Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९

मांज्यामुळे शहरातील पक्ष्यांवर ‘संक्रांत’
* नेचर क्लबचे सर्वेक्षण * ११ पक्षी मृत्युमुखी, ३६ पक्ष्यांचा बचाव

प्रतिनिधी / नाशिक

मकर संक्रातीचा सण पतंग उडवून उत्साहाने साजरा झाला असला तरी याच पतंगींसाठी वापरलेला काच लावलेला धागा अर्थात मांज्यामुळे शहरातील असंख्य पक्ष्यांवर अक्षरश सक्रांत कोसळल्याचे नेचर क्लब ऑफ नाशिक या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. नुकत्याच झालेल्या संक्रांतीच्या दिवशी व त्याच्या आगे-मागे पतंगीच्या धाग्यात अडकून अनेक पक्षी जखमी झाले तर ११ पक्षांना आपले प्राण गमवावे लागले. या पाश्र्वभूमीवर, राबविलेल्या पक्षी बचाव मोहिमेंतर्गत घुबड, कबुतर, रानबगळा अशा ३६ वेगवेगळ्या पक्ष्यांना वाचवण्यात संस्थेला यश आले आहे.

केवळ अज्ञान हेच कारण नव्हे!
बोगस डॉक्टर : शोध आणि बोध

अनेकदा या ना त्या कारणामुळे बोगस डॉक्टरांचा विषय चर्चेत असतोच. फुटकळ उपचार करून ठिकठिकाणी डॉक्टर म्हणून मिरविणारी ही मंडळी नेमकी असतात तरी कोण आणि त्यांचा असा सुळसुळाट का होतो याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास अनेक बाबी उघड होतात. मुळात ग्रामीण वा वनवासी भागात प्रामुख्याने आढळणाऱ्या या बोगस डॉक्टरांच्या वाढत्या संख्येमागे केवळ ग्रामीण जनतेचे अज्ञान एवढेच एकमेव कारण आहे, असे अजिबात नाही. त्यामागे इतरही अनेक कारणे आहेत. मुख्य म्हणजे बहुसंख्य परवानाधारक नोंदणीकृत डॉक्टर ग्रामीण भागात जायला फारसे उत्सुक नसतात. इंटर्नशिपच्या काळात आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यापूर्वीही खरे तर या डॉक्टरांची उपलब्धी शासनाने ग्रामीण भागात सक्तीची केली आहे.

महापालिकेला बस सेवेसाठी मिळणार अर्थसहाय्य..
प्रतिनिधी / नाशिक

मागील दहा वर्षांपासून महापालिकेने बघितलेले शहर वाहतूक बस सेवा सुरु करण्याचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे असून केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने दोन जानेवारी रोजी पाठविलेल्या पत्रान्वये प्रत्येक महानगरपालिकेला जवाहरलाल नेहरु पुनरुत्थान योजनेतंर्गत शहर बस सेवा सुरु करण्यासाठी अर्थ सहाय्य देण्यात येणार असल्याची माहिती महापौर विनायक पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेतंर्गत नविन बस घेण्यासाठी अनुदान मिळणार आहे. यासाठीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरात महानगरपालिकेची बस सेवा सुरु करावी यासाठी महासभेत प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.

..राष्ट्रवादीने स्वीकारला आंदोलनाचा पर्याय
प्रतिनिधी / नाशिक

शहरातील कचरा उचलणाऱ्या घंटागाडीचे व्यवस्थापन करणे सद्यस्थितीत अवघड झाले असताना आणि पाणीपट्टी वसुलीचे कामही योग्य पद्धतीने होत नसल्याने त्यावर खासगीकरणाचा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असताना आणखी एक नवीन सेवा पुरविण्याची महापालिकेला आवश्यकता काय, असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रस्तावित बससेवेला जोरदार विरोध करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. बससेवा सुरू करण्याविषयी महापौरांनी घोषणा केल्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर जमून या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहर वाहतूक बस सेवा महापालिकेने स्वत: चालविल्यास विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरून महापालिकेवर मोर्चा
प्रतिनिधी / नाशिक

आदर्श अंगणवाडी मॉडेल पद्धतीने महापालिकेच्या सर्व अंगणवाडय़ा एकाच पद्धतीने बांधाव्यात, अंगणवाडी मुख्य सेविका, सेविका व मदतनिसांना नियमित वेतनश्रेणीवर पालिका सेवेत सामावून घ्यावे, भविष्यनिर्वाह निधी व विम्याची कपात करावी आदि मागण्यांसाठी मंगळवारी समता कर्मचारी संघटनेच्यावतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी महिलांना महापालिका सेवेत कायम करण्याचे निर्देश खुद्द पालकमंत्र्यांनी दिले असताना प्रशासन कार्यवाहीस दिरंगाई करीत असल्याचा आरोप यावेळी मोर्चेकऱ्यांनी केला.

चाळीसगाव क्रीडा संकुलासाठी एक कोटीची मदत
पालकमंत्री सतीश पाटील यांची ग्वाही

चाळीसगाव / वार्ताहर

शहरात क्रीडा संकुल बांधण्याचा प्रस्ताव आल्यास शासनाकडून एक कोटी रूपयांचे सहाय्य मिळू शकेल. तसेच एका सुसज्ज व्यायामशाळेसाठी दोन ते अडीच लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन जळगाव जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सतीश पाटील यांनी दिले. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी आणि आ. बं. हायस्कुलच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन आ. अरूण गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली तर खा. वसंत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी पाटील बोलत होते.

