Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
विशेष
(सविस्तर वृत्त)

हे विश्वचि माझे घर!

 

विज्ञान म्हणजे केवळ संशोधन आणि त्यातून लागलेले शोध एवढाच मर्यादित अर्थ नाही. विज्ञान हा जगातील मानवी समुदायांना जोडणारा सेतू आहे. आजपर्यंतच्या काळात खगोलशास्त्रानेही मानवी संस्कृती, समाज यांना जोडण्याचे हे काम फार मोठय़ा प्रमाणात केले आहे. इ.स. २००९ हे खगोलशास्त्र वर्ष म्हणून साजरे करण्याचा ठराव आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने २३ जुलै २००३ रोजी सिडनी येथे झालेल्या अधिवेशनात सर्वप्रथम मांडला होता. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी २० डिसेंबर २००७ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने इ. स. २००९ हे खगोलशास्त्र वर्ष म्हणून साजरे करण्याचा इटलीने मांडलेला ठराव मंजूर केला. विशेष म्हणजे इटली हा गॅलिलिओची जन्मभूमी असलेला देश. खगोलशास्त्र वर्ष साजरे करण्याची जबाबदारी ‘युनेस्को’ला देण्यात आली. जगातील बहुतांश देशांत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी क्रांती होत आहे, त्याचा उत्कंठावर्धक अनुभव घेता यावा, हा या संकल्पनेमागचा मूळ हेतू आहे. ‘द युनिव्हर्स, युवर्स टू डिस्कव्हर’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या वर्षांतील विविध उपक्रमांचा फायदा माणसाला त्याचे विश्वातले स्थान नेमके काय आहे हे समजून घेण्यासाठी होणार आहे.
विज्ञानाच्या कुठल्याही शाखेत झालेल्या मूलभूत संशोधनाचा उपयोग हा सरतेशेवटी मानवी जीवन सुखकर करण्यासाठी होतो आहे. खगोलशास्त्रातील अशा शोधांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उपयोग माणसाला होतो आहे. खगोलशास्त्र ही विज्ञानशाखा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ‘जागर’ आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेच्या (आयएयू) माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्षांच्या उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम १५ व १६ जानेवारीला पॅरिसमध्ये उत्साहात पार पडला. अनेक देशातील वैज्ञानिकांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. या उपक्रमात शेकडो देश सहभागी आहेत. त्यात अर्थातच भारताचाही समावेश आहे. खगोलशास्त्र वर्षांच्या निमित्ताने आपल्या देशातील विविध उपक्रमांचे संयोजन करण्यासाठी इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स म्हणजेच ‘आयुका’ या पुण्यातील संस्थेची निवड करण्यात आली आहे. खगोलशास्त्र वर्षांनिमित्त उद्घाटनाचा कार्यक्रम ‘आयुका’मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. खगोलशास्त्रातील सैद्धांतिक व गुंतागुंतीच्या गोष्टी सोडून सोपे खगोलशास्त्र सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या निमित्ताने व्हायला हवे,अशी अपेक्षा डॉ. नारळीकर यांनी व्यक्त केली. ‘आयुका’ या संस्थेच्या वतीने वर्षभरात आकाशदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय खगोलशास्त्राची रंजक व सचित्र माहिती देणारी डायरीही ‘आयुका’ने सादर केली आहे. डॉ. जयंत नारळीकर व डॉ. टी. पद्मनाभन यांची ही संकल्पना आहे. ‘आयुका’ च्या संकेतस्थळावर या डायरीची सविस्तर माहिती दिलेली आहे. वर्षभर खगोलनिरीक्षण करण्यासाठी मार्गदर्शक नकाशे व इतर बरीच माहिती त्यात आहे.
बंगळुरू येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स’ या संस्थेचा भारतीय खगोलशास्त्राची ओळख करून देणारा चित्ररथ यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात लक्षवेधी ठरणार आहे. याच संस्थेने ४ इंच अ‍ॅपरचरची दुर्बिण देशभरात उपलब्ध करून देण्याची योजना हाती घेतली आहे. खगोलशास्त्र लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही दुर्बिण किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. आकाशातील ४००
ग्रहगोल या दुर्बिणीतून पाहता येतील. गुरु, शुक्र, चंद्रावरची विवरे यांचे दर्शन घेता येईल. जास्तीत जास्त शाळा किंवा हौशी निरीक्षकांनी ूँं३@्रंस्र्.१ी२.्रल्ल. या पत्त्यावर या दुर्बिणीची मागणी नोंदवावी, असे आवाहन या संस्थेचे एस. चटर्जी यांनी केले आहे. चार हजार दुर्बिणीची मागणी आली तर ही दुर्बिण तीन हजार रुपयात उपलब्ध होणार आहे. खगोलशास्त्राबाबत समाजात जागृती घडवायची असेल तर त्यासाठी दुर्बिण हे मुख्य साधन आहे, त्यामुळे या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.
rajendra.yeolekar@gmail.com