Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, २० जानेवारी २००९
राज्य

आदिवासींचे पुनर्वसन न करताच मध्य वैतरणाचा श्रीगणेशा!
शहापूर, १९ जानेवारी/वार्ताहर

मुंबईची भविष्यातील २५ वर्षांंची पाण्याची गरज लक्षात घेऊन शहापूर-मोखाडा तालुक्याच्या हद्दीवर बांधण्यात येणाऱ्या मध्य वैतरणा धरणाचे भूमिपूजन २३ तारखेला होत आहे. मात्र या प्रकल्पामुळे देशोधडीला लागणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे कुठलेही पुनर्वसन न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. प्रकल्पग्रस्तांना सोयीसुविधा, रोजगार व पुनर्वसन केल्याशिवाय धरणाचे काम सुरू केले जाणार नाही, असे आश्वासन जलसंपदा मंत्र्यांनी देऊनही आता मात्र आदिवासींच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

नावाला पर्यटन जिल्हा.. प्रत्यक्षात भाराभार चिंध्याच
छत्रपती शिवाजी महाराजांपासून अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा वारसा, अथांग समुद्रकिनारा आणि विलोभनीय सह्य़ाद्रीकडे लाभलेला सिंधुदुर्ग जिल्हा. पण अशा जिल्ह्य़ाची विकासाच्या बाबतीत अवस्था म्हणजे- एक ना धड भाराभार चिंध्या! खऱ्या अर्थाने विकास साधला गेल्यास हा जिल्हा उभ्या महाराष्ट्रात आर्थिकदृष्टय़ा मानाचे स्थान मिळवू शकेल. गोवा व केरळ राज्याला पर्यटनात मागे टाकेल एवढी ताकद या जिल्ह्य़ात आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ाचे १९८० च्या दशकात विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी अशा आठ तालुक्यांचे ५०८७.५ चौरस किलोमीटरचे आटोपशीर क्षेत्र त्याला लाभले आहे.

जैविक हल्ल्यांच्या मुकाबल्यासाठी वैद्यकीय यंत्रणाच नाही!
मुस्तफा आतार
पुणे, १९ जानेवारी

दहशतवादाच्या विविधरूपी आक्रमणांचा गेल्या काही दिवसांमध्ये मुकाबला करावा लागत असतानाच देशात जैविक हल्ला प्रतिबंधक व उपचारात्मक यंत्रणाच अस्तित्वात नाही. राज्यात महाराष्ट्र सिक्युरिटी गार्डच्या (एमएसजी) स्थापनेनंतर तरी जैवरासायनिक हल्ल्यांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यरत करण्याच्या हालचाली सुरू होतील, अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे. ‘देशामध्ये दहशतवाद्यांकडून आता जैविक हल्ला होण्याची शक्यता अधिक आहे. देशाची जीवित वा वित्तहानी करणे हाच उद्देश त्यामागे असणार आहे. ‘देवी’चे जंतू सहज मिळणे सहजासहजी शक्य नाही, तर अ‍ॅन्थ्रॅक्सचे विषाणू सहज मिळू शकतात. त्यामुळे दहशतवाद्यांकडून त्याचाच अधिक वापर होण्याची शक्यता आहे.

बहुचर्चित वांजुळपाडा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता - डॉ. आहेर
नाशिक, १९ जानेवारी / खास प्रतिनिधी

वादग्रस्त मांजरपाडा प्रकल्पाला पर्याय म्हणून पुढे आलेल्या वांजुळपाडा प्रकल्पास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून त्याच्या सव्‍‌र्हेक्षणाच्या कामाकरीता तब्बल सव्वा कोटींची तरतूद केली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ७७४ द.ल.घ.फू पाणी बोगद्याव्दारे गिरणा नदीत टाकण्यात येईल, अशी माहिती तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांनी येथे दिली. प्रस्तावित मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी गिरणा प्रकल्पाऐवजी गोदावरी खोऱ्यात वळविणे आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य ठरते.

नवीन सांस्कृतिक धोरण लवकरच ठरणार
८० जणांना मिळाले वाङ्मय पुरस्कार

रत्नागिरी, १९ जानेवारी/खास प्रतिनिधी

महाराष्ट्राला साहित्य व संस्कृतीची संपन्न परंपरा आहे. या परंपरेचे जतन-संवर्धन करण्यासाठी नवीन सांस्कृतिक धोरण ठरविण्याचा मनोदय असून, त्याबाबत विचारविनिमय करण्याच्या हेतूने खास बैठक बोलाविण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले. उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे २००८ या वर्षीचा पुरस्कार प्रदान सोहळा काल येथे पार पडला. याप्रसंगी बोलताना पाटील म्हणाले की, साहित्य क्षेत्रामध्ये प्रतिभावंत लेखकांनी केलेल्या योगदानाचा आदर्श नव्या पिढीसमोर असावा म्हणून हे पुरस्कार दिले जातात. येत्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे.

पुणे रेल्वेस्थानकावरही राहणार २४ तास सुरक्षा यंत्रणेची नजर
रेल्वे सुरक्षा दलासाठी एक हजार अत्याधुनिक रायफल

पुणे, १९ जानेवारी/ प्रतिनिधी

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस व परिसरात पुरविलेल्या सुरक्षा यंत्रणेनुसार देशातील महत्त्वाच्या स्थानकांतही हीच यंत्रणा राबविण्यात येणार असून, त्यात पुणे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे स्थानक व परिसरावर २४ तास सुरक्षा यंत्रणेची करडी नजर राहणार आहे, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री नारणभाई राठवा व मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक विनय मित्तल यांनी आज येथे दिली. अतिरेक्यांचा सामना करू शकतील, अशा अत्याधुनिक एक हजार रायफल रेल्वे सुरक्षा दलासाठी लवकरच खरेदी करण्यात येणार असल्याचेही राठवा म्हणाले.

