Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, २० जानेवारी २००९
विविध

रामलिंग राजूने स्वत:च मोठी रक्कम काढून घेतली?
न्यूयॉर्क, १९ जानेवारी / पी. टी. आय
.
सत्यम कॉम्प्युटरचे माजी प्रमुख बी. रामलिंग राजू यांनी कंपनीतून स्वत: मोठी रक्कम काढून घेतली असावी, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या एका वृत्तात म्हटले आहे. सध्या अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या जगातील चौथ्या क्रमांकावरील निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्यम कॉम्प्युटर्सच्या चेअरमनपदाचा राजीनामा देऊन मोकळे झालेले राजू यांनी कंपनी मोठा नफा कमावित असल्याचे चित्र वर्षांनुवर्षे जनतेसमोर उभे केले; परंतु या कंपनीच्या खात्यातून त्यांनीच स्वत: एक कोटी डॉलर इतकी रोख रक्कम काढून घेतली असावी आणि ‘सत्यम’च्या खात्यावर त्या रकमेची कोठेही नोंद ठेवलेली नसावी, असे एकंदरीत तपासातून दिसून येत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

सीमाप्रश्नी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची कर्नाटकची मागणी
बेळगाव, १९ जानेवारी/ पीटीआय

महाराष्ट्राला (कर्नाटकच्या हद्दीतील) एक इंचही जमीन दिली जाणार नाही, असे स्पष्ट करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सीमाप्रश्नी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. कर्नाटकच्या हद्दीतील बेळगाव व इतर मराठी भाषक प्रदेशांवरील आपला दावा महाराष्ट्राने सोडून द्यावा, यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करून महाराष्ट्राला मार्गदर्शन करावे, अशी मागणी येडीयुरप्पा यांनी केली आहे. कर्नाटक राज्य विधानसभेत येडीयुरप्पा म्हणाले, ‘‘(सीमाप्रश्नाबाबतचा) महाजन समितीचा अहवाल सर्वानी स्वीकारला आहे.

महसूल आयुक्तालयावरून सलोख्याने तोडगा काढण्याचे निर्देश
नवी दिल्ली, १९ जानेवारी / खास प्रतिनिधी

महसूल आयुक्तालयावरून लातूर आणि नांदेड दरम्यान निर्माण झालेल्या वादावर सर्व संबधितांना विश्वासात घेऊन सलोख्याने तोडगा काढण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिल्याचे विश्वसनीयरित्या समजते. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सायकांळी साऊथ ब्लॉक येथे कॉँग्रेस श्रेष्ठींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीस परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आगामी लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.

‘जबाबदारीच्या नव्या युगाची मुहूर्तमेढ करूया’
ओबामा करणार आवाहन
वॉशिंग्टन, १८ जानेवारी/एएफपी

अमेरिकन नागरिकांच्या ‘काहीही चालेल’ या संस्कृतीत बदल करून नव्या जबाबदारीच्या युगाची मुहूर्तमेढ करूया, असे आवाहन बराक ओबामा मंगळवारी आपल्या अध्यक्षीय भाषणात करणार आहेत. मंगळवारी अमेरिकेचे ४४वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ओबामा हे सूत्रे स्वीकारल्यानंतर आपले पहिलेवहिले अध्यक्षीय भाषण भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री १० वाजून ३० मिनिटांनी देणार आहेत.
ओबामा यांनी आठवडय़ाभरापूर्वी अनेक ऐतिहासिक भाषणे नजरेखालून घातल्यावर तयार केलेल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणतात की, आपल्याला जबाबदारीने वागून देशाला पुन्हा समर्थ करायला हवे. प्रवक्ते रॉबर्ट गिब्ज यांनी ‘फॉक्स न्यूज संडे’ला सांगितले. आफ्रिका-अमेरिकन वंशाचे पहिले अध्यक्ष ओबामा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जबाबदारीचे युग निर्माण होण्याची गरज आहे असे विचार मांडले. ओबामा यांनी नियुक्त केलेले कामकाज प्रमुख रहम इमॅन्युअल यांनी ही माहिती दिली. जबाबदारीभिमुख संस्कृतीची आपल्याला आवश्यकता आहे. अमेरिकन नागरिकांना हे फक्त सांगून चालणार नाही, तर नेत्याने आपल्या उदाहरणांनी तो आदर्श घालून देणे गरजेचे आहे, असे इमॅन्युअल यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ओबामा अमेरिकन नागरिकांना पुन्हा एकदा मूल्य पद्धती विकसित करण्याचे आवाहन करणार आहेत. ही पद्धती जबाबदारीचा आदर आणि बहुमान करील. आपण आपल्या देशाला काहीतरी देणेकरी लागतो, ही जाणीव जोपासणे गरजेचे असते.

