Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

व्यापार - उद्योग

क्रीडा

अग्रलेख

विशेष लेख

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांतनिवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

भय दूर सारून आशावाद जोपासूया -ओबामा
वॉशिंग्टन २० जानेवारी/पीटीआय
आर्थिक मंदीसह अनेक आव्हानांनी ग्रासलेल्या अमेरिकेला आज नूतन अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात नवे भविष्य घडवण्याचे आश्वासक स्वप्न दाखविले. धास्तावलेल्या अमेरिकी जनतेला त्यांच्या या दमदार भाषणाने दिलासा मिळाला. अमेरिकेचे ४४ वे अध्यक्ष म्हणून कॅपिटॉल हिल येथे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्याकडून शपथग्रहण केल्यानंतर तेथे जमलेल्या ४० लाखांहून अधिक लोकांना ओबामांनी मंत्रमुग्ध केले. त्यांनी सांगितले की, अमेरिकेतील अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे, हे खरे असले तरी या कठीण आव्हानावरही आम्ही कसून मात करू. कठीण काळातच अमेरिकेचे चारित्र्य प्रकट होते, असा इतिहास आहे. सध्या असलेल्या समस्यांवर निर्धाराने व वेगाने ठोस उपाययोजना केल्या जातील. त्यादृष्टीने आपल्या पिढीवर एक नवी जबाबदारी येऊन ठेपली आहे. हा आमच्या परीक्षेचा काळ आहे. मात्र, त्यामुळे भयभीत होण्याचे कारण नाही. आम्ही भीतीऐवजी आशेला निवडले आहे. आपण सर्व समान आहोत.

आशावादी बोल.
जगातील मुस्लिमांना मी सांगू इच्छितो की, आम्ही एका नव्या वाटेने पुढे जाणार आहोत ही वाट परस्पर हिताची व आदराची असेल.
शांततेचा पुरस्कार करणाऱ्या सर्वाचा अमेरिका हा मित्र आहे.
अमेरिका पुन्हा एकदा जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे.
पोरकटपणा सोडून आपण अमेरिकेचे पुननिर्माण करण्यासाठी कंबर कसली पाहिजे.
आपल्यापुढची आव्हाने वास्तव आहेत पण त्यांचा समर्थपणे मुकाबला केला जाईल.
केवळ धनदांडग्यांना प्रोत्साहन देऊन अमेरिका मोठी होणार नाही.
आम्ही इराकमधून माघार घेऊ व तेथील जनतेला सूत्रे देऊ.

ओझोनच्या थराची समस्या इतिहासजमा होणार!
अभिजित घोरपडे
पुणे, २० जानेवारी

वातावरणात ४० ते ४५ किलोमीटर उंचीवर असलेला ओझोनचा थर पृथ्वीवर येणाऱ्या घातक अतिनील सूर्यकिरणांना रोखतो. हा संरक्षक थर विरळ होत असल्याचे १९८० च्या दशकात उघडकीस आले. त्यामुळे त्वचेचा कर्करोग, काही जिवांचे नामशेष होणे असे धोके जगासमोर असल्याचे स्पष्ट झाले. वातानुकूलन यंत्रणा, फ्रीज, स्प्रे आणि इतर काही वस्तूंमध्ये वापरण्यात येणारे सीएफसी वायू, हॅलॉन, मिथाईल क्लोराईड यासारख्या वायूंमुळे ओझोनचा थर विरळ होत होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघातर्फे या वायूंचे उत्पादन कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. या वायूंचे उत्पादन २००७ च्या अखेपर्यंत ८५ टक्क्य़ांनी कमी करण्याचे उद्दिष्ट घेण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यांचे उत्पादन ९० टक्के कमी करण्यात आले. आता २००९ च्या अखेपर्यंत या वायूंचे उत्पादन पूर्णपणे थांबविण्याचे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे. भारतानेही उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने प्रगती केलेली आहे. या वायूंचे भारतातील उत्पादन ९० ते ९५ टक्के थांबविण्यात आले आहे. त्यामुळे माणसाने ही पर्यावरणीय लढाई जवळपास जिंकली आहे, असे डॉ. शेंडे यांनी सांगितले. ओझोनच्या थराला पडलेले भोक वाढण्याची प्रक्रिया थांबल्याचे २००६ सालच्या अहवालात स्पष्ट झाले. त्यापुढच्या अहवालात मात्र या भोकाचा आकार वाढत असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत शेंडे म्हणाले की, वातावरणातील अनेक घटकांचा ओझोनच्या थरावर परिणाम होतो. त्यामुळे दरवर्षी किरकोळ चढ-उतार होतच असतात. मात्र गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहता ओझोनचा थर भरून निघत आहे. ओझोनच्या थराला मारक ठरणाऱ्या सी.एफ.सी.सारख्या वायूंचे आयुष्य जास्त असल्याने त्यांचा परिणाम येत्या ५० वर्षांत पूर्णपणे थांबलेला असेल. हे वायू ग्लोबल वॉर्मिगलासुद्धा कारणीभूत ठरतात. कार्बन डाय ऑक्साईडच्या एका रेणूमुळे जितके तापमान वाढते, त्याच्या सहा हजार ते आठ हजार पट अधिक तापमान सीएफसीच्या एका रेणूमुळे वाढते. त्यामुळे या वायूंचे प्रमाण कमी होणे हे ग्लोबल वॉर्मिग कमी करण्यासही उपयोगी ठरले आहे, असेही शेंडे यांनी सांगितले.

