Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, २० जानेवारी २००९
क्रीडा

यान्कोव्हिच, रॉडिकची विजयी सलामी
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस

मेलबर्न, १९ जानेवारी / एएफपी

जागतिक महिला टेनिस क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी येलेना यानोकोव्हिच व अमेरिकेचा अ‍ॅन्डी रॉडिक यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करत आजपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष विभागात विजयी सलामी दिली. सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोविचला पहिल्या फेरीचा अडसर दूर करताना बराच घाम गाळावा लागला. भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने पोलंडच्या मार्ता दोमाचोव्हस्काचा ६-१, ६-४ गुणांनी पराभव करत दुसरी फेरी गाठली.
यान्कोव्हिचने तिच्या मानांकनावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना गप्प करताना यव्होन मेसबर्गरचा ६-१, ६-३ गुणांनी सहज पराभव केला.

स्पर्धेतील कामगिरीला महत्त्व नसेल तर रणजी स्पर्धा हवी कशाला ?
विनायक दळवी
मुंबई, १९ जानेवारी

मुंबई क्रिकेटची नर्सरी. मुंबई राष्ट्रीय क्रिकेटचे निर्विवाद विजेते. राष्ट्रीय क्रिकेटचे मुख्यालय मुंबईत आहे. राष्ट्रीय क्रिकेटचे सर्वेसर्वाही मुंबईचेच; पण या गोष्टी यंदाच्या रणजी स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या धवल कुलकर्णीला भारतीय संघात स्थान देऊ शकत नाहीत. सर्वाधिक धावा काढणारा अजिंक्य रहाणे भारतीय संघात का बसू शकत नाही? या दोन उदयोन्मुख क्रिकेटपटूंना ‘ड’ गटाचा करारदेखील मिळू शकत नाही? यंदाच्या हंगामात विशेष कामगिरी न करणाऱ्या प्रवीण कुमारसाठी धोनीने आग्रह धरला. दोष धोनीचा नाही. त्याने धवल कुलकर्णीची गोलंदाजी फारशी पाहिलेली नाही. भारतीय संघाच्या कर्णधाराने पाहावी, अशी अपेक्षा नाही. पण पगारी राष्ट्रीय निवड समितीने धवल कुलकर्णी, अजिंक्य रहाणे यांचा खेळ पाहिला होता, असे गृहीत धरायला हरकत नाही.

भारताची अर्जेन्टिनावर २-१ गोलने मात
दीपक ठाकूरची चमकदार कामगिरी

मार डेल प्लाटा, १९ जानेवारी / पीटीआय

दीपक ठाकूरच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने आज हॉकी लढतीत अर्जेन्टिनचा २-१ गोलने पराभव केला आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-०ची आघाडी मिळवली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना उद्या, मंगळवारी खेळल्या जाणार आहे.
पनाम नॅशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या लढतीत दीपक ठाकूरने १८ व ४१व्या मिनिटाला दोन गोल नोंदवत भारताच्या विजयात उल्लेखनीय योगदान दिले. पराभूत संघातर्फे ६५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर माटिस पराडेसने नोंदवलेला गोल पराभवातील अंतर कमी करणारा ठरला. दरम्यान, या लढतीत यजमान संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला.

