Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९

सिनेसृष्टीतील कलाकार तंत्रज्ञ एका ठिकाणी जमणे हा फार दुर्मिळ योग असतो. अलीकडेच १४ जानेवारी रोजी साजऱ्या झालेल्या १५ व्या नोकिया स्टार स्क्रीन पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने अवघे बॉलीवूड एकत्र आले होते. सुपरस्टार्सची मांदियाळी , तुफान परफॉरन्स आणि त्यातच सेलिब्रिटींमध्ये उडालेल्या खटक्यांचा मसाला मिळून एक अत्यंत चटपटीत कॉकटेल तयार झाले होते. पडद्यावर आपल्या अदाकारीने भल्याभल्यांना स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारे आणि तो ७० एमएमचा पडदा जिवंत करण्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांचा गौरव करण्यासाठी हे एक निमित्त होते. त्या संध्याकाळी साक्षात स्वप्ननगरी भूतलावर अवतरली होती असे म्हटले तरी अतिशयोक्तीचे ठरणार नाही.