Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

गुहागरातील बुधल समुद्रकिनारी आणखी २० वीज प्रकल्प

 

चिपळूण, २० जानेवारी/वार्ताहर : तालुक्यातील अडूर-बुधल येथे सागरी लाटांच्या माध्यमातून वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, भविष्यात आणखी २० वीज प्रकल्प या परिसरात होणार असल्याची माहिती अपार ऊर्जाचे संचालक प्रा. गोपाळ बापट व डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे या भागाचा संपूर्ण कायापालट होणार आहे.
बुधल येथील समुद्रकिनारी खडकातल्या एका भागात समुद्राचे पाणी आत घेतल्याने तेथे बसविलेले पॅनल लाटांच्या धक्क्याने हलतात व पंप सुरू होतात. एवढीच क्रिया लाटा करतात. हे पंप सुरू झाल्याने टाकीत साठवलेले गोडे पाणी टेकडीवरच्या टाकीत पोहोचते व तेथून ते खाली पाईपने येऊन टर्बाइनवर पडते व वीज निर्मिती होते. ही वीजनिर्मिती विद्युत निर्मिती मंडळाच्या विजेसारखी ग्रीड टाईप क्वालिटी इलेक्ट्रिक असून, ती थ्री फेज असणार आहे. तिचा दाब ४१५ व्होल्टस राहणार आहे.
या प्रकल्पासाठी २० हजार लिटरच्या तीन गोडय़ा पाण्याच्या टाक्या खाली बसविण्यात आल्या असून, १०० मी. उंचीवर १२ इंच व्यासाच्या पाईपद्वारे पाणी नेऊन ते टाकीतून ६ इंच व्यासाच्या पाइपद्वारे टर्बाइनवर सोडण्यात येणार आहे. या टर्बाइनची ६० व्हॅटची क्षमता असून, जनरेटर २५ कि.व्ॉ. क्षमतेचा आहे. पुढे जर विद्युतनिर्मितीत वाढ झाली तर ही यंत्रणा उपयोगी पडेल. टेकडीवरसुद्धा ६० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधलेली आहे. या वीज प्रकल्पाला आतापर्यंत ६४ लाख रुपये खर्च झाला असून, ३४ लाख रुपये अनुदान मेडाकडून मिळाले आहे. ३० लाख रुपये खर्च संचालक बापट व पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: केला असल्याची माहिती दिली. शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाला २००६ साली हा प्रकल्प सादर केला होता. प्रस्ताव सादर करण्यापूर्वी महाराष्ट्र ऊर्जा निर्मिती अभिकरण (मेडा) यांचे अधिकारी व अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे यशस्वी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले होते.
या वीज प्रकल्पाला शासनाकडून परवानगी मिळाल्यावर तो उभारण्यासाठी सीआरझेड परवानगी, शासनाच्या विविध खात्यांची मंजुरी, समुद्राच्या उधाण पाण्यामुळे कामात सातत्याने आलेले अडथळे व प्रकल्पापर्यंत जाण्यास तयार करावा लागलेला रस्ता यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास तीन वर्षांंचा कालावधी लागला. या वीज प्रकल्पाला लागणारे टर्बाइन बसविण्यात आले असून, पाण्याच्या टाक्या व पाईपलाइनचे काम पूर्ण झालेले आहे. वीजमापक यंत्रसामुग्री आलेली असून, खडकात खड्डा मारून तेथील बांधकाम पूर्ण झालेले आहे. या खडकातील बांधकामात क्लॉट पॅनेल बसविण्याचे काम सुरू असून, समोरील खडक फोडून या क्लॉट पॅनेलवर पाणी येणार आहे. यातच निसर्गाने साथ दिल्यास काही दिवसांतच या सागरी लाटांच्या माध्यमातून वीज प्रकल्पाचे स्वप्न साकार होणार आहे.