Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
विशेष

दुष्काळात तेरावा..
गेले काही महिने जागतिक अर्थकारणात मंदी या एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेला ‘सब-प्राईम’ प्रकरणाने लावलेल्या सुरूंगामुळे ती चर्चा सुरू झाली आणि जगभरच्या अर्थव्यवस्था त्यात ओढल्या गेल्या. प्रत्येक देशात प्रत्येकच अर्थव्यवस्थेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी समस्येला सततच सामोरे जावे लागत असते. देश-कालानुरुप त्याबाबत धोरणेही आखली जातात. सध्याच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात अशा धोरणांचा अनुकूल-प्रतिकूल परिणाम कधीच त्या देशापुरेसा मर्यादित राहात नाही. एरवीही अमेरिकेला किंवा अमेरिकेत काहीही (आणि कितीही नगण्य झाले) झाले तरी ‘जणू काही ते ‘एकमेकाद्वितीय’ असल्यासारखे त्याला ‘सेलिब्रेटी’ स्टेटस् देण्याची पद्धतच अलीकडे रूढ झाली आहे. आता हेच पाहा ना, सब प्राईम क्रायसिसच्या नुकसानाचा आकार जास्तीत जास्त एक ट्रिलियन (एक लाख कोटी) डॉलर्स आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचे आकारमान कमीत कमी तीस ट्रिलियन (तीस लाख कोटी) डॉलर्स आहे. त्यामुळे एक-तीसांश भागासाठी एवढी चर्चा कशाला? पण त्या घोटाळ्याच्या वाहत्या गंगेत आता सारेच सोयीस्करपणे हात धुवून घेत आहेत. या र्सवकष, सर्वदूर, सर्वागीण प्रयत्नामुळे सध्या जागतिक मंदीची चर्चा जोरात आहे. कारण काहीही असले तरी अशी मंदी आणि त्याबाबतची कृतिशील किंवा कृतीहीन चर्चा हा नेहमीच एक महत्त्वाचा ‘मार्केट मेकर’ असतो.

हे विश्वचि माझे घर!
विज्ञान म्हणजे केवळ संशोधन आणि त्यातून लागलेले शोध एवढाच मर्यादित अर्थ नाही. विज्ञान हा जगातील मानवी समुदायांना जोडणारा सेतू आहे. आजपर्यंतच्या काळात खगोलशास्त्रानेही मानवी संस्कृती, समाज यांना जोडण्याचे हे काम फार मोठय़ा प्रमाणात केले आहे. इ.स. २००९ हे खगोलशास्त्र वर्ष म्हणून साजरे करण्याचा ठराव आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने २३ जुलै २००३ रोजी सिडनी येथे झालेल्या अधिवेशनात सर्वप्रथम मांडला होता. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी २० डिसेंबर २००७ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने इ. स. २००९ हे खगोलशास्त्र वर्ष म्हणून साजरे करण्याचा इटलीने मांडलेला ठराव मंजूर केला. विशेष म्हणजे इटली हा गॅलिलिओची जन्मभूमी असलेला देश. खगोलशास्त्र वर्ष साजरे करण्याची जबाबदारी ‘युनेस्को’ला देण्यात आली. जगातील बहुतांश देशांत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी क्रांती होत आहे, त्याचा उत्कंठावर्धक अनुभव घेता यावा, हा या संकल्पनेमागचा मूळ हेतू आहे. ‘द युनिव्हर्स, युवर्स टू डिस्कव्हर’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या वर्षांतील विविध उपक्रमांचा फायदा माणसाला त्याचे विश्वातले स्थान नेमके काय आहे हे समजून घेण्यासाठी होणार आहे.

‘काय रे, बाबल्या, असो घामाघूम जावन् खयसून आयलय?’
‘काय सांगतलय, तालानु, रांग लावक गेलयय, पण काम झाला बुवा एकदाचा.’
‘कसली रे, रांग? ह्य़ा मुंबयत संडासापासून स्मशानापर्यंत सगळीकडे रांग असता!’
‘तात्यानु, सध्या मुंबयत एकच रांक आसा, म्हाडाच्या सस्तातल्या घरासाठी..’
‘त्या रांकेत उभ्या रवन् तुका काय मेल्या घर मिळताला? त्यापेक्षा दगडार डोक्या आपटून घे..’
‘म्हणजे आम्ही परयतन् करू नये की काय? आणि सगळ्यो जागा त्या भैयान मिळवच्यो काय?’
‘जय, थय तुका भैयाच दिसतत.. जो पंधरा वर्षां महाराष्ट्रात रवतासा तो यासाठी नियमान अर्ज करू शकता, मग तो खयच्याय राज्यातलो का असाना..’
‘म्हणजे मुंबयतल्ये ह्य़ो जागा मराठी माणसाक मिळूच्यो नाय काय?’
‘मिळतल्यो. पण तुमी नियमात बसल्यात आणि नशीबान लॉटरी लागली तरच..’
‘पण तात्यानु, माका एक समजणा नाय तुमी कधीपासून या भैय्यांची बाजू घेवक् लागल्यात?’
‘बाजू घेवचो प्रश्न नायरे, मुंबय- महाराष्ट्र असो संकुचित विचार आता सोडून द्या. आताच्या युगात या मराठी माणसान जगात संचार करूक होयो. जगाच्या खयच्याच देशात तुका सरदारजी नाय तर मारवाडी सापडतत, तशी मराठी माणसां सापडूक होयी.’
‘..म्हणजे मुंबयक तुम्ही जाव नकात आणि जगात संचार कारा, असाच तुमचा म्हणणा आसा..’
‘तसा नाय रे कोकणातलो हो चाकरमनी मुंबयक नाय तर न्यूयॉर्कक, टोकियोक, लंडनाक जावक होयो. मुंबई आमची आसाच.. पण जगय आमचाच आसा.. जगात आपला नाव गाजूक ह्य़ोया!’
‘तात्यानु, त्या मोठय़ो गजाली उगाच करू नकात. आमका मुंबयत एक लाहानसा घर, एक नोकरी मिळाली तरी पुरे. आम्ही आपली लहान माणसा आसोव.’
‘ह्य़ाच चुकता आपल्या कोकणी माणसांचा.’
‘या मुंबयत सध्याच्या दरात आमका तरी घरा परवडूची नाय. मंदी आल्यान घरांच्यो किंमती घसरल्यो असा म्हणतत. पण ती तरी किंमत परवडतासा खयं? म्हणूनच म्हाडाच्या घरांसाठी मी अर्ज करतसय.’
‘चतकोर खावक चार डोकी, तसा झालासा. फ्लॅटची संख्या हजारात आणि अर्ज करणारे लाखात. त्याशिवाय पैशे घेवक आतून नंबर काढून देणारे असततच.’
‘नाय, नाय तात्यानु, यावेळी म्हाडांन चॅलेंज दिलासा. लॉटरीच्या सॉफ्टवेअरसुद्धा तपासूक ठेवलासा.’
‘काय मेलो, सॉफ्टवेअर तपासतासा, त्या कामपुटराचा ‘लाग इन’ तरी करुक येता काय? तु काय सोताक नारायणमूर्ती समाजतय की काय?’
‘माका काय तेचेतला कळता, मी आपला तेंनी सांगला ता मी तुमका सांगल्यानी?’
‘काय रे, तुका मुंबयत होयी कित्याक जागा, रिटायर झाल्यार जा गावाक आणि रव थयसर टाळ कुटत!’
‘अहो, तात्यानु आमच्या गावाकय भैयांन जागा घेवक सुरुवात केलीसा.’
‘मग तुझी गावची जमीन विकू नको, त्या भैयाक.’
‘नाय नाय. अजाबात नाय. मी गावाची जमीन ठेवतय् आणि म्हाडाचो फ्लॅटय् घेतलंय. मी चललय फॉर्म भरूक.’
‘भर रे बाबा फॉर्म आणि पुढच्या महिन्यात आंगणेवाडीची जत्रा आसा, त्यावेळी फ्लॅटचो नंबर लागण्यासाठी देवीक नवस करं.’
प्रसाद केरकर
prasadkerkar73@gmail.com