Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, २० जानेवारी २००९
व्यक्तिवेध

अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनातील विवेक कुंद्रा हे प्रदीर्घ काळ अमेरिकेत राहिलेले असले तरी पक्के भारतीय आहेत. त्यांचा जन्म नवी दिल्लीचा. मात्र जन्मानंतर एकच वर्षांने ते आपल्या आई-वडिलांबरोबर टांझानियाला गेले. तेथे अकरा वर्षे राहिल्यावर अमेरिकेत स्थायिक झाले. आता पद्मश्री वॉरियर यांच्याबरोबरच त्यांची नियुक्ती ओबामा यांच्या प्रशासनात मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून झाली आहे. भारतीय वंशाच्या या तरुणाला एवढे मोठे मानाचे पद मिळाले आहे. ओबामा यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून आज ते ओळखले जातात. त्यामुळेच त्यांना अत्यंत महत्त्वाचे असे तंत्रज्ञान खाते देण्यात आले आहे. प्रामुख्याने सध्याच्या मंदीच्या काळात या खात्याला विशेष महत्त्व आहे. तांत्रिक क्षेत्रात कुंद्रा यांची आजवरची कामगिरी मोलाची आहे. सरकारची अत्यंत मोलाची आकडेवारी जनतेला खुली करणे तसेच तंत्रज्ञानात खासगी क्षेत्राला सहभागी करून जनतेला त्याचा कसा लाभ होईल ते पाहण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आय.टी. कंपन्यांसाठी तसेच शेअर बाजारासाठी त्यांनी केलेल्या मॉडेलमुळे ते प्रकाशझोतात आले. त्यामुळेच ओबामा यांनी त्यांची निवड केली. खरे तर या पदासाठी अनेकांच्या नावाची चर्चा अमेरिकेत होती. यात गुगलमधील एका वरिष्ठाचा तसेच एका आय.टी. कंपनीतील ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या नावाचा समावेश होता. परंतु ही सर्व नावे मागे टाकून विवेक

 

कुंद्रा यांची निवड झाली. कुंद्रा यांच्यापुढे एक मोठे आव्हान उभे आहे. अमेरिकेतील मंदीच्या वातावरणात अनेक आय.टी. व तंत्रज्ञान कंपन्या होरपळल्या आहेत. त्यांना या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी जे भविष्यात ओबामा प्रशासन प्रयत्न करील त्यातील अनेक निर्णयांत कुंद्रा अग्रभागी असतील. गेल्या वर्षी कुंद्रा यांची नियुक्ती कोलंबिया डिस्ट्रिकच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारीपदी करण्यात आली होती. त्याचवेळी त्यांची व्हर्जिनिया राज्याच्या व्यापार व तंत्रज्ञान सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली. अशा प्रकारे एकाच वेळी दोन राज्यांसाठी काम करणारे ते पहिले अधिकारी होते. गेल्या वर्षी त्यांनी सुमारे १०० उद्योजकांसमवेत भारत दौरा केला होता. यातून त्यांना तेथील राज्यात ९९ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्यात यश आले होते. सरकारी नोकरीत दाखल होण्यापूर्वी कुंद्रा प्रथम इनव्हिंसिबल सॉफ्टवेअर या कंपनीत विपणन विभागाचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर ते क्रिओस्टार या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी होते. या कंपनीत असताना त्यांनी सरकार तसेच आय.टी. कंपन्यांना गव्हर्नन्स व धोरण आखण्यात विशेष मदत केली होती. त्यापूर्वी काही काळ ते व्हर्जिनिया कंपनीत पायाभूत तंत्रज्ञानाचे संचालक म्हणून कार्यरत होते. केवळ नऊ महिन्यांच्या कळातच त्यांनी उच्च प्रतीचे आय.नेट हे महानगरपालिकांना लागणारे सॉफ्टवेअर तयार केले. झुरिच, पॅरिस, बर्लिन या आघाडीच्या शहरात त्यांनी या कंपनीचा व्यवसाय वाढविला. कुंद्रा यांनी माहिती तंत्रज्ञानात एम.एस. केले असून अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातून मानसशास्त्रातही पदवी संपादन केली आहे. त्याशिवाय व्हर्जिनिया विद्यापीठातून त्यांनी राजकीय नेतृत्त्व या विषयावर पदवी मिळवली आहे. अमेरिकेतील आय.टी. उद्योगातील अनेक नामवंत पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. २००८ सालचा त्यांना इन्फो वर्ल्ड मासिकाचा आय.टी.तील उत्कृष्टतेचा पुरस्कार मिळाला. अमेरिकेत एवढी वर्षे राहिल्यावरही त्यांनी भारतीय भूमीशी आपले अतूट नाते ठेवले आहे. त्यांचा सर्वात आवडता चित्रपट आहे ‘शोले’. त्यांना आदर स्थानी आहेत महात्मा गांधी. अमेरिकेतील सध्याच्या मंदीच्या कठीण प्रसंगी आपल्यावर आलेली जबाबदारी आपण समर्थपणे पेलू याबाबत त्यांना ठाम विश्वास वाटतो. अर्थातच ते यात यशस्वी होतील आणि भारतीय पताका फडकवतील.