आराम बस अपघाताची वर्षपूर्ती; यंत्रणा अद्याप निद्रिस्त
वणी, १९ जानेवारी/वार्ताहर

सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनानंतर परतीच्या प्रवासाला निघालेली आराम बस एका अवघड वळणावरून थेट पाचशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातास २० जानेवारी रोजी वर्ष पूर्ण होत असले तरी झालेल्या घटनेतून कोणताही बोध न घेता गडावरील या मार्गाची सुरक्षितता जपण्यासाठी जबाबदार असणाऱ्या घटकांकडून अद्याप डोळेझाक केली जात असल्याचे विदारक चित्र पुढे येत आहे. अवैध प्रवासी वाहतूक आणि क्षमतेहून अधिक प्रवासी असणाऱ्या वाहनांना रोखणे, संरक्षक भिंतीचे मजबूत बांधकाम आदी उपायांबाबत अजून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे.

जैविक हल्ल्यांच्या मुकाबल्यासाठी वैद्यकीय यंत्रणाच नाही!
पुणे, १९ जानेवारी

दहशतवादाच्या विविधरूपी आक्रमणांचा गेल्या काही दिवसांमध्ये मुकाबला करावा लागत असतानाच देशात जैविक हल्ला प्रतिबंधक व उपचारात्मक यंत्रणाच अस्तित्वात नाही. राज्यात महाराष्ट्र सिक्युरिटी गार्डच्या (एमएसजी) स्थापनेनंतर तरी जैवरासायनिक हल्ल्यांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यरत करण्याच्या हालचाली सुरू होतील, अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे. ‘देशामध्ये दहशतवाद्यांकडून आता जैविक हल्ला होण्याची शक्यता अधिक आहे. देशाची जीवित वा वित्तहानी करणे हाच उद्देश त्यामागे असणार आहे. ‘देवी’चे जंतू सहज मिळणे सहजासहजी शक्य नाही, तर अ‍ॅन्थ्रॅक्सचे विषाणू सहज मिळू शकतात. त्यामुळे दहशतवाद्यांकडून त्याचाच अधिक वापर होण्याची शक्यता आहे. अ‍ॅन्थ्रॅ्रक्स, प्लेग, ब्य्रुसेलिसिस, टय़ुलारमिया, कॉलरासारख्या जिवाणूंचा जैविक अस्त्र म्हणून वापर होऊ शकतो. अद्ययावत तंत्राद्वारे जिवाणूंचे बॉम्ब तयार क रून ते फेकले जातील किंवा हेलिकॉप्टर, विमानांद्वारे केवळ जंतूंची फवारणी केली जाईल. देशातील पिके, जनावरे नष्ट करण्यासाठीही त्या पद्धतीच्या जैविक अस्त्रांचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. आपला देश हा कृषिप्रधान असून, सत्तर टक्के जनता त्यावर अवलंबून आहे’, असे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ.मिलिंद वाटवे यांनी सांगितले. जैविक हल्ल्यानंतर तातडीने वैद्यकीयदृष्टय़ा काय उपाययोजना कराव्यात किंवा काय जबाबदारी पेलायची याचा आरोग्य खात्याकडेही आराखडा नाही. केंद्र सरकारने यासंदर्भात काही पावले उचलली तरच त्याची अंमलबजावणी राज्यात होईल, अन्यथा आज तरी जैविक हल्ला प्रतिबंधक व उपचारात्मक वैद्यकीय यंत्रणा नाही, असे आरोग्य खात्याचे अधिकारी ‘लोकसत्ता’शी बोलताना खासगीत मान्य करतात.

शालान्त परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
अमरावती, १९ जानेवारी / प्रतिनिधी

राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्रलंबित वेतनेतर अनुदानाच्या मागणीकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसह सर्व शालेय परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महामंडळाच्या येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शालेय परीक्षांसाठी खासगी संस्था आपल्या इमारती उपलब्ध करून देणार नाही आणि परीक्षांसंदर्भात शासनाला कुठलेही सहकार्य करणार नाही, अशी माहिती आंदोलन कृती समितीचे अध्यक्ष व माजी मंत्री विनोद गुडधे पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांना गेल्या सहा वर्षांपासून वेतनेतर अनुदान देण्यात आलेले नाही. अनुदानाअभावी शाळांचे व्यवस्थापन करणे कठीण काम होऊन बसले आहे. वेतनेतर अनुदानाच्या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

शरण आलेल्या नक्षलवाद्याची हत्या
गडचिरोली, १९ जानेवारी / वार्ताहर

एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरावाही या गावात आत्मसमर्पित नक्षलवादी मानू रावजी गावडे (३०) याची आज पहाटे नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केली. मानू गावडे याने एक वर्षांपूर्वी आत्मसमर्पण केले होते. पूर्वी तो ग्रामरक्षा दलाचा सदस्य होता.या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या नेतृत्वाखाली परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली पण, नक्षलवादी हाती लागले नाहीत.