Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
प्रादेशिक

साध्वी, पुरोहितसह ११ जणांवर आरोपपत्र
मालेगाव बॉम्बस्फोट

मुंबई, २० जानेवारी/प्रतिनिधी

गेल्या वर्षीच्या रमझान महिन्यात मालेगाव येथील मशिदीच्या बाहेर झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाशी संबंधित प्रकरणात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज साध्वी प्रज्ञासिंग व भारतीय लष्करातील एक निलंबित कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह एकूण ११ आरोपींविरुद्ध येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले. २९ सप्टेंबर रोजी झालेल्या या बॉम्बस्फोटात सात व्यक्ती मरण पावल्या होत्या व शंभरजण जखमी झाले होते. ‘एटीएस’चे सहाय्यक पोलीस आयुक्त व या प्रकरणाचे मुख्य तपासी अधिकारी मोहन कुलकर्णी यांनी हे आरोपपत्र महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखालील (मोक्का कायदा) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश वाय. डी. शिंदे यांच्यापुढे सादर केल

मुंडे यांचा शिवसेनेला टोला; तर गडकरी यांची मवाळ भूमिका
मुंबई, २० जानेवारी/प्रतिनिधी

शिवसेना-भाजप युती स्वाभिमानाने होईल. आम्ही संयमी आहोत दुबळे नाही. समंजस आहोत बावळट नाही, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी आज शिवसेनेला कडक इशारा दिला. त्याचवेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून शिवसेनेबरोबर असलेली भाजपची युती तुटावी अशी आमची जराही इच्छा नाही, अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज केली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून युतीचे किमान ३५ खासदार दिल्लीला पाठविण्याचा संकल्प गडकरी यांनी जाहीर केला.

‘सत्यम’वर ताब्यासाठी ‘एल अ‍ॅण्ड टी’ उत्सुक
मुबई, २० जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी

इंजिनीयरिंग क्षेत्रातील अग्रेसर कंपनी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लिमिटेडने (एल अ‍ॅण्ड टी) संकटग्रस्त सत्यम कॉम्प्युटरवर ताबा मिळविण्यासाठी सरकारकडे प्रयत्न सुरू केले असल्याचे विश्वसनीयरित्या कळत आहे. सत्यमवर नव्याने नियुक्त करण्यात सहा सदस्यांच्या संचालक मंडळानेही अनेक समस्यांनी वेढलेल्या या कंपनीच्या विलिनीकरण, विक्री, विभाजन यासाठी देशा-विदेशातून अनेकांनी स्वारस्य दाखविले असल्याचे स्पष्ट केले आहे. सत्यमच्या बीपीओ व्यवसाय संपादण्यासाठी एस्सार समूहातील कंपनी एजीस बीपीओने आपले इरादापत्र सरकारला सादर केले असल्याचे समजते.

‘नक्षत्रांचे देणे’ मध्ये ‘सखी मंद झाल्या तारका’
पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजात!

मुंबई, २० जानेवारी / प्रतिनिधी

पं. भीमसेन जोशी हे नाव उच्चारले की आपल्या मनात त्यांनी गायलेले अनेक अभंग किंवा चित्रपटातील ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ अशी गाणी उमटतात. दमदार आवाज हे त्यांचे वैशिष्टय़. मात्र पं. भीमसेन जोशी यांनी चक्क भावगीत म्हटले आहे. ते सुद्धा आपल्याला माहीत असलेले, असे सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र पंडितजींनी गायलेले ‘सखी मंद झाल्या तारका’ हे भावगीत झी मराठीवरील ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात रसिकांना ऐकायला मिळणार आहे.

आठवले यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघात शक्तिप्रदर्शन
मुंबई, २० जानेवारी / प्रतिनिधी

मतदारसंघाच्या शोधात असलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर आता लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारंघावर दावेदारी प्रबळ करण्यासाठी आठवले येत्या ८ फेब्रुवारी रोजी या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. रामदास आठवले यांचा पंढरपूर मतदारसंघ राखीव झाल्यामुळे आठवले सध्या मतदारसंघाच्या शोधात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या मगासवर्गीयांसाठी राखीव झालेल्या मतदारसंघावर त्यांचे लक्ष आहे. हा मतदारसंघ मिळावा, अशी त्यांनी जाहीरपणे मागणी केली आहे.

त्या संशयास्पद जहाजाचे काय झाले..?
मुंबई, २० जानेवारी / प्रतिनिधी

हद्दीचे कारण सांगून आपली जबाबदारी झटकण्याची पोलीसांची सवय २६/११ घटनेनंतरही गेलेली नाही. मुंबईच्या समुद्रातून एक संशयित नौका सोमवारी तुफान वेगाने दक्षिण मुंबईच्या दिशेने गेली होती. त्याबाबत पोलीसांना कळवूनही हे आमच्या हद्दीत नाही, त्यांच्याकडे विचारा असे सांगत आपली जबाबदारी दुसऱ्या पोलिस ठाण्यावर टाकणाऱ्या मुंबई पोलीसांचा अक्षम्यपणा नौका गायब प्रकाराने उघड झाला आहे. मुंबईवर हल्ला चढविणारे दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत दाखल झाल्याने समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस ठाण्यांना सतर्क तेचे आदेश देण्यात आले आहेत.

जोगेश्वरी- गोरेगाव येथे पालिका बांधणार उड्डाणपूल
मुंबई, २० जानेवारी / प्रतिनिधी

गोरेगाव आणि जोगेश्वरी पूर्व -पश्चिम जोडणारे दोन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी या पूलांचे काम सुरू करण्याचा सत्ताधारी शिवसेना-भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसआधीच सेना-भाजपची घाई सुरू असल्याची पालिकेत चर्चा होत आहे. गोरेगाव पश्चिमेकडील राम मंदिर ते पूर्वेला असलेल्या निरलॉन कंपनीपर्यंत हा पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल चौपदरी असणार आहे. जोगेश्वरी पूर्व- पश्चिमेला जोडणारा पूल स्वामी विवेकानंद रोड जंक्शन ते पूर्वेला क्रिस्टल इमारतीपर्यंत बांधण्यात येणार आहे. या दोन पुलांमुळे उपनगरातील सुमारे दहा लाख मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी सांगितले. या पुलांच्या कामाच्या निविदा ताबडतोब काढण्यात येणार असून आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. दोन वर्षांत हे पूल वाहतुकीसाठी खुले होतील, असेही वायकर यांनी सांगितले. या दोन्ही पुलांमुळे साधारण तीनशे घरांचे पुनर्वसन करावे लागणार असून त्याची तयारी पालिकेने केली आहे.

‘सावित्रीच्या लेकीं’ची शिवसेनेकडून दखल!
लोकसत्ता इफेक्ट
मुंबई २० जानेवारी / प्रतिनिधी

पालिका शाळांतील मुलींना प्रोत्साहन भत्ता लवकरात लवकर मिळेल यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरावे, असे आदेश शिवसेना नेत्यांनी आपल्या पालिकेतील नगरसेवकांना दिले आहेत. ‘लोकसत्ता’ने गेल्या शुक्रवारी ‘ सावित्रीच्या लेकी पालिकेतही उपेक्षित’ असे वृत्त दिले होते. या वृत्ताची शिवसेना नेत्यांनी गंभीर दखल घेतल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार निलम गोऱ्हे यांनी सांगितले. पालिका शाळांमध्ये मुलींची संख्या वाढावी म्हणून पालिकेने प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना सुरू केली. यासाठी अर्थसंकल्पात सहा कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे. मात्र गेल्या वर्षभरात एक दमडीही वाटण्यात आलेली नाही. प्रसारमाध्यमांत येणाऱ्या वृत्तांकडे शिवसेनेचे नेहमीच लक्ष असते. अशा वृत्तांची शिवसेना नेते आणि कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे दखलही घेत असतात. लोकसत्ताने दिलेल्या वृत्ताची शिवसेनेने दखल घेतली असून आपण स्वत: या बाबतीत महापौर शुभा राऊळ आणि इतर नेत्यांशी चर्चा करणार आहोत. सावित्रीच्या लेकींची पालिकेकडून उपेक्षा होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषादिनाच्या निर्णयाचे मान्यवरांकडून स्वागत
मुंबई, २० जानेवारी / प्रतिनिधी

प्रसिद्ध साहित्यिक कै. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्याच्या मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाचे साहित्य, पत्रकारिता, नाटय़ व शिक्षण क्षेत्रातून स्वागत करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मराठी भाषा, साहित्य, संस्कृती महाविद्यालयांपर्यंत पोहचण्यास नक्कीच मदत होईल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर, नाटककार रत्नाकर मतकरी, वामन केंद्रे, कमलाकर नाडकर्णी, राजकीय विश्लेषक राजू परूळेकर, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते उर्मिला पवार, अर्जुन डांगळे, प्राचार्य टी. ए. शिवारे, उदय माशेलकर, सुहास पेडणेकर, पत्रकार पद्मभूषण देशपांडे, मंदार परब, तुळशीदास भोईटे, युवराज मोहिते या मान्यवरांनी विद्यापीठाच्या निर्णयाचे स्वागत केल्याचे समतावादी छात्रभारतीने पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे. मुंबई विद्यापीठाचा हा निर्णय डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील सर्व विद्यापीठांमध्येही मराठी भाषा दिवस साजरा करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी आदेश जारी करावेत, अशी मागणीही या मान्यवरांनी केली आहे. मुंबई विद्यापीठात तसेच संलग्न महाविद्यालयांत कुसुमाग्रजांचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्याची मागणी समतावादी छात्रभारतीने केली होती.

बाळ सामंत यांच्यावर अंत्यसंस्कार
मुंबई, २० जानेवारी / प्रतिनिधी

जेष्ठ साहित्यिक बाळ सामंत यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. १८ जानेवारी रोजी बाळ सामंत यांचे नानावटी रूग्णालयात न्यूमोनियाच्या आजाराने निधन झाले होते. त्यांचे दोन मुलगे विजय व संजय अमेरिकेतून मुंबईत परतल्यावर अंत्यसंस्कार आज करण्यात आले. अंत्यसंस्काराला साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार एकनाथ ठाकूर, मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोक कोठावळे, समीक्षक विं. शं. चौगुले, व्यंगचित्रकार वसंत सरवटे, साहित्यिक सुभाष भेंडे, परचुरे प्रकाशनाचे आप्पा परचुरे, माजी सनदी अधिकारी शशिकांत दैठणकर यांच्यासह सामंत यांचे नातेवाईक, चाहते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दोन्ही मुलांचे आगमन झाल्यावर शिवाजी पार्कला सकाळी विद्युत दाहिनीत सामंत यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

तरुणीची आत्महत्या
मुंबई, २० जानेवारी / प्रतिनिधी

नायर रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय प्रशिक्षण घेणाऱ्या श्वेता कापसे (२७) या तरुणीने आज सायंकाळी गिरगाव येथील हॉस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. श्वेता ही मूळची नागपूरची आहे.