Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९

चित्रपटगृहे, मॉल्स, शिक्षण संस्थांना दक्षतेचा इशारा
पुणे, २० जानेवारी/प्रतिनिधी

दहशतवादी हल्ल्याविषयी केंद्रीय यंत्रणांनी पुणे पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील सर्व चित्रपटगृहे, मॉल व शैक्षणिक संस्थांसह महत्त्वाच्या संस्थांना दक्षतेचा इशारा दिला आहे. बुलेटप्रुफ असलेली खास ‘लाईट आर्मर्ड ट्रप व्हेईकल’ आज आयुक्तालयात दाखल झाली असून, कमांडो पथकासह राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ाही सज्ज झाल्या आहेत. दरम्यान, स्कार्फ अथवा अन्य कोणत्याही प्रकारे चेहरा झाकून दुचाकीस्वारांनी शहरातील रस्त्यांवर फिरू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

‘बीआरटीच्या मार्गावर रस्ता ओलांडण्याची सुविधाच नाही’
पुणे, १४ जानेवारी/प्रतिनिधी

बीआरटीच्या प्रवाशांना, तसेच या रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याची कोणतीही सुविधा नसल्याने या मार्गावर पादचाऱ्यांचे अपघात वाढत असून बीआरटी मार्गावर रस्ते ओलांडण्याची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.बीआरटी मार्ग ओलांडताना एका एसटी कर्मचाऱ्याचा सोमवारी मृत्यू झाला. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर ‘पादचारी प्रथम’चे संस्थापक प्रशांत इनामदार यांनी आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.

काची यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी नगरसेवकांची ‘एकी’!
पुणे, २० जानेवारी/प्रतिनिधी

काँग्रेसचे सहयोगी नगरसेवक राजन काची यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केल्यानंतर त्यांच्यावर खटला दाखल करण्यासाठीचा प्रस्ताव अखेर आज मागे घेण्यात आला. ही कारवाई टाळण्यासाठी महापालिका आयुक्त आणि सर्वपक्षीय नगरसेवकांची ‘एकजूट’ झाली आणि या एकजुटीने त्यांच्यावरील कारवाई टाळण्यात सर्वानाच ‘यश’ आले. एका व्यापाऱ्याकडून लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात नगरसेवक काची यांना गेल्यावर्षी अटक झाली होती.

प्राचार्यपदाकरिता आता पात्र उमेदवाराचा शोध!
पुणे, १९ जानेवारी/खास प्रतिनिधी

पूर्णवेळ प्राचार्याची नियुक्ती करण्याबाबत उच्च न्यायालय आणि विद्यापीठाने सक्तीचा ‘धडा’ दिल्यानंतर आता संलग्न महाविद्यालये व संस्थांमध्ये पात्र उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली आहे; परंतु या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात तरी अनेक महाविद्यालये-संस्थांच्या पदरी निराशाच पडली आहे.
पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीतील पाचशेहून अधिक महाविद्यालयांपैकी तब्बल तीनशेपेक्षा अधिक ठिकाणी पूर्णवेळ प्राचार्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

‘साहेब देशी’चे विद्यार्थी-शिक्षक घेताहेत पुण्यात ‘धडे’!
पुणे, १९ जानेवारी/खास प्रतिनिधी
ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये मॅकॉले यांच्या अहवालानुसार भारतीय शिक्षणपद्धतीची रचना करण्यात आली असली, तरी आता ‘साहेब देशी’चे विद्यार्थी-शिक्षक विद्येच्या माहेरघरात शैक्षणिक धडे गिरवित आहेत! त्याचबरोबर वर्गापुरत्याच बंदिस्त राहिलेल्या अध्यापन प्रक्रियेला शिक्षणेतर उपक्रमांची प्रभावी जोड कशी द्यायची, याबाबत खुला संवादही ते साधत आहेत. निमित्त आहे भारत-ब्रिटन शैक्षणिक आदान-प्रदान उपक्रमाचे! पुण्यातील बालशिक्षण प्रशालेतील काही विद्यार्थी गेल्या वर्षी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले होते.

पौड रस्ता, विद्यानगर भागात उद्या सायंकाळी पाणी नाही
पुणे, २० जानेवारी/प्रतिनिधी

वारजे जलकेंद्र येथील विद्युतविषयक दुरुस्तीची कामे गुरुवारी (२२ जानेवारी) केली जाणार असल्यामुळे पौड रस्ता, भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, पाषाणसह अनेक भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी सायंकाळी बंद राहणार आहे. गुरुवारी सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत. पौड रस्ता, उजवी व डावी भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भूगाव रस्ता व परिसर, सूस रस्ता, बाणेर, बालेवाडी आणि पाषाण.विद्यानगर पंिपग स्टेशनमधील कामांमुळे विद्यानगर आणि धानोरी या भागांचा पाणीपुरवठाही गुरुवारी (२२ जानेवारी) सायंकाळी बंद राहणार आहे.या सर्व भागांचा पाणीपुरवठा शुक्रवारी (२३ जानेवारी) नेहमीप्रमाणे होईल, असे कळविण्यात आले आहे.

पिंपरीचे नगरसेवक जावेद शेख यांना तडीपारीची नोटीस ?
पिंपरी, २० जानेवारी/प्रतिनिधी
पिपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांना निगडी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेख यांना तडीपार करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. शेख यांना बजावण्यात आलेली नोटीस त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे.
पिंपरीचे सहायक पोलीस आयुक्त प्रभाकर पाटील यांच्या आदेशानुसार निगडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील दरेकर यांनी शेख यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार त्यांना सुनावणीसाठी एसीपी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. जावेद शेख हे पिपरी पालिकेवर बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. त्यांच्यावर खुनासारख्या गंभीर गुन्ह्य़ांसह १६ वेगवेगळ्या गुन्ह्य़ांची नोंद आहे. या सर्व गोष्टींची दखल घेऊन पोलिसांनी शेख यांच्यावर दोन वर्षांसाठी जिल्ह्य़ाबाहेर तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. शेख यांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात येणार आहे. त्यानंतरच याबाबतचा पुढील निर्णय होणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.