Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
नवनीत

जी व न द र्श न
हिंदू

 

‘हिंदू’ याचे अनेक अर्थ आहेत. याच्या व्युत्पत्ती विविध आहेत. त्याची पुनरावृत्ती इथे नको. काहींना हिंदू ही जीवनशैली वाटते, तर काहींना ती रीत वाटते. याच्या चर्चाही झडताहेत. हिंदू हा शब्द सिंधुपासून तयार झालेला आहे. हे मत बऱ्याच अभ्यासकांनी गृहीत धरले आहे. हिंदू ही सार्वजनीन शुद्ध सामाजिक धारणा आहे. सार्वत्रिक सक्रिय सहिष्णुतेचे सगुण रूप म्हणजे हिंदू. जगण्यातली जाणीव, भूप्रदेशाविषयीची कृतज्ञता, राष्ट्रीय भावनांची अंगभूत कास आणि सामाजिक सहसद्भान यात अभिप्रेत आहे. सगळय़ांच्या सन्मानातली आदरार्थी भावना यामध्ये अनुस्यूत आहे. सर्व धर्माना आणि पंथांना सामावणारी विराट आत्मीयता यात आहे. ‘सह ना ववतु सह नौ भुनक्तु। सहर्वीय करवावहै।’ ही सनातन सद्भावना हिंदुत्वाच्या मुळाशी आहे. अकारण कुणावरही स्वत:हून हल्ला करण्याची कुवृत्ती इथे नाही. एकाला कमी लेखायचे आणि दुसऱ्याला स्वार्थासाठी चढवायचे असले आलेख यात नाहीत. ‘माता भूमि: पुत्रोऽहं पृथिव्याम्।’ अशी सद्वासना हिंदूंत आहे. सर्वाना सारखे मानून ज्याच्या त्याच्या गुणात्मक अधिकाराने एकमेकांना एकमेकांनी मानणे हे हिंदूपण आहे. विज्ञान आणि आत्मज्ञान यांचा मिलाफ यात आहे. ज्ञानाची व्रतस्थ साधना अखंड करण्याचे व्रत यात आहे. हिंदू हा जीवनावर अखंड प्रेम करणारा आहे. तो जीवनाला चिरंजीव मानतो आणि मृत्यूला स्वल्पविराम मानतो. म्हणून आजोबा नातवाच्या व आजी नातीच्या रूपाने जन्माला येते. तो निसर्गाला विराट ईश्वरात अनुभवतो. नद्यांना विश्वमाता म्हणून पूजतो. डोंगरांना देव समजून जत्रा भरवतो. देवळात जाण्यास त्याला सक्ती नाही. पण त्याची उत्कट गंभीर विवेकशक्ती ही श्रद्धा समजून तो आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायला तयार असतो. त्याची कृती आणि उक्ती विश्वासार्ह असते. आत्मविश्वास हा त्याचा कणा असतो. त्याला काळाचे उत्तम भान असते. पृथ्वीतला शब्द, जलातला रस, तेजातला प्रकाश, वायूतला यशस्पर्श, आकाशातला व्यापकपणा त्यात असतो. तो मानवतेला नित्य जपतो. समजून-उमजून वागतो. जशास तसे असतो. तरीही उत्तम माणूस नक्की आहोत, ही सार्थ जाणीव आहे.
यशवंत पाठक

कु तू ह ल
ताऱ्यांचं आयुष्य

ताऱ्याचं आयुष्य किती असतं? ते कशावर अवलंबून असतं?
वायुमेघांच्या प्रसव वेदनेतून तारा जन्माला येतो म्हणजेच उष्णता आणि प्रकाश देऊ लागतो. उष्णता, प्रकाश, क्ष-किरण अवरक्त किरण, अतिनील किरण या सर्व विद्युतचुंबकीय लहरी आहेत. या लहरी हे ऊर्जेचे स्वरूप आहेत. यातील ज्या ऊर्जेची संवेदना डोळय़ांना जाणवते त्यालाच आपण ‘प्रकाश’ म्हणतो. ताऱ्यातील ऊर्जानिमिर्तीसाठी हायड्रोजन या इंधनाचा वापर होतो. चार हायड्रोजनचे अणू एकत्र येऊन हेलियमचा एक अणू निर्माण होतो. या प्रक्रियेत जी ऊर्जा मिळते तीच उष्णता व प्रकाश इ. स्वरूपात आपणास सूर्याकडून मिळते. व्यवहारात आपण इंधन शब्द वापरतो. उदाहरणार्थ, कोळसा. कोळसा हे इंधन जळते तेव्हा त्याचा ऑक्सिजनशी संयोग होतो व ऊर्जा मिळते. हायड्रोजन आणि लाकूड या दोघांनाही इंधन म्हटले असले तरी दोन्हींपासून ऊर्जा मिळण्याच्या प्रक्रिया वेगळय़ा आहेत. एक अणू संमिलनाची प्रक्रिया आहे आणि दुसरी रासायनिक प्रक्रिया आहे.
हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर हेच ताऱ्याचे खरे स्थिर आयुष्य आहे. माणसाच्या जीवनातील २५ ते ३५ वर्षे वयापर्यंतच्या अवस्थेसारखी ही अवस्था आहे. ताऱ्याच्या या अवस्थेचा काळ प्रत्येक ताऱ्याच्या बाबतीत भिन्न भिन्न असतो. हायड्रोजनचे रूपांतर हेलियममध्ये होण्याचा कालखंड किती असेल, हे ठरविणारा प्रमुख घटक म्हणजे ताऱ्याचे वास्तुमान. एक किलो हायड्रोजनचे रूपांतर ९९३ ग्रॅम हेलियममध्ये होताना सात ग्रॅम वस्तुमान घटते व त्याचेच रूपांतर ऊर्जेत होते. सूर्यासारख्या ताऱ्यामध्ये ही क्रिया दहा ते बारा अब्ज वर्षे चालू राहील. ज्यांचे वस्तुमान सूर्याच्या निम्मे आहे, त्यांचे आयुष्य चाळीस ते पन्नास अब्ज वर्षे तर सूर्यापेक्षा पंचवीसपट वस्तुमानाचे तारे ही क्रिया सत्तर लाख वर्षांतच संपवतील. यानंतर हेलियमचे ज्वलन होऊ लागते व ताऱ्यांत विविध बदल होऊलागतात. ताऱ्याचे स्थिर आणि एकाच स्थितीत अनेक वर्षे राहण्याचे आयुष्य इथे संपते असे म्हणावे लागेल. त्यातही किती विविधता आहे ते पहा.
हेमंत मोने
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
लेनिन

आधुनिक रशियाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारा ब्लादिमीर इलिच उल्यानोव्ह म्हणजेच लेनिन. २२ एप्रिल १८७० चा जन्म. झारशाही विरोधात आवाज उठवणाऱ्या लेनिनला तिसाव्या वर्षीच हद्दपारी ठोठावली गेली. १९१७ रोजी झारशाही संपताच लेनिन रशियात परतला. झारला फासावर लटकावून त्याने सत्ता ताब्यात घेतली. अंतर्गत व बाह्य़ शत्रूंशी सामना करीत त्याने क्रांती घडवून आणली. दहशतवादाचा आसरा घेत अनेक सुधारणा घडविल्या.. खासगी जमीन मालकी रद्द, उद्योगांचे राष्ट्रीयीकरण, स्त्रियांना मताधिकार, लष्कराचं सैनिकीकरण, राजकारणापासून धर्माची फारकत, अशी पावले उचलणारा लेनिन २१ जानेवारी १९२४ ला मृत्यू पावला. त्याच्या स्मरणार्थ ‘पेट्रोग्राड’चे नाव ‘लेनिनग्राड’ करण्यात आले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
कविता सुचली

वर्गात शिंदे बाई म्हणाल्या, ‘मनात आणलं तर तुम्हा सगळय़ांना छान लिहिता येतं, कविता करता येतात. अगदी प्रत्येकाला! आज अभ्यासाऐवजी कविता करणार?’ सगळी मुलं मोठय़ांदा म्हणाली, ‘होऽ ऽऽ ऽ आम्ही आज कविता करणार.’
बाईंनी कविता लिहायला वेळ दिला. प्रत्येक जण हातात पेन घेऊन समोर वही ठेवून विचारात दंग झाला. थोडय़ा वेळाने प्रतीक्षाने हात वर केला.
‘अरे वा! झाली लिहून? वाच बरं तुझी कविता प्रतीक्षा’, शिंदे बाई म्हणाल्या.
‘आकाश उंच, निळा रंग
कोण देतं, चढून उंच
खटय़ाळ वारा, सो सो भरारा
पडल्याशिवाय धावतो कसा ’
- प्रतीक्षाने कविता वाचली. सगळय़ांनी टाळय़ा वाजवल्या. ‘सुंदर’, शिंदे बाईंनी कौतुक केलं. तोपर्यंत आणखी काही हात वर झाले. संस्कार उठला. वाचू लागला-
‘ एक फुगा खूप फुगला । आभाळात उंच वर वर गेला।
वाऱ्याशी खेळला पक्ष्यांशी बोलला। चांदोबाच्या घरी झोपून गेला। ’
बऱ्याच जणांनी कविता वाचल्या. दिनेशचे लक्षच नव्हते. तो टारगटपणे शेरे देऊन प्रत्येकाच्या कवितेला हसत होता. शिंदे बाईंना ते आवडलं नाही. ‘दिनेश तुझी कविता वाच’, त्या म्हणाल्या. त्यानं कविता केली नव्हती. त्याला येतही नव्हती. बाईंनी त्याला उभं केलं तास संपेपर्यंत.
संध्याकाळी दिनेश सायकलवरून घरी जाताना एका खड्डय़ात सायकल गेली आणि तो बाजूला फेकला गेला. काही कोंबडय़ा तिथं होत्या. एकजण म्हणाली, ‘हा मुलगा पाहा, त्याला उडता येतं’ तिघी त्याच्याभोवती गोळा झाल्या.
एक म्हणाली, ‘ ट्रिंऽग ट्रिंऽऽग सायकल धाव धाव धावली। दिनेशला घेऊन धपकन पडली। ’ दोघीजणी हसल्या आणि म्हणाल्या,‘बिच्चारा दिनेश। रडत बसला। सायकलचा पण। स्पोक तुटला।’ पहिली कोंबडी म्हणाली, ‘एक मात्र गोष्ट। फार बरी झाली। दिनेशला रडताना। कविता सुचली। ’ रडायचं थांबून दिनेश म्हणाला, ‘अगं, आहात तरी कोण? इथं काय करताय?’ तिघी एकदम म्हणाल्या, ‘कविता’ दिनेश म्हणाला, ‘अरेच्या कवीचा अनुभव म्हणजे कविता तर!’ पाहतो तर कोंबडय़ा नव्हत्याच तिथं.
प्रत्येकात प्रतिभा असतेच. जो तिचा वापर करतो तो असामान्य होतो, करत नाही तो सामान्य जीणं जगतो.
आजचा संकल्प- माझ्यात नेमकी कोणत्या विषयातली प्रतिभा आहे ती मी शोधेन आणि तिचा वापर करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com