सानिया मिर्झा दुसऱ्या फेरीत दाखल
मेलबर्न, १९ जानेवारी / पीटीआय

भारताची सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आपला पहिला सामना जिंकत स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत ६१ व्या स्थानावर असलेल्या पोलंडच्या मार्ता दोमाचोव्हस्का हिचा तिने ६-१, ६-४ असा पराभव केला. दुखापतीमुळे बराच काळ टेनिसपासून दूर राहिलेल्या सानियाने वर्षांच्या सुरुवातीलाच मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. दुखापतीमुळे गेले सहा महिने मला एकही सामना खेळता आला नव्हता. त्यामुळे या विजयामुळे मला अतिशय आनंद झाला आहे, असे मत सामन्यानंतर सानियाने व्यक्त केले. सानियाने सामन्यातील पहिला सेट केवळ २५ मिनिटांमध्ये ६-१ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये तिला मार्ताकडून कडवा प्रतिकार सहन करावा लागला. या सेटमध्ये २-० अशी आघाडीवर असताना सानियाची सव्‍‌र्हिस दोन गेममध्ये भेदत मार्ताने सलग ४ गेम जिंकत सानियावर ४-२ अशी आघाडी घेतली. त्यामुळे दबावाखाली आलेल्या सानियाने आपला खेळ उंचावत हा सेट ६-४ असा जिंकत विजय मिळविला. अन्य एका सामन्यात रशियाची दहावी मानांकित नादिया पित्रोवा हिने कझाकस्तानच्या यरोस्लावा श्वेदोवा हिचा ६-३,७-६ असा पराभव केला. आता दुसऱ्या फेरीत सानियाची गाठ नादियाशी पडणार आहे.

आयसीसीच्या क्रमवारीत सचिन व सेहवागच्या मानांकनात सुधारणा
दुबई, १९ जानेवारी/पीटीआय

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या (आयसीसी) जागतिक क्रमवारीत सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवाग यांच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. नव्या क्रमवारीत सचिन अकराव्या स्थानावर पोहोचला असून सेहवागनेही विसाव्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. या क्रमवारीनुसार युवराज सिंगचे मानांकन सातव्या स्थानापर्यंत घसरले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंग हा सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आला आहे.

जॉन्सन ऑस्ट्रेलियन संघात
मेलबर्न, १९ जानेवारी/ पीटीआय

पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या उर्वरीत तीन सामन्यांसाठी रायन हॅरीसला डावलून वेगवान गालंदाज मिशेल जॉन्सनला संघात स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर मायकेल क्लार्क हा अंगठाच्या दुखापतीतून सावरलेला नसून उपकर्णधार पदाची जबाबदारी मायकेल हसीला देण्यात येणार असल्याचे, ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने आज सांगितले. केएफसी ट्वेंटी-२० ची मालिका आणि दोन एकदिवसीय सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियाच्या तेरा सदस्यीय संघामध्ये मिशेल जॉन्सनला स्थान देण्यात आले असून हा एकच बदल यावेळी करण्यात आलेला आहे, असे राष्ट्रिय निवड समितीचे अध्यक्ष अ‍ॅन्ड्रयू हिल्डिच यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियाचा संघ -: रिकी पॉन्टींग (कर्णधार), मायकेल हसी (उपकर्णधार), नॅथन ब्रॅकन, बॅड्र हॅडीन, नॅथन हॉरित्झ, बेन हिल्फेनहॉस, जेम्स होप्स, डेव्हिड हसी, मिशेल जॉन्सन, शॉन मार्श, शॉन टेट, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून व्हाईट.

पश्चिम विभाग संघातून अजित आगरकर बाहेर
दुलीप करंडकासाठी पश्चिम विभागाचा संघ जाहीर
मुंबई, १९ जानेवारी/ क्री. प्र.

दुलीप करंडकासाठी पश्चिम विभागाचा संघ जाहीर करण्यात आलेला असून मुंबईच्या अजिंक्य रहाणे, धवल कुलकर्णी आणि अभिषेक नायर या युवा त्रयीचा संघात समावेश करण्यात आलेला आहे. तर यंदाच्या हंगामात ५२ विकेट्स घेणारा गुजरातचा फिरकीपटू मोहनिश परमार आणि मुंबईचा अनुभवी वेगवान गोलंदाज अजित आगरकरला वगळण्याचा निर्णय विभागीय निवड समितीने घेतला आहे. वीस वर्षीय परमारने यंदाच्या आठ रणजी सामन्यांमध्ये ४१ विकेट्स घेतल्या आहेत, पण त्याला डावलून रमेश पोवार आणि राजेश पवार या दोन फिरकीपटूंना निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम विभागाचे नेतृत्व मुंबईचा कर्णधार वसीम्म जाफर करणार असून पहिला सामना पुर्व विभागाविरूद्ध २९ जानेवारीपासून ब्रेबॉर्न स्डेडियमवर खेळविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव हेमंत वायंगणकर यांनी दिली .
संघ पुढील प्रमाणे-: वसीम जाफर (कर्णधार, मुंबई) पार्थिव पटेल (उपकर्णधार, गुजरात), अजिंक्य रहाणे, अभिषक नायर, धवल कुलकर्णी, रमेश पोवार (मुंबई), केदार जाधव, अजय श्रीखंडे, समद फल्लाह (महाराष्ट्र), चेतेश्वर पुजारा (सौराष्ट्र), भाविन ठक्कर, सिद्धार्थ त्रिवेदी (गुजरात), राजेश पवार, अजितेश अरगल, अझर भिलाकिया (बडोदा)

