपरी १९,जानेवीरी / प्रतिनिधी

एमबीए प्रवेश परीक्षेचे अर्ज खरेदीसाठी गर्दी केलेल्या संतप्त विद्यार्थ्यांनी पिंपरी पोस्ट कार्यालयात आज दुपारी अक्षराश: धुडगूस घातला.कर्मचाऱ्यांना कोषागारात कोंडून ,शिवीगाळी करत त्यांनी सर्व साहित्य व कागदपत्रांची फेकाफेक केल्याने घबराट होती.पोलीस येताच हे विद्यार्थी पसार झाले.
या परीक्षेसाठी पुणे व पिंपरी शहरात तीन ठिकाणी अर्ज उपलब्ध आहेत.पिंपरी येथील पोस्टात दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज विक्रीची मुदत होती ती तीनपर्यंत वाढविण्यात आली.अर्ज खरेदीसाठी दिवसभर मोठी रांग लागली होती.ज्या विद्यार्थाना वेळेत अर्ज मिळाले नाहीत त्यांना उद्या दिले जातील,त्यांनी आपली नाव नोंदणी करावी,अशी सूचना पोस्ट मास्तरांनी केली.गर्दी पाहूण वेळे नंतरही विक्री व्यवहार सुरु होता.उन्हातान्हात ताटकळत उभे राहिलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज ताबडतोब मिळावेत यासाठी आग्रह धरला.ते शक्य नाही म्हटल्यावर त्यांनी गोंधळाला सुरवात केली.एक अर्ज साडेअठराशे रुपयांना असल्याने त्याची नोंद करणे,पैसे घेणे यासाठी वेळ लागत होता.
दरम्यान ,कार्यालयात रांगेत थांबलेल्या विद्यार्थ्यांनी विलंब होतो म्हणून प्रथम आरडाओरड सुरु केला.त्यांना शांत राहण्यासाठी वारंवार विनंती करुनही कोणीही ऐकले नाही,उलट हा गोंधळ वाढतच गेला.काही विद्यार्थ्यांनी टेबलावरचे टपालाचे गठ्ठे,रजिस्टर्स व पार्सल उचलून अस्ताव्यस्त फेकले. रागावलेल्या विद्यार्थिनींनीही काही कागदपत्रे भिरकावली.

संशयिताची माहिती दिल्यास पोलिसांकडून बक्षीस
पुणे, १९ जानेवारी / प्रतिनिधी

शहरात दहशतवादी घुसल्याच्या वृत्ताचा सातत्याने इन्कार करणाऱ्या पुणे पोलिसांनी, संशयित व्यक्तीबद्दल माहिती देणाऱ्या पुणेकरांना रोख बक्षीस देण्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. त्याचबरोबर शनिवारपासून ‘एसएमएस’ जनजागृती मोहीमही पोलिसांनी सुरू केल्याने आज शहरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. शहर पोलिसांच्या विशेष शाखेचे उपायुक्त रवींद्र सेनगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, ‘मुंबईत २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर संशयित दहशतवाद्यांविषयी माहिती देणाऱ्या व्यक्तीला, अथवा एखाद्या नागरिकाने दिलेल्या माहितीच्या आधारे संशयित व्यक्तीला पकडण्यात मदत झाल्यास त्या संबंधित नागरिकाला चांगले रोख बक्षीस देण्यात येणार आहे.’

संगणकावरील सातबाराच्या नोंदी तलाठय़ांमुळे ‘हँग’!
पुणे, १९ जानेवारी / खास प्रतिनिधी

सामान्य नागरिकांना सहजगत्या सातबारा उतारा मिळण्यासाठी राज्य सरकारने राबविलेल्या संगणकीकरणाला तलाठय़ांनी खो घातला असून, गेल्या चार महिन्यांपासून तलाठय़ांनी संगणकावर नोंदी घेण्याचे काम थांबविल्याने राज्यभरात सुमारे पाच लाख नोंदी रखडल्या आहेत. सातबारा उतारे आणि फेरफार आता संगणकाऐवजी हस्तलिखीत पद्धतीने दिले जात असल्यामुळे नागरिकांना मोठय़ा गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. वेतन व अन्य मागण्यांसाठी तलाठी संघटनेने संगणकावरील सर्व प्रकारच्या नोंदींचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत नोंदींच्या कामाला हात न लावण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. मात्र तलाठय़ांच्या या भूमिकेमुळे सामान्य नागरिक मात्र वेठीला धरले गेले आहेत.

लष्कर येथे जादा न्यायालय;प्रलंबित खटले निकाली काढणार
पुणे, १९ जानेवारी/प्रतिनिधी

लष्कर न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून एकाच न्यायालयावर खटल्यांचा जादा बोजा असल्याने असंख्य खटले प्रलंबित राहिले होते. आता प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी नव्या न्यायालयाचे आज उद्घाटन क रण्यात आले. त्यामुळे उद्यापासून या न्यायालयातही खटले निकाली काढण्याचे कामकाज सुरू होणार आहे. जिल्हा न्यायाधीश अशोक चिमा यांच्या हस्ते या नव्या न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी विशेष न्यायाधीश पी. आर. बोरा, न्या. संगीतराव पाटील, न्या. एस पी. हयातनगरकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विनायक अभ्यंकर, सचिव अ‍ॅड. शिवराज जहागीरदार, लष्कर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुलतान इनामदार आदींची उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षांपासून या न्यायालयात वानवडी, कोंढवा, हडपसर आणि लष्कर भागातील खटल्यांचे न्यायनिवाडय़ाचे काम सुरू होते. येथे न्या. ए. एम. पाटणकर यांच्या न्यायालयात कामकाज सुरू होते. त्या न्यायालयात अनेक खटले प्रलंबित होते. त्यात उच्च न्यायालयाने हे प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी नवे न्यायालय सुरू क रण्याची सूचना केली होती. त्यानुसार लष्कर न्यायालयात हे नवे न्यायालय सुरू करण्यात आले.

