Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९

तीन रुपयांचा जिझिया कर कमी होणार
रिक्षा प्रवाशांना दिलासा

नवी मुंबई/प्रतिनिधी

नवी मुंबईतील रिक्षा प्रवाशांना ठाणे, मुंबईकरांच्या तुलनेत मीटरमागे मोजावी लागणारी तब्बल तीन रुपयांची अतिरिक्त रक्कम कमी करण्याच्या दृष्टीने अखेर परिवहन विभागाने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या शहरात पुरेशा प्रमाणात सीएनजी केंद्रे नाहीत, हे एकमेव कारण पुढे करीत मागील सहा महिन्यांपासून नवी मुंबईकरांना मीटरमागे १३ रुपये मोजावे लागत आहेत. हा भाडेदर कमी करण्याच्या दृष्टीने आता प्रयत्न सुरू झाले असून, लवकरच यासंदर्भात एक प्रस्ताव तयार केला जाणार आहे.

नवी मुंबईकरांना आता कमांडोजचे कवच
नवी मुंबई/प्रतिनिधी

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एनएसजीच्या धर्तीवर राज्यात एखादे सुरक्षा दल उभारण्याच्या प्रक्रियेने वेग धरला असतानाच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी आपल्या दलात ४० कमांडोंचे खास पथक तयार केले आहे. नवी मुंबई पोलीस दलात नव्याने सहभागी झालेल्या २२ ते २५ वयोगटातील तरण्याबांड युवकांचा या पथकात समावेश करण्यात आला असून या कमांडोजना लष्करी प्रशिक्षणाकरिता पाठविण्याची तयारीही पोलिसांनी सुरू केली आहे.

हद्दपारीची कारवाई रद्द करण्यासाठी शेकापचा उरण पोलीस ठाण्यावर मोर्चा
उरण/वार्ताहर : सेझविरोधात लढणाऱ्या शेकाप कार्यकर्त्यांविरोधात केलेली हद्दपारीची कारवाई शासनाने १५ दिवसांत मागे न घेतल्यास शेकाप जिल्हा पातळीवर आंदोलन उभारेल, असा इशारा पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी उरण पोलीस ठाण्यावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी दिला. उरण, पेणमध्ये महामुंबई सेझ येऊ घातला आहे. या विरोधात आंदोलनात सहभागी झालेले शेकापचे माजी जि. प. सदस्य यांच्यावर उरण पोलिसांनी विविध गुन्हे दाखल करून त्यांना दोन वर्षांंसाठी हद्दपार केले असल्याचा शेकापचा आरोप आहे. उरण पोलिसांनी शासनाच्या दबावातून ही कारवाई केल्याच्या निषेधार्थ रविवारी शेकापने उरण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

विविध क्षेत्रातील गुणीजनांचा गौरव
मल्हार महोत्सवाचा शानदार समारोप

पनवेल/प्रतिनिधी : श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मल्हार महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. या कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, अभिनेते विजय पाटकर तसेच मंडळाचे रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील, शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुडेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील गुणीजनांचा गौरव करण्यात आला. आजच्या तणावाच्या वातावरणात या महोत्सवाने सामान्य नागरिकांना मोठा आनंद दिला आहे. आपण गेल्या व यावर्षी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.

राष्ट्र रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन
बेलापूर/वार्ताहर : भारतात बहुसंख्येने असलेल्या हिंदूंनी आपले राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी एकत्र आले, तरच देशावरील दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देता येईल, असे आवाहन नेरुळ येथील धर्मजागृती सभेत करण्यात आले. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी धर्मशक्ती सेनेचे विनय पानवळकर म्हणाले की, काश्मीरपासून महाराष्ट्रापर्यंत धर्मांधांकडून अत्याचार केले जात आहेत. हिंदूंनी धर्माचरण केले, तरच ते राष्ट्र रक्षणासाठी संघटित होऊ शकतील. समितीचे महाराष्ट्र प्रवक्ते रमेश शिंदे यांनी हिंदूंना ‘भगवे अतिरेकी’ ठरविणाऱ्या काँग्रेसने मुंबईवरील दहशतवादी हल्ला करणाऱ्यांचा रंग स्पष्ट करावा, अशी मागणी केली.
हिंदूंनी धर्माचरणाचा त्याग केल्याने समाजाला अनंत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाने अस्मिता जागृत करावी, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केले. अन्य धर्मीयांना नव्हे, तर केवळ हिंदूंनाच संघटित करण्यासाठी संघटना स्थापाव्या लागत असल्याबद्दल अखिल भारतीय सिंधी शिक्षा संघाचे अध्यक्ष प्रेम तोलानी यांनी खंत व्यक्त केली. या सभेला २५०० राष्ट्रप्रेमी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रेम शुक्ल यांचेही भाषण झाले.

‘नवयुवकांनी परिवर्तनाचे कार्य हाती घ्यावे’
डॉ. अभंग बंग यांना धामणकर पुरस्कार प्रदान

पनवेल/प्रतिनिधी : नवीन पिढीतील कार्यकर्ते व तरुण समाज परिवर्तनाचे कार्य हाती घेत नाहीत, तोपर्यंत समाजशुद्धीला पर्याय नाही, असे मत महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग यांनी पनवेल तालुक्यातील शांतीवन येथे आयोजित करण्यात आलेल्या मित्रमेळाव्यात व्यक्त केले. यावेळी डॉ. बंग यांना भाऊसाहेब धामणकर प्रेरणा पुरस्कार देण्यात आला. ५० हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्यात सर्वत्र सध्याचे जनजीवन धावपळीचे व अशांत झाले आहे. नवी मुंबई व पनवेलला लागूनच असलेले हे शांतिवन मात्र अशांती दूर करणारा दिवा आहे, असा गौरव डॉ. बंग यांनी केला. गडचिरोलीतील आदिवासींचे अन्न असलेल्या मोहाच्या फुलांपासून दारू करण्याचा कारखाना तेथे उभारण्याची योजना आखली जात आहे, परंतु तसे झाले तर आदिवासींच्या पोटावरच पाय येणार असल्याने सर्वानी त्यास विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले. अंध मुलांसाठी काम करणाऱ्या बदलापूरच्या सुहासिनी मांजरेकर यांना शांताबाई धामणकर तर पत्रकार प्रतिमा जोशी यांना ताराबाई धर्माधिकारी पुरस्कार देण्यात आला. जानराव फरीद, नंदकुमार यादव, बाबुराव महाजन यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, पुणे महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, मीनल मोहाडीकर आदी उपस्थित होते. या मेळाव्याचे प्रास्ताविक शांतिवनचे कार्यवाह गोविंद शिंदे यांनी केले.

चुकीची दुरुस्ती
नवी मुंबई वृत्तान्तच्या मंगळवार, २० जानेवारीच्या अंकात पहिल्या पृष्ठावर प्रसिध्द झालेल्या छायाचित्राच्या ओळीमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांचा उल्लेख अनवधानाने देवीदास चौगुले असा झाला आहे. संबंधितांना या चुकीमुळे झालेल्या मनस्तापाबद्दल दिलगीर आहोत. - व्यवस्थापक