Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
अग्रलेख

‘आय हॅव अ ड्रीम..!’

 

ओबामांच्या भाषणातून ओथंबणारा आत्मविश्वास आणि आशावाद याच गोष्टी सध्याच्या, मळभ आलेल्या वातावरणात अतिशय उत्साहवर्धक आहेत. अमेरिकन अर्थव्यवस्था अतिशय भन्नाट भोवऱ्यात सापडलेली आहे. परिणामी चीनपासून ते चिलीपर्यंत आणि आफ्रिकेपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत, सर्वत्र मंदी, बेकारी आणि असंतोष यांनी थैमान घातले आहे. ओबामा निवडून आल्यानंतर तीनच आठवडय़ांनी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला व्हावा आणि शपथविधीच्या अगोदर तीन आठवडे इस्रायलने गाझा पट्टीत हिंस्र बॉम्बहल्ला करून एक हजारांहून अधिक माणसे ठार करावी, या घटना योगायोगातून घडलेल्या नाहीत. पाकिस्तानी दहशतवाद्यांचे सूत्रसंचालक आणि इस्रायलचे आक्रमक राज्यकर्ते यांनी ओबामांना दिलेली ती सलामी आहे. या सलामीतून दिलेला इशारा हा आहे की, ‘‘असेल हिंमत तर ‘चेंज’ करून दाखव. गाठ आमच्याशी आहे. आम्ही कोणतेही नीतिनियम पाळत नाही आणि कुणाच्याही जिवाची पर्वा करीत नाही.’’ ओबामांकडून अमेरिकेच्याच नव्हे तर अवघ्या जगाच्याच अपेक्षा इतक्या उंचावल्या आहेत की त्यांना पराभूत ठरविणे हे अगदीच सोपे जाणार आहे. ज्यांना विजय तेंडुलकरांचे जीवनविषयक आणि हेन्री किसिंजर यांचे समष्टीविषयक तत्त्वज्ञान व निरूपण भावते वा पटते त्यांनी ओबामांच्या पराभवाची ट्रॅजेडी आजच लिहायला सुरुवात केली असेल! ओबामा जग बदलू शकतील का? किती प्रमाणात बदलतील? की प्रवाहपतित होतील आणि अमेरिकेतील प्रतिगामी व स्थितीतील व्यवस्थेचे तेच बळी होतील? एक मोठा प्रवाह जगात असा आहे की, तो ओबामांच्या निवडून येण्याने जगात व अमेरिकेत काहीही फरक पडणार नाही असे मानतो. अमेरिकेची ‘मूळ साम्राज्यवादी व आक्रमक प्रवृत्ती’ ओबामा बदलू शकणार नाहीत आणि खुद्द त्यांच्याच देशातील कृष्णवर्णीयांच्या जीवनात लक्षणीय बदल घडवून आणू शकणार नाहीत. या प्रवाहाच्या दृष्टिकोनातून जॉन मॅक् केन निवडून आले असते तरी काही बिघडत नव्हते! रिपब्लिकन असो वा डेमोक्रॅट, कृष्णवर्णीय असो वा गौरवर्णीय, महिला असो वा पुरुष, तरुण असो वयस्कर- या सर्व मामुली गोष्टी आहेत, परंतु या तथाकथित ‘तटस्थ’ (आणि ‘डाव्या’सुद्धा!) मंडळींनी बऱ्याच अंशी ओबामांच्या विरोधात मनोमन भूमिका घेतली होती. जर कुणीही येण्याने फरक पडत नाही तर ही मंडळी ओबामांच्या विरोधात व उदासीन का असा प्रश्न विचारायची प्रथा या उच्चभ्रू समाजात नाही. परंतु तितकाच हास्यास्पद प्रकारही सध्या आपल्या देशात चालू आहे. ‘भारतातला ओबामा कोण?’ असा शोध हे सर्व नाटककार या संभाव्य नव्या पात्राचा घेत आहेत. शरद पवारांपासून ते मायावतीपर्यंत आणि चंद्राबाबूंपासून मुलायमसिंगांपर्यंत अनेकजण त्या भूमिकेसाठी उत्सुक आहेत. असो. हे काहीसे विषयांतर अशासाठी केले की ओबामांचा ऐतिहासिक विजय किती सवंगपणे किंवा तथाकथित तटस्थपणे घेतला जाऊ शकतो, हे ध्यानात यावे. मुद्दा ओबामा काय बदल घडवून आणू शकतील इतकाच नाही. ते निवडून येणे हाच प्रचंड मोठा बदल आहे आणि पराभूततावाद्यांना ते उत्तर आहे. पुढील चार वर्षांत काय काय घडेल हे कुणीच ठामपणे सांगू शकणार नाही. परंतु गेल्या वर्षभरात जे घडले आहे तेच चित्तथरारक आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारीत जवळजवळ सर्व भाष्यकार व पत्रपंडितांनी गृहीत धरले होते की, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन असतील. जॉर्ज बुश यांची राजवट इतकी विघातक आणि विदारक होती की डेमोकॅट्र निवडून येणार हे गृहीत धरले जात होते. जॉर्ज बुश यांच्याबद्दल प्रेम व आस्था असणारे विद्वान भारतात मात्र होते, बुश यांच्यामुळेच भारत-अमेरिका अणुकरार झाला, बुश हे भारताच्या बाजूने आहेत आणि एकूणच रिपब्लिकन राजवट भारताच्या दृष्टिकोनातून हितकारक असते असे मानणाऱ्यांची एक मोठी टोळी आपल्या देशात आहे. या टोळ्याही ओबामा अयशस्वी वा निदान बदनाम होण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. म्हणूनच मुख्य प्रश्न हा विचारायला हवा की काय घडले म्हणजे ते ‘यशस्वी’ मानले जातील आणि त्यांना आताच अपयशी ठरविण्याची इतकी अहमहमिका का सुरू झाली आहे? गेल्या चाळीस वर्षांतली २८ वर्षे अमेरिकेत रिपब्लिकन राजवट होती, आणि १२ वर्षे डेमोक्रॅटिक पक्षाची. निक्सन-किसिंजर यांची रिपब्लिकन राजवट व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस, चिली, अंगोला अशा अमेरिकाप्रणीत हिंस्र आक्रमणांनी व्यापलेली होती. रोनाल्ड रीगन यांच्या राजवटीत मोकाट बाजारपेठीय तत्त्वज्ञानाबरोबर ‘स्टार वॉर्स’सारख्या प्रकल्पांना प्राधान्य मिळाले. लष्करी सामथ्र्य आणि भांडवली दांडगाई यांना एक वैचारिकच नव्हे नव-नैतिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. (याच काळात भारतात उग्र हिंदुत्त्ववाद, प्रखर नेहरू-इंदिरा विद्वेष आणि खासगी क्षेत्राचे ‘पावित्र्य’ वाढले हाही योगायोग नाही.) बुश यांच्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत ‘द क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स’सारख्या प्रबंधांचा केवळ पुरस्कारच नव्हे तर आक्रमक पाठपुरावा केला गेला. प्रथम निक्सन आणि नंतर रीगन यांच्या कारकीर्दीतच शीतयुद्धाने परिसीमा गाठली आणि सोविएत युनियनला नामोहरम करण्यासाठी सर्व प्रकारची कट-कारस्थाने जगभर केली गेली. मुस्लिम मूलतत्त्ववादी आणि दहशतवादी संघटनांना नरसंहारक शस्त्रास्त्रे आणि कोटय़वधी डॉलर्स पुरविले गेले. त्यातूनच बिन लादेन आणि अल् काईदाचा भस्मासुर निर्माण झाला. भारताच्या विरोधात पाकिस्तानातील लष्कराला व आयएसआयला जे संरक्षण व उत्तेजन मिळाले ते निक्सन-रीगन आणि बुश यांच्या कारकीर्दीतच. म्हणजेच आज जगभर जो दहशतवाद थैमान घालताना दिसतो तो मुख्यत: अमेरिकेतील रिपब्लिकन राजवटींचा परिपाक आहे. म्हणजेच शीतयुद्ध संपले तरी शीतयुद्धाच्या सावलीतून जग अजून बाहेर आलेले नाही. शीतयुद्धाचे निकष कालबाह्य़ झालेले आहेत असे मानणाऱ्यांना इतिहास समजत नाही आणि त्यामुळे वर्तमानकाळही उमजत नाही. साहजिकच त्यांना ओबामांच्या ऐतिहासिक विजयाची साक्ष पटली तरी संदर्भ कळत नाहीत. अमेरिकेतील उग्र गौरवर्णीय वंशवादाला रिपब्लिकन पक्षाचा सुप्त आशीर्वाद असे. याच प्रवृत्तींनी प्रथम जॉन केनेडी, नंतर रॉबर्ट केनेडी आणि कृष्णवर्णीयांचे नेते मार्टिन ल्यूथर किंग यांची हत्या केली. या खूनसत्रांच्या आणि कपटांच्या आधारेच निक्सन-किसिंजर सत्तेत आले होते आणि पुढे बुश यांनी तर फसवणुकीनेच अध्यक्षपद काबीज केले होते. ओबामांना ‘समाजवादी’ वा अगदी कम्युनिस्टही ठरवून प्रचार करण्याचा रिपब्लिकनांचा डाव त्याच जातकुळीतला होता. फॅसिस्ट शैलीतील अमेरिकन राष्ट्रवादाला उधाण आले ते ‘९/११’ नंतर. इराकवर हल्ला करून, शक्यतो इराकची फाळणी करून आणि एकूणच अरब देशांवर जरब बसवून जगातील बहुतांश खनिज तेल संपत्तीवर कब्जा करण्याचा अमेरिकेचा कट होता. अफगाणिस्तानवर बॉम्बहल्ला करून आम्ही आपणच उभ्या केलेल्या तालिबानी टोळ्यांच्या विरोधात पाकिस्तानला सिद्ध करण्याचे षड्यंत्रही त्यांचेच. प्रत्यक्षात पाकिस्तानच तालिबानी वृत्तीचा बनू लागला आणि पाकिस्तानी लष्कराने व आयएसआयने अमेरिकेलाच ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. याच आठ वर्षांच्या काळात बाजारपेठीय भांडवलशाहीचे तत्त्वज्ञान इतके मोकाट सुटले की, त्यामुळे बँका आणि वित्तसंस्थांना मंदीच्या अजगरी विळख्याने घेरले. अमेरिकेच्या इतिहासात इतका भयानक विळखा अमेरिकन अर्थव्यवस्थेला पडलेला नव्हता. असा अजगरी विळख्यात सापडलेला, युद्धाने वेढलेला आणि भस्मासुराने डोक्यावर हात ठेवलेला देश ओबामांच्या हाती सोपविला गेला आहे. या स्थितीत ओबामांनी निवडून येणे हाच मोठा, -त्यांचाच नव्हे, तर अमेरिकन जनतेचा - विजय होता. स्वातंत्र्यसंकल्पनेच्या ज्या अमेरिकन मूल्यांनी जगाला स्फूर्ती दिली त्यांना पायदळी तुडवायचा प्रयत्न त्यांच्याच देशातल्या उग्रवादी, वंशवादी, प्रतिगामी आणि मोकाट भांडवली टोळ्यांनी केला होता. कधी कपटाने तर कधी दिशाभूल करून अमेरिकन जनतेला ते फसवू शकले होते. ‘अमेरिकन ड्रीम’चे ‘अमेरिकन मिराज’मध्ये म्हणजे स्वप्नांचे मृगजळात रूपांतर झाले होते. ओबामांच्या येण्यामुळे मृगजळाने पुन्हा एकदा खऱ्या अमेरिकन स्वप्नांना जागा करून दिली आहे. बरोबर चाळीस वर्षांपूर्वी ‘ आय हॅव अ ड्रीम..’ असे उद्गार काढीत मार्टिन ल्यूथर किंग यांनी जी भावना व्यक्त केली होती तिचाच उच्चार आज ओबामांनी केला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वप्नसुद्धा आत्मविश्वास देते- ओबामांनी तोच अमेरिकन आत्मविश्वास जागृत केला आहे.