भीमसेन जोशी यांच्या नावाने शिष्यवृत्ती देण्याचा विचार-पाटील
पुणे, १९ जानेवारी/प्रतिनिधी

शास्त्रीय संगीतातील उदयोन्मुख कलाकारांसाठी पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने शिष्यवृत्ती देण्याचा विचार शासन करीत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज दिली. पं. भीमसेन जोशी यांच्या ‘कलाश्री’ या निवासस्थानी जाऊन आज हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, आमदार दिलीपराव देशमुख व त्यांच्या पत्नी सुवर्णा देशमुख आणि आमदार उल्हास पवार उपस्थित होते. पाटील यांनी सांस्कृतिक खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर आवर्जून पं. जोशी यांची भेट घेतली.राज्यात शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा यासाठी, तसेच या क्षेत्रातील पंडितजींचे कार्य लक्षात घेऊन त्यांच्या नावाने ही शिष्यवृत्ती दिली जाईल. या शिष्यवृत्तीचे स्वरुप आणि रचना याचा मसुदा ठरविण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

रेल्वेच्या ‘ऑनलाईन’ व्यवस्थेत
दुसऱ्याच्या आरक्षणात फेरफार?
पुणे, १९ जानेवारी/ प्रतिनिधी

रेल्वेच्या ऑनलाईन आरक्षण व्यवस्थेमुळे घरबसल्या गाडय़ांची तिकिटे आरक्षित करता येत असली, तरी या यंत्रणेच्या माध्यमातून दुसऱ्यांच्या आरक्षणाची माहिती घेण्याबरोबरच ती परस्पर रद्दही करता येत असल्याची गंभीर बाब एका प्रवाशाच्या नजरेत आली आहे. यंत्रणेतील हा दोष दूर करण्यासाठी संबंधित प्रवाशाने रेल्वेच्या माहिती- तंत्रज्ञान विभागाला पत्रही पाठविले आहे.
निखिल वाकळे या प्रवाशाला नुकताच हा प्रकार लक्षात आला. वाकळे यांनी ऑनलाईन व्यवस्थेवरून एक आरक्षण केले होते. आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्याची प्रिंट काढली. त्यावेळी त्यांच्या एक तांत्रिक बाब लक्षात आल्याने त्यांनी या ऑनलाईन सेवेमध्ये आणखी काहीवेळ गंमत म्हणून माहिती घेतली. विशेष म्हणजे या सेवेमधील दुसऱ्या क्रमांकाचे आरक्षणही त्यांना दिसू लागले. मात्र पुढे काहीही न करता त्यांनी ही वेबसाईट बंद केली. वाकळे यांनी केलेले आरक्षण काही कारणास्तव त्यांना रद्द करावे लागणार होते. त्यामुळे पुन्हा त्यांनी ऑनलाईन सेवेचा वापर केला. दिलेल्या सूचनांनुसार त्यांनी त्यांचे आरक्षण रद्द केले. मात्र, कालच आलेल्या अनुभवामुळे केवळ जिज्ञासेपोटी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचे आरक्षण पुन्हा काढले व ते परस्पर रद्द होऊ शकते का, याची चाचपणी केली. संबंधित प्रक्रियेतून त्यांना अत्यंत धक्कादायक गोष्ट लक्षात आली. त्यांना दिसत असलेले दुसऱ्याचे आरक्षण त्यांनी रद्द केले नाही. परंतु, ते रद्द करता येऊ शकते, ही गंभीर बाब त्यांच्या लक्षात आली. याबाबत वाकळे म्हणाले, संगणकातील तज्ज्ञ असलेल्या व्यक्ती या ऑनलाईन व्यवस्थेमध्ये सहजपणे रद्द करू शकतो. ही गंभीर बाब असल्याने याबाबत आपण संपूर्ण स्पष्टीकरणासह रेल्वेच्या माहिती-तंत्रज्ञान व ऑनलाईन आरक्षणाच्या अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे पत्र पाठविले आहे. त्यात इतरांचे आरक्षण कसे दिसते व ते कसे रद्द करता येऊ शकते, याचेही उदाहारण दिले आहे. त्यानुसार तातडीने दक्षता घ्यावी, अशी मागणी आपण केली आहे.

‘गाथा ज्ञानाची माहिती पर्यावरणाची’ च्या कात्रणवह्य़ा जमा करण्याचे आवाहन
पुणे, १९ जानेवारी/प्रतिनिधी

‘लोकसत्ता’ आयोजित ‘गाथा ज्ञानाची माहिती पर्यावरणाची’ या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी कात्रण चिकटविलेल्या वह्य़ा दिनांक २२ जानेवारीपूर्वी ‘लोकसत्ता’ वितरण कार्यालय, वेस्ट विंग, तिसरा मजला, अरोरा टॉवर, मोलेदिना रस्ता, पुणे-१ या पत्त्यावर पाठवाव्यात. २२ तारखेनंतर येणाऱ्या कात्रण संकलन वह्य़ांचा विचार केला जाणार नाही, असे संयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.