Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

नाशिकमधील ३०० टॉवर्सवर कारवाईची शक्यता
नाशिक, २० जानेवारी / खास प्रतिनिधी

 

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी विनापरवाना उभारण्यात आलेल्या सुमारे ३०० टॉवर्स विरुद्ध पालिकेने मोहिम हाती घेतली असून संबंधितांना अंतिम नोटीसा बजावण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. अशा विनापरवाना टॉवर्स पैकी सुमारे १०० प्रकरणे परवानगीसाठी पालिकेकडे आल्यानंतर आता त्यातून तब्बल दीड ते दोन कोटींची वसुली होवू शकते अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी येथे दिली.
नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रहिवाशी इमारती, व्यापारी संकुल वा काही खासगी जागांमध्ये मोठय़ा प्रमाणात टॉवर्स उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भारत संचार निगम लिमिटेडचे ६२, रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेडचे ४६, आयडीया सेल्युलरच्या ७७, भारती सेल्युलर ५४, टाटा इंडिकॉम लिमिटेड २३, व्होडाफोन एस्सार सेल्युलर लिमिटेड २८ आणि व्टिलीप इंटरनेटचा एक अशा सुमारे ३०० टॉवर्सचा समावेश आहे. अलीकडेच मोबाईल टॉवर्समुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो अशी ओरड स्थानिकांकडून सुरु झाली होती. त्याची दखल पालिका प्रशासनाने घेत कार्यक्षेत्रात विनापरवाना उभारण्यात आलेल्या जवळपास सर्वच टॉवर्सधारकांना अंतिम नोटीसा देण्याची कार्यवाही केली होती. या कारवाईनंतर पालिकेकडे सुमारे १०० प्रकरणे परवानगीसाठी प्राप्त झाली असून त्यामधून दीड ते दोन कोटींची वसुली दंडात्मक कारवाई पोटी होवू शकते असा पालिकेचा दावा आहे. मोबाईल टॉवर्सच्या उभारणीसाठी परवानगी देताना इमारतीचे बांधकाम, मनोऱ्याचे डिझाईन सक्षम असल्याचे प्रतिज्ञापत्र संबंधितांकडून घेण्यात येणार आहे. इमारतीचे मालक व कंपनीच्या दरम्यान झालेला करारनामा तसेच इमारतीतील सदनिकाधारक यांचा ना-हरकत दाखला इत्यादी बाबी तपासण्यात येतील. त्यानुसारच परवानगीचा विचार केला जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून या संदर्भात वेळोवेळी निर्गमित होणारे आदेश, निर्णय देखील यापुढे टॉवर्सधारकांवर बंधनकारक राहणार आहे. यापुढे पालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय शहरात कुठेही टॉवर उभारले जाणार असतील तर असे टॉवर्स काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही पालिकेच्यावतीने देण्यात आला आहे.