Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

दरामध्ये कपातीच्या शक्यतेने पेट्रोल-डिझेलची टंचाई
रत्नागिरी, २० जानेवारी/खास प्रतिनिधी

 

केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये नजीकच्या काळात कपात होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन पेट्रोल पंपचालक साठा कमी ठेवत असल्यामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची पुन्हा एकवार तीव्र टंचाई जाणवत आहे.
देशभरातील तेल कंपन्यांचे अधिकारी आणि मालवाहतूकदारांनी गेल्या आठवडय़ात संप मागे घेतल्यानंतर काही दिवस सर्वत्र पेट्रोल-डिझेल मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत, पण गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकवार काही पंपांवर ‘पेट्रोल संपले’ असे फलक, तर पेट्रोल-डिझेल उपलब्ध असलेल्या मोजक्या पंपांवर सर्व प्रकारच्या वाहनांच्या रांगा, असे दृश्य दिसू लागले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे सरचिटणीस उदय लोध यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या बेमुदत संपामागे डिझेलचा दर कमी करावा, अशी प्रमुख मागणी होती. हा संप मिटल्यानंतर केंद्र सरकार त्यादृष्टीने पावले उचलण्याची चिन्हे दिसू लागली होती. त्यामुळे सध्याच्या दराने पेट्रोल-डिझेल आणले आणि त्या साठय़ाची विक्री चालू असतानाच सरकारने दरामध्ये कपात करून त्वरित अंमलबजावणीचा आदेश दिला, तर पंपचालकांना आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे एरवी साधारणत: तीन दिवसांचा पेट्रोल-डिझेल साठा ठेवणारे पंपचालकही सध्या ज्या-त्या दिवसाच्या गरजेपुरतेच पेट्रोल-डिझेल मागवू लागले आहेत. त्यातच गेल्या रविवारी सुट्टी असल्यामुळे काल सर्वत्र कमी प्रमाणात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा झाला आणि ते थोडय़ाच वेळात संपले. आजही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. टंचाईची स्थिती लक्षात घेऊन ग्राहक गरजेपेक्षा जास्त पेट्रोल-डिझेल आपल्या वाहनांमध्ये भरतात, असेही निदर्शनास आले आहे.
या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून पुन्हा सध्याची टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. केंद्र शासनाकडून दराबाबत स्पष्ट निर्देश मिळेपर्यंत ही कृत्रिम टंचाई चालूच राहण्याची शक्यताही लोध यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पेट्रोल-डिझेल दराबाबत आढावा घेऊन निर्णय देणाऱ्या समितीची बैठक येत्या गुरुवारी (२२ जानेवारी) होणार आहे. त्यामध्ये ठोस निर्णय झाल्यास टंचाईची स्थिती निवळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.