Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

भय दूर सारून आशावाद जोपासूया -ओबामा
वॉशिंग्टन २० जानेवारी/पीटीआय

 

आर्थिक मंदीसह अनेक आव्हानांनी ग्रासलेल्या अमेरिकेला आज नूतन अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात नवे भविष्य घडवण्याचे आश्वासक स्वप्न दाखविले. धास्तावलेल्या अमेरिकी जनतेला त्यांच्या या दमदार भाषणाने दिलासा मिळाला. अमेरिकेचे ४४ वे अध्यक्ष म्हणून कॅपिटॉल हिल येथे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्याकडून शपथग्रहण केल्यानंतर तेथे जमलेल्या ४० लाखांहून अधिक लोकांना ओबामांनी मंत्रमुग्ध केले. त्यांनी सांगितले की, अमेरिकेतील अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे, हे खरे असले तरी या कठीण आव्हानावरही आम्ही कसून मात करू. कठीण काळातच अमेरिकेचे चारित्र्य प्रकट होते, असा इतिहास आहे. सध्या असलेल्या समस्यांवर निर्धाराने व वेगाने ठोस उपाययोजना केल्या जातील. त्यादृष्टीने आपल्या पिढीवर एक नवी जबाबदारी येऊन ठेपली आहे. हा आमच्या परीक्षेचा काळ आहे. मात्र, त्यामुळे भयभीत होण्याचे कारण नाही. आम्ही भीतीऐवजी आशेला निवडले आहे. आपण सर्व समान आहोत. कुठल्याही देशाला मोठेपणा दिला जात नसतो, तर तो मिळवावा लागतो. त्यामुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाने परिश्रम करून देशाचे उज्ज्वल भवितव्य घडविले पाहिजे. अमेरिकेपुढे सध्या आर्थिक मंदीची समस्या असली तरी कामगारांची उत्पादनक्षमता कमी झालेली नाही. अशा सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि अमेरिकेचे पुनरुत्थान करण्यासाठी माझे प्रशासन वचनबद्ध आहे. आज या पहिल्याच भाषणात मी अमेरिकी जनतेला नवे भविष्य घडविण्याचा व उज्ज्वल इतिहास निवडण्याचा शब्द देत आहे. दहशतवादाचा प्रश्न उग्र रूप धारण करीत आहे. या पाश्र्वभूमीवर अफगाणिस्तानमध्ये आम्ही आणखी काम करून दाखवू. त्याचबरोबर इराकमधून माघार घेऊन तेथील सर्व सूत्रे त्यांच्या जनतेकडे सोपविली जातील. दहशतवाद्यांना पराभूत केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असा संकल्पही त्यांनी बोलून दाखविला. अमेरिकेला उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम व देशभक्ती या गुणांचा अंगिकार केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. शांततेवर प्रेम करणारा कुठलाही माणूस व कुठलाही देश हा आमचा मित्र आहे, असेही ते म्हणाले. पर्यावरणाच्या समस्येचा उल्लेख करीत ओबामा म्हणाले, ऊर्जेचा अतिरेकी वापर केल्यामुळे जागतिक तापमानवाढीचे संकट उग्र झाले आहे. त्यासाठी भविष्यात प्रदूषण टाळणारी इंधने वापरली जातील, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला जाईल. जी व्यवस्था फक्त श्रीमंतांचे हित पाहते, तिला भवितव्य नसते, असे सांगत ओबामांनी आपल्या भाषणाचा सामाजिक आशय अधिक ठळक केला आणि जात-धर्म-वंश यापलीकडे एक देश म्हणून उभे राहण्याचे आवाहन केले, तेव्हा उपस्थित जनसमुदायाने त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अमेरिकेचे सोळावे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी ज्या बायबलला स्मरून शपथ घेतली होती, त्याच बायबलच्या साक्षीने, भारतीय प्रमाणवेळेनुसार १० वाजून ३६ मिनिटांनी ओबामांनी शपथ घेतली.