Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९

राष्ट्रवादीची ताकद अद्यापही मर्यादितच!
खास प्रतिनिधी

कुर्ला पोटनिवडणुकीतील पराभवामुळे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अद्यापही मर्यादित असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. या निकालानंतर तरी पक्षनेतृत्वाचे डोळे उघडतील व नेतृत्वबदल केला जाईल, अशी अपेक्षा पदाधिकारी व कार्यकर्ते करू लागले आहेत. गेल्या पाच वर्षांंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राज्यात सर्वत्रच वाढला. अगदी गेली चार दशके काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारसारख्या जिल्ह्य़ात राष्ट्रवादीने मुसंडी मारली. गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविताना राष्ट्रवादीला मुंबईत मात्र मर्यादित असे यश मिळाले होते.

टॅक्सींच्या खिळखिळाटाला आरटीओही जबाबदार!
कैलास कोरडे

शहरातील बहुतांश टॅक्सी अत्यंत दहा-पंधरा वर्षांहून जुन्या असून, त्यापैकी अनेक टॅक्सी पूर्णत: खिळखिळ्या झाल्या असून प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीच्या ठरणाऱ्या या टॅक्सींच्या दैन्यावस्थेला टॅक्सी मालक-चालक यांच्याप्रमाणेच प्रादेशिक परिवहन कार्यालयेसुद्धा (आरटीओ) त्यासाठी तितकीच जबाबदार ठरली आहेत. दरवाजा आहे तर, हॅंडल नाही. सीट आहे तर, कव्हर नाही. टायर गुळगुळीत झाले आहेत. आसने कळकट-मळकट आहेत. बाह्य रंग उडाला आहे. ब्रेक लाईट व टेल लाईट गायब आहेत. सांगाडे आवाज करीत आहेत..अशा प्रवाशांची हाडे खिळखिळी करणाऱ्या अशा अवस्थेतील अनेक काळ्या-पिवळ्या टॅक्सी सर्रास शहरातील रस्त्यांवर धावताना दिसतात.

संजय सूरकरांनी हात घातलाय ‘इच्छामरणा’ला
प्रतिनिधी

अनेक वर्षे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाचा मृत्यू होतो तेव्हा अभावितपणे अनेकांच्या तोंडून ‘सुटला’ असे उद्गार बाहेर पडतात. अत्यंत परावलंबी आणि यातनामय जीवन जगणाऱ्या रुग्णाला मरण्याची इच्छा असते. पण कायद्याने आजही इच्छामरणाला मान्यता नाही. एप्रिल महिन्याच्या सुमारास प्रदर्शित होणाऱ्या ‘सुखांत’ या चित्रपटात दिग्दर्शक संजय सूरकर यांनी ‘इच्छामरण’ या विषयाला हात घातला आहे. याबाबत विचारणा केली असता संजय सूरकर म्हणाले की, आई आणि मुलामधील नाते हे निरपेक्ष असते.

‘मोरबे’च्या पाण्याचा खळखळाट
मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस प्रचंड वेगानं वाढते आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शहराला उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांचाही कस लागत आहे. सध्या मुंबईची ४५०० दशलक्ष लिटर पाण्याची मागणी आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ३३५० दशलक्ष लिटर पाणीच मुंबईकरांना पुरविले जात आहे. भविष्यात मुंबईकरांची तहान आणखीन वाढणार आहे. भविष्यात पाण्यासाठी मुंबईकरांची दाहीदिशा वणवण होऊ नये यासाठी महापालिका आतापासूनच नियोजन करीत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिकेने नवी मुंबई महापालिकेकडून मोरबे धरणातील १०० दशलक्ष लिटर पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला होता.

भीती सायबर विश्वातील
Dear friend,
Sorry I didn't inform you about my traveling to UK for a program. I am currently stranded in London because I lost my wallet on my way to the hotel where my money, and other valuable things were kept. I need you to help me. Please assist me with a soft loan urgently with the sum of 1,200 GB Pounds to sort out my hotel bills and get myself back home. I will appreciate whatever you can afford.

मुंबईच्या सुरक्षेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची संधी
प्रतिनिधी

२६/११ नंतर सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनात सुरक्षेच्या संदर्भात निर्माण झालेल्या भीतीच्या पाश्र्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी या विषयावर चर्चा करण्याची संधी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय निरुपम यांनी उपलब्ध करून दिली आहे. गुरुवारी दुपारी जुहूमध्ये होणाऱ्या या समारंभात मुख्यमंत्री सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी विविध उपाय योजण्यात आल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात येते. तरीही सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनात अद्यापही असुरक्षिततेची भावना आहे. या पाश्र्वभूमीवर संजय निरुपम यांच्या पुढाकाराने विविध स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात मुंबईच्या सुरक्षेच्या संदर्भात सरकारने योजलेल्या उपायांची माहिती मुख्यमंत्री देणार असून, लोकांच्या प्रश्नांना ते उत्तरे देणार आहेत. हा कार्यक्रम सर्वसामान्यांसाठी खुला असल्याचे संजय निरुपम यांनी कळविले आहे. हा कार्यक्रम गुरुवारी दुपारी २.३० वाजता कमला रहेजा कॉलेज हॉल, विद्यानिधी शाळेच्या मागे, कैफी अस्मी पार्कजवळ, जुहू येथे होणार आहे.

‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा’चा मुहूर्त
प्रतिनिधी : ‘रंगनील’च्या बॅनरखाली कल्पना कोठारीनिर्मित व संजय मोने दिग्दर्शित ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा’ या नाटकाचा मुहूर्त खलनायक प्रेम चोप्रा यांच्या हस्ते शिवाजी मंदिर येथे झाला. यावेळी निर्माती कल्पना कोठारी, लेखक-दिग्दर्शक संजय मोने, किरण पोत्रेकर, अभिनेता जितेंद्र जोशी, श्वेता शिंदे, मानसी कुलकर्णी, नेपथ्यकार राजन भिसे, संगीतकार अशोक पत्की, सुकन्या कुलकर्णी, अतुल परचुरे, त्यागराज खाडिलकर, अमित भुरे आदी उपस्थित होते.माझ्यासारख्या ‘सज्जन’ माणसाचे नाव देऊन त्याच्या जीवनशैलीला साजेशा अशा या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला मी आवर्जून येईल, असे आश्वासन देत प्रेम चोप्रा यांनी नाटकाला शुभेच्छा दिल्या.या नाटकाचे लेखन संजय मोने व किरण पोत्रेकर यांनी संयुक्तरीत्या केले आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे, व् शिभूषा सुमुखी पेंडसे यांची असून, दिग्दर्शन साहाय्य नीलेश रानडे यांचे आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात ते रंगमंचावर येणार आहे.

आंतरराष्ट्रीय दहशतवादावर कुमार केतकरांचे भाषण
प्रतिनिधी : भाषाप्रभू कै. पु. भा. भावे यांच्या जन्मशताब्दी वर्षांचा योग साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने यंदाच्या ९ व्या वर्षांच्या व्याख्यानमालेचे आयोजन दणक्यात करायचे ठरवले असून येदा २३, २४ व २५ जानेवारी रोजी चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या सभागृहात तीन महत्वाच्या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शुक्रवार, २३ जानेवारी रोजी लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर गुंफणार आहेत.त्यांच्या भाषणाचा विषय ९/११ ते २६/११ - आंतराष्ट्रीय दहशतवादाचा एक प्रवास असा आहे. शनिवार, २४ जानेवारी रोजी अभिनेते शरद पोंक्षे तर रविवार, २५ जानेवारी रोजी ज्येष्ठ ज्योतिषशास्त्र अभ्यासक, संगीततज्ज्ञ, औषधनिर्मितीतज्ज्ञ डॉ. विद्याधर ओक गुंफणार असून दैव ७ कर्म हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. तीनही व्याख्याने रोज सायंकाळी ७ वाजता होणार आहेत. व्याख्यानमालेस रसिकांनी व जाणकार श्रोत्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महानगरापलिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

बहि:शालचा नाटय़प्रशिक्षणक्रम
नाटय़ प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागातर्फे ‘नाटय़प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या नव्या तुकडीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दहा महिने चालणाऱ्या या अभ्यासक्रमात १५ वर्षांवरील कुणालाही प्रवेश घेता येईल. प्रशिक्षणक्रमाचे समन्वयक भालचंद्र कुबल असून, विजय केंकरे, विनय आपटे, सतीश पुळेकर, अमिता खोपकर आणि रवि मिश्रा या रंगकर्मीचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थीना लाभेल. यात ७० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. हा अभ्यासक्रम शनिवार व रविवार या सुट्टय़ांच्या काळात चालणारा असल्याने विद्यार्थी व नोकरदारवर्गास तो सोयीस्कर आहे. अभ्यासक्रमात एकांकिका, पथनाटय़े यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाईल. प्रवेश आणि चौकशीसाठी बहि:शाल शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ, आरोग्य केंद्र इमारत, दुसरा मजला, विद्यानगरी परिसर, मुंबई-४०००९८ येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ६५९५२७६१/ ६५२९६९६२/ ९८२०२०२९२६ वर संपर्क साधावा.

तनाळी शाळेचा शतक महोत्सवी सोहळा
प्रतिनिधी : चिपळूण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, तनाळी या शाळेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त २४ ते २६ जानेवारीदरम्यान शताब्दी महोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून महापूजा, शिक्षक व मान्यवरांचा सत्कार, विद्यार्थी सभा, विद्यार्थी व ग्रामस्थ क्रीडा स्पर्धा, ध्वजवंदन, शोभायात्रा आदींचा त्यामध्ये समावेश आहे. आमदार डॉ. विनायक नातू यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. या सोहळ्यास अधिकाधिक मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.