मिशेल ओबामा यांच्याकडेच जगाचे लक्ष
वॉशिंग्टन, १९ जानेवारी / पी. टी. आय.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उद्या शपथ घेणारे बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा यांनाही उद्या राष्ट्राची प्रथम महिला नागरिक म्हणून मान मिळणार आहे आणि म्हणून त्यांचा अ‍ॅपिअरन्स कसा असणार आहे याकडेही जगाचे लक्ष लागले आहे.अमेरिकन आणि ब्रिटिश लोक फारच चोखंदळ समजले जातात. ओबामा यांच्या शपथग्रहण समारंभाला उपस्थित राहणाऱ्या ४५ वर्षीय मिशेल ओबामा यांचा ड्रेस कसा असणार आहे त्यांची केशभूषा कशी असणार आहे याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. रोडार्ट, हालस्टन, तसेच व्हाइट हाउसचे ड्रेस डिझायनर्ससह बऱ्याच डिझायनर्सनी यापूर्वीच अनेक स्केचेस तयार करून दिलेल्या असल्याने उत्तमोत्तम ड्रेस असणार यात वाद नाही. मात्र आजही मिशेल यांनी कोणत्या डिझायनरकडून गाउन शिवला त्याचे नाव गुलदस्त्यातच ठेवले गेले आहे.मिशेल १८ वर्षांच्या होत्या तेव्हापासून त्यांची वेशभूषा करणारे शिकागोचे मायकेल फ्लॉवर्स यांना रविवारपासून मिशेल यांनी बोलावून घेतलेले आहे. तेव्हा उद्या त्या कशा दिसणार याकडे जगभराच्या मीडियाचेही कॅमेरे रोखले गेलेले आहेत.
मार्टिन ल्युथर किंग यांना श्रद्धांजली
वॉशिंग्टन : आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत आर्थिक मंदीचे संकट आणि जगातील युद्धजन्य स्थितीचा सामना करण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना उद्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या बराक ओबामा यांनी आज नागरी हक्क नेते मार्टिन ल्युथर किंग यांना श्रद्धांजली वाहताना केली.

माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांची प्रकृती गंभीर
नवी दिल्ली, १९ जानेवारी/पी.टी.आय.

माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांना येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आज आठव्या दिवशीही गंभीरच असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. व्यंकटरमण यांना अतिसाराच्या त्रासामुळे गेल्या १२ तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती त्यांना मूत्रविकार, न्यूमोनिया व अन्य आजार असल्याचे स्पष्ट झाले. प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. ९८ वर्षीय आर. व्यंकटरमण यांनी १९८७ ते १९९२ या कालावधीत देशाचे आठवे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोग लागले कामाला!
नवी दिल्ली, १९ जानेवारी/खास प्रतिनिधी