कोंढावळ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे माळी विजयी
वार्ताहर / शहादा

तालुका पंचायत समिती कोंढावळ गणाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने आपली जागा कायम राखली असून भीमराव भिला माळी हे सुमारे अडीच हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे गोविंद पाटील यांना पराभूत केले. कोंढावळ गणातून राष्ट्रवादीचे जयपालसिंग रावल हे विजयी झाले होते. तसेच ते ब्राह्मणपुरी गटातही विजयी झाले होते. नंतर ते नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले. दरम्यान, त्यांनी कोंढावळ गणात राजीनामा दिल्याने या गणात पोटनिवडणूक जाहीर झाली. राष्ट्रवादीचे भीमराव माळी व काँग्रेसचे गोविंद पाटील यांच्यात सरळ लढत होऊन माळींना तीन हजार ५९८ मते तर पाटील यांना एक हजार ४४ मते मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीने आपली जागा कायम राखण्यात यश मिळविले. शहादा पंचायत समितीत एकूण २८ जागा आहेत, त्यापैकी १९ जागा राष्ट्रवादीने बळकावल्या आहेत.

शालेय पोषण आहारात केळीच्या समावेशाचा विचार - डॉ. पाटील
वार्ताहर / रावेर

कुपोषणाचे प्रमाण कमी करायचे असेल तर शालेय पोषण आहारात ‘केळी’ चा समावेश करणे गरजेचे असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. सतीष पाटील यांनी येथे दिली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथे सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी होते. आपल्या भाषणात पाटील म्हणाले की, शालेय पोषण आहारात केळी व दुधाचा समावेश करण्याचा निर्णय शेतकरी हिताचा असून राज्यातील कुपोषणाचे प्रमाण थांबविण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होईल. तालुक्यात पुन्हा मागणी केल्यास पणन महामंडळाच्या सहकार्याने कोल्ड स्टोअरेजसाठी प्रयत्न करू तसेच हतनूर धरणात साचलेला ५० टक्के गाळ व ५० टक्के पाणी असे न करता धरणात साचलेला गाळ काढून पूर्ण पाणी साचेल याबाबत उपाययोजना करण्यात येतील असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी आ. मधु जैन, आ. अरूण गुजराथी, खा. अॅड. वसंत मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ईश्वरलाल जैन, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सोपान पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, नगराध्यक्ष हरिष गणवाणी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय गरूड, बाजार समितीचे सभापती डॉ. राजेंद्र पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्तविक राजीव पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अॅड. योगेश गजरे यांनी केले.

धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचा खर्च ५० कोटींनी कमी
अनिल गोटे यांचा दावा
धुळे / वार्ताहर

काही राजकीय शत्रूंकडून निर्माण केलेल्या अडथळ्यांमुळेच मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचे काम दीर्घकाळ रेंगाळले तरी अलिकडे रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर हालचाली झाल्याने नुकतेच रेल्वे मार्गाबाबत अंतिम सर्वेक्षण पूर्ण झाले, तसेच रेल्वे मार्गासाठी येणारा खर्च ५० कोटींनी कमी झाला आहे, अशी माहिती लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येत्या महिनाभरात या रेल्वे मार्गाच्या आखणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे शंभर वर्षांपासून धुळेकरांनी बाळगलेले रेल्वे मार्गाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. या कामाला रेल्वे प्रशासनाकडून गती मिळाली आहे. १४ जानेवारी रोजी रेल्वे मार्गासंदर्भातील अहवाल दिल्लीला पोहोचविण्यात आला.गेल्या आठ महिन्यापासून रेंगाळला होता, असेही गोटे यांनी सांगितले. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गासाठी साधारणपणे १५०१ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता तो १४५०.४१ कोटीवर आला आहे. म्हणजे या मार्गाचा खर्च तब्बल ५० कोटीने कमी झाला आहे. यामुळे हा रेल्वे मार्ग होणारच यावर शिक्कामोर्तब झाल्याचेही त्यांनी सांगितले.रेल्वे मार्गावर ‘ब’ दर्जाची २२ तर ‘ड’ दर्जाची १२ स्थानके असतील. एकूण ४० रेल्वे स्थानके असणारा नियोजित रेल्वे मार्ग राज्यातील नाशिक आणि धुळे जिल्ह्य़ातून तर मध्य प्रदेशातील बडवाणी, खरगोन, धार आणि इंदूर या जिल्ह्य़ातून जाईल. रेल्वे मार्ग मनमाड ते महूपर्यंत महामार्ग क्रमांक तीनला समांतर असा मालेगावपर्यंत येईल. पुढे मालेगाव ते महूपर्यंतही तो समांतरच असेल. धुळे तालुक्यातील बोरविहीर हा मार्ग धुळे-चाळीसगाव या रेल्वेमार्गाला जोडला जाईल. मोहाडी हे मुख्य स्थानक असेल, असे या अहवालात नमूद असल्याचे गोटे यांनी सांगितले. याशिवाय प्लॅटफॉर्म, रस्ते, इंजिन दुरूस्तीचे शेड, रेल्वे स्वच्छ करण्याच्या व्यवस्थेचाही नव्या सर्वेक्षणात समावेश आहे.