Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा उफाळल्याने एस. टी. बस ठप्प
सावंतवाडी, २० जानेवारी/वार्ताहर

 

कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकावर होणारा अन्याय आणि सरकारने मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात दंडुकेशाहीचा धाक दाखविल्यानंतर लातूरमध्ये बस जाळण्यात आल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक आंतरराज्य प्रवासी वाहतूक थांबली आहे. आज बेळगावात पुन्हा एकदा या प्रश्नावर वातावरण तंग झाल्याने निपाणी व शिनगोळ या महाराष्ट्रातील हद्दीत एस. टी. बस थांबविण्यात आल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा आणि कर्नाटक सरकारची सीमा हद्द संपते, तिथपर्यंत महाराष्ट्राच्या एस. टी. बस थांबविण्यात आल्या. मात्र बेळगावहून येणारी बस आज आली असल्याचे सावंतवाडी स्थानकातून सांगण्यात आले. बेळगावात महाराष्ट्राच्या बसला धोका असला तरी सिंधुदुर्ग मात्र शांत होता, असे चित्र आज कर्नाटकच्या बस धावत असल्याने दिसून आले.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारच्या एस. टी. महामंडळांना बस बंद असल्याने मोठा आर्थिक फटका बसला, तसेच लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे त्यामुळे हाल झाले. सीमा भागापर्यंत एस. टी. बस जात होती. मात्र नंतर बेळगाव किंवा कर्नाटकात पुढे कसे जायचे, असा प्रश्न प्रवाशांसमोर उभा राहिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भाजीविक्रेते बेळगावहून भाजी आणून भाजीचा व्यवसाय करतात. त्यांच्यावरही या घटनेचा परिणाम जाणवत आहे. महाराष्ट्र एस. टी. महामंडळाने प्रवासी व एस. टी. बसची दक्षता घेण्यास सुरुवात केली असून सीमावर्ती भागात पोलीस दक्षता पाळत आहेत. दरम्यान महाराष्ट्राच्या एस. टी. बसचे आणि महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटक बसचे फलक मराठीत असावेत. कन्नड शब्द त्यावरून तातडीने दूर करावेत, अशी मागणी होत आहे.