शरद पवार शिरुरमधून लढणार?
नवी दिल्ली, २० जानेवारी/ प्रतिनिधी

लोकसभेऐवजी राज्यसभेतून संसदेत जाण्याची इच्छा व्यक्त केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला विचार बदलून लोकसभेची निवडणूक लढविण्याचे आज जाहीर केले. मात्र पवार हे आपला पारंपारिक बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाहीत. बारामतीमधून पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांची उमेदवारी आज जाहीर करण्यात आली. यामुळे पवार शेजारील शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चिन्हे आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघातून राज्यसभेच्या खासदार ३९ वर्षीय सुप्रिया सुळे या निवडणूक लढवतील, असे पक्षाचे सरचिटणीस खासदार तारिक अन्वर यांनी जाहीर केले. त्यापाठोपाठ प्रफुल्ल पटेल व डी. पी. त्रिपाठी या दोन नेत्यांनी सुप्रियाच्या उमेदवारीस दुजोरा दिला. त्यामुळे पवार राज्यसभेवर जातील अशी अटकळ बांधण्यात येत होती. सायंकाळी नवी दिल्लीत बोलताना पवारांनी आपणही लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून लोकसभा निवडणूक लढवीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार हे मात्र त्यांनी सांगितले नाही. पवार हे शेजारील शिरुर (सध्याचा खेड मतदारसंघ) मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा गेली सहा महिने या मतदारसंघात सुरू होती. पवारांपुढे पुणे जिल्ह्य़ातील शिरुर किंवा मावळ या दोन मतदारसंघांचा पर्याय असला तरी ते शिरुरमधून निवडणूक लढवतील अशीच चिन्हे आहेत. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना निवडून येण्यात काही अडचण येणार नाही. शेजारील शिरुर मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीसाठी कठीण होती. कारण शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदारसंघ चांगला बांधला होता. पवार हे स्वत:च उमेदवार असल्याने राष्ट्रवादीला निवडणूक जिंकण्यात काहीच अडचण येणार नाही. तसेच या लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात पवारांमुळे राष्ट्रवादीला वातावरण अनुकूल राहणार आहे.

नारायण राणे यांनी काँग्रेसला आणखी थोडा वेळ दिला
मुंबई, २० जानेवारी / खास प्रतिनिधी
काँग्रेस पक्ष मोठा असून, केंद्र व अनेक राज्यांमध्ये पक्षाची सत्ता आहे. परिणामी काँग्रेस पक्षात निर्णय घेण्यास विलंब लागतो. त्यामुळे आपणही पक्षाला काही वेळ देत आहोत, असे सांगून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षातच राहण्याचे संकेत आज दिले. खुद्द काँग्रेसमध्येही राणे यांच्या समर्थकांनी पक्षश्रेष्ठींना ‘समजुतीचे’ धोरण घेण्याची विनंती केली होती. राणे हे शरद पवार यांनीच अलीकडे म्हटल्याप्रमाणे एक ‘शक्तीशाली’ नेतृत्व आहे. ते पक्षात नसतील तर येत्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्याचा प्रतिकूल परिणाम होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. काँग्रेसच्या नवी दिल्लीतील निरीक्षकांनाही तसेच वाटत होते, असे समजते. राणे यांच्याबाबत काहीच निर्णय होत नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. या पाश्र्वभूमीवर राणे यांनी समर्थक आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण केले होते. त्यांची मते राणे यांनी जाणून घेतली. काँग्रेसमध्ये राहायचे की अन्य कोणत्या पर्यायांचा विचार करायचा याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार समर्थकांनी राणे यांना दिले आहेत. मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आल्यानंतर आक्रमक झालेल्या राणे यांनी आता काहीशी सबुरीची भूमिका घेतली आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी ए. के. अ‍ॅन्टोनी यांची भेट घेऊन चर्चा केली. राज्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून मगच निर्णय घेतला जाईल, असे अ‍ॅन्टोनी यांनी आपल्याला सांगितले होते. तसेच लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती राणे यांनी दिली. काँग्रेस पक्ष मोठा असल्याने तेथे निर्णय घेण्यास विलंब लागतो. यामुळेच काँग्रेसला आपण काही वेळ देत असल्याचे राणे यांनी सांगितले.
काँग्रेसने आपल्याला माफी मागण्यास सांगितलेले नाही. पक्षश्रेष्ठींकडून बोलावणे येईल तेव्हा नवी दिल्लीत जाऊन राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत आपण आपले म्हणणे मांडू. ते विचारतील त्यावर उत्तरे देईन. पुढील राजकीय निर्णय लवकरच म्हणजे किती दिवस थांबून घेणार या प्रश्नावर राणे यांनी लवकरच एवढेच उत्तर दिले. अ‍ॅन्टोनी किंवा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत मंत्रिमंडळातील समावेशावर चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निलंबन मागे घेण्याची प्रक्रिया सुरू - अ‍ॅन्टोनी
नारायण राणे यांचे निलंबन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यांना लवकरच पक्षात फेरप्रवेश दिला जाईल, असे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. राणे यांच्याबरोबर आपली चर्चा झाली आहे, असे ते म्हणाले. अ‍ॅन्टोनी हेच पक्षाच्या शिस्तभंग समितीचे अध्यक्ष असल्याने निलंबन रद्द करण्याची प्रक्रिया त्यांच्याकडूनच होणार आहे.

कल्याणसिंग यांचा पुन्हा भाजपला ‘रामराम’
लखनौ, २० जानेवारी/पी.टी.आय.

अयोध्या चळवळीच्या दरम्यान भाजपचे ‘हिरो’ बनलेले उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंग यांनी आज दुसऱ्यांदा भाजपला ‘रामराम’ ठोकला. पक्षामध्ये मागासवर्गीयांना पुरेसे महत्त्व दिले जात नाही. तसेच उमा भारती, बाबूलाल मरांडी, मदनलाल खुराणा आदी जनाधार असलेल्या नेत्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेले काही दिवस आपण अस्वस्थ होतो. परंतु पक्षात राहून स्वत:शी प्रतारणा करणे शक्य नसल्याने आपण राजीनामा देत आहोत, असे कारण त्यांनी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांना लिहिलेल्या पत्रात दिले आहे. कल्याणसिंग गेले काही दिवस समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग तसेच त्यांचे साथीदार अमरसिंग यांच्या संपर्कात होते. कल्याणसिंग भाजपापासून दुरावल्याचे तेव्हापासूनच बोलले जात होते. माजी केंद्रीय मंत्री अशोक प्रधान यांना कल्याणसिंग यांचा विरोध डावलून बुलंदशहर येथून भाजपने येत्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. कल्याणसिंग यांचे पुत्र राजवीर सिंग यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी प्रधान यांनी प्रयत्न केल्याचा कल्याणसिंग यांचा आरोप होता. प्रधान यांना उमेदवारी देऊ नये ही आपली ‘छोटीशी’ विनंतीही फेटाळली गेली, असा आरोप कल्याणसिंग यांनी या पत्रात केला आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८