Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, २० जानेवारी २००९

लेखा परीक्षक मिळेल का सरकारी?
ठाणे महापालिकेचे सव्वा वर्षांचे दुखणे

संजय बापट

ठाणे महापालिकेची अवस्था मोठी विचित्र झाली आहे. गेले १५ महिने पूर्णवेळ लेखापरीक्षकाविना कोटय़वधींचा खर्च सुरू आहे. कुणी लेखापरीक्षक देता का, अशी याचना करण्याची वेळ जणू महापालिकेवर आली आहे. विशेष म्हणजे पूर्णवेळ लेखापरीक्षक असावा हा संकेत पायदळी तुडवत कायद्यातील ‘प्रभारी’ पळवाटेचा आधार घेण्याचा मार्गच सोयीस्कर ठरविला जात आहे.
पूर्णवेळ लेखापरीक्षक नसल्यामुळे ज्यांनी कोटय़वधींची उलाढाल करायची, त्यांनीच त्यांचे मूल्यमापन करायचे, असा प्रकार ठाणे महापालिकेत सुरू आहे.

बचतीतही पालिकेची कोटींची उड्डाणे
दिलीप शिंदे

ऊर्जा बचत व संवर्धन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळविणाऱ्या ठाणे महापालिकेने वीज बिलापोटी १९ कोटी ४७ लाख रुपये आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षांकाठी ३.५० कोटी युनिट विजेची लक्षणीय बचत करण्याची कामगिरी केली आहे.
प्रदूषणकारी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर व ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठाणे महापालिका व आयसीएलईआय (इक्ले) यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला.

कल्याण-डोंबिवलीकरांना कचऱ्यात सडविण्याचा शिवसेना-भाजपचा प्रयत्न
कल्याण/प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याच्या ९१ कोटीच्या एकत्रित प्रकल्प अहवालाला स्थगिती देण्याचा निर्णय महासभेत घेऊन शिवसेना-भाजपने शहरातील कचऱ्याचा प्रश्न पेटविण्यास हातभार लावण्याचे काम केले आहे, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे. तसेच, या प्रकल्पात महापालिकेचा आर्थिक सहभाग फक्त १८ कोटी आहे. तरीही युतीने या प्रकल्पाला स्थगिती देऊन नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे.

स्थायी समितीत जाण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी
२८ जानेवारीला नेमणुका

कल्याण/प्रतिनिधी

गेल्या दीड महिन्यापासून ठप्प असलेल्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या नव्याने नेमणुका करण्यासाठी विशेष सभा घेण्याचे आदेश महापौर तथा पीठासन अधिकारी रमेश जाधव यांनी प्रशासनाला महासभेत दिले. २८ जानेवारी रोजी स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.

राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचे काम करा - नवल बजाज
शहीद स्मारकाचे भूमिपूजन

वाडा/वार्ताहर

गावागावातील वाद संपुष्टात आणून एकजुटीने काम करा, म्हणजेच राष्ट्रनिर्माण करण्याचे काम केल्याचे समाधान मिळेल, असे प्रतिपादन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक नवल बजाज यांनी येथे केले. २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील हल्ल्यात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी राज्यात प्रथमच उभारण्यात येमाऱ्या शहीद स्मारकाचा पायाभरणी समारंभ बजाज यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास शहीद स्मारक समितीचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश शर्मा, प्रांत अधिकारी डॉ. जयकृष्ण फड, शिक्षक संचालित शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सु.पां. कुलकर्णी, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला काँग्रेसचे ठाण्यात शक्तिप्रदर्शन
ठाणे/प्रतिनिधी

केंद्रात यूपीएचे सरकार आणण्यात महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान असतानाही तिकीटवाटपात मात्र महिलांवर अन्याय होत असून, महिला आरक्षण विधायक संमत करण्यात जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत. आगामी निवडणुकीत मात्र कार्यक्षम महिलांना अधिकाधिक संख्येने उमेदवारी मिळाली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन अ.भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार प्रभा ठाकूर यांनी शनिवारी येथे महिला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना केले. प्रदेश सरचिटणीस फातिमा खान व ज्येष्ठ नेते सुभाष कानडे यांच्या पुढाकाराने झालेल्या या मेळाव्याच्या निमित्ताने महिला काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

जाता जाता गाईन मी!
ठाणे/प्रतिनिधी : हार्मोनिअम हे माझं सर्वस्व आहे. सुरांची सोबत असताना मी कधीच एकटा नसतो, असे म्हणत कधी संगीताच्या सुरावटीतून तर कधी पटकन उमजतील अशा उदाहरणांच्या माध्यमातून प्रसिद्ध गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांनी ठाणेकरांना जिंकून घेतले आणि उपस्थित ठाणेकरांची संक्रांत खऱ्या अर्थाने गोड झाली. येथील सरस्वती शाळेच्या प्रांगणात आठवडाभर चाललेल्या २३ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचा समारोप संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या सुश्राव्य संगीत मेजवाणीने झाला.

अभाविपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मिलिंद मराठे
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे येथील प्रा. मिलिंद मराठे यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये दरवर्षी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व महामंत्री यांची निवड केली जाते. अभाविपचे केंद्रीय निवडणूक अधिकारी डॉ. दुर्गाप्रसाद अग्रवाल यांनी आगामी वर्षांसाठी प्रा. मिलिंद मराठे यांची राष्ट्रीय अध्यक्ष आणि विष्णुदत्त शर्मा (भोपाळ) यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. जळगाव येथे होणाऱ्या अधिवेशनात ते आपला पदभार ग्रहण करतील.प्रा. मराठे हे सोमय्या इंजिनीअरिंग कॉलेज येथे इलेक्ट्रॉनिक्स शाखेचे विभागप्रमुख आहेत. ते विद्यार्थी परिषदेमध्ये १९७९ पासून सक्रिय आहेत. त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. राजस्थान प्रदेश संघटनमंत्री, प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. विष्णुदत्त शर्मा हे मध्य प्रदेशमधील फराणा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. १९८१ पासून ते विद्यार्थी परिषदेत सक्रिय आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयावर कुणबी सेनेची धडक
ठाणे/प्रतिनिधी

शहापूर तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना न्यायालयीन निकालाप्रमाणे कुठल्याही प्रकारची परीक्षा न होता थेट शासकीय सेवेत समाविष्ट करावे, या व इतर मागण्यांसाठी शहापूर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात प्रकल्पग्रस्त मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. संपादित जमिनीचा बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना एक हेक्टर जमीन शिल्लक असेल तरच प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला देण्यात येतो, त्याऐवजी तो सरसकट देण्यात यावा, भातसा प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन भातसा वसाहती पाडून जी जागा मोकळी केलेली आहे, त्या जागेवरच करावे, आदी मागण्या करण्यात आल्या.

मुरबाडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
शहापूर/वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आदिवासी भागातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने मुरबाड तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. मुरबाड तालुका भाजपच्या आदिवासी आघाडीतर्फे वैशाखरे गावी आयोजित आदिवासी मेळाव्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा मेळावा झाला. मेळाव्याचे प्रमुख पाहुणे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. विनोद तावडे, कल्याणचे आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी आदिवासी कार्यकर्त्यांचा सत्कार करून कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजप नेते सुभाष घरत, कल्याण जिल्हा अध्यक्ष दिनेश तावडे, शरद म्हात्रे उपस्थित होते. झाडघरचे माजी सरपंच मोरेश्वर भला, करचोंडे गावचे माजी सरपंच पांडुरंग शिद, फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीचे सदस्य भाऊ भाली, पळू गावचे शरद मोरे, टोकावडेचे अमोल पवार, पेंढरीचे माजी सरपंच चिमण खंडवी, बुरसुंगे गावची माजी सरपंच व सदस्यांनीही कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. आदिवासी भागातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने भाजपची या भागात ताकद वाढली आहे.

शाळेजवळील धोकादायक विजेच्या तारांकडे दुर्लक्ष
बदलापूर/वार्ताहर

शाळेजवळ धोकादायक अवस्थेत असणाऱ्या विजेच्या तारांची दुरुस्ती करण्याच्या मागणीकडे वीज खात्याने दुर्लक्ष केल्याचे आढळून येते. अंबरनाथच्या साई विभागातील भगिनी मंडळ शाळेजवळ दोन विद्युत खांबांमधील विजेच्या तारा खांब वाकल्यामुळे लोंबकळत आहेत. या धोकादायक विद्युत तारांची त्वरित दुरुस्ती करा, अशी मागणी नगराध्यक्षा संपदा गडकरी यांनी वीज खात्याकडे केली. वीज खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली. भारनियमनाच्या कालावधीत विजेच्या तारांची चोरी झाल्याने शाळेजवळ असणारा विजेचा खांब वाकला असून तो धोकादायक स्थितीत आहे. या खांबाला आधार देण्याच्या किरकोळ कामासाठी लक्ष द्यायला विद्युत खात्याला वेळ मिळत नाही काय, असा सवाल संतप्त नागरिक करीत आहेत. शाळेच्या मैदानाजवळ या धोकादायक स्थितीतच विद्युत तारांची दुरुस्ती लवकर करावी, अशी मागणी आहे.

विज्ञान प्रदर्शनात ऊर्जा बचतीचा प्रकल्प प्रथम
बदलापूर/वार्ताहर : अंबरनाथच्या भगिनी मंडळ शाळेत भरवलेल्या विज्ञान प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ऊर्जा बचत प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. मराठी विज्ञान परिषदेच्या अंबरनाथ शाखेच्या वतीने नुकतेच दोन दिवसांचे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. विष्णू वैद्य यांच्या हस्ते प्रकल्प तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पारितोषिक वितरणास शाखा अध्यक्ष प्रा. भगवान चक्रदेव, उद्योजक आनंद जयवंत, परीक्षक उल्हास कासार, प्रा. गोपाळकृष्ण कऱ्हाडे आदी उपस्थित होते. सध्या देशाला वैज्ञानिकांची गरज असल्यामुळे शिक्षकांबरोबरच पालकांनीही विज्ञानाची आवड निर्माण करावी, असे आवाहन वैद्य यांनी केले. मराठी विज्ञान परिषदेचे नागरिकांनी सभासद व्हावे, यासाठी वयाची अथवा शिक्षणाची अट नसल्याचे शाखाध्यक्ष प्रा. चक्रदेव म्हणाले.
विजेते प्रयोग/प्रकल्प आणि स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे-
भातापंप- चिन्मय सोमणी (बालवाडी भगिनी मंडळ, शाळा क्र. १), पूर सूचक यंत्र- माधुरी भरसाळ, वैष्णवी कुंभार, (बालविकास मंदिर विद्यालय), तरकाटा- त्रिनाद सोमणी, गोकुळ सोनावणे (भाऊसाहेब परांजपे विद्यालय), धुराचे प्रदूषण नियंत्रक चिमणी-प्रदीप बागराव, देवेंद्र बागराव (बालवाडी भगिनी मंडळ शाळा), मोर्स कोड संदेश प्रक्षेपण यंत्र- मंगेश दिघे, सागर भोई (भाऊसाहेब परांजपे विद्यालय).