Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘एटीव्हीएम’द्वारे मिळणाऱ्या रेल्वे पासविषयी सावधानतेचा इशारा
पंकज ओसवाल यांचे निवेदन
कर्जत, २० जानेवारी/वार्ताहर

 

ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीनच्या माध्यमातून म्हणजेच ‘एटीव्हीएम’द्वारे काही दिवसांपासून दिल्या जाणाऱ्या रेल्वे पाससंबंधी कर्जतमधील सामाजिक कार्यकर्ते आणि कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे सदस्य पंकज ओसवाल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला सावधानतेचा इशारा दिला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी या यंत्रणेत असलेली त्रुटी दूर करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
पंकज ओसवाल यांनी यासंदर्भात मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना लेखी निवेदन सादर केले असून, त्यामध्ये या समस्येविषयी आवश्यक त्या पुराव्यांसह माहिती देण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि मध्य व पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनादेखील पाठविण्यात आल्या आहेत.
यंदाच्या वर्षीपासून उपनगरी रेल्वेच्या कार्ड तिकिटांप्रमाणेच मासिक आणि त्रमासिक सिझन तिकिटे म्हणजे पासेसदेखील ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीनच्या माध्यमातून म्हणजेच ‘एटीव्हीएम’द्वारे उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ‘क्रिस’ या रेल्वेच्या उपक्रमाद्वारे ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. सध्या या मशीनच्या माध्यमातून केवळ उपनगरी गाडीची म्हणजे लोकलचीच तिकिटे उपलब्ध करून दिली जात आहेत. असे तिकीट मिळविण्याकरिता प्रवाशांना स्मार्ट कार्ड खरेदी करावे लागते. या कार्डच्या सहाय्याने ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीनच्या माध्यमातून म्हणजेच ‘एटीव्हीएम’द्वारे उपनगरी गाडीचे तिकीट मिळू शकते, मात्र अशा प्रकारे या ‘एटीव्हीएम’चा उपयोग करून काढण्यात आलेल्या तिकिटांवरील माहिती अथवा तपशील हा काही दिवसांच्या कालावधीतच फिक्कट अथवा अंधुक होत जाऊन कालांतराने हा मजकूर पूर्णपणे पुसला जातो, असे पंकज ओसवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या सप्रमाण निदर्शनास आणून दिले आहे. हे पुरावे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत.
नेमकी हीच बाब या मशीनद्वारे मासिक अथवा त्रमासिक पासेस काढल्यानंतर प्रवाशांसाठी कमालीची त्रासदायक ठरणार आहे. याकडे पंकज ओसवाल यांनी लक्ष वेधले आहे. सध्या अशा मशिन्समध्ये वापरली जाणारी शाई ही मुळीच टिकाऊ स्वरूपाची नाही. त्यामुळेच तिकिटावरील मजकूर हा केवळ काही दिवसांतच नष्ट होतो. जर मासिक अथवा त्रमासिक पासेसवरील मजकूर अशाच प्रकारे फिक्कट झाला अथवा पूर्णपणे पुसला गेला, तर तिकीट तपासनीसांकडून संबंधित प्रवाशांची अडवणूक केली जाऊ शकते, असे ओसवाल यांनी निदर्शनास आणले आहे. हीच संभाव्य अडचण लक्षात घेऊन या मशिन्सद्वारे मासिक आणि त्रमासिक पासेसची उपलब्धता सुरू करण्यापूर्वी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी, अशी आग्रहाची विनंती पंकज ओसवाल यांनी केली आहे.