झिम्बाब्वेचा बांगलादेशविरुद्ध विजय
रेमंड प्राईसची चमकदार कामगिरी
ढाका, १९ जानेवारी / एएफपी

शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आज झिम्बाब्वेने बांगलादेशविरुद्ध मिळवलेल्या दोन फलंदाजांच्या विजयाचा अनुभवी रेमंड प्राईस शिल्पकार ठरला. २२ धावांत ४ बळी घेत बांगलादेशला माफक धावसंख्येत रोखणाऱ्या प्राईसने मग विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या षटकांत दोन चौकार मारून झिम्बाब्वेच्या सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केले. ३२ वर्षीय रेमंड प्राईसने एकदिवसीय कारकिर्दीत सर्वोच्च धावसंख्या नोंदवताना झिम्बाब्वेला सामना जिंकून देणारी २४ धावांची नाबाद खेळी केली. बांगलादेशने विजयास दिलेले १२५ धावांचे माफक अव्हान झिम्बाब्वेने चार चेंडू व २ फलंदाज शिल्लक राखून पूर्ण केले. वेगवान गोलंदाज मशर्रफ मोर्तझा (३-२१) आणि फिरकीपटू शाकिब अल हसन (३-११) यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवत झिम्बाब्वेची ८ बाद ९८ अशी नाजूक अवस्था केली होती. मात्र, त्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या माल्कम वॉलर (२४) आणि अनुभवी रेमंड प्राईसने झुंजार फलंदाजी करत झिम्बाब्वेच्या विजयावर मोहर चढवली. शेवटच्या षटकात झिम्बाब्वेला विजयासाठी ६ धावांची गरज असताना रेमंड प्राईसने नझीमुल हुसेनच्या गोलंदाजीवर पहिल्या दोन चेंडूंवरच चौकार खेचत सामनावीराचा पुरस्कार मिळवला. या विजयामुळे तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत आता झिम्बाब्वेने १-० ने आघाडी घेतली आहे. झिम्बाब्वेचा हा बांगलादेशविरुद्ध सलग दुसरा विजय ठरला. नुकत्याच झालेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत झिम्बाब्वेने पाहुण्या संघाविरुद्ध ३८ धावांनी विजय मिळवला होता.

अमित रॉयला ठरला ‘मुंबई श्री’
मुंबई, १९ जानेवारी / क्री. प्र.

ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन व मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेच्या विद्यमाने दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये झालेल्या आणि मुंबईतील अव्वल शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत हळदणकर्सच्या अमित रॉयने हा मानाचा किताब आणि २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. किताब विजयासाठी झालेल्या गटविजेत्यांच्या स्पर्धेत त्याने या वर्षी मुंबईतील बहुतेक सर्व स्पर्धा जिंकणाऱ्या दिनेश कांबळी या आपल्या नजीकच्या प्रतिस्पध्र्याला हरवून सलग आठ वर्षांच्या मेहनतीनंतर प्रथमच एवढी मोठी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. याच स्पर्धेअंतर्गत ‘बेस्ट पोजर’साठी झालेल्या स्पर्धेत स्लीमवेलच्या जयेंद्र मयेकरने पाच हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.
गटनिहाय निकाल- ५५ किलो- संतोष भरणकर, जगदीश कदम, रोशन नाईक, रुदन चौगुले, रूपेश शालकर. ६० किलो- दिनेश कांबळी, अली सलेमानी, अरुण पाटील, बाबू नकुलदास, मंगेश कदम. ६५ किलो- जयेंद्र मयेकर, विजय जाधव, उदय सावंत, अमित नायडू, समशेर राणे. ७० किलो- अमित रॉय, मनोहर पाटील, संतोष सेठी, बी. आलोक, राजेश जाधव. ७५ किलो- विलास वरक, सुमित जाधव, मिलिंद सालियन, नितीन घाणेकर, मिलिंद सारंग. ७५ किलोवरील- सचिन बरबोज, केतन करंडे, ज्यूड रॉबर्ट डिसुझा, श्रविन सोंधी,
अमीन खान.

महाराष्ट्राचा विनीत कोटियन उपान्त्य फेरीत दाखल
बॉक्सिंग
मुंबई, १९ जानेवारी / क्री. प्र.

महाराष्ट्र संघाच्या विनित कोटियनने उपान्त्यपूर्व फेरीत लाईट वेल्टर गटात आपल्या तंत्रशुद्ध खेळाने उत्तरपूर्व विभाग यलो संघाच्या हरी किशनला गारद करत तिसऱ्या महापौर सुपर कप बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाचं स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे.
तिसऱ्या महापौर सुपर कप स्पर्धेतील उपान्त्यपूर्व फेरीत आज महाराष्ट्र संघाच्या सहा खेळाडूंपैकी केवळ विनितच उपान्त्य फेरीत धडक मारू शकला. सामन्यात विनित कोटियनने सुरूवातीपासून आक्रमक पवित्रा धारण केला असला तरी हरीकिशन पहिल्या डावात एका गुणाने सरस ठरला. आघाडी घेऊनही त्याला सातत्य राखता आले नाही. विनित पिछाडीवर असूनही संयमी खेळी करत दुसऱ्या डावात १०-६ अशी आघाडी घेऊ शकला. तिसऱ्या डावात हरीकिशनला डोकेवर काढण्याची संधी न देता विनितने महाराष्ट्राला उपान्त्यपूर्व फेरी जिंकून दिली. महाराष्ट्र संघाच्या वतीने खेळणारा मुंबईचा विनीत २००७ आणि २००८मध्ये राज्य विजेता राहिलेला आहे. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये रौप्य पदक विजेता,ओपन राष्ट्रीयमध्ये कांस्य पदक तर पश्चिम विभाग सुवर्ण पदक विजेता राहिलेला आहे. सेनादल आणि भारतीय बॉक्सिंग असोसिएशन सीनीयर अशा दर्जेदार संघांच्या खेळाडूंकडून महाराष्ट्राचे इतर खेळाडू गारद झाले. लाईट फ्लाय गटात सेनादलाच्या देवेंद्र सिंगने भारतीय बॉक्सिंग असोसिएश सीनियर सघांच्या अमनदीपला ९-४च्या फरकाने पराभूतकरीत उपान्त्य फेरी गाठली. सेनादलाचा एम डी एतेसाम वगळता सर्व खेळाडूंनी उपान्त्य फेरीत प्रेवश केला. तर भारतीय बॉक्सिंग असोसिएशन सीनियर संघाचा अमनदीप वगळता इतरसर्व खेळाडूंनीही उपान्त्य फेरीत प्रवेश केला
आहे.

दिल्लीतील बुद्धिबळ स्पर्धेत राहुरीची शाल्मली विजेती
नगर, १९ जानेवारी/प्रतिनिधी

दिल्ली येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धेत राहुरीची बुद्धिबळपटू शाल्मली अण्णासाहेब गागरे हिने प्रथम क्रमांक मिळवत सर्वात छोटी वूमन ग्रँडमास्टर होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. तिने हा पराक्रम ५ विजय व २ बरोबरीच्या डावांनी केला. तिला रोख १५ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शाल्मलीने या स्पर्धेत एकूण २० गुणांची कमाई केली. वूमन ग्रँडमास्टर होण्यासाठी तिला आणखी केवळ १८० गुणांची गरज आहे. शाल्मली दि. २१पासून गुरगाव (हरियाणा) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर स्पर्धेत सहभागी होत आहे.