यंदा एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात प्रमुख राजकीय पक्षांचे नेते, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी चर्चा आणि सल्लामसलतीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल, असे आज एका निवेदनाद्वारे आयोगाने स्पष्ट केले. ३ फेब्रुवारी रोजी लोकसभा निवडणुकांशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपसह सात राष्ट्रीय पक्ष तसेच ४० राज्यस्तरीय पक्षांना निवडणूक आयोगाने निमंत्रित केले आहे. ४ फेब्रुवारी रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली असून या बैठकीत मतदार याद्या आणि फोटो ओळखपत्रांच्या मुद्यावर चर्चा अपेक्षित आहे. ५ आणि ६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयुक्तांशी सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची चर्चा होईल. संसदेचे ‘अर्थसंकल्पीय’ अधिवेशन १२ ते २६ फेब्रुवारीदरम्यान होण्याची शक्यता असून चौदाव्या लोकसभेचे ते शेवटचे अधिवेशन ठरेल. त्यानंतर लगेच पंधराव्या लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाचा मानस असल्याचे म्हटले जात आहे. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकांचे मतदान पाच टप्प्यांमध्ये झाले होते.

कल्याणसिंह यांच्या भेटीचा मुलायम यांच्याकडून इन्कार
नवी दिल्ली, १९ जानेवारी/पी.टी.आय.

भारतीय जनता पक्षाचे नेते कल्याणसिंह यांची भेट घेतल्याच्या वृत्ताचा समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी आज इन्कार केला. मात्र, कल्याणसिंग यांचे चिरंजीव राजवीर हे सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवू इच्छीत असतील तर आम्ही त्याचे स्वागतच करू असे त्यांनी म्हटले आहे.कल्याणसिंह यांच्यासमवेत झालेल्या कथित भेटीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुलायमसिंह म्हणाले, ‘‘मी कल्याणसिंग यांची भेट घेतली तर तुम्हाला त्याची जाहीरपणे माहिती देईन. पण आमची भेट झाली नसताना तुम्ही अफवा पसरवत आहात.’’कल्याणसिंह यांच्या संभाव्य हालचालींविषयी विचारले असता मुलायमसिंह म्हणाले की, ते भाजपचे वरिष्ठ नेते असून त्यांच्याविषयी मला आदर आहे. त्यामुळे आपण त्यांच्याविषयी काही मत व्यक्त करणे योग्य होणार नाही. मुलायमसिंह आणि कल्याणसिंह यांच्यात काल भेट झाल्याची अफवा पसरली होती.

आसाममध्ये स्फोटके जप्त
दिफू, २० जानेवारी/पीटीआय

आसाममधील वेगवेगळ्या भागांमध्ये आज स्फोटकांचे साठे जप्त करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या वेळी राज्यात विविध ठिकाणी हल्ले घडवून आणण्यासाठी अतिरेकी गटांकडून हे साठे करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. करबी अन्गलॉन्ग जिल्ह्य़ामध्ये मोठय़ा प्रमाणावर स्फोटकं आणि शस्त्रास्त्रांचा साठा सैन्याने जप्त केला. प्रजासत्ताक दिनाच्या वेळी जिल्ह्य़ात हल्ले घडवून आणण्यासाठी करबी लोन्गरी नॅशनल लिबरेशन फ्रन्टच्या अतिरेक्यांनी ही स्फोटके साठवून ठेवली होती. भेलुघाट येथील जंगलांमध्ये केलेल्या कारवाईमध्ये हा साठा जप्त करण्यात आल्याचे सैनिकी सूत्रांनी सांगितले. जप्त केलेल्या शस्त्रास्त्र साठय़ामध्ये ३३७ रायफल्स, १६३ नऊ एमएम पिस्तुलं, ७.६२ एमएमची ९५ पिस्तुलं, ५०० ग्राम स्फोटकं , इत्यादी शस्त्रास्त्रे आहेत.

माकपचे ज्येष्ठ नेते बालानंदन यांचे निधन
कोची, १९ जानेवारी/पीटीआय

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व ‘सिटू’ या कामगार संघटनेचे माजी अखिल भारतीय अध्यक्ष ई. बालानंदन यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. माकपच्या पॉलिटब्यूरोचे माजी सदस्य असलेले बालानंदन कर्करोगाने